Monday, September 30, 2013

'नवरा' एक खोज - भाग १० ( अंतिम )

सहा महिन्यांचा परदेशदौरा करून घरी आले आणि बाबांनी भलीमोठी यादी माझ्यासमोर ठेवली. यादी कसली विचारा, हं बरोब्बर! ती यादी होती 'यंदा कर्तव्य असणा-या मुलांची'! मी मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला Fool आणि स्वतःला आठवण करून दिली की हम्म अजून आपला नवरा शोधायचा

राहिला आहे,मी विसरलेच होते Blush

हूह! तर मी ती यादी हातात घेतली आणि लॅपटॉप उघडून एकेका मुलाचं प्रोफाईल बघायला सुरूवात केली.जे जे ठीक वाटले त्यांच्या नावावर टीक करून यादी निकालात काढली.

प्रत्येकवेळेस जे तंत्र वापरतो ते यावेळेस नको हा एक विचार मनात आला आणि मी सगळ्यात आधी ऑनलाईन प्रोफाईल मधे टाकलेला माझा 'टीपीकल' फोटो बदलून मला चांगला वाटलेला साडीतला एकच फोटो लावला Smile

त्यानंतर ठरवलं की डोळे बंद करून कुठल्यातरी एका प्रोफाईलवर क्लीक करायचं आणि त्यालाच फक्त मेल पाठवायचं.पण पूर्वानुभवानुसार जर उत्तर आलंच नाही तर किती वेळ थांबायचं, म्हणून जास्तीत जास्त ३आठवडे वाट बघायची आणि पुढच्या मुलाच्या प्रोफाईलकडे वळायचं असं ठरवलं.

मग ठरवल्याप्रमाणे मी एक प्रोफाईल सलेक्ट केला आणि त्याला मेल पाठवून दिलं.

दोन दिवसातच त्या मुलाच्या वडीलांचा घरी फोन आला.त्यांनी माझी पत्रिका अमूक गुण जुळते असं सांगितलं आणि पुढचा काय विचार आहे असं विचारलं.

बाबांना सांगितलेलं असल्यामुळे बाबांनी,'मुलांना एक-दोनदा भेटू द्या म्हणजे कळेल आपल्याला',असं सुचवलं.मुलाचे वडील लगेच तयार झाले.मुलाचा फोन नंबर घेऊन बाबांनी मला त्याच्याशी संपर्क करायला सांगितला.

मी परत एकदा शुक्रवारची निवड केली आणि मुलाला संपर्क करून कुठे भेटायचं,किती वाजता भेटायचं ते ठरवलं.ह्या मुलाने कोणत्याही अंतराचं मोजमाप न-देता,आढेवेढे न-घेता ठरलेल्या वेळेला भेटायचं कबूल केलं.मला थोडं आश्चर्य वाटलं पण हायसंही वाटलं Smile

संध्याकाळी ६वाजताची वेळ ठरली होती आणि मला ५.५५वा. त्या मुलाचा मेसेज आला की,मी ठरलेल्या ठिकाणी आलो आहे तू आल्यावर फोन कर.

मी वेळेत पोहोचले आणि त्याला फोन केला.आमची भेट झाल्यावर मॉलमधे असणा-या एका कॉफीशॉपमधे आम्ही जाऊन बसलो.

कॉफीशॉपमधे गेल्यावर मेन्यू कार्ड समोर आलं.

त्याने मला विचारलं की इथे कोणती कॉफी चांगली मिळते? मी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे माहित नाही.
मला ते ऐकून थोडी मजा वाटली.मी मेन्यू कार्ड हातात घेऊन माझ्या माहितीतली कोणती कॉफी दिसते का ते बघितलं पण मलाही सापडेना तेंव्हा कॉफीशॉप च्या माणसानेच मदत केली Biggrin

आमच्या गप्पा सुरू झाल्या एकामधून दुसरा, दुस-यातून तिसरा असे विषय निघत गेले आणि फक्त 'अर्धा तास भेटूया' असं ठरवून आलेली मी दीडतासाने फोन वाजल्यावर भानावर आले!
एकमेकांना बाय करून,घरच्यांशी बोलून निर्णय कळवूयात असं म्हणून आम्ही निघालो.

मी स्वतःशीच विचार करत होते की काय झालं आज Shok दीड तास वेळ कसा निघून गेला कळालंच नाही Smile

खूप दिवसांनंतर दोन मित्र भेटल्यावर जशा मनमोकळ्या अगदी मनापासून गप्पा होतात तसं काहीसं वाटलं.
आज पहिल्यांदा मी ह्या मुलाला भेटले आणि तरी इतक्या गप्पा का कराव्याश्या वाटल्या आणि तेही कोणत्याच आडकाठीशिवाय? आजपर्यंत इतक्या मुलांना भेटले पण असं कधीच झालं नाही मग आजच का?

कदाचित तो पण खूप गप्पा मारतो म्हणून झालं असेल का? पण माझं मन इतकं आनंदाने का फुलून गेलं आहे, काय असं वेगळं घडलं? मला तो आवडला आहे का? ओह गॉड Blush

पण परत विचार आला की इतक्या घाईघाईने मी निर्णयाप्रत नको पोहोचायला.घरी जाऊन विचार करू, ताईशी बोलू मग खरं उत्तर कळेल.

घरी आले आणि आधी ताईला फोन केला.आम्ही भेटलो तेंव्हापासून ते आम्ही काय अन कशाकशावर चर्चा केली ते सगळं इत्थंभूत सांगितलं.
ताई शांतपणे ऐकत होती, शेवटी तिने फक्त एकच विचारलं,तुझं अ‍ॅनालिसीस काय आहे त्या मुलाबद्दल? आणि मी सहजपणे बोलून गेले,'ताई, इतक्या निर्मळ मनाचा आणि निरागस मुलगा मला पहिल्यांदाच भेटला आहे'.

