Tuesday, January 12, 2016

कष्ट

आमच्या आॅफिस पार्किंगला दोन लेव्हल्स आहेत.लेव्हल-१ दुचाकी साठी आणि लेव्हल-२ चारचाकीसाठी.जागेअभावी कधिकधि चारचाकी गाडी ले-१ ला लावता येते पण काढतांना मात्र नियमानुसार ले-२ मधूनच काढावी लागते.

आत्ताच माझ्यासमोर एक व्यक्ती त्याची चारचाकी ले-१ मधून बाहेर काढू द्या म्हणून सिक्युरिटी गार्डशी हुज्जत घालत होता.जेंव्हा कडक शब्दात त्याला समज दिल्या गेली तेंव्हा मात्र चरफडत त्याने गाडी ले-२ ला नेली.

पुढे बाहेर पडण्यासाठी जे गेट वापरायला हवं त्याऐवजी त्याने दुस-या गेडकडे गाडी वळवली तिथुन नेमकी बस आत येत होती आणि धडक होता होता वाचली!! अर्थात त्या गेटवरही पहिल्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली आणि शेवटी त्याला ठरवलेल्या मार्गानेच बाहेर पडावं लागलं!!

त्याचा मुद्दा होता की मला घाई आहे बाहेर जायची तर तुम्ही आजचा दिवस मला जाऊ द्या अाणि जर एखाद्याला असं नियमबाह्य सोडलं कधीतरी तर काय बिघडणार आहे??

काय बिघडणार आहे?? हं!!

आपल्या सोयीसाठी नियम मोडून वागायचं आणि परत हा विचार करायचा की मी एकट्याने असं केलं तर काय बिघडणार आहे?

- मी हेल्मेट नाही घातलं तर कुठे बिघडलं!!

- मी अमुक-तमुक काम अपेक्षेप्रमाणे न-करता 'पटकन' पण ५०%च केलं तर कोणालाही कळणार नाही, जाऊ देत इतका काहि फरक पडत नाही बरंका!!

- मी मारली पान खाऊन एखादी पिंक रस्तावर तर काय बिघडलं, रस्ता तर मोठा आरशासारखा स्वच्छच आहे ना!!

- मी सिग्नलचा लाल दिवा दिसत असतांनाही थांबलो नाही तर काय फरक पडतो, सगळेचजण तसं करतात!!

अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजूला रोज दिसतात, कित्येकदा आपणच ते करतो आणि दुस-यांना करतांना बघितलं की शिव्या देतो.

काय म्हणावं ह्या वृत्तीला?? आळशीपणा कि उद्दामपणा कि अजून काही.

मला तरी असं वाटतं कि हल्ली आपण कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाऊन तिचा विचार करायचा नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणचे नियम पाळायचे नाहीतच, भलेही ते आपल्या सुरक्षेसाठी का असेनात,असं आपण वागतो.नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणीही ह्या विचारसरणीचे बहुतांश लोक दिसतात.

मुख्य मुद्दा एकच आहे- स्वतःला (मानसिक, शारीरिक) कष्ट कमीतकमी पडावेत अशा पद्धतीने जमेल तसं काम करून टाकायचं एकदाचं, मग त्यामुळे पूर्ण व्यवस्था खिळखिळी होऊन ढासळली तरी काय फरक पडणार आहे :( जे काहि परिणाम होतील ते वेळ आल्यावर बघू :D इत्ता टेन्शन नइ लेनेका मामू :D :D :D