Wednesday, April 15, 2015

शो-पिस

हल्ली दुचाकीच्या अ‍ॅक्सेसरीजमधे एका गोष्टीची भर पडली आहे. रस्त्यावरून जातांना तुम्हाला दिसलच असेल ते शोपिस.लक्षात नाही आलं? अहो शिरस्त्राण किंवा हेल्मेट लावलेलं असतं बघा बाईकला शेवटच्या चाकाच्या थोडं वर. हां तेच ते शोपिस!

बहुतेक करून सिग्नलला उभं असतांना किंवा रस्त्यावरून जातांनासुध्दा बहुतांश गाड्या अशा दिसतात ज्यांना हेल्मेट लटकवलेलं असतं. म्हणजे ज्याची जागा दुचाकीस्वाराच्या डोक्यावर असायला हवी ती गोष्ट गाडीला लटकवून हिंडतात लोकं. पुण्यामधे तर ब-याचदा हेल्मेटसक्तीचा प्रयत्न करण्यात आला आहे पण नियम आणि पुण्यामधे..वेगळाच विषय आहे तो..

तर हिंजेवाडी मधे असणा-या बहुतेक सर्व आय.टी. कंपन्यांनी आणि पुणे शहरातल्या ब-याच कॉलेज आणि कंपन्यांनी दुचाकीस्वारांना शिस्त लावायचा एक छोटासा प्रयत्न केला. जर तुम्ही दुचाकीने ऑफिसला येत आहात तर तुमच्या डोक्यावर शिरस्त्राण आवश्यक आहे असा नियम आहे. जर शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट नसेल तर तुम्हाला तुमची दुचाकी ऑफिस पार्किंगमधे लावता येत नाही.

पण गम्मत अशी आहे की, हे दुचाकीस्वार इतके हुशार आहेत की, घरून निघतांना हेल्मेट गाडीला लॉक करतात आणि ऑफिसजवळ आलं की मग परिधान करून गेटमधून आत येतात. ऑफिसमधून बाहेर पडतांना डोक्यावर नुसतं अडकवतात आणि बाहेर गेल्या गेल्या हातामधे घेऊन आगेकूच करतात.

अरे कंपनीवाले काय वेडे आहेत का तुम्हाला हेल्मेट घालायची सक्ती करायला! तुमची काळजी तुम्ही स्वतः घेत नाही म्हणून कंपनी ते करायचा प्रयत्न करते पण, त्याचीही अडचण कशी वाटू शकते लोकांना (हेल्मेट न-घालणा-या)??

तुम्ही म्हणाल, नुसते शब्द लिहणं सोपं आहे पण हेल्मेट चा काय त्रास असतो ते घालणा-यालच माहित!
हम्म मला चांगलच माहित आहे की हेल्मेट घातल्याने काय काय त्रास होऊ शकतात पण ते त्रास रोजच्या वापरानंतर अंगवळणी पडतात असाही माझा अनुभव आहे. त्यामुळेच जेंव्हा असे दुचाकीला लटकवलेले हेल्मेट्स दिसतात ना तेंव्हा चीड येते त्या लोकांची!

रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी वेगवेगळ्या जाहिरातींमधून हेल्मेट वापराचं महत्त्व सांगायचा प्रयत्न केला आहे. नुकतीच एक नविन जाहिरात आली आहे इंडियन हेडइंजुरी फाउंडेशन संस्थेकडून ज्यामधे, पुराणकाळातले देव कसे शिरस्त्राण वापरत होते हे दाखवून 'आता तरी हेल्मेट घाला रे बाबांनो' अशी जणू विनवणी करण्यात आली आहे.

अगदी लाखाच्या घरातल्या बाईक्स वापरायला जर मजा वाटते तर मग हेल्मेट्स का नाही वापरू शकत बाईकस्वार, लाज वाटते की काय? अर्थात साधी काही हजारांच्या घरातली सिटी-बाईक वापरण्या-या माणसांना सुध्दा हा नियम लागू होतो!

मला तर ना असं वाटतं की मुन्नाभाईच्या स्टाईलमधे अशा सगळ्या लोकांना एक कार्ड द्यावं ज्यावर लिहीलेलं असेल,'धन्यवाद हेल्मेटचा वापर न-केल्याबद्दल!तुमचं अगदी स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावरसुध्दा अजिबात प्रेम नाही. तुमच्यासारख्या निस्वार्थी लोकांची खूप गरज आहे देवाला!!'

आणि त्याचबरोबर जे लोक नेहमी हेल्मेट वापरतात त्यांना एक कार्ड द्यावं,'धन्यवाद हेल्मेटचा वापर केल्याबद्दल! तुमचं स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे :)'