ताई अगदी मनापासून हसली आणि म्हटली,'तेरी तो घंटी बज गयी बेटाssss, आय थिंक ज्या सहजतेने तुम्ही आज गप्पा केल्या त्यावरून तुम्हांला दोघांनाही पुढे जायला हरकत नाही'.
मी तर उडालेच ते ऐकून Shok
मी परत एकदा तिला विचारलं,'खरंच तुला असं वाटतंय?'

ताई म्हटली, 'घाई नाही आपल्याला. तुम्ही हवं तर अजून दोन-तीन वेळेस भेटा. जर, तुझं मत आता सांगितल्या पेक्षा वेगळं झालं तर परत आपण विचार करू, हम्म Smile

मी ताईशी बोलून फोन ठेवला पण का कोण जाणे मनामधे असाही विचार आला की,कदाचित तो मुलगा असंच सगळ्या मुलींशी वागत असेल.त्यामुळे जरी मला तो आवडला तरी त्याचं मत काय असेल? तो म्हटला की घरी गेल्यावर कळवेन पण जर त्याने नकार दिला तर? परत माझंच मन मला जागं करत म्हटलं,अगं तो स्वतः म्हटला ना की त्याला अजून एक-दोन वेळेस भेटायला आवडेल म्हणून.

मग परत वाटलं, आता त्याचा फोन येईपर्यंत नकोच विचार करायला.

असं ठरवलं खरं पण माझं मन काही त्याचा विषय सोडायला तयार होईना.रात्रीसुध्दा दोन मिनीटामधे झोपणारी मी संध्याकाळच्या भेटीचा प्रसंग आळवत पडले होते ..रात्री कधी झोप लागली ते कळालं नाही पण दुस-या दिवशी आईने उठवलं तेंव्हा सकाळचे ११ वाजले होते!! Mosking

आईने उठवलं आणि माझ्या चेह-यावरून अगदी प्रेमाने हात फिरवत म्हटली,'त्या मुलाचा थोड्यावेळापूर्वी फोन आला होता.त्याला आणि त्याच्या घरच्यांना सगळं आवडलं आहे.त्याने परत एकदा भेटायला हरकत नाही असं सांगितलं.'
मी तर एकदम खाड्कन जागीच झाले ते ऐकून Biggrin  आणि आईकडे बघतच राहिले. मी स्वप्न तर बघत नाही ना म्हणून स्वतःला चिमटा पण काढून बघितला. पण हो आई खरंच माझ्यासमोर बसली होती आणि अगदी कौतुकाने हसत होती Smile

मी लगेच ताईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली.आम्ही परत भेटल्यावर काय बोलायला हवं ह्याची चर्चा केली आणि तासाभराने त्या मुलाला रविवारी भेटायची वेळ ठरवायला फोन केला.

...पुढे आम्ही दोन-तीन वेळेस भेटलो. खूप खूप गप्पा मारल्या. नोकरी,पगार, एकमेकांची स्वप्नं,स्थायिक होण्याचं शहर, आई-बाबा-कुटुंब,नविन नातं आणि अजून भरपूर काही.

भेटीनंतर प्रत्येक वेळेस मी माझं मत तपासून बघत होते पण ते बदललं नाही.

मग काय एके दिवशी आई-बाबा आणि मी त्या मुलाच्या घरी गेलो लग्नाची बोलणी करायला आणि

फायनली माझं लग्न ठरलं  Blush Mosking Clapping Dance 4 Yahoo

तर अशी ही साठा-उत्तरांची 'नवराखोज' कहाणी पाचा-उत्तरी सफळ संपूर्ण झाली Biggrin

समाप्त

Tuesday, September 24, 2013

'नवरा' एक खोज - भाग ९

चार दिवसात एका प्रोफाईलच्या वडीलांनी घरी फोन केला.आईने सगळी माहिती विचारली आणि दोन दिवसांत कळवतो म्हणून सांगितलं.मी संध्याकाळी घरी आल्यावर आईने मला त्या मुलाचं प्रोफाईल चेक करायला सांगितलं.फोटो व्यवस्थित होता,द्वीपदवीधर होता,घरच्यांबद्दल-स्वतःबद्दलपण नीट माहिती दिली होती.मला सगळं ठीक वाटलं,मी ठीक आहे म्हटलं.

पण, मला तर परदेशी जायचं होतं मग ह्या मुलाला आत्ता भेटणं ठीक राहील का अशी शंका मी उपस्थित केली.त्यावर सगळ्यांचं म्हणणं झालं की जाण्याआधी एकदा भेटून बघ, जर ठीक वाटत असेल तर पाहता येईल पुढचं कसं करायचं ते.मी तयार झाले पण माझी एक अट होती की,मी एकटीच जाऊन ह्या मुलाला एखाद्या कॉफीशॉपमधे भेटेन उगाच कंटाळवाणा,टाईमपास कांदा-पोहे प्रोग्रॅम मला नकोय! वेळेचं गणित बघता आई-बाबा पण तयार झाले.

त्या मुलाच्या घरी बाबांनी फोन केला आणि सांगितलं की,मुलांना बाहेर भेटून घेऊ देत मग सगळं ठीक वाटलं तर आपण भेटू.पण त्या मंडळींनी गळ घातली की तुम्ही घरीच या,घर पण बघणं होईल आणि आपल्या गप्पा पण होतील.पण बाबांनी ते आग्रहाचं निमंत्रण टाळून निग्रहाने 'बाहेर भेटून घेऊ द्या' हे सांगितलं.मुलाकडची मंडळी म्हटली ठीक आहे आम्ही कळवतो.

