Friday, June 27, 2014

आरक्षण

आरक्षण मिळालं! सही है!! मज्जाच मज्जा! आता काय शाळेमधे शिका नाही तर नका शिकू तुम्हांला कॉलेजमधे स्पेशल कोट्यामधे अ‍ॅडमिशन मिळणारच. ज्या काही सवलती कॉलेज देत असेल म्हणजे लायब्ररीतून पुस्तकं, वर्षभराची फीस वगैरे त्यातही सूट मिळणारच. मग पुढे काय तुम्ही इंजिनिअर, डॉक्टरच्या डिग्र्या घेऊन लोकांचे जीव घेणार नाही तर राज समाजकारण करून 'एवढुस्स' पोट भरणार!!!

आमच्यासारखे अनारक्षित कुठे जाणार? शाळेमधून कितीही चांगले मार्क्स घेऊन पास झालो तरी चांगल्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळेल की नाही ह्याची धास्ती असणार कारण, आम्हा अनारक्षितांना फक्त आणि फक्त मार्कांच्या बळावरच आत जाता येणार. कमी मार्क्स म्हणजे मग अगदी सुमार कॉलेजात जा. बरं जरी तिथे जाऊन शिक्षण घेतलं तरी पुढे सरकारी नोकरी मिळणं वगैरे तर स्वप्नच होणार कारण परत तिथे आमच्यासारखे अनारक्षित ढिगानी असणार आणि ज्यांची लायकी नाही असे लोक आमच्या नाकावर टिच्चून आरक्षणाची शिडी घेऊन वर-वर चढत जाणार!!

मग आमच्यासाठी काय तर फक्त प्रायव्हेट सेक्टर! म्हणजे इतक्या खस्ता खाऊन घेतलेलं शिक्षण पदरात काय दान देतं तर आयुष्यभराची खर्डेघाशी! हां पण जर तुम्हांला अगदी फारच हौस असेल डॉक्टर किंवा इंजिनीयर बनायची तर मग ओता पैसा! म्हणजे शिक्षणापासून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घ्या आणि आयुष्यभर फेडत रहा आणि आपणच का ह्या 'अनारक्षित' जातीमधे जन्माला आलो म्हणून नशिबाला आणि आई-बापाला दूषणं देत रहा!!!

ज्या महान कार्यकर्त्यांनी आरक्षण प्रकरण करवलं आहे त्यांना माझ्यासारख्या अनारक्षित व्यक्तिकडून अगदी कळकळीची विनंती आहे की निदान प्रायव्हेट सेक्टरमधे तरी हा किडा नका सोडू हो नाहीतर आम्हांला खरंच हातामधे कटोरं घेऊन भीक मागावी लागेल!!

Tuesday, June 24, 2014

किंमत

परवा एका कार्यक्रमाला गेले होते,घरगुतीच होता,पण लग्न झाल्यावर हजेरी लावायचा तसा पहिलाच प्रसंग.अलिखित नियमानुसार भरजरी साडी घालायचीच होती त्यामुळे, सगळा जामानिमा करून मी पैठणी नेसून त्यावर साजेसे असलेले दागिने घालून गेले.

कार्यक्रम सुरू झाला,माझ्यासारख्या बघ्यांची संख्या बरीच होती म्हणून गप्पा चालू झाल्या.माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या ब-याच जणी होत्या.गप्पांमधे साहजिकच साडी कुठे घेतली,कोणी दिली वगैरे वरून चर्चा समस्त भारतीय स्त्रीवर्गाच्या जिव्हाळ्याच्या म्हणजेच दागिन्यांच्या विषयावर आली! मला विचारणा झाली मी घातलेले दागिने किती तोळ्याचे वगैरे..मी माझ्या सवयीप्रमाणे काहीही आव न-आणता सांगितलं 'खोटे आहेत'.मी तर सहजच बोलले पण त्या दोन शब्दांनी ऐकणा-यांच्या डोक्यावर घणाघाती वार केल्यासारखं झालं!! चक्क खोटे दागिने??? अगं तुझ्या माहेरच्यांनी,सासरच्यांनी काही दागिने नाही घातले तुझ्या अंगावर?? हे ऐकून मी दचकलेच आणि कसंबसं उत्तर देऊन तिथून निघून गेले.

