Saturday, September 2, 2017

आठवणी लहानपणाच्या - 'V' आकाराची ओढणी


आमच्या आॅफिसच्या क्लीनिंग स्टाफ चा युनिफॉर्म बदललेला दिसला. सलवार-कुर्ता आणि V शेपची ओढणी. ती ओढणी बघितल्यावर एकदम मला शाळेचे दिवस आठवले!!

बहुतेक मी १०वी ला म्हणजे शाळेच्या शेवटच्या वर्षाला असतांना नेमका आमचा युनिफॉर्म बदलला. आधीच तर मला ओढणी असलेला युनिफॉर्म झेपायचा नाही त्यात आता 'V' आकाराची ओढणी म्हणजे तर मला जणू शिक्षाच केल्यासारखं वाटलं :(

सकाळी ७ची शाळा असतांना अशी V शेप ओढणी असलेला युनिफॉर्म घालून जाणं म्हणजे अगदी दिव्य होतं.
एकतर सळ-सळ करणारं ते शिफाॅन का कसलं तरी ओढणीचं कापड त्याच्या ४ घड्या करायच्या मग डाव्या खांद्यावर असणा-या पट्टी मधून ती पातळ घडी अलगद खाली सोडायची. ते झालं की मग तो V शेप तयार करुन दुसरं टोक उजव्या खांद्यावरच्या पट्टी तून आत सरकवायचं. ही प्राथमिक फेरी झाली की मग खाली सोडलेली ओढणीची दोन्ही टोकं सरळ रेषेत आहेत की नाही ते बघायचं, जी कधी पहिल्या फटक्यात येतच नव्हती, मग ते वर-खाली करत बसा. हा द्राविडी प्राणायाम करुन झाला की मग सायकल हाकत शाळेला जातांना सतत लक्ष ठेवा कुठे ओढणी चा V शेप तर बिघडत नाही नं!!देवा!! काय दिवस होते ते बापरे!! मला तर आज हे सगळं आठवून पण घाम फुटला.


Sunday, August 13, 2017

आठवणी लहानपणाच्या - स्पोर्टस् शूज

आज कित्येक वर्षांनी मी असे क्यूट शूज घेतले आहेत :) :) :) लहानपणी आम्हांला वर्षातून फक्त एकदाच नविन ड्रेस घेतला जायचा अर्थात ही तक्रार नाही तर तो नियमाचा-संयमाचा भाग होता, हं तर मी ५वी मधे होते तेंव्हा ड्रेसच्या ऐवजी स्पोर्टस् शूज चा हट्ट धरला होता आणि साधारण असेच पांढरेशुभ्र-गुलाबी रंगाची छटा असणारे मऊ-मऊ शूज घेतले होते :) :)जाम खुश झालेले मी आणि विशेष म्हणजे बरीच वर्ष ते शूज मी सांभाळून वापरले पण होते.बरं आहे ही फॅशन रिपीट होत असते आता मी परत हे शुज घालून उड्या मारायला तय्यार :) :)