दुस-या दिवशी सकाळी त्या मुलाच्या वडीलांनी 'आम्हाला हरकत नाही'चं सर्टीफिकेट दिलं आणि मुलीला स्थळ-काळ-वेळ ठरवण्यासाठी फोन करायला सांगा असा निरोपही दिला.

त्या दिवशी मला ऑफिसमधे काम कमी होतं आणि शुक्रवारचा दिवस होता म्हणून मी त्या मुलाला फोन केला.
आज संध्याकाळी ७वाजता अमूक ठिकाणी भेटूया का असा मी प्रस्ताव मांडला, तो म्हटला मी माझं शेड्यूल चेक करून अर्ध्या तासामधे तुला कळवतो.
बरोबर अर्ध्या तासाने त्याचा फोन आला.
पण त्याचं म्हणणं झालं की,
तो: तू सांगितलेली जागा माझ्या ऑफिसपासून १६किमी वर आहे म्हणून आपण १०किमी वर असलेल्या कॉफीशॉप मधे भेटूया का?
मी: पण मला ती जागा माहीत नाही. त्यापेक्षा आपण तमुक ठिकाणी भेटलं तर चालेल का?
तो: पण तिथे सीसीडी आहे का?
मी: मला माहीत नाही पण असायला हवं,ते जर नसेल तर दूसरं कॉफीशॉप चालेल का?
तो: हो ठीक आहे.मग भेटू आपण आज संध्याकाळी ७वाजता.
मी: हो ठीक आहे.

मी ऑफिसचं काम आटोपून ६.५५वा. ठरलेल्या जागी येऊन थांबले.
दहा मिनीटे झाली तरी त्याचा फोन नाही म्हणून मी त्याला फोन केला.पहिल्या वेळेस त्याने उचलला नाही म्हणून मी त्याला मेसेज केला मी तिथे पोहोचल्याचा पण तरी काही रिप्लाय नाही आला Sad

दहा मिनीटाने त्याचा फोन आला की,७.३०वा. भेटायचं ठरलं होतं आपलं तू इतक्या लवकर का आली आहेस तिथे??
मी म्हटलं ७वा. भेटायचं ठरलं होतं!!
तर तो म्हटला पण मी तर आत्ता निघालो आहे ऑफिसमधून त्यामुळे अजून दहा मिनीटांमधे पोहोचेन.मी म्हटलं ठीक आहे आता इतका उशीर तर झालाचं आहे अजून दहा मिनीटे थांबूया Boredom
मी गाणे ऐकत त्याच्या फोनची वाट बघत तिथेच बसून राहीले.

दहा मिनीटांनी त्याचा फोन.तू सांगितलेली जागा कुठे आहे,मला सापडत नाहीये गूगल मॅप्सवर, प्लीज मला गाईड कर.मग मी त्याला रस्त्याचं मार्गदर्शन करत शेवटी जिथे ती जागा आहे तिथवर घेऊन आले,हूह!!

बाईक पार्क करून तो मला हाय म्हटला आणि सीसीडी च्या ऐवजी बरिस्ताचं कॉफीशॉप बघून म्हटला इथे सीसीडी का नाही?? मी म्हटलं कारण इथे बरिस्ता आहे  Blum 3
थोडं घुश्श्यातच त्याने माझ्याकडे बघितलं आणि आम्ही आत गेलो.समोर दिसलेल्या टेबलापाशी जाऊन बसलो.त्याने मला काय घेणार म्हणून विचारलं,मी तिथे असलेल्या मेन्यूपैकी एक शितपेय सांगितलं.पैसे आणि ऑर्डर देऊन तो येऊन बसला आणि..५..१०..१५मिनीटे झाली तरी एकही शब्द बोलला नाही  Shok
मी विचार करत बसले की ह्याला झालंय तरी काय हा बोलत का नाही?पण मी वाट बघून इतकी वैतागले होते की म्हटलं जाऊ देत बोलेल तेंव्हा बोलेल.

तितक्यात आमच्यासमोर शितपेयं आली,त्याने पहिला घोट घेतला आणि ओरडतचं बोलायला सुरूवात केली
तो: ७.३०वा. भेटायचं ठरलं होतं ना मग तू ७वा. का आलीस??
मी: (माझा आवाज शांत ठेउन)अरे पण आपण दुपारी फोनवर जेंव्हा बोललो तेंव्हा वेळ ७ ची ठरली होती.
तो: शक्यच नाही.मला चांगलं आठवतंय आपण ७.३०ला भेटूया असं बोललो होतो!
मी: ठीके! तू ठरवलं होतंस त्याप्रमाणे तू त्याच वेळेला आलास आणि मी माझ्या वेळेला!!

इतक्यात त्याचा फोन वाजला.अगदी हळू आवाजात त्याने,'हो पोहोचलो मी,भेटलो तिला,झालं की कळवतो हं' असं पलिकडच्या माणसाला सांगितलं आणि फोन ठेवला.

तो माझ्यावर असा ओरडेल असं मला अपेक्षितच नव्हतं त्यातही माझी काही चूक नव्हती तरीपण तो मला असं बोलला त्यामुळे मी पण चिडले होते,पण शक्यतो शांत रहावं म्हणून मी नकोच काही बोलायला असं ठरवलं आणि शितपेयं सीप करत बसले.

