Monday, February 13, 2017

समुद्र

कादंबरीचा शेवट हा गोडच करावा असा काही नियम आहे का? म्हणजे त्या भास्करच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं आणि तरी पण दोन पानांच्या मजकुरामधे त्याने स्वतःला सावरलं आणि त्याच्या बायकोला 'भोळी' आहे, तिला जग माहीत नाही अशी स्वतःची समजूत घातली आणि सगळं आलबेल झालं??!! इतकं सोपं आणि सरळ ख-या आयुष्यात घडूच शकत नाही!!

मुळात जे स्पष्टीकरण नंदिनीने दिलं आहे तेच फोल वाटलं मला. तिचे विचार नव-याला समजत नव्हते मग तिला राजोपाध्याय भेटला, त्यांच्यामधे वैचारिक पातळीवर जवळीक निर्माण झाली पण मग शरीराने जवळ येतांना कितीही काहीही म्हटलं तरी जर नंदिनीची इच्छा नसती तर तिने पहिल्या क्षणाला त्याला झटकून बाजूला केलं असतं कारण त्याची जबरदस्ती सहन करायला ती काय त्याची बायको नव्हती!!
तिच्या म्हणण्यानुसार तिला मैत्री कुठवर जाऊ शकते हे बघायचं होतं पण वैचारिक पातळीवरुन शारीरिक पातळीवर जर ती जात आहे तर ते सुद्धा एक थ्रिल म्हणून तिने एंजाॅय केलं. फक्त एकदा बघायचं होतं तर पहिल्यांदा घडलं तेंव्हाच तिला प्रचिती येऊन तिची उत्सुकता शमायला हरकत नव्हती पण ते २-३ वेळेस घडलं, याचाच अर्थ तिला ते हवं होतं!

बाकी कथेचा वेग चांगला आहे, अगदी शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की काहीतरी वेगळं समोर येईल पण मग शेवटी भास्कर स्वतःची समजूत घालतो आणि तिला माफ करतो हे जरा घाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे भास्करच्या मनातले विचार आणि समुद्राचं वर्णन ह्याची सांगड छान घातली आहे. तसंच समुद्र, रिसाॅर्ट, किनारा, टेकडी सगळं व्यवस्थितपणे डोळ्यासमोर उभं राहतं, चित्रदर्शी लिखाण आहे अगदी.

Sunday, February 12, 2017

सावित्री - पु.शि.रेगे

अगदी मोजक्या पानांचं, छोटेखानी पुस्तक आहे. हातात घेतलं तेंव्हा वाटलं, हं लग्गेच वाचून होईल पण माझा हा भ्रम पहिल्या ४-५ पानातच मोडला.

ह्यामधे गोष्ट तशी आहे पण आणि नाही पण. एका 'साउ' ने नव्याने ओळख झालेल्या एका व्यक्तीशी केलेला पत्रव्यवहार आहे हा. ती व्यक्ती कोण आहे कशी आहे ते शेवटपर्यंत कळालं नाही किंवा कळू दिलं नाही बहुतेक.

सहजगप्पा आहेत पत्रातून व्यक्त केलेल्या पण त्यात कुठेही प्रेम-पत्र अशी छबी उमटत नाही. पत्रव्यवहार जरी एका पुरूषाशी होत असला तरी तो एकमेव प्रेमभावनेच्या भरातला नाही, उलट प्रगल्भ विचारांची सुरेख मांडणी केलेली आहे.

'साउ' ने लिहिलेली ही पत्रं म्हणजे कुठेतरी स्वत:शी संवाद साधला आहे असं जाणवत राहतं. अर्थात फक्त इतकंच नाही त्या मजकूरामधे तर, आजुबाजूला घडणा-या घटनांचे पडसादही आहेत पण गरजेपुरतेच.

काही विचार जरा अवजड झाले मला तरी समजायला, पण ते अपवाद सोडले तर भाषा अगदी सहज-सोपी आहे आणि मुळात एकसंधपणा व्यवस्थित साधला आहे. वाचतांना असं सतत वाटत राहतं की आता तरी 'त्याचं' पत्र दिलेलं असेल पण नाही, वाचकाने 'साउ' च्या पत्रांमधूनच 'त्याला' आणि 'त्याच्या प्रतिसादांना' समजावून घ्यायचं आहे :)

मी अशा पिढीत जन्माला आले जिथे असे पत्रव्यवहार करायची वेळ कधी येऊ शकली नाही पण, हे पत्ररूपी पुस्तक वाचून एक वेगळा अनुभव नक्कीच मिळाला

Saturday, February 11, 2017

पुस्तक पेठ

आज मुहूर्त लागला आणि मी पुस्तक पेठ एकदाची शोधली!!

प्रसिद्ध लेखक श्री.संजय भास्कर जोशी यांची ही खास पुस्तकांची पेठ. पुण्यनगरी मधे पेशव्यांनंतर नविन पेठ वसवणारे हे बहुदा एकमेव व्यक्ती असावेत,असो.

तर मी आतमधे गेले तेंव्हा संजय जोशी सर कोणासोबत तरी बोलत वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल चर्चा करत होते. माझं पेठेचं निरीक्षण चालू होतं. मग संजय सरांनी मला विचारलं एखादं खास पुस्तक शोधत आहेस का? मी मग माझं आजवर जे काही छुटुक-पुटुक वाचून झालं आहे त्याबद्दल सांगितलं. मग सरांनी मला एक से एक पुस्तकं हातात दिले ज्यामधे गौरी देशपांडे यांचं 'आहे हे असं आहे' आहे परत पु.शि.रेगे यांचं 'सावित्री' आहे आणि अशीच अजून मस्त दहा-एक पुस्तकं आहेत.

मला कधीपासून 'जी.ए.कुलकर्णी' यांचं कुठलं तरी पुस्तक वाचावं असं वाटत होतं पण, कळेल की नाही आणि नेमकं कोणतं वाचावं हे कळत नव्हतं तर संजय सरांनी माझा तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला 'डोहकाळिमा' हातात देऊन. बरं नुसतं पुस्तक नाही दिलं तर त्यात कोणत्या क्रमाने मी गोष्टी वाचायला हव्या त्याचे क्रमांक पण लिहून दिले :) :) काय भारी नं, म्हणजे मला तर असं वाटलं की अभ्यासक्रमातला कठिण विषयाचा अभ्यास करायचं गाईडच हातात मिळालं :)

मस्त गप्पा मारत अजून काहि इंग्रजी पुस्तकांबद्दल पण चर्चा झाली आणि मुख्य म्हणजे सरांनी त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आवडीच्या पुस्तकावर आॅटोग्राफ पण दिला :) :) :)

इतकं मस्त वाटलं ना आज तिथे जाऊन, दिल एकदम गार्डन गार्डन हो गया :)

इतकं हलकं-फुलकं आणि आपुलकीचं वातावरण आहे की कोणीही ह्या पेठेमधे वारंवार येत राहिल.

अजून एक खास बात म्हणजे इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात ज्यायोगे आपल्याला अनेक लेखक-कविंना भेटायची, गप्पा मारायची संधी मिळू शकते.

आजची संध्याकाळ सत्कारणी लागली माझी आणि मनामधे एक पुस्तकांसाठीचा जो कोपरा आहे त्याची खिडकी परत एकदा सताड उघडली गेली :) :) थँक्यू सो मच संजय सर :)