Sunday, December 12, 2010

’फुकटची’ करमणुक

प्रसंग १:
मला पुणे-मुंबई प्रवास करायचा होता म्हणून मी दुपारी ३ च्या नीता चं एक तिकीट बुक केलं.जेवण वगेरे करून मी साधारण २.४५ ला ज्या ठिकाणाहून बस निघणार होती तिथे आले, बस उभीच होती, त्यात सामान टाकलं अन पुस्तक वाचायला सुरुवात केली.हळु हळू सगळे प्रवासी आले अन बस निघाली, एक एक बसथांबे करत बस शहराबाहेर पड़ली..अन अचानक खूप जोरात गाण्याचा आवाज़ आला, पुस्तकातून डोकं वर काढुन बघते तर ड्रायव्हर सोबत असणा-या माणसाने टीव्ही सुरू केला होता अन 'मिलेंगे मिलेंगे' नामक एक अतिशय रटाळ सिनेमा लावला होता!! आवाजाची पातळी इतकी जास्त होती की कानात हेड-फोन्स टाकून गाणे ऐकणा-याला सुद्धा अगदी व्यवस्थित सगळा आवाज़ येत असेल!! एक-दोन प्रवाश्यांच्या कपाळावर पूसटशी आठी दिसली पण कोणाला अगदीच त्रास होतोय असं काही वाटलं नाही.

बहुतेक प्रवासी पुणे-मुंबई प्रवासात अगदी थोड़या पैश्यात फुकट सिनेमा बघायला मिळतोय ह्या आवीरभावात बघत होते.

मी ही तो सिनेमा बघायचा प्रयत्न सुरू केला पण आवाजाची तीव्रता इतकी होती की मला सहन होईना अन मी तो सिनेमा सुरू करणा-या भल्या माणसाला जाउन विनंती केली, आवाज़ थोडा कमी करण्याची, असं काहीतरी ऐकून त्याने आधी लक्ष नाही दिलं पण मी थोड़ा ज़ोर दिल्यावर क़ळत-नकाळतसा आवाज़ कमी केला..मी त्याचे आभार मानले अन माझ्या जागेवर येउन बसले..नशिबाने दिवसा प्रवास करत होते अन पावसाळ्याचे दिवस असल्याने खिड़की बाहेर बघत मी पुढचा प्रवास पूर्ण करू शकले.

प्रसंग २:
एकदा मला मुंबई-औरंगाबाद प्रवास करायचा होता म्हणून मी पुन्हा एकदा प्रायव्हेट बस वाल्याकडे तिकीट बुक केलं.प्रवासाची वेळ रात्री ११, दिवसभराचं ऑफीस आटपून मी बस मधे बसले.अगदी १ल्या रांगेतलं सीट मिळालं म्हणून मी खुश झाले.दिवसभराचा शीण आणि पुन्हा रात्रभर प्रवास ह्या विचाराने माझं शरीर आणि डोकं आधीच थकलं होतं..रात्रीचा प्रवास असल्यामुळे मी पांघरुण काढ़लं अन लगेच झोपेची आराधना सुरू केली..मला झोप लागते न लागते तोच अचानक समोरचा टीव्ही सुरू झाला,अंधारात अचानक आलेला तो प्रखर प्रकाश माझे डोळे दीपउन गेला अन पाठोपाठ आलेल्या कर्णकर्कश आवाजाने माझे कान एक क्षण बहीरे झाले..ड्रायव्हर जागा राहावा म्हणून त्याच्यासोबत असणा-या माणसाने एक बावलटपनाचा कहर असलेला असा सिनेमा सुरू केला होता, हे बघून मात्र माझ्या झोपेच्या सुखावर पार वीर्जन पड़लं!!