तो: (इंग्लीशमधे) तुझे ऑफिस अवर्स कधी संपतात.
मी: (मराठीमधे) कामावर अवलंबून आहे तरीपण माझी शिफ्ट ११ ते ८ असते.
तो: (इंग्लीशमधे) तुझं ऑफिस कुठे आहे, टेक्नॉलॉजी काय आहे तुझी
मी: (मराठीमधे) ....
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
तो: (इंग्लीशमधे)..पुढचा प्रश्न
मी मराठीमधून बोलत असूनही तो सारखा इंग्लीशमधूनच बोलतोय म्हटल्यावर मी पण इंग्लीश स्रुरू केलं.
तो: तुला ऑस्ट्रेलिया आवडतं का? मी तिकडे शिफ्ट होणार आहे.लोक वेड्यासारखे यू.एस. आणि यू.के.च्या मागे लागतात पण त्यांना माहीत नाही की ऑस्ट्रेलियामधे किती स्कोप आहे.मला माझ्या गाईडने सांगितल्याप्रमाणे मी व्हिसासाठीची सगळी प्रोसिजर सुरू केली.त्यामधे इंग्लिशची टेस्ट असते,मग अ‍ॅप्टी असते,मग हे असतं...ते असतं...

मी त्याच्याकडे फक्त बघत बसले होते.त्याच्या इंग्लीशमधे बोलण्याचं कारण मला आत्ता कळालं होतं त्यामुळे मी म्हटलं संपव बाबा तू तुझं 'ऑस्ट्रेलिया पुराण' मग मी बोलेन Mosking

थोड्या वेळाने त्याने थोडा पॉझ घेतला आणि माझ्याकडे बघितलं.मी एक क्षण ब्लँक झाले,आता काय बोलू?
मग तोच म्हटला,तुला काही प्रॉब्लेम नाही ना तिकडे जायला.
मी: पण मला माहीत नाही माझी कंपनी तिकडे ऑपरेट करते की नाही आणि प्रोजेक्ट नसेल तर कसं मिळेल जायला.
तो: अगं मी तर नोकरी सोडून जाणार आहे तिकडे.तिथे गेल्यावर आरामात नोकरी मिळेल माझा गाईड म्हटला आहे मला.
मी: मी एकदम जागीच झाले त्याचं ते वाक्य ऐकून!मी सरळ सांगितलं मी हातातली नोकरी सोडून अशी नाही जाऊ शकत.
तो: पण मला ऑस्ट्रेलियाला जायचंच आहे.
मी: ठीक आहे. पण जर दोघांनी हातातली नोकरी सोडून तिथे जाऊन नव्याने सगळं सुरू करायचा विचार केला तर तिथे राहणार कुठे आणि खाणार काय? तिथे उपयोगी येईल इतका पैसा कसा मॅनेज कसा करणार आहेस तू?
तो: मी आतापर्यंत जितका पैसा कमावला आहे तितका सगळा मी तिकडे नेणार आहे म्हणजे मग नोकरी लागेपर्यंत व्यवस्था होऊ शकते आणि राहायचं म्हटलं तर माझा गाईड त्याची व्यवस्था लावणार आहे त्यामुळे कसलीच काळजी करायची गरज नाही Smile
मी: हम्म.पण तरी मला नाही पटत.एनीवे तुला अजून काही विचारायचं आहे का?
तो: तुला काय वाटतं एकत्र कुटुंबाबद्दल? तुला चालेल का? तू अ‍ॅडजेस्ट करू शकशील का?
मी: हो मला काही हरकत नाही.फक्त एकच आहे की,मी लग्नानंतर सुध्दा नोकरी करणार आहे तर कदाचित बाकीच्यांना माझ्यावेळेसोबत अ‍ॅडजेस्ट करावं लागेल.
तो: तुला काय वाटतं फॅमिली कितपत इम्पॉर्टंट आहे?
मी: फॅमिली महत्त्वाची आहेच पण त्याहीपेक्षा ज्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतित करायचं तो जास्त महत्त्वाचा आहे.
तो: म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की फॅमिली सेकंडरी आहे?
मी: अर्थातच.
तो: नाही मला नाही पटत! फॅमिली सगळ्यात पहिले आणि मग इंडिव्ह्युज्युअल.
मी: सॉरी माझ्यासाठी तरी माझ्या पार्टनरचा स्वभाव आणि त्याचं माझ्या आयुष्यातलं स्थान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग त्याचं कुटुंब.
तो: आय थिंक मग आम्हांला चुकीची माहिती मिळाली तुझ्याबद्दल.
मी: काय? माझ्याबद्दल तुला माहित आहे Shok
तो: हो. तुझ्या आईसोबत माझ्या मामाची मुलगी शिकली आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हांला तुझ्याबद्दल कळालं.पण आम्हांला असं सांगितलं गेलं की मुलगी खूप चांगली आहे, शिकलेली आहे आणि मोठ्यांचा आदर करते.पण जर तुझ्यासाठी कुटूंब सेकंडरी असेल तर मग मला नाही पटणार.

त्याचं सगळं ऐकून मी शॉक झाले पण, माझे विचार किंवा मी कोण अन कशी आहे ही गोष्ट मला त्याला अजून पटवून द्यायची काहीच गरज वाटली नाही.डोक्यातला राग थोपवत मी फक्त म्हटलं,

मी: ठीक आहे. धन्यवाद आपण इथे भेटलात पण परत कधीच भेटू नका,बाय!

कॉफीशॉपमधून बाहेर पडल्या पडल्या मी आईला फोन करून सांगितलं,'असल्या भांडकूदळ आणि चुकीचं असलं तरी स्वतःचंच घोडं दामटणा-या आणि दुस-याचं म्हणणं नीट ऐकून समजावून न-घेणा-या माणसाशी मला लग्न करायचं नाही!!'