दिवसभर तोच विषय डोक्यात घोळत राहिला.माझ्या दागिन्यांबद्दलची त्यांची प्रतिक्रिया इतकी भयंकर होती की जणू काही मी काहीतरी पाप केलं होतं खोटे दागिने घालून!

अचानक मला आईसोबत झालेला संवाद आठवला.माझं लग्न ठरलं तेंव्हा आई मागे लागली होती की अगं, आता लग्न आहे तुझं तेंव्हा आता तरी दागिने घे.पण, माझं आपलं एकच,नको गं आई मला काही हौस नाहीये ते सोन्याचे दागिने घालायची आणि सांभाळणार कोण गं त्यांना! नको करूस तू उगाच खर्च! तरी आईने, जे काही जुजबी दागिने असतात ते माझ्या अंगावर लग्नामधे घातले आणि सासरी पण माझा हाच सूर असल्यामुळे त्यांनीही आईचाच कित्ता गिरवला.

बरं लग्न झाल्यावरही माझे सगळे दागिने मी सासूबाईंकडे ठेवले आणि प्रत्येक साडीला शोभून दिसेल अशी वेगळी ट्रेडिशनल,आर्टिफिशीयल ज्वेलरी घेतली.

पण त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाने माझे डोळे खाड्कन उघडले आणि आईचं म्हणणं न-ऐकल्याचा जबरदस्त फटका मला बसला! मात्र एक गोष्ट जी आजवर मला समजली नव्हती ती चांगलीच कळाली! आपल्या देशामधे सोन्याची इतकी मागणी आजही का आहे ते कळालं.म्हणजे, सरकारने सोन्यावर जास्त कर आकारला तरी मागणी काही कमी झालेली नाही कारण, आजही अजूनही लोक अंगावर किती किलो सोनं आहे ह्यावरूनच तुमची किंमत ठरवतात!!

भलेही तुम्ही उच्चशिक्षित असू दे,तुमच्या मालकिची गाडी,मोठ्या शहरामधे फ्लॅट असू देत,लठ्ठ पगाराची नोकरी असू देत किंवा हि-याचे ढीगभर दागिने असू देत पण छे! जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत तर तुम्ही कफल्लकच! तुमची किंमत शून्यच!!

पण हे काही आजच्या काळातलं दुखणं नाही अगदी पुराणकाळापासून चालत आलेलं आहे.चातुर्मासाच्या पुस्तकामधे श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची कहानी दिलेली आहे त्यात मी एक गोष्ट वाचली होती.एक भाऊ आपल्या गरीब बहिणीला विचारतही नसतो पण जेंव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते त्यानंतर तो तिची विचारपूस करतो आणि तिला घरी जेवायला बोलावतो.पण ती बहिण तिच्या अंगावरच्या दागिन्यांना ताटासमोर मांडते आणि न-जेवता निघून जाते! काय ना माणसापेक्षासुध्दा तो पिवळा धातू किती महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे!

हूssह!
बापरे! खूपच गहन की काय विचार केला मी त्या एवढ्याशा प्रसंगावर! पण आता मला चांगलंच समजलं आहे त्यामुळे आता मी ठरवलं आहे आणि नव-याला सुध्दा निटच समजावून सांगितलं आहे की, ह्यावर्षी निदान एक किलो तरी सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच! उगाच कोणी आपली किंमत कमी नको समजायला!!! हूं!!

Thursday, June 19, 2014

निकाल!

काल हॉस्पीटल मधे गेले होते,हातात टोकन घेऊन बिलिंग काउंटरला वाट बघत होते आणि अचानक थोडी गडबड ऐकू आली. मागे वळून बघितलं तर, स्ट्रेचरवर एका मुलाला घेऊन येत होते.कदाचित बेशुद्ध असावा तो,अंगकाठी अगदी किरकोळ होती त्याची आणि साधारण १५-१६ वर्षांचा असेल असं वाटलं.आत आल्यावर लगेचच त्याला एका रूममधे नेलं आणि त्यासोबत आलेले सगळे नातेवाईक बाहेर थांबले.