सिनेमातला तो गोंगाट असहय झाल्यामुळे ५ व्याच मिनिटाला मी त्या माणसाला विनंती केली आवाज़ कमी करण्याची तर माघे असलेला एक प्रवासी अगदी भांडण्याच्या स्वरात 'आम्हाला ऎकु येत नाही, आवाज़ कमी करू नका' अस जवळपास ओरडलाच..मी बापड़ी काय कारणार, शांत बसले अन प्रवास भाड्यासोबत फूकट असलेल्या हया करमणुकीचा बळी झाले!!

प्रसंग ३:
ऑफीस ला जाण्यासाठी गर्दीतुन वाट काढत बेस्ट बस मधे चढ़ले..सकाळची वेळ त्यामुळे तूफान गर्दी, महीलांसाठी राखीव असलेल्या सीट पाशी आले बघते तर काय बेस्ट च्या नवीन उपक्रमांतरगत बस मधे २ ही रांगांसाठी एलसीडी टीव्ही लावलेले.सुरुवातीला कौतुक वाटलं ह्या उपक्रमाचं पण अगदी १० मिनीटातच ते कौतुक गळुन पड़लं..त्या टीव्ही वर जोरजोरात कुठल्या तरी जुन्या सिनेमा चे गाणे वाजत होते..ते संपत नाही की लगेच कुठल्या तरी मॉल ची जाहीरात सुरू झाली, ती संपते न संपते तर लगेच एका सोन्या-चांदीच्या दुकानाची जाहीरात सुरू झाली..बघता बघता पुन्हा एकदा तिच गाणी टीव्ही वर यायला लागली...विचार आला, बस मधे टीव्ही लावण्याची कल्पना ज्याने काढली त्याचा प्रत्यक्षात जर असा उपयोग केला तर ही गोष्ट देखील ’फुकट’ करमणुकीच्या रांगेत जाउन बसेल!!

हे अगदी मोजके प्रसंग मी इथे नमूद केले आहेत पण आपल्या आजूबाजुला हल्ली रोज़च असे ’फुकटची’ करमणुक
करणारे अनेक समाजसेवक किंव्हा समाजकार्य करणारी मंडळं दिसत आहेत.गणपती उसत्सावापासून उभ्या केलेल्या स्पीकर्स च्या भिंती अगदी दीवाळी-दस-यापर्यंत इमाने-इतबारे २४तास आपली करमणुक करत असतात, ती करमणुक कमी पडू नये म्हणुन की काय राजकीय नेत्यांचे वाढदिवस ,प्रचार, सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजा, सार्वजनिक उत्सव हे ही फुकट करमणुकीच्या समाजकार्यात हातभर लावण्याचे काम वर्षाचे ३६५ दिवस करत असतात.

पण ह्या सगळ्या समाजसेवकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की, कृपा करुन, आपलं हे समाजकारण थोड्या कमी आवाजात करा जेणेकरुन आमच्यासारख्या सामान्य माणसांना स्वत: च्या कानांचा बचाव करता येइल.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Saturday, October 9, 2010

अंतर्धान पावता यायला पाहिजे...

काय सहिss कल्पना आहे ना...अंतर्धान पावता यायला पाहिजे.....म्हणजे एका क्षणात मनात येईल त्या ठिकाणी पोहोचता येईल...म्हणजे लहानपणी जसा नकाशा-नकाशा खेळायचो तसं अगदी रोज़ खेळता येईल आणि सगळं जग बिनदिक्कत फिरता येईल.कुठे कसं जायचं इथपासून कोणती बस,ट्रेन किंव्हा विमान ह्याचे टिकेट्स इथपासून ते पासपोर्ट, वीसा च्या परमिशन्स असं काहीच लागणार नाही.अगदी चंद्रावर पण सहज जाउन फेरफटका मारता येईल ;)

रोज़ शाळा, ऑफीस ला जायचं म्हटलं तरी किती सुखात पोहोचता येईल.सिग्नल ला थांबावं लागणार नाही की ट्रेन मधे धक्के खावे लागणार नाहीत,रिक्षा साठी वाट बघावी लागणार नाही आणि सगळ्यांना अगदी वेळेत हव्या त्या ठिकाणी पोहोचता
येईल.रस्त्यावर गाडयांना धावायची गरजच पडणार नाही म्हणजे अग्निशमन दलाच्या गाड्या किंव्हा रुग्णवाहिका सोडल्या तर रस्त्यावर अजिबात गर्दी नसेल,म्हणजे ध्वनी आणि वायू प्रदूषण अगदीच कमी होईल...आह..विचार करून पण एक क्षण शुद्धा हवा आत घेतल्याचा भास झाला...