Monday, September 16, 2013

'नवरा' एक खोज - भाग ८

रविवारचा प्रसंग झाल्यानंतर मी स्वतःशी परत एकदा बोलायचा प्रयत्न केला.बाबा म्हटले त्याप्रमाणे मला खरंच माहित होतं का कसा पार्टनर हवा आहे ते! आतापर्यंत भेटलेल्या मुलांपैकी मला कोणीच आवडला नव्हता असं का?मला परत एकदा विचार करायची गरज होती,स्वत:ला विचारायची गरज होती.काहितरी चुकत होतं का?की अजून काही वेगळं कारण होतं Sorry 2

माझा ऑफ झालेला मूड बघून आई म्हटली,'जेंव्हा तुझ्या नशिबात असेल तेंव्हाच सापडेल तो. उगाच इकडे-तिकडे डोकं आपटून काय होणार!'
तर ताई परत एकदा समजावत म्हटली की, 'इतकं काही तुझं वय झालं नाही,असेल तुझ्यासाठी नक्कीच कोणीतरी.ते म्हणतात ना,स्वर्गात गाठी बांधलेल्या असतात तो समोर आला की तेरे दिमाग मे घंटी जरूर बजेगी' आणि तेवढ्यात माझा भाऊ त्यामधे अॅड करत म्हटला,'आणि हो तुझ्या आजूबाजूला अचानक व्हायोलिनचे सूर वाजू लागतील..सगळीकडे अगदी प्रकाश भरून उरेल आणि पांढ-याशुभ्र घोड्यावर बसून तो राजकुमार तुला घ्यायला येईल'.. आणि फस्स करून आम्ही सगळे हसत सुटलो Biggrin

माझ्या मनावरचं मळभ थोडंतरी दूर झालं पण बाबांनी मात्र मनाशी एक विचार पक्का केला.माझी पत्रिका कुठल्यातरी भटजीला दाखवायची.बाबांनी एकदा मनावर घेतलं की मग ते कोणाचंच ऐकत नाहीत त्या दबंगच्या चुलबुल पांडेसारखं Mosking

तर बाबांनी लगेच एका भटजीला माझी पत्रिका दाखवली आणि माझ्या लग्नामधे उशीर का होत आहे ह्याचा उलगडा झाला. त्या भटजींनी सांगितलं की मुलीच्या लग्नघरात राहू आणि केतूचा वास असल्या कारणाने तिच्या लग्नामधे विलंब होत आहे. ह्यावर उपाय एकच! तिची नक्षत्रशींती करून घ्या, माझ्याकडे केलीत तर डिस्काऊंट मधे करून देईन अथवा तुम्ही दुसरा भटजी शोधू शकता Yes 3

माझ्या पत्रिकेमधे इतका गोंधळ सुरू असेल अशी कोणालाच कल्पना नव्हती.ह्याचा परिणाम असा झाला की सगळे मला म्हटले, बाळ तुझी काही चूक नाही जर आतापर्यंत कोणी आवडला नसेल तर, तुझ्या पत्रिकेमधेच प्रॉब्लेम आहे.तू काळजी नको करूस आपण काहीतरी उपाययोजना नक्की करू Biggrin

मला एक गोष्ट कळेना, आपल्या ग्रहमालेमधे राहू-केतू नामक कोणताच ग्रह / लघुग्रह / मानवी उपग्रह नाही मग हे दोन पठ्ठे माझ्या पत्रिकेमधे आले कुठून Unknw बरं ते जरी असले वरती आकाशामधे बसलेले तरी त्यांचा माझ्यावर इथे पृथ्वीवर ते पण डायरेक्ट पत्रिकेमधे कसा काय परिणाम होऊ शकतो  Shok आणि जर ती नक्षत्रशांती वगैरे केली तरी त्यांच्या डोक्यावर खरंच अक्षता पडतील, त्यांना दिलेला नैवेद्या चाखून ते खरंच माझ्या लग्नाला संमती देतील Scratch one-s head

काय यार आजच्या जमान्यामधे अजूनही ह्या गोष्टी का पाळल्या जातातNea
मी तर सरळ विरोध दर्शवला आणि स्पष्ट सांगितलं घरच्यांना मी अशी कोणतीही पूजा करून घ्यायला तयार नाही पण शेवटी ते माझे जन्मदाते ना, इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडून त्यांनी हे कर्मकांड करवून घेतलंच Dash 1

त्यांच्या दबावाला बळी पडून मी पूजा तर करवून घेतली पण आता मला बघायचंच होतं की भटजींनी दिलेल्या डेडलाईन मधे माझं लग्न होतं की नाही Aggressive

भटजींच्या मते नक्षत्रशांतीची पुजा त्यांनी इतकी पावरफुल्ल बांधली होती की एक महिन्यामधे माझं लग्न झालंच पाहिजे नाहीतर दक्षिणा परत!

घरच्यांना ते ऐकून कोण आनंद झाला पण आतापर्यंत आलेल्या अनुभवामुळे म्हणा किंवा मला कदाचित भविष्य जणू कळालं म्हणा माझा आतला आवाज कुत्सितपणे हसून म्हटला,'शक्यच नाही, एक महिन्यात काय पुढच्या निदान चार महिन्यांमधे तरी हे होणार नाही.आत्ताच त्या ब्राम्हणाला म्हणावं की दक्षिणा बाजूला काढून ठेव मी परत घ्यायला येईन I-m so happy

बाकी भटजींनी केलेल्या त्या आकाशवाणीमुळे माझ्या बाबांनी 'वर'संशोधन डब्बल-स्पीडने सुरू केलं.
पण काही दिवसांतच मला ऑफिसमधे सांगण्यात आलं की,मला तब्बल सहा महिन्यांकरता परदेशी जावं लागणार आहे Yahoo,हे ऐकलं आणि माझ्या अंतर्मनाने टाळी दिली वर डॉयलॉगही मारला,'बघ मी म्हटलं होतं ना Diablo

मी घरी आल्यावर ही बातमी ऐकवली आणि सगळं घर एकदम खुश झालं.परदेशी जाण्याची संधी इतकी अलगद चालून आल्यामुळे मी तर हवेत तरंगतच होते.पंधरा दिवसांतच मला निघायचं होतं म्हणून मी आणि आई लगेच याद्या करायला बसलो आणि ह्या सगळ्यामधे मी 'वरसंशोधन' वगैरे काही सुरू आहे हे पार विसरून गेले Biggrin

Thursday, September 12, 2013

'नवरा' एक खोज - भाग ७

प्रत्यक्ष भेटी किंवा फोनवरून संपर्क अशा पध्दतीने माझ्यासाठी 'नवरा' ह्या प्राण्याचा शोध घेणं सुरू होतं. ह्यादरम्यान एका दिवशी माझं नाव नोंदवलेल्या वधू-वर सूचक मंडळाकडून एक मेल आलं.अमूक एका तारखेला त्यांनी वधू-वर मेळावा आयोजित केला होता.