सगळेजण तिथेच उभे राहून बोलू लागले तेंव्हा कळालं ज्या मुलाला आत नेलं होतं त्याने 'विष' घेतलं होतं! एकाने सांगितलं की त्याने व्हॉट्स अ‍ॅपला मेसेज टाकला की मी विष घेतो आहे पण माझ्या घरच्यांना ह्याबद्दल काही सांगू नका.दुस-या कोणीतरी विचारलं की,घरामधे झोपेच्या वगैरे काही गोळ्या होत्या का? तर एका बाईने कदाचित त्या मुलाची आई असावी तिने म्हटलं,अशा तर गोळ्या घरात नसतात पण क्रोसीन होत्या घरामधे!

परवा दहावीचा निकाल लागला त्यानंतर घडलेली ही घटना!!

...नंतर माझं काम करून मी बाहेर पडले पण त्या लोकांची चर्चा,तो मुलगा हे मात्र डोक्यातून जात नव्हतं.

दहावीचा निकाल लागल्यावर पेपरमधून हमखास अशा बातम्या वाचल्या आहेत.पण काल जेंव्हा समोर बघितलं तेंव्हा तिडीकच गेली डोक्यात आणि पहिला विचार आला की त्या पोराला जीव द्यायची अक्कल आहे पण मग तीच थोडी वापरून नीट अभ्यास केला असता तर!!

अर्थात, त्या मुलाची नेमकी कहाणी काय आहे मला माहित नाही पण, जीव देणं हा एकमेव पर्याय कसा असू शकतो कोणतेही प्रश्न सोडवायला? इतका स्वस्त वाटतो का जीव ह्या लोकांना? आणि ह्याहीपेक्षा आज ती व्यक्ती ह्या जगामधे ज्यांच्यामुळे आली आहे त्यांचा काही विचार आहे की नाही?? फक्त स्वतःचे प्रश्न सोडवता नाही आले म्हणजे अप्पलपोट्यासारखं असा काहितरी निर्णय घ्यायचा आणि आई-वडीलांना वा-यावर सोडून द्यायचं?

ह्या सगळ्यामधे चूक कोणाची? आई-वडीलांची की त्या मुलाची की आपल्या शिक्षण पध्दतीची की सामाजिक दबावाची??

मला आठवतं माझ्या दहावीच्या परिक्षेनंतर नाही नाही त्या नातेवाईकांनी आमच्या घरी फोन करून निकाल विचारला होता आणि इतकी हुशार पोरगी पण मेरिट मधे नाही आली?? असा शेराही मारला होता!!

मला एक कळत नाही की ह्या १०,१२वीच्या परिक्षांना इतकं महत्त्व का आहे आपल्याकडे? फक्त बोर्डाची परिक्षा आहे म्हणून की अजून काही?

मान्य आहे मला की, १०-१२वी नंतर पुढचं शिक्षण काय घेणार ह्यावर भवितव्य ठरतं पण तरी इतका उहापोह करायची खरंच गरज आहे का?

तसं बघितलं तर शाळेमधे प्रत्येक इयत्तेमधे शिकविला जाणार अभ्यासक्रम हा १०वी इतकाच महत्त्वाचा असतो मग फक्त ह्याच वर्षाला का इतकं महत्त्व द्यायचं?
मला तर वाटतं हे जे सगळे प्रायव्हेट क्लासेस वाले लोक आहेत ह्यांचाच ह्या सगळ्यामधे हात आहे!! कारण गेल्या काही वर्षांमधे क्लासेसचं जे पेव फुटलं आहे त्यामुळे मार्कांची स्पर्धा खूप जोरात चालू झाली आहे. प्रत्येक क्लास निकाल लागल्यावर मोठमोठाले बोर्डस लावून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे फोटो आणि मार्क्स झळकवून 'आमच्या क्लासचे इतके टॉपर्स' वगैरे असं ठणाणा बोंबलत असतात! म्हणजे त्या मुलांनी फक्त अमका अमका क्लास लावला म्हणूनच तो टॉपर झाला असं त्यांना म्हणायचं असतं.याचा अर्थ त्या मुलाची अंगभूत हुशारी वगैरे काहीच नाही फक्त तो तमक्या क्लासचा म्हणून हुशार!! वाह!!