कोणालाच घरापासून दूर शिक्षण किंव्हा नोकरीला जायची गरज पडणार नाही.ऑफीस संपलं की, घर जगाच्या पाठीवर कुठेपण असलं तरी, लगेच आईच्या हातचं गरम गरम जेवायला हजर राहता येईल.सगळं कुटुंब आजी,आजोबा,मामा,मामी,काका,काकू,सगळी भावंड कधीपण एकत्र येऊ शकतील...

मुली आणि बायकांना ह्या वरदानाचा सगळ्यात जास्त उपयोग होईल...कधीही रात्री उशिरा येताना चुकून कोणी त्रास देतोय असं वाटलं की छू मंतर होता येईल..आणि जर बॉयफ्रेंड किंव्हा नवरयावर नजर ठेवायची असेल तर मग अगदीच सोप्प...बिच्चारे नवरे..

पण हीच गोष्ट शाप बनू शकते...ऑफीस मधून कधीही कॉल येऊ शकतो अन बॉस बोलाउ शकतो.वीकेंड किंव्हा मोठी सुट्टी ह्या गोष्टींना काही अर्थच राहणार नाही.चोरांसाठी तर खूपच सोपं होईल कोणाच्या ही घरात,कोणत्याही क्षणी त्यांना जाता येईल आणि कोणाची चाहूल लागली की लगेच गायब होता येईल..

एक वाईट गोष्ट अशी ही होईल की कोणीपण कोणाच्या ही खाजगी आयुष्यात सहज डोकाउ शकेल!!

पण तरीही..जसे ह्याचे तोटे आहेत तसे फायदे पण आहेत ना...मग मी तर ह्या गोष्टीच्या चांगल्या बाजुकडेच बघेन..कारण glass is always half full for me!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, October 6, 2010

थोडंसं बहिरं व्हायला हवं...

सोमवार सकाळी १०.०० ची वेळ...मी माझ्या कंप्यूटर मधे डोकं घालून समोर आलेला गहन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतीये...तितक्यात बॉस येतो...आज काय काय कामं आहेत ह्याची उजळणी करून घ्यायला..त्याचं होत नाही की माझ्या टेबल वरचा फोन खणखणतो...तिकडून एका यूज़र चा आवाज..हे चालत नाहीये आणि ते सुरू नाहीये...समोर बसणार्‍या मॅनेजर्स ची वीकेंड ला काय काय केला ह्यावर जोरजोरात चर्चा सुरू आहे...इथे माझ्या प्रश्नाचं विराट रूप बघून मी आधीच वैतागलिये आणि त्यात ही आजु-बाजूची जनता नुसती गोंधळ घालतीये...वैताग आलाय मला ह्या सगळ्यांचा...पण त्यांना शांत बसवणार कसं? काश मेरे पास कोई रिमोट कंट्रोल होता!!
डोकं फुटेल आता माझं ह्या गोंगटाने एका दिवशी!!!! आणि अचानक वाटलं...थोडंसं बहिरं व्हायला हवं...