त्यांच्या म्हणण्यानुसार हा मेळावा अगदी टीपीकल नसून वेगळा होता.वेगळेपण कसं तर, फक्त ज्या मुलांना आणि मुलींनी 'यंदा कर्तव्य आहे' तेच हा मेळावा अटेंड करू शकतात आणि नाव नोंदवणा-या पहिल्या पन्नास जनांना आणि जनींना ह्यामधे प्रवेश होता.मुख्य आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्याही पालकांना ह्या कार्यक्रमामधे सहभागी होता येणार नव्हतं.

बाबा म्हटले तुझं नाव नोंदवू, बघ जाऊन तिथे कोणी सापडतो का Wink
मी पण विचार केला एका-एका मुलाला भेटण्यापेक्षा जर पन्नासजणांना एकदाच भेटता येत असेल तर चांगलं आहे.

तर मेळाव्याचा दिवस उगवला, सकाळी ११ची वेळ ठेवण्यात आली होती त्याप्रमाणे मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले.एका मंगल कार्यालयामधेच त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता Mosking
दारामधे मंडळाच्या दोन काकू बसल्या होत्या त्यांनी माझं नाव विचारून मला एक नंबर दिला आणि आतमधे दिलेल्या नंबरच्या ग्रुपमधे जाऊन बसायला सांगितलं.

आत गेल्यावर बरीच मंडळी ग्रुपमधे बसलेली दिसली.मी माझा ग्रुप शोधला आणि येऊन बसले.आमच्या ग्रुपमधे आम्ही तीन मुली होतो आणि दोन मुलगे बसलेले होते.पाच-एक मिनीटामधे कार्यक्रम सुरू झाला.
एक काका हॉलच्या स्टेजपाशी उभे राहून खणखणीत आवाजात बोलू लागले.मंडळाचा व्यवस्थापक म्हणून
त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि हा मेळावा काय आहे आणि कसा वेगळा आहे हे एकवार सांगून आम्ही बसलेल्यांनी नेमकं काय करायचं हे सांगितलं.

प्रत्येक मुलाला आणि मुलीला एक पत्रक दिलं होतं. त्यामधे मेळाव्याला आलेल्या सर्वांची नाव-गाव-पत्ता-फोन नंबर-शिक्षण-पगार वगैरे माहिती होती.ग्रुपमधे एकूण पाच जण होते. प्रत्येक ग्रुपला एक विषय दिला जाणार आणि त्यावर पाच मिनीटे चर्चा करायचा वेळ दिला जाणार. विषयावर बोलायला सुरूवात करण्याअगोदर प्रत्येकाने स्वतःची थोडक्यात ओळख करून द्यायची. पाच मिनीटे संपली की मुलांनी उठून पुढच्या ग्रुपमधे जाऊन बसायचं आणि परत चर्चा करायची.जर कोणाला एखादा मुलगा आवडला किंवा मुलगी आवडली तर त्या पत्रकामधे त्या व्यक्तीचा नंबर मार्क करून ठेवायचा.प्रास्तावीक करून काकांनी कार्यक्रम सुरू झाल्याची घोषणा केली.

आमच्या ग्रुपला पहिला विषय मिळाला.मी चिठ्ठीमधे लिहीलेला विषय सगळ्यांना सांगितला. मग आम्ही सर्वांनी एक-एक करून स्वतःची माहिती दिली आणि चर्चेला सुरूवात केली.कोणी विशेष काही बोलत नव्हतं.उलट, बसलेली दोन मुलं पत्रकामधे डोकं घालून बसली होती.

पहिल्या विषयाचा वेळ संपला तसे ते दोघे उठून दूस-या ग्रुपमधे गेले आणि नविन दोघे येऊन बसले.त्यातला एकजण अगदी झोपेतून उठून आल्यासारखा आला होता. चेह-यावर दाढी वाढलेली, डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त आणि कपडे तर त्याच्या मापाचे अजिबातच वाटत नव्हते इतके ढगळ!
त्याने स्वतःची ओळख करून देतांना मी 'रॉकस्टार' आहे आणि आमच्या रॉक बॅन्डमधे लीड सिंगर म्हणून काम करतो असं सांगितल्यावर त्याच्या अवताराचा अर्थ लागला Biggrin
दूसरा मुलगा त्यामानाने बराच बरा दिसत होता.

दिलेल्या विषयापेक्षा इतर गोष्टींवर म्हणजे एकमेकांबाबत जास्त माहिती मिळवण्याकडे सर्वांचा कल दिसला पण एक मुलगी अशी होती की ती सारखी सगळ्यांना आठवण करून देत होती की आपल्याला चर्चा करायला सांगितली आहे तर चर्चा करू उगाच वेळ संपली तर प्रॉब्लेम होईल.पण तिच्याकडे कोणी जास्त लक्ष दिलं नाही.

