Monday, May 30, 2011

पाणी-पुरी


बस्स!! ठरलं आता, मी काहिहि झालं तरी आज पाणी-पुरी खाणार ह्या विचाराने ’एलको’ मधे गेले आणि टोकन घेउन पाणी-पुरीवाल्या स्टॉलच्या समोर उभी राहिले पण, पहिली पुरी हातात घेतली आणि एखाद्दा चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून १३ एप्रिल २०११ च्या वर्तमानपत्रात आलेली ती किळसवाणी आणि धक्कादायक बातमी समोर आली आणि मी ती पुरी तिथेच टाकुन काढता पाय घेतला!!

हे असं आज तिस-यांदा होत होतं. कोण कुठला तो विक्षिप्त माणुस, त्याने इतका गलिच्छ प्रकार केला आणि मी आज दीड महिना झाला पाणी-पुरीच्या सुखाला मुकले!! आमची आई अगदी नेहमी आम्हांला सांगायची की, बाहेर पाणी-पुरी खात नका जाउ हो, ते लोक कसलंही पाणी वापरतात, दुस-या लोकांनी वापरलेल्याच प्लेटस घाणेरडया पाण्यात धुउन काय देतात आणि कहर म्हणजे त्या लोकांचा अवतार तर असा असतो की कित्येक दिवसात आंघोळ केली आहे अस वाटतच नाही, पण ऎकणार ते आम्ही कसले!!

मला अजुन आठवतं, उन्हाळयाच्या सुट्टीत मामा, मावशी कोणाच्याही गावाला गेलो तरी आम्ही एकदम टेस्टी पाणी-पुरी कुठे मिळते हे शोधत शोधत कमीत-कमी ३ पाणी-पुरीवाल्यांकडे जाउन पाणी-पुरी खायचो. पुण्याला कधी मनमीत चाटवाल्या कडे ’मिनरल वॉटर’ पाणी-पुरी तर कधी नागपुरला सिता-बर्डीमधे स्पेशल पाणी-पुरी खायचो आणि शाळा-कॉलेज जवळच्या चाटवाल्याकडे तर रोजच हजेरी असायची!!    

तर असं जोपर्यंत पोटात काही दुखत नाही किंवा आजारी पडत नाही तोपर्यंत बाहेर पाणी-पुरी खाण्याचा मोह काही केल्या सुटत नव्हता पण, त्या एका दुष्ट आत्म्याने आम्हां सगळ्यांचे डोळे अगदी एका क्षणात उघडले!!!

ती बातमी आल्यानंतर सामान्य माणसांना धक्का बसला पण त्याही प्रसंगी काहि राजकीय पक्षांनी त्या माणसासकट इतर पाणी-पुरी चे ठेले असणा-या निर्दोश लोकांना त्रास दिला, अगदी आठ दिवस हे नाटक सुरू होतं. पण, ज्या मुंबई मधे बॉम्बस्फोट झाल्याच्या दुस-या दिवसापासुन सुरळीत व्यवहार सुरू होतात तिथे इतक्या छोटया गोष्टीचा परिणाम आठ दिवस राहिला हेच खुप होतं आणि मग काय लगेच पुन्हा एकदा सगळे पाणी-पुरी वाले आपापले ठेले घेउन समाजकार्य करायला सज्ज झाले!!!

आणि मी मात्र अजुनही माझ्या मनाला ह्या धक्क्यातुन सावरण्यासाठी समजावत राहिले!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Saturday, May 28, 2011

पहिलेपण..


आपल्या आयुष्यात पहिलं असं काहितरी जे घडतं त्याला किती महत्त्व असतं नाइ...

आपल्याला कळायला लागल्यानंतर साजरा झालेला पहिला वाढदिवस...
आपली पहिली शाळा...
पहिली मैत्रिण किंवा मित्र...
पहिलं मिळालेलं बक्षिस...
प्रत्येक पावसाळ्याच्या सुरूवातीला अनुभवलेला पहिल्या पावसाचा पहिला थेंब...
कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या मुखकमलावर पडलेलं सूर्याचं पहिलं किरण...
नविन वर्षाचा पहिला दिवस...
शाळा-कॉलेजात आवडलेली पहिली व्यक्ती...
सुचलेली पहिली कविता...
पहिलं प्रेम...
कॅम्पसमधुन लागलेली पहिली नोकरी...
आईच्या हातावर ठेवलेला पहिला पगार...
आवडत्या हिरो किंवा हिरोईनचा फस्ट डे फस्ट शो बघितलेला सिनेमा...
वर्तमानपत्रात किंवा कुठेही प्रसिद्ध झालेला पहिला लेख किंवा ब्लॉग...
घरात आलेलं पहिलं बाळ...
पहिला अ‍पघात (अर्थात, त्या अपघातामधुन पूर्णपणे बरं वाटल्यावर )...
आपण लावलेल्या रोपटयाला आलेली पहिली कळी...
स्वयंपाक शिकुन यशस्वीपणे बनविलेला पहिला पदार्थ...
स्वकमाईतून घेतलेलं पहिलं घर...
पहिली गाडी...

