Sunday, July 22, 2012

श्रावणमास - श्लोक


सकाळी झोपेतून जागे झाल्यावर अंथरूणात बसून हाताची ओंजळ करून म्हणावयाचा श्लोक.
   कराग्रे वसते लक्ष्मी: करमूले सरस्वती।
   करमध्ये तु गोविंद: प्रभाते करदर्शनम॥
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मूलभागी सरस्वती आणि मध्यभागी गोविंद वसतो म्हणून सकाळी तळहाताचे दर्शन घ्यावे.

अंथरूणावरून उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी, जमिनीला नमस्कार करून म्हणावयाचा श्लोक.
   समुद्रवसने देवी । पर्वतस्तनमण्डले ।
   विष्णुपत्नि । नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
समुद्ररूपी वस्त्र धारण करणा-या, पर्वतरूपी स्तन असलेल्या, भगवान विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, तुला मी नमस्कार करतो.माझ्या पायाचा तुला स्पर्श होणार आहे त्याबद्दल मला क्षमा कर.

पूर्वीच्या काळी कडुनिंब किंवा गावरान बाभळीच्या काडया दात घासायला वापरल्या जात असत त्यामुळे वनस्पतीजवळ मागणी मागणारा पण एक श्लोक असा 
   आयुर्बलं यशो वर्च: प्रजा: पशून वसूनि च ।
   ब्रम्ह प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ॥
हे वनस्पती, तू आम्हांला आयुष्य, बळ, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रम्हाला जाणण्याची व आकलन करण्यासारखी उत्कृष्ट त-हेची तेजस्वी बुद्धी दे.


आंघोळ करतांना म्हणावयाचा श्लोक.
   गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
   नर्मदे सिंधु कावेरि जलेsस्मिन सन्निधिं कुरू ॥
हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

सूर्यदेवाला नमस्कार करतांना म्हणावयाचा श्लोक.
    आदिदेव । नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
    दिवाकर । नमस्तुभ्यं प्रभाकर नमोsस्तु ते ॥
हे आदिदेव सूर्यनारायणा, मी तुला नमस्कार करतो. हे प्रकाश देणा-या भास्करा, तू प्रसन्न हो. हे दिवाकरा, तुला मी नमस्कार करतो. हे तेजस्वी प्रभाकरा, तुला मी प्रणाम करतो.

गुरूंना वंदन करतांनाचा श्लोक.
   गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर: ।
   गुरू: साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: ॥
गुरू हेच ब्रम्हदेव, गुरू हेच सर्वव्यापक भगवान विष्णू, गुरू हेच कैलासराणा शिवजी, गुरू हेच साक्षात परब्रम्ह होत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.


दिवा लावतेवेळी म्हणावयाचा श्लोक.
    शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपद: ।
    शत्रुबुध्दिविनाशाय दीपज्योतिर्नमोsस्तु ते ॥
हे दीपज्योती, तू शुभ आणि कल्याण करतेस. त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपत्ती देतेस. शत्रू मानणा-या बुध्दीचा नाश करतेस, म्हणून तुला मी नमस्कार करतो/करते.

झोपण्याआधी म्हणावयाचा श्लोक.
   कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
   प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥
वसुदेवाचा पुत्र जो भगवान श्रीकृष्ण त्याला, सर्व दु:खे हरण करणा-या परमात्म्याला, शरण आलेल्या लोकांचे क्लेश दूर करणा-या गोविंदाला वारंवार नमस्कार असो.

Wednesday, July 18, 2012

श्रावणमास - दर्श ठाणवयी अमावस्या



आज दर्श ठाणवयी अमावस्या.

श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते.पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.

आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं.मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून,गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे.गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून 'दिव्याची कहाणी' वाचून ह्या पूजेची सांगता होत असे.ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा.हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत.

अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.




या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check