Tuesday, November 11, 2014

ब्राम्हण

काल बसमधे माझ्या शेजारी दोन मुली गप्पा मारत उभ्या होत्या..विषय होता त्यांची रूममेट..तिच्याविषयी बोलता बोलता त्यातली एकजण म्हटली ,'ती ब्राम्हण आहे एक रूपया पण कधी सोडत नाही हां' आणि पुढे अजून काही-बाही..

मला एक कळत नाही जर ती तिसरी मुलगी हिशोबी असेल तर मग तो तिचा स्वभाव आहे त्यासाठी जातीवरून बोलायची गरजच काय??

समोरच्या माणसाबद्दल कुठली गोष्ट आवडली नाही की लगेच त्याच्या जातीवरून त्याला बोलायच ह्याला काही अर्थ आहे का? त्याचा स्वभाव, त्याचं वागणं ह्याला त्याची जात कशी काय जबाबदार असू शकते?? ज्याप्रमाणे माणसाचा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो कुठल्याही गोष्टीसाठी प्रतिसाद देणार ना. त्याचा स्वभाव घडण्यासाठी घरातले संस्कार जितके जबाबदार तितकेच बाहेर घडणा-या, त्याच्या आजूबाजूला असणा-या गोष्टीपण जबाबदार असतात मग जातीनंच काय घोडं मारलंय?? जिथे जमेल तिथे तिला वर काढलीच पाहिजे का?

मी पण ब्राम्हणच आहे आणि ब-याचदा मलासुध्दा 'तू ब्राम्हण आहेस?' असं आजवर ब-याच जणांनी अगदी तुच्छतेने विचारलं आहे, जणू काही शिवीच आहे ब्राम्हण म्हणजे!

बरं ह्याबाबतीत काही बोलायला गेलं तर मग पुराणातले दाखले देतात की आमच्या जातीवर ब्राम्हणांनी अत्याचार केले होते म्हणून वगैरे वगैरे..

पण मला एक कळत नाही तुम्ही-आम्ही आजच्या काळामधे जन्माला आलो आणि वावरतोय ना मग पुराणातले संदर्भ देऊन उगाच का म्हणून एकमेकांना जातीवरून हिणवायचं किंवा उगाच का भावना दुखवायच्या??

जग कितीही कुठे गेलं तरी आपण आपल्या अशा खुळचट कल्पना सोडणार नाही असं ठरवूनच टाकलं आहे जणू सर्वांनी.जात-पात ह्या इतक्या क्षुल्लक गोष्टी आहेत ना की, ह्यावर विचार करायची पण इच्छा होत नाही पण, असे काही प्रसंग बघितले की वाटतं आपण तरी का गप्प बसतो आणि स्वतःच्या जातीबद्दल बोलत नाही? आपणही अभिमानाने बोलायला हवं स्वतःच्या जातीबद्दल पण नाही जमत ना कदाचित आमच्यावर तसे संस्कारच केले गेले नाहीत..अर्थात हे कोणाकोणाला म्हणून सांगणार ना..शेवटी काय शहाण्यालाच शब्दाचा मार असतो नं... ;D