असंच बराच वेळ विषय चेंज होत गेले आणि नवनविन मुलं आमच्या ग्रुपमधे येऊन गेले पण मला कोणी विशेष वाटत नव्हता.अर्ध्याअधिक मुलांना तर असं मेळाव्यामधे एकदम तीन-चार जणांच्या ग्रुपमधे बोलायचं कसं हे सुचत नव्हतं.मुली त्यामानाने नीट माहिती देत होत्या आणि व्यवस्थित विचारही मांडत होत्या.

काही मुलांचा तर, हा सगळा टाईमपास सुरू आहे आणि आज रविवारची सुट्टी कशी वाया गेली असा सूर होता! काही मुलं व्यवस्थित बोलत होती पण मग त्यांच्या अटी अशा होत्या की, मी त्यामधे बसत नव्हते आणि काही मुलं माझ्यापेक्षा वयाने फारच मोठी होती!

दोन-तीन मुलं अशीही भेटली की ती तिस-यांदा अशा मेळाव्याला आली होती, अगदी सराईतासारखी ती आमचा इंटरव्ह्यू घेत होती Biggrin

दोन तास हा सगळा सोहळा चालला, वेळ संपली तसं व्यवस्थापक काकांनी माईक परत हातात घेतला आणि घोषणा केली की आता चहा-पान करून घ्या आणि तुम्हाला जर कोणा मुलाशी/मुलीशी बोलायचं असेल तर त्याला/तिला भेटून चर्चा करा.

पाच-एक मिनीटात सर्वजण हातात चहा घेऊन इकडे-तिकडे फिरू लागले.मी एका कोप-यात उभी राहून मजा बघत होते.हॉलमधे एका ठिकाणी मला बरीच गर्दी दिसली थोडं जवळ जाऊन बघितलं तर,मेळाव्यामधे सर्वात व्यवस्थित दिसणा-या एका मुलाशी तीन-चार मुली बोलायचा प्रयत्न करत होत्या.तो सुध्दा एकदम छाती पुढे काढून प्रत्येकीला अटेंड करत होता.मला गंमत वाटली आणि सहज म्हणून मी त्याचा आणि त्या मुलींचा नंबर चेक केला.तो मुलगा आणि त्या सर्व मुलींमधे जवळपास दहा वर्षांचं अंतर होतं!

मला काय कोणाशी बोलायची इच्छा नव्हती म्हणून मी नंतर तिथून बाहेर पडले.रिक्षा पकडून तडक घरी पोहोचले.घरी सगळेजण माझीच वाट बघत होते.

आईने पाणी दिलं आणि लगेच प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.कसा होता कार्यक्रम, किती जण आले होते, तुला किती आवडले. त्यातच ताईने विचारलं कोणत्या क्षेत्रातले होते,पगार किती काय.त्यांना उत्तर देईतो बाबा पण घरात आले मग त्यांनी सुरू केलं. पत्रिका आहे का त्या मुलांची, कोणाला बघायची नसेल तर तसं कितीजणांनी सांगितलं वगैरे वगैरे!

आई ग! किती ते प्रश्न! Nea

मला कोणीच आवडला नाही असं एकदाच सगळ्यांना उत्तर देऊन टाकलं मी.

ते ऐकून आई-बाबांचा चेहरा खर्रकन उतरला! ताईसुध्दा म्हटली काय? अगं पन्नास पोरांमधून तुला एकही नाही आवडला Shok

मी: ( शांतपणे म्हटलं) खरंच गं ताई मला कोणीच नाही आवडला.
ताई: पण का??
मी: एकतर अर्ध्या पोरांना धड बोलता येत नव्हतं.माहिती विचारली तर तत-पप करत होते.
बाबा:( नाराजीच्या सुरात ) तू दरडावून विचारलं असणार मग ते बिचारे घाबरले असतील, कसा आवाज फुटेल त्यांच्या तोंडून!
मी: बाबा! मी एकटीच मुलगी नव्हते काही तिथे, ग्रुपमधल्या इतर मुलींशी बोलतांना पण तीच अवस्था होती त्यांची. एक मुलगा तर अजागळासारखा उठून आला होता म्हणजे आपण कुठे जात आहोत ह्याचंसुध्दा त्याला भान नव्हतं!
आई: अगं असतात काही मुलं अशी. सगळेच कसे तुझ्यासारखे सगळ्या बाबतीत पर्टिक्युलर असतील.त्या मुलांना सोडून कोणी दूसरं दिसलं नाही का तुला?
मी: अगं अगदीच कोणी चांगलं नव्हतं असं नाही पण जे ठीक वाटले त्यांच्या अटी फार वेगळ्या होत्या गं.
म्हणजे एक डॉक्टर आहे, त्याचा दवाखाना त्याच्या गावामधे आहे. त्याला त्याची बायको तिथे राहणारी हवी आहे मग आता मी माझी नोकरी सोडून तिथे कशी शिफ्ट होऊ?
आई: अगं तिथे दूसरी नोकरी बघ ना, पोरीने नोकरी केलीच पाहिजे असा काही नियम नाहीये!
ताई: आई, नोकरीबाबत तिने तिचा निर्णय घेणं जास्त योग्य आहे. जर तिला नको वाटत असेल तर आपण बळजबरी करण्यात अर्थ नाही.
मी: अगं आई, मी एकवेळ नोकरीवर पाणी सोडलं असतं पण तो मुलगा डॉक्टर. आता त्याच्या दवाखान्यामधे मी काय मदत करणार त्याला? एनीवे. बाकी जे ठीक वाटले ते फार म्हणजे अगदी दहा वर्ष मोठे होते माझ्यापेक्षा मग मला ते नको वाटलं Sad
बाबा: दहाच वर्ष ना, त्यात काय होतं. मुलगा चांगला असेल, व्यवस्थित पगार, घर-दार असेल तर वयातलं अंतर थोडं जास्त असेल तर काय फरक पडतो!
मी आणि ताई एकदम अवाक झालो ते ऐकून!
आई: अहो काही तरी काय बोलत आहात. हल्लीच्या काळी नवरा-बायकोमधे इतकं जास्त अंतर नसतं.आपल्या वेळी ठीक होतं.हल्ली ते जनरेशन गॅप का काय ते असतं म्हणतात. त्यामुळे, नको इतकं अंतर उगाच. जाऊ दे गं, तुला नाही आवडला ना कोणी ठीक आहे. बघू आपण परत शोधू.
बाबा: तू मला एकच गोष्ट सांग, तुला स्वतःला तरी माहित आहे का कसा मुलगा शोधत आहेस तू?? आतापावेतो पन्नास-साठ मुलं बघितलीस पण तुला एकही ठीक वाटला नाही! बघा, कुठेतरी अ‍ॅडजस्टमेंट करायला शिका, सगळंच मनासारखं मिळत नाही प्रत्येकाला.