पण ह्या असल्या मार्केटींगला बहुतेक सगळे पालक भुलतात आणि क्लासवर अतिविश्वास ठेवून आपल्या मुलाची कुवत लक्षात न-घेता त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. पण, सगळीच मुलं काही अशाने टॉपर होत नाहीत आणि शेवटी जर निकाल अपेक्षेप्रमाणे नसेल तर मग कोणीतरी विष घेतं किंवा अजून काही!!

पण हे सगळं चुकीचं आहे!! हे थांबणं शक्य आहे का?

कदाचित हो, पण ह्यासाठी, परत एकदा आई-वडीलांनाच थोडे अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत स्वतःला समजावण्याचे आणि स्वतःच्या मुलांना समजावून सांगण्याचे. परिक्षेमधे मिळणारे मार्क्स ह्या एकाच गोष्टीवर आयुष्य अवलंबून नाही.ती गोष्ट फक्त एखाद्या लहानशा विटेसारखी आहे, जी महत्वाची आहेच पण त्याचबरोबर जर कष्ट करण्याची तयारी, जिद्द, स्वभाव, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हे खांब वेळीच बळकट केले नाहीत तर आयुष्य उभं राहू शकत नाही आणि येणा-या वादळांमधे तगही धरू शकत नाही!

Thursday, June 12, 2014

वटपौर्णिमा

तुमच्या घराच्या आजूबाजूला वडाचं झाड नाहीये का? किंवा शोधायला वेळ नाही का? डोण्ट वरी अ‍ॅट ऑल!! आता बाजारामधे १०रू. ला तुम्हाला वडाची फांदी मिळू शकते.ती घेऊन या,त्या फांदीला दोरा गुंडाळून मनोभावे तिची पूजा करा आणि उद्या सकाळी ती फांदी कच-यात फेकून द्या!! काय सोप्प झालं आहे ना हे सगळं हल्ली!

म्हणजे वडाचं झाड असं फांद्या-फांद्या करून तोडून टाकायचं आणि वडाची पूजा केली म्हणून मिरवायचं वाह रे संस्कृतीचं पालन!!

अरे काय संस्कृतीचं गुणगाण गाता आणि नटून-थटून मिरवता! आजच्या पिढीतल्या ज्या काही पोरी,बायका वटपौर्णिमा 'सेलिब्रेट' करतात त्यांना किंवा त्यांच्या आई,सासू,घरातली वयाने मोठी बाई ह्यांपैकी किती जणींना हा सण का साजरा करतात ते माहित आहे?किंवा त्यांच्यापैकी कितीजणींनी कधी प्रयत्न केला आहे का ह्या सणामागचं खरं कारण शोधण्याचा? आपली संस्कृती आहे म्हणून आई,सासू ह्या जनरेशन ने हा सण साजरा केला आणि आता 'आपलं ट्रेडिशन आपणच सांभाळलं पाहिजे ना' म्हणून नविन पिढी एंजॉय करते!

तुम्ही म्हणाल इतकी बडबड करण्यापेक्षा तू सांग तुला माहित असेल कारण तर! हं तर ऐका! अर्थात ही माहिती मला माझ्या आजीने सांगितली आहे.तर आजी म्हणते की,मागच्या काळी चूल-मूल-रांधा वाढा-उष्टी काढा ह्याव्यतिरिक्त देव-देव करणं हा एकच 'टाईमपास' बायकांसाठी होता.तसंच घरातल्या बाईला घरातलं सगळं-सगळं सोडून सारखं बाहेर पडायचा 'चान्स' मिळत नव्हता मग अशा सणांच्या निमित्ताने ती बाहेर जाऊन मैत्रिणींसोबत 'एंजॉय' करू शकायची.बरं त्या काळी स्वयंपाकघर म्हणजे नुसता धूर आणि काळोख त्यामुळे जर वडासारख्या झाडाची पूजा केली तर भरपूर 'ऑक्सिजन' मिळायचा