संध्याकाळी ७.३० ची वेळ...कसं बसं ऑफीस मधलं काम आटपून मी बस-स्टॉप ला आले...बस मिळाली पण खूप गर्दी होती..गर्दीतून वाट काढत 'स्त्रियांसाठी फक्त' असलेल्या आसनाजवळ पोहचले...बस जरा हळु झाल्याचं जाणवलं, बाहेर बघितलं तर दूरवर लाल दिवा दिसला आणि त्याच्या आणि माझ्या बस मधे असलेली गाड्यांची भली मोठी रांग ही...तारसप्तकात बायकांच्या गप्पा रंगात आल्या होत्या...दुस-या कोपर्‍यात एक आजोबा त्यांच्या नातवाची खुशाली फोनवरून सॉरी फोन मधे शिरून विचारात होते... मी मात्र आशेने त्या दिव्याकडे बघत होते, कधी एकदाचा हिरवा दिवा लागतो अन बस निघते कारण पोटातले कावळे बाहेरच्या गोंगाटात मिसळून गात होते...हिरवा दिवा लागला अन सगळीकडे एकच गलका प्या-पू,प्या-पू,प्रत्येकाने आपापल्या परीने समोरच्याला निघायची सूचना द्यायला सुरूवात केली...देवा..कित्ती हा आवाज...कान फुटतील माझे...कोण सांगणार ह्यांना...आणि अचानक वाटलं...थोडंसं बहिरं व्हायला हवं...

मधेच एकदा वाटलं बाहेरचा इतका सगळा आवाज सुरू आहे तर आपणच कानात काहीतरी घालावं..मग कापसाच्या बोळ्यापेक्षा थोडा बरा पर्याय मी निवडला आणि एंपी3 प्लेयर घेतला..गाणे, रेडियो ऐकण्यासाठी..रेडियो साठी 10 चॅनेल्स पण सापडले..कौतुकाने थोडे दिवस ऐकलं पण, त्यावरही गाणे कमी आणि नुसत्या जाहिराती आणि त्या आर.जे. ची बडबड...पुन्हा एकदा गोंगाट...

नको...

त्यापेक्षा थोडंसं बहिरच व्हावं असा विचार करून कानाचे दरवाजे अगदीच कामापुरते उघडे ठेवले अन आत डोकावले...माझं मलाच आश्चर्य वाटलं...खूप शांतता होती माझ्या मनात...कुठेतरी कोपर्‍यात एक पुस्तक दिसलं बर्‍याच दिवसांपासून वाचूया म्हणून ठेवलेलं..काही-बही अर्धवट खरडलेला एक कागद फडफडताना दिसला...खूप छोट्या छोट्या गोष्टींवर मनाशी बोलायचा राहून गेलय इतक्या दिवसात हे आठवलं...अन बरं वाटलं हा विचार करून की चला मला ह्या बहिरं होण्याच्या शोधामुळे एक घबाड मिळालं स्वत: ला होणार्‍या त्रासातून वाचवणारं :)

सूचना : ऑफीस मधे बॉस समोर बहिरं राहणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Saturday, May 22, 2010

’केस’ बचाव मोहीम!

अचानक एका रात्री माझ्या मैत्रिणीचा फोन आला, "अगं, खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे!" मला एक क्षण वाटलं, नाकासमोर सरळ चालणा-या या मुलीच्या आयुष्यात अशी कुठली समस्या निर्माण झाली असेल?? मग तिने घाब-या आवाजात सांगितलं, "माझे केस खुप गळत आहेत, काही तरी केलंच पाहिजे!!"

मग काय, माझ्या मैत्रिणीला मी मदत करायचं ठरवलं आणि सुरु झाली आमची ’केस’ बचाव मोहीम!

सगळ्यात पहिले आम्ही धाव घेतली माझ्या आईकडे, तिच्या लांबसडक केसांकडे बघुन माझ्या मैत्रिणीला जरा धीर आला.आईने तर आधी आमच्या पिढीला फ़ैलावरच घेतलं,"तुम्ही आज-कालच्या पोरी, केसांना तेल नको लावायला, आम्ही बघा; मग म्हणाली, रोज तेल लावावं आणि आठवडयाला एकदा शिककाइने केस धुवावेत मग कशाला होतोय केस गळण्य़ाचा त्रास!!" आम्हा दोघींना पण ते पटलं.