मी शेवटी तिथून उठून माझ्या रूममधे जाऊन बसले Cray 2

Sunday, September 1, 2013

’नवरा’ एक खोज - भाग ६

एखादा नकार तर येणारच हा विचार करून बाबा तर केंव्हाच पुढची स्थळं शोधत होते.मग मीही स्वतःला रिफ्रेश केलं पुढच्या 'खोज'मोहिमेसाठी Smile
बाबांनी काढलेल्या लिस्टमधल्या ब-याच जणांना आम्ही संपर्क केला त्यातल्या अर्ध्या लोकांनी उत्तर दिलं नाही, ज्यांनी उत्तर दिलं त्यांनी 'नोकरी करणारी मुलगी नको' अशी *कंडिशन नंतर कळविली त्यामुळे तेही निकालात निघाले.राहता राहिले दोन जण.
त्यातला एकजण बँगलोरमधला असल्याने त्याच्याशी फोनवर बोलायचं ठरलं. ठरवलेल्या वेळी त्या मुलाने मला मोबाईलवर फोन केला.मला आता थोडीफार सवय झाली होती त्यामुळे ठरावीक प्रश्नांनी मी सुरूवात केली अन जुजबी माहिती शेअर झाली. त्याही मुलाने साधारण सारखेच प्रश्न विचारले.नंतर त्याने पार्टनर बद्दलच्या अपेक्षा सांगायला सुरूवात केली.
मुलगी दिसायला अगदी सुंदरच हवी,( म्हणजे तुला सामान्य मुलगी नाही ऐश्वर्या नाहीतर कटरिना ऑर करिनाच हवीये Nea )
केस लांब असले तर वेल अ‍ॅण्ड गूड पण अगदीच बॉयकट / बॉबकट नसावा( टीपीकल डिमाण्ड Biggrin ).
तिला चष्मा नकोच कारण आमच्या घरात आम्हांला कोणाला चष्मा नाहीये यूनो,सो..( हे काय आहे?? घरात कोणाला चष्मा आत्ता नाहीये पण उद्या लागणार नाही ह्याची काय गॅरंटी?? अन चष्मा असणं काय असाध्य रोगाचं लक्षण आहे का?? काय रे देवा ही कसली अपेक्षा Shok )
तिने टाईमपास म्हणून नोकरी केली तर चालेल पण मी ऑफिसमधून घरी येण्याआधी ती घरी असायला हवी ( हे भगवाssन! मग तिला नोकरी कशाला करू देतो बाबा Dash 1 )
मला खाण्याची खूप आवड आहे तेंव्हा तिने रोज मला नवनविन पदार्थ करून खाऊ घालायला हवेत.
मी मधेच म्हटलं, पण जर तिला स्वयंपाकच येत नसेल तर??
त्यावर तो म्हटला मग मी कदाचित तिला नापसंत करेन!! ( ग्रेट यार म्हणजे ह्या पोराला करिना कपूरसारखी हिरोईन + नव-याची दारात वाट बघणारी तुलसी + ताज होटेलची शेफ एकत्रितपणे हवीये!! Fool )
ह्या अपेक्षा ऐकून मी विचारलं की हे सगळं असलेली मुलगी भेटली पण जर तुमचा स्वभाव जुळलाच नाही तर?
त्यावर लगेच तो उत्तरला, स्वभाव काय, मुलींना नविन ठिकाणी सगळंच जुळवून घ्यावं लागतं त्याप्रमाणे तिने माझ्या स्वभावासोबत अ‍ॅडजस्ट करून घ्यायला पाहिजे!!
मी ह्याउपर काही बोलूच शकले नाही Sad
त्याने स्वतःच्या अपेक्षांची लिस्ट कंटिन्यू केली.पाचएक मिनीटाने ते सांगून संपल्यावर तो म्हणाला मी आत्ता काही महिन्यांकरता यू.एस.ला जाणार आहे त्यानंतर भेटू मग आपण, मी येईन तुला भेटायला. अच्छा, ठेवतो मग मी आता, अन फोन बंद!!
काय माणूस आहे हा! स्वतःच्या अपेक्षांची घोडागाडी दौडवून पार आमचं लग्न ठरल्यासारखं मला भेटायला येतो म्हटला अन फोन बंदपण करून टाकला!! मला आत्ताच त्याने बोलू दिलं नाही,माझं म्हणणं ऐकूनही घेतलं नाही तो पुढे मला कशी वागणूक देईल?? अन त्याच्या अपेक्षा बघता मी तरी त्याला सूट होणारी नव्हते!!
आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटलं की आजच्याही काळातील तरूण आपली बायको पिक्चरमधल्या हिरोईनसारखी असावी अशी अवास्तव अपेक्षा ठेवतात??? सीक यार Dash 1