मग मी विचारलं की मग धागा का बांधायचा आणि सात जन्म वगैरे काय प्रकरण आहे? तर ती म्हटली,'अगं त्या काळी कळत्या न-कळत्या वयात लग्न व्हायची आणि नव-याव्यतिरिक्त कोणी पुरूष आयुष्यात कधी इतका जवळून माहित व्हायचाच नाही.त्यामुळे देवाला सांगायचं की,देवा नारायणा मला हाच नवरा बरा रे बाबा.ते तुमच्या भाषेत म्हणतात ना ते नोन एनिमी इझ बेटर दॅन अन्नोन फ्रेंड का काय ते तसंच बघ अगदी :) आणि दोरा बांधायचं म्हणशील तर नेमकं कारण मलापण आठवत नाही गं पण, ह्या पुजेमुळे झाडं,निसर्ग ह्याचा मानवाने सांभाळ करायला हवा हेही नकळतपणे मनावर बिंबवलं जायचं.

आजी जे म्हटली ते तिचं व्हर्जन होतं पण मला तरी हे वाटतं की,फक्त बायकोनेच नव-यासाठी ही पूजा करण्यापेक्षा दोघांनी जर ह्या सणाकडे एक सामाजिक कर्तव्य म्हणून बघितलं तर हा सण ख-या अर्थाने साजरा होईल.

तर एक असं करता येऊ शकतं की तुम्ही वड,पिंपळ,आंबा ह्यांसारखे भरपूर प्राणवायू देणारे आणि अधिक आयुर्मान असणा-या एकातरी वृक्षाची लागवड करा.नियमितपणे त्याची निगा राखा.अर्थात हल्ली फ्लॅटसंस्कृती असल्या कारणाने गॅलरीमधे तर ही झाडं लावू शकत नाही पण, तुमच्या आजूबाजूला असणा-या एखाद्या टेकडीवर किंवा एखाद्या निसर्ग मित्रमंडळासोबत जाऊन तुम्ही हा प्रयत्न करू शकता.आज तुम्ही सुरूवात केलीत तर तुमच्या आजूबाजूचे आणि तुमची पुढची पिढीसुध्दा ह्या कामात हातभार लावेल.

आज प्रदूषणाची मात्रा इतकी वाढली आहे की वडाची पूजा करण्यासारखे सण दर महिन्यात येण्याची गरज आहे पण ती पूजा फक्त आणि फक्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धानातूनच होऊ शकते.मग ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीचं जतन होऊन मानवजातीचं कल्याण होऊ शकतं.

Tuesday, June 3, 2014

माझी सवत

आमच्या लग्नाचे कौतुकाचे दिवस संपले म्हणजेच ऑफिस वगैरे रूटीन चालू झालं आणि माझ्या सवतीनं आमच्या संसारात प्रवेश केला!

सकाळ म्हणू नका,रात्र म्हणू नका सारखी आपली ती नव-याच्या जवळच! मी अजून तशी नवी नवरी होते पण जुनी व्हायच्या आतच त्या दोघांचं सुत जुळलं.

ऑफिसमधून घरी आल्यावर नव-यासोबत दिवसभरात काय झालं काय नाही हे बोलायला जावं तर नवरोबांचं लक्ष सगळं तिच्याकडेच!

मी एक-दोनदा प्रेमाने सांगून बघितलं पण माझे शब्द वा-यावरच.मग थोडंसं रागावून बघितलं पण छे! माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे नव-याला!! रूसले-फुगले तरी क्काही काही परिणाम झाला नाही मग शेवटी ब्रम्हास्त्र वापरायचं ठरवलं आणि अबोला धरला.मला खात्री होती की हे अस्त्र कधी निकामी जाणार नाही पण हाय रे कर्मा! माझा अबोला असेपर्यंत नव-याने विचारपूस केली पण मी पूर्ववत झाल्यावर परत पहिले पाढे पंच्चावन.

