Sunday, July 25, 2021

#आठवणी_लहानपणाच्या - शिकेकाई रविवार

  मेरे घने, लंबे बालोंका राज है..लाॅकडाऊन 😜

लहानपणी बाॅयकट/मश्रूमकट मिरवणारी मी आज चांगले एक-हात लांब केस सांभाळते आहे यावर माझा काय माझ्या आईचा ही विश्वास बसत नाहीए😄

लाॅकडाऊन आणि एकूणच बाहेर गेल्यावर मास्क काढायचाच नाही, या आता लागलेल्या सवयीमुळे, निदान गेल्या १५महिन्यांतमी केसांना कात्री लावलीच नाही!

दोन वेळेस केशकर्तनालयात जायची अपाॅईंमेंट घेतली पण कोरोनाभितीने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करायला भाग पाडलं!!

आता जर ते जमत नसेल तर केसांची व्यवस्थित निगा राखणं हे ओघानेच आलं!त्यासाठी मग शँम्पू हा आजतागायत वापरत आलेला पर्याय होताच, पण केसगळती सुद्धा आंदण आली होती. कधी इतके लांब केस मी वाढवलेच नाही ना त्यामुळे 'केसगळती' या वैश्विक प्रश्नाकडे मी गांभीर्याने बघितलंच नव्हतं!

पण केसांची काळजी घेणं हे काय दिव्य असू शकतं याचि प्रचिती आता मला हळू हळू यायला लागली होती! 

म्हणून मग जरा प्रयोग करुन बघायचे ठरवले-सर्वप्रथम कमीत कमी केमिकल्स वाला शँम्पू शोधायचा प्रयत्न केला, काही पर्याय सापडले पण मग नुसत्या शँम्पूने भागत न्हवतं, त्यासाठी त्या कंपनीच्या 'हेअर-स्पेशल पॅक'ची अख्खी पेटी उचलावी लागत होती, जे खिशाला अंमळ जड जायला लागलं! 

मग केस धुवायचे साबण वापरून बघितले, त्याने काही दिवस फरक वाटत आहे असं वाटेपर्यंत परत पहिले पाढे पंचावन्न!

मग म्हटलं हे सगळं बास झालं!शेवटी अॅमेझाॅनला मी शिकेकाई शोधायला सुरूवात केली,ती तर सापडलीच पण त्यासोबत ब्राम्ही, आवळा, रिठा काय न काय सापडलं😍फिर देर किस बातकी? लग्गेच सगळं आॅर्डर केलं!

मी लहान असतांना आमच्या घरात शिकेकाई हा एकमेव प्रकार केस धुवायला वापरला जायचा.प्रत्येक रविवार हा 'शिकेकाई' रविवार ठरलेला असायचा.माझ्या आईचे आणि बहिणीचे केस लांबसडक होते. आई स्वतःच्या केसांपेक्षा ताईच्या केसांची फार काळजी घ्यायची.केसांना तेल लावून चापून-चोपून वेणी घालणं हे जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं आणि महत्प्रयासाचं काम असायचं केसांना स्वच्छ ठेवणं.

शँम्पूने केस धुवायची पद्धत फार नंतर सुरु झाली खरं आमच्या घरात, कारण केस धुवायला शिकेकाईच वापरतात हेच माहीत होतं आम्हाला तेंव्हा.
तर माझी आई शिकेकाईची पावडर बनवून घ्यायची. म्हणजे जसं वर्षभराचं सामान-सुमान घरात भरून ठेवलं जायचं तसंच, वर्षभर पुरेल इतकी शिकेकाई ही दळून आणली जायची.तेंव्हा बाजारामधे शिकेकाईच्या वाळलेल्या शेंगा मिळायच्या, आताचं मला माहीत नाही.

शिकेकाईच्या या शेंगा, रिठा, नागरमोथा, आवळा असे बरेच जिन्नस एकत्र करुन कांडप केंद्रावरून दळून आणून, ती भुकटी(पावडर) एखाद्या डब्यात साठवून ठेवली जायची.मग प्रत्येक रविवारी सकाळी एकीकडे चहाचं आधण ठेवलेलं असायचं आणि दुसरीकडे एका भांड्यामधे दोन-तीन चमचे शिकेकाई पावडर + पाणी असं मिश्रण उकळत असायचं. जसं जसं पाणी उकळायचं तसा एक वेगळा, किंचित गोडुस पण उग्र सुगंध घरात पसरायला लागायचा आणि जितकं पाणी सुरूवातीला घातलं त्याच्या निम्मं झालं की शिकेकाई तय्यार झाली हे समजायचं.
मग ते कढत मिश्रण गाळणीने गाळून एका भांड्यात काढून ठेवायचं. केस धुतांना त्यात गरजेइतकं पाणी घालून केस धुवायचे आणि भलेही तेल निघायचं नाही पूर्णपणे, पण केसांची मूळं, त्वचा स्वच्छ व्हायची आणि केसांना तेलमिश्रित शिकेकाईचा वेगळाच सुगंध लगडायचा 😊😘 आमच्या आईचे केस इतके सुंदर,काळेभोर आणि लांबसडक होते की आमच्या पैकी कोणा एकीला ते विंचरायला मदत करावी लागायची.माझे केस तेंव्हा भलेही छोटुसे होते पण मला आईचे केस विंचरायला फार आवडायचं.