पण एकाच आठवडयात माझी मैत्रिण वैतागली, रोज सकाळी उठुन ऑफिस ला जाण्याच्या घाईत तेल लावणं एक तर अवघड त्यात शिककाइने धुतल्यावरही केसांचं तेल जात नाही मग त्यावर धुळ बसली की डोकं सगळं चिकट होतं!!

आता दुसरा पर्याय शोधणं आवश्यक होतं मग आम्ही आमच्या जिवश्च-कंठश्च मित्र-मैत्रीणीं पासुन ते ऑफिस मधे नुकतीच ओळख झालेल्या प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली. कोणी सांगितलं मी अमुक तेल आणि तमुक शैम्पू वापरते तो अगदी छान आहे, जरुर वापर; कोणी सांगितलं फक्त तेल + शैम्पू वापरुन चालणार नाही, कंडिशनर पण वापरलं पाहिजे. जे रुचलं ते माझी मैत्रिण वापरुन बघत होती मग पुन्हा काही दिवसांनी त्याचे दुष्परिणाम दिसले की पुढचा पर्याय आम्ही शोधत होतो. एकीने सांगितलं की माझी पार्लर वाली खुप छान हेड मसाज देते तुला नक्की फ़ायदा होइल! तिच्या कडे २-३ आठवडे जाउनही काही विषेश परिणाम दिसला नाही म्हणुन आम्ही पुन्हा शोधाशोध सुरु केली.

सल्ले तर आम्हाला एकदम सही मिळत होते - कोणी सांगितलं आर्युवेद ट्राय कर, कोणी सांगितलं ’हर्बल का नाही ट्राय करत? त्याचे काही दुष्परिणाम पण नाहीत!!’.कोणी म्हणे आठवडयातुन ३ वेळेस केस धुत जा तर कोणी म्हणे दररोज केस धुत जा पण हद्द तर तेंव्हा झाली जेंव्हा आम्हाला HAIR DYE वापरायलाचा सल्ला मिळाला!!

बरेच आठवडे प्रयोग केल्यावर माझी मैत्रिण अगदी कंटाळली आणि दुर्दैवाने तिच्या केसांनी देखील प्रतिसाद देणं बंद केलं!!ह्या सगळ्यामधे वेळ आणि पैसा तर खर्च झालाच पण मनस्ताप झाला तो वेगळाच.

एवढा सगळा खटाटोप करुनही माझ्या मैत्रिणिच्या केसांची अवस्था खालावतच गेली आणि अगदी मोजण्याइतपतच केस तिच्या डोक्यावर राहिले!!

पण या सगळ्यातुन एक धडा मात्र आम्ही शिकलो...ऎकावे जनाचे अन करावे मनाचे!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, May 11, 2010