साम-दाम-दंड-भेद सगळं काही वापरून झालं पण कशाचाच उपयोग होईना.काय करू आणि तिला नव-यापासून वेगळं करू हा एकच विचार डोक्यात घुमू लागला पण उत्तर काही सापडेना.ह्यामुळे माझ्या सवतीला जे हवं होतं ते मात्र होऊ लागलं - आमच्यामधे वाद व्हायला लागले.कधी मी गप्प तर कधी तो गप्प,दिवस दिवस संभाषण होईना!

मला तिचं घरात असणं सहन होत नव्हतं पण नवरा काही तिला दूर करायला तयार होत नव्हता.माझी नुसती चिडचिड होऊ लागली पण तिकडे नव-याला त्याची जाणीवही नव्हती.तिच्याविरूद्ध बोललेला एक शब्दही त्याला खपत नव्हता.माझ्यापेक्षा त्याला तिचं महत्त्व जास्त वाटत होतं.सकाळी उठल्यापासून ते रात्री अगदी झोपतांना सुध्दा तीच जवळ, मी असले-नसले तरी काही फरक पडेनासा झाला.

हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागलं मग मात्र मी ह्या प्रश्नाचा तुकडा पाडायचा ठरवलं आणि नव-याला स्पष्टपणे विचारलं,

मी - तुला तुझ्या आयुष्यात ती हवी आहे की मी?
नवरा ( खवचटपणे ) - दोघीही!
मी - ते आता शक्य नाही. एकतर मी तरी ह्या घरात राहीन नाहीतर ती तरी, ठरव काय ते एकदाचं. मला असं रोज रोजचं मरण नकोय!
नवरा - हम्म विचार करावा लागेल.
मी - विचार करावा लागेल काय?? ठीक आहे! तू करत बस विचार मी ठरवलं आहे जर ती ह्या घरात राहणार असेल तर मी ही निघाले!!
नवरा - लगेच निघत आहेस की उद्या जाणार?
मी ह्यावर काही बोलूच शकले नाही आणि अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले! तो मात्र शांतपणे स्मीतहास्य करत माझ्याजवळ आला आणि माझ्या हातात एक छानसं गिफ्ट ठेवत म्हटला,' हे बघून ठरवं खरंच जायचं आहे की नाही ते'.

मला तर काही कळतंच नव्हतं हे सगळं काय चाललंय ते!
मी ते गिफ्ट उघडून बघितलं आणि त्यात एक नवा-कोरा टॅबलेट होता!  :)   :)


... आता आमच्याकडे सगळं आलबेल आहे.नवरा त्याच्या मोबाईलमधे आणि मी माझ्या टॅबमधे बिझी आहे :D

Monday, June 2, 2014

'ते' दिवस!

 स्त्री - निसर्गाने तिला मार्तृत्वासारखं वरदान बहाल केलं आहे. हे मार्तृत्व सुकर व्हावं म्हणून निसर्गाने अगदी काळजीपूर्वक एक यंत्रणा तिच्या शरीरात बसवून ठेवली आहे. मुलगी वयात आल्यावर ही व्यवस्था कार्यरत होते आणि योग्य वेळी तिचा कार्यभाग पार पाडते.

 निसर्गानेच जर हे सगळं तिला बहाल केलं आहे आणि त्याची निष्पन्नता एका निरागस जीवाला जन्म देण्यामधे होते तर ती गोष्ट 'घाणेरडी, विचित्र, किळसवाणी' कशी काय असू शकते???

 तुम्ही म्हणता देवाने निसर्ग,पृथ्वी,स्त्री,पुरूष यांना बनवलं मग ह्या देवानेच बनवलेल्या स्त्रीचं 'त्या' दिवसातलं वावरणं त्याला का खटकतं?? का त्या दिवसांमधे स्त्रीने 'बाजूला' बसायचं? का तिने देवपुजा करायची नाही? का तिने देवाचं नाव घ्यायचं नाही? का तिने कुठल्या देवालयात जायचं नाही? इतकंच कशाला तिने साधं कुठल्या घरी होत असलेल्या मंगलकार्यालाही उपस्थित राहायचं नाही?? का??

 एकवेळ असं समजून चालू की, आधीच्या काळी औषधं नव्हती म्हणजे पेनकिलर्स वगैरे आणि स्त्रीयांना पुष्कळ कामं करावी लागायची तर 'त्या' दिवसात शरीराची जास्त झिज होऊ नये म्हणून, त्यांना विश्रांती घ्यायला लावायची याकरता, त्यांनी बाजूला बसायचं.

 पण हे बाजूला बसणं म्हणजे, 'कावळा शिवला' आता तिला कोणी हात लावायचा नाही, तिने वेगळ्या अंधा-या खोलीत बसून राहायचं, तिच्यासाठी पाणी वेगळं, भांडी वेगळी, जेवणाचं ताटही दुरून देणार - अरे काय हा मूर्खपणा!! 'त्या' दिवसांमधे असं काय होतं म्हणून तिला इतकी विचित्र वागणूक?? आणि ही वागणूकही कोण देणार तर एक स्त्रीच म्हणजे सासू किंवा आई, की ज्या स्वतः त्या सगळ्यामधून गेल्या आहेत. त्यांना 'त्या' दिवसांचं महत्त्व आणि कार्यकारणभाव माहित आहे त्यांनी असं वागावं?? काय बोलणार!!

 हल्ली हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो पण, अजूनही, विशेषत: हिंदू घरांमधे एखाद्या मुलीचं 'त्या' दिवसांबद्दलचं गणित हे तिच्यापुरतं कधीच राहत नाही. जर घरामधे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल तर तिला आईकडून विचारणा होतेच.पुढे तिच्या स्वतःच्या लग्नासाठी तारीख काढतांना किंवा त्यापुढचा 'ऋतुशांती' हा विधी करायचा म्हणूनही चक्क गुरूजी ह्याबाबतीत विचारणा करतात! गुरूजी म्हणजे कुटुंबाबाहेरचा कोणीतरी तिसरा पुरूष आणि त्याला ह्याबाबतीत सांगायचं श्शी! विचार केला तरी किळस येते पण, हो, त्या मुलीला ह्याबाबतीत आईला किंवा सासूला खुलासा द्यावा लागतो आणि मगच मुहूर्ताचे दिवस ठरतात!!!

 विक्षिप्तपणाचा कळस आहे हा सगळा! मला तर समजतच नाही की काय असा फरक पडतो जर 'त्या' दिवसांमधे सुध्दा एखाद्या मुलीने कुठलं मंगलकार्य केलं तर. तुमचा देव काय तिच्याकडून पुजा करायला नाही म्हणणार आहे का? की तो त्या मूर्तीतून पळून जाणार आहे? वर्षानुवर्ष आंधळेपणाने काही गोष्टी आपण पाळत आलो आणि अजूनही त्या पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत व्वाह रे संस्कार!

 वैज्ञानिक माहिती असं म्हणते की ह्या काळामधे स्त्रीच्या शरीरामधे उष्णता ब-याच प्रमाणात वाढते आणि पुरूषामधे असलेल्या जननक्षम कार्यप्रणालीला त्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून त्या काळापुरतं का होईना स्त्री-पुरूषाने एकत्र असू नये. पण ही तर गोष्ट एखाद्या विवाहीत किंवा लीव्ह-इन मधे असणा-यांसाठी लागू होते. मग ह्या गोष्टीमुळे देवाला कुठे काय प्रॉब्लेम होतो??

 हा त्रागा जर केला तर असं ऐकावं लागतं की, तुमचं सगळं विचार करणंच विचित्र आहे,आम्हाला आमच्या आईने जे सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि वागलो.आम्हाला नाही असले प्रश्न पडले, तुम्हांला जे करायचं ते करा.

 मग असं ऐकल्यावर स्वतः स्त्री असल्याचीच किळस वाटायला लागते. एक मन म्हणतं आई म्हणते तर ऐकलं तर काय होतं, पण, दुसरं मन म्हणतं की का ऐकायच्या असल्या बिनबुडाच्या गोष्टी! आणि शेवटी काय होतं तर आतल्या आत धुमसतच रहावं लागतं आणि 'ते' दिवस मूड स्विंग्स आणि दुखणी घेऊन आलेलेच असतात!!