Thursday, February 26, 2015

शिक्षा

सोमवारी संध्याकाळी थोरात उद्यानात चक्कर मारावी म्हणून गेले..गेटमधून आत गेल्यावर डाव्या हाताला महादेवाचं मंदीर आहे आणि पुढे बाकी देवि-देवतांचं मंदीर आहे.

सोमवार म्हणून आपसूक पाय महादेवाच्या मंदीराकडे वळले.विशेष गर्दी नव्हती पण तरी दोन-तीन जण उभे होते.
महादेवाची पुजा अगदी छान मांडलेली होती,शिवलिंगावर एक पांढरं फुल त्याखाली बेलाचं पान आणि बाकी पिंड अगदी काळीशार स्वच्छ, प्रसन्न वाटलं ते बघून :)

नमस्कार करून मी निघत असतांनाच एक बाई लगबगीने पुढे आल्या.लगेचच त्यांनी हातातली चितळेंच्या गाईच्या दुधाची पिशवी फोडून महादेवावर धार धरली.काही क्षणांपूर्वीपर्यंत जिथे अगदी
सुंदर पूजा मांडलेली होती तिथे आता दुधाचा अभिषेक होऊन सगळंच विचित्र झालं होतं!

बिचारा महादेव! आतापर्यंत डोक्यावरच्या बेला-फुलाच्या मंदसुगंधामधे ध्यानस्थ बसलेला असतांना अचानक गार दुधाची धार पडल्यावर एकदम भांबावलाच असेल!!

मला ते बघून असं वाटलं त्या बाईचा हात धरावा आणि तिला विचारावं सुंदर साडी घालून मेक-अप करून तयार झाल्यावर डोक्यावर कोणी पाणी ओतलं तर कसं वाटेल?? का त्या बिचा-या
देवाला त्रास देत आहेस!!

पण माझ्या मनामधे हा संवाद होईतो ती बाई महादेवाच्या पुजेचं होत्याचं नव्हतं करून समोरच्या मंदिरातल्या देवांकडे वळली पण होती!

देव असण्याची कदाचित शिक्षाच मिळाली आज महादेवाला!!