ह्या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येतात आणि आपल्या मनावर छाप सोडून जातात, तर कधी आयुष्यही बदलून जातात.कधी-कधी काही कडू अनुभवही पहिल्यांदाच येतात पण अशा गोष्टींमधुनच तर आपण शिकत पुढे जाउ शकतो...


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, May 23, 2011

!! प्रतिज्ञा !!


सकाळी ऑफिसला जाताना एका शाळेत सुरू असलेली प्रतिज्ञा ऎकू आली आणि मी नकळत माझ्या शाळेत पोहोचले!!
रोज शाळेत आल्यावर प्रार्थना झाली की, आम्ही सगळे विद्दार्थी छातीवर उजवा हात ठेउन प्रतिज्ञा म्हणायचो..
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत....किती भाबडं जग असतं ना शाळेचं..बाई सांगतात म्हणून आपण रोज किती तरी वर्षं प्रतिज्ञा म्हणालो, त्या वेळेला ह्या सगळया वाक्यांचा अर्थ कितपत कळाला माहित नाही पण, आज इतक्या वर्षांनंतर मला ही प्रतिज्ञा एका वेगळ्याचं अर्थाचं दर्शन देउन गेली!!
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत (तरीहि आम्हांला प्रांतियवाद प्रिय आहे.पण, असंही आहे की आमच्या देशात घुसून आमच्याच लोकांना मारणा-याला मात्र आम्ही एखाद्या व्ही.आय.पी पेक्षा जास्त चांगली वागणूक देतो.) माझ्या देशावर माझे प्रेम आहे.(म्हणून तर कुठेतरी आम्हांला फक्त आमचे हक्कच दिसतात आणि देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे आम्ही विसरत चाललो आहे!!) माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.(ह्याचा प्रत्यय म्हणून की काय आपल्याच देशातील जनता ज्या ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देते तेथे आपल्या अस्वच्छतेचा नमूना प्रदर्शित करते.) त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.मी माझ्या पालकांचा, गुरूजनांचा आणि वडिलधा-या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.(दुर्दैवाने आज म्हाता-या आई-वडिलांचा भार कोणालाच सहन होत नाही आणि त्यांची रवानगी वृध्दाश्रमात होते.गुरूजनांचं भाग्य तर काय बोलावं, शाळेत असतानाच मुलं त्यांच्याबद्दल आदराने बोलत नाहीत). माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.(म्हणूनच सगळे नेते एकमेकांत चढाओढ लागल्या सारखे एकापेक्षा एक असे घॊटाळे करून जनतेचे रक्त शोषत आहेत!!) त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.(खरंच????!!!!)

कधीकाळी आपल्या देशातून सोन्याचा धुर निघायचा असं ऎकलं होतं, ती गोष्ट आजही खरी आहे.आजही सोन्याचा धुर निघतोय पण त्याला कुठेतरी काळा रंग प्राप्त झाला आहे!! शाळेत असतांना आपला देश कोणकोणत्या धान्य, खनिजे अशा गोष्टींबाबत जगात कोणत्या क्रमांकावर आहे हे शिकलो होतो पण आज आपला देश लोकसंख्येत पहिला क्रमांक पटकाविण्याच्या तयारीत दिसतोय आणि आपल्या राजकारण्यांपैकी एकाने आत्ताच जगातील दुस-या क्रमांकाचा भ्रष्टाचारी म्हणून उच्च पद प्राप्त केलं आहे!!

काळानूसार ही प्रतिज्ञा शालेय पाठयपुस्तकांतून बदलायला हवी की कुठेतरी आपण ही प्रतिज्ञा फक्त शाळेपुरती न ठेवता शाळेबाहेरच्या जगात ती आमलात आणयला हवी!!?!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check