आमचा कट्टा - OSM



हल्लीच्या काळात ’कॉलेज कट्टा’ हा शब्द काही नविन नाही. ह्या कटटयाने प्रत्येकाला आयुष्यात थोड्याफ़ार प्रमाणात कडू-गोड अनुभव दिलेले आहेत.अशाच कटटयाचा अनुभव घेण्याचं भाग्य मला ५ वर्ष लाभलं. हा कट्टा म्हणजे अगदीच आमच्या कॉलेजचा भाग नव्हता पण, आमच्या कॉलेजबाहेर असलेल्या एका दुकानाचा भाग होता Om Super Market...म्हणजेच OSM अर्थात आमचा कट्टा!!
कॉलेज सुरु झाल्यावर काही दिवसातच OSM ची ओळख झाली, परराज्यातुन, परदेशातुन आलेले आम्ही सगळे वर्गमित्र-मैत्रीणि (classmates) एकमेकांना OSM च्या क्रुपेने भेटलो. मग रोज कॉलेज सुटलं की, OSM ला सगळ्यांची हजेरी, मग कॉफ़ी आणि veg-puff सोबत सुरु व्हायची चर्चा. अगदी आज काय काय झालं कॉलेजमधे, रात्री जेवायला कुठे जायचं किंवा weekend ला भटकायला कुठे जायचं पासून ते freshers party कुठे द्यायची नविन आलेल्या मुलांना इथपर्यंत सगळ्या योजना इथेच आखल्या गेल्या. ब-याच जणांचे break-ups, patch-ups ह्या कटटयाच्या साक्षीने झाले.
कोणी नविन गाडी घेतली किंवा कोणाला एखाद्या स्पर्धेत बक्षिस मिळालं तरी OSM लाच सगळे भेटून ही बातमी एकमेकांना द्यायचो.
कधी रविवारी भटकायचा कंटाळा आला किंवा कॉलेजला चुकून सुट्टी असलीच तर ह्याच कटटयावर रोज शिकवल्या जाणा-या विषयाच्या चिरफाडी पासून ते देश-विदेशाच्या गहण प्रश्नांवर चर्चासत्र घडायचं.
काही वेळेस काही जणांना दिवाळी ला घरी जायला नाही मिळायचं मग दिवाळी, नविन वर्ष (new year) असे सण OSM वरच साजरे व्हायचे.होंळी तर अगदी सगळ्यांच्या hostel / PG वर खेळून झाली तरी OSM ला किमान अर्धा तास खेळल्या शिवाय कधी पूर्ण झालीच नाही.
कधी अभ्यासाचा कंटाळा आला की, किंवा रात्री जेवण झाल्यावर चक्कर मारायची म्हणून आमच्या सगळ्यांची पावलं आपोआप तिकडेच वळायची.कधी जर एखाद्याचा मूड खुपच off असेल तर त्याला जबरदस्तीने तिकडे नेलं जायचं म्हणजे त्याला डोंगराएवढं वाटणारं दु:ख उंदराएवढं होउन कधी पळून जायचं हे त्याला पण कळायचं नाही.
कॉलेजच्या विविध कार्यक्रमांची आखणी, कॉलेजला कोणत्या स्पर्धेत कोणी भाग घ्यायचा, क्रिकेट च्या सामन्यांसाठी कसं खेळायचं, कुठे जाऊन सराव करायचा ह्या आणि अशा अनेक गोष्टी आम्ही कट्टयावरच ठरवल्या.
OSM आणि कॉलेजच्या सान्निध्यात ५ वर्ष कशी सरली ते कळलच नाही, कॉलेजच्या शेवटच्या सत्रात एकेकाची नोकरी लागली त्याच्याही treats आधी OSM वर मिळाल्या आणि मग hotels मधे!!
हे सगळं वाचून कदाचित तुम्हाला वाटेल, मी आणि माझ्या मित्र-मैत्रीणिंनी फ़क्त उनाडक्याच केल्या या कट्ट्यावर पण नाही, आम्हा घरापासून दुर असणा-या एकटया पोरांना ह्या कट्ट्यामुळेच जिवा-भावाचे मित्र मिळाले, अभ्यासा सोबतच मन मोकळं करायची जागा मिळाली म्हणूनच कदाचित we all could give our best in exams as well as placement activity.
परीक्षा संपल्या तसं सगळेजण नोकरी / घर होती तिकडे निघून गेले..कॉलेज संपलं आणि कट्ट्याचा सहवासही...आता तर नोकरी मुळे एका शहरात असुन सुध्दा भेटणं अगदी अवघड होउन बसलयं, अशा वेळेस OSM ची खुप तीव्रतेने आठवण होते.नशिबाने कॉलेज मधे असणा-या विविध कार्यक्रमांमुळे, Alumni meet मुळे पुन्हा एकदा कट्ट्यावर भेटायचा योग येतो तेंव्हा पुन्हा १ कॉफ़ी आणि veg-puff सोबत ५ वर्षाच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला जातो.
OSM ने आम्हा सर्वांना आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचा काल बहाल केला आहे...
आता मात्र मी या सुखाला पारखी झालीये...आजही office मधून आल्यावर वाटतं काश....OSM यहां भी होता..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, April 7, 2010

इहलोकातील 'स्वर्ग'

इहलोकातील 'स्वर्ग'

कोणालाही हेवा वाटेल अशा ठिकाणी मला सध्या राहायचं भाग्य लाभलं आहे...
आमच्या सदनिकेला एक डझन अर्थात १२ श्वानांचं पथक रक्षक म्हणून लाभलं आहे..हे पथक रक्षण करण्यासोबतच आम्हाला सदनिकेत येताना व जाताना escort करतं अगदी साग्रसंगीत पद्धतीने. तसच हे रक्षक आम्हा रहिवास्यानकरीता रोज रात्री मैफ़ल सजवतात निरनिराळ्या रागांची आणि जर चुकून कोणाला ह्या मैफ़लीत झोप लागलीच तर भल्या पहाटे आपल्या सुमधुर आवाजात उठवायचं महान कामही करतात जेणेकरुन आमची office ची दांडी वाचते ( पण जाग्रणामुळे office मधे वाट लागते.)

परीसर तर इतका रम्य आहे की, सतत अगदी २४ तास आमच्या कानावर संगिताचा वर्षाव सुरु असतो, जवळच असलेल्या highway च्या क्रुपेने!!

सदनिकेसमोरच एक सुंदर इमारत आहे ज्याकडे बघुन लहान मुलांना आहट, phoonk2 अशा गोष्टींचं भय अजिबात वाटणार नाही.

चला आता घरात जाउया,
घरामधली हवा इतकी खेळकर आहे की, ती एक क्षणही आमच्यासाठी थांबत नाही, नळ तर इतके सेवातत्पर आहेत की, एखादा नळ उघडलात तर बाकी सगळ्या नळातलं पाणी देखील ह्याच नळातून तुमचं स्वागत करायला धावत येतं!!

मी राहत असलेल्या घरातील सर्वचजण अतीशय निसर्गप्रेमी आहेत त्यामुळे विजबचत, ध्वनीप्रदुषण टाळणे, जीवनावश्यक वस्तूंचा काटेकोरपणे ( कंजूषपणे ) वापर करणे अशा सवयी सर्वांना आहेत.

विजबचतीसाठी आम्ही अगदी गरज असेल तेंव्हाच दिवे लावतो ( म्हणजे जर कोणी अंधारात धडपडलाच तरच दिवे लागतो.) water heater हा प्रत्येकी अर्धा बादली गरम पाण्यासाठीच वापरला जातो.ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी घरामध्ये संभाषण अतीशय कमी वेंळा केलं जातं आणि मोठ्यांदा हसणे, बोलणे इथे वर्ज्य आहे.

घरातल्या मुख्य व्यक्तिच्या मते प्रत्येकी १च जोडी चप्पल व २ किंवा फ़ार फ़ार तर ३ जोडी कपडे असावेत जेणेकरुन जागेचा व सामानाचा अपव्यय टळेल.

जीवनावश्यक गोष्टी उदाहरणार्थ मीठ; बाजारात जर कधी त्याची तंगी निर्माण झाली तर आपली पंचाईत नको व्हायला म्हणून ते वापरलच जात नाही आणि अगदी रोज आमच्याकडे देवाचा नैवेद्य ( मीठ नसलेलं ) जेवण वाढलं जातं...

तर अशा इहलोकीच्या स्वर्गात मी राहते...anybody would like to join??

हे सगळं वाचून तुम्हाला वाटेल की, मला वेड लागलय....पण, खरच जेंव्हा आपण अशा छान छान परीस्थितीत राहतो, मनाला मुरड घालून चालत राहतो तेव्हा कळते किंमत आईच्या हातच्या जेवणाची, घराची...

घर...जिथे रोज संध्याकाली हसतमुखाने स्वागत करायला आपलं कुटुंब वाट बघत असतं...जर कधी अडचण आलीच तर ढाल बनून संरक्षण करायला देखिल तेच पुढे येतं!!

खरच स्वत:चं घर, कुटुंब हाच इहलोकातील 'स्वर्ग' !!

IndiBlogger - The Indian Blogger Community



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check