काहि वर्षांत ताई होस्टेल ला रहायला गेली, तिथे शिकेकाईचं कौतुक करायला जमेना, नंतर तिने केसही कापले. मग तर शिकेकाई वापरणारा एक मुख्य दावेदारच संपुष्टात आला, त्यामुळे आईने सुद्धा शिकेकाई बनवून घ्यायचा घाट घातला नाही.

तोवर शँम्पूच्या छोट्या पाऊचेस ने वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून घरात चंचूप्रवेश केला. तुम्हांला आठवत असेल तर, क्लिनिक प्लस या शँम्पूच्या छोट्या पुड्या रविवारच्या पेपरमधल्या जाहिरातीत चिटकवलेल्या असायच्या.

माझे केस लहान असल्याने एक छोटी पुडी बहुदा ५०पैसे किंमत असावी, पुरायची. शँम्पूने केस पटकन धुतले जायचे आणि एकदम मऊसूत व्हायचे, असलं भारी वाटायचं नं 😍

शिकेकाईसाठी 'करावी' लागणारी एकूणच 'मेहनत' बघता, शँम्पू सर्वार्थाने उजवा वाटायला लागला आणि शिकेकाईची पिछेहाट होत-होत शँम्पू घरात स्थिरावला.आईने सुद्धा शँम्पूची कास धरत केसांना जरा तेलयुक्त दुनियेतून क्वचित मोकळीक द्यायला सुरूवात केली😄

  शँम्पू मधे नंतर कित्ती कित्ती प्रकार निघाले.वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या लाटेत उडी घेत अगदी 'आयर्वेदीक' शँम्पूपण बाजारात आणले!त्यातच काही काळ शिकेकाई हा साबण ही ब-यापैकी लोकप्रिय झाला होता.

 तसं जरी झालं असलं तरी, बरीच वर्षं क्लीनिक प्लस हाच ब्रँड आमच्या घरात वापरला जायचा. पुढे मग बाजारात येणारे नवनवे पर्याय वापरायला सुरूवात झाली, क्वचितप्रसंगी शिकेकाईची बाजारात मिळणारी तयार पावडरही आईने वापरून बघितली. पण शेवटी आईने स्वतः जिन्नस गोळा करुन कांडप केंद्रातून तयार करुन आणलेल्या शिकेकाईची सर कोणालाच आली नाही, येऊही शकत नाही!!

आज शिकेकाईच्या उकळत्या वाफांच्या उग्र-गोडुस सुगंधाने या सगळ्या आठवणी जाग्या केल्या 😍

  मार्केटमधले चिक्कार शँम्पू आणि कंडिशनर्स आजतागायत वापरले होते पण शिकेकाई वापरली नं, की असं वाटतं,आई तिच्या हाताने माझ्या केसांची अगदी छान काळजी घेत आहे

  #आठवणी_लहानपणाच्या_शिकेकाई_रविवार
#शिकेकाई

Friday, July 9, 2021

#मुक्कामपोस्टUK - डबा

  मेस चा डबा - हे शब्द ऐकले की नेमकं कसं वाटतं हो तुम्हाला 😃

कॉलेज च्या दिवसातला बहुतांश लोकांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा, क्वचित माझ्यासारखीला भीती घालणारा तर काही जणांच्या सुखद आठवणी जागवणारा असेल ना 😁

मी कॉलेज ला असताना पेयिंग-गेस्ट म्हणून राहिले सगळीकडे, त्यामुळे स्वयंपाक घराचा पर्याय नव्हता आणि डबा नामक प्रकरण माझ्या आयुष्यात शिरलं!

पहिल्या वर्षी ज्या काकूंकडे राहिले त्या डबे पण करून द्यायच्या म्हणून मी त्यांच्याचकडे सुरुवात केली. आईच्या हातची चव काय असते याची जाणीव काही दिवसातच झाली आणि ताटात वाढलेल्या अन्नाची 'किंमत' पण कळायला लागली!

पहिल्या वर्षी सगळंच नवीन होतं, त्यामुळे 'मेस' किंव्हा 'डबा' या सतत बदलाव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत हे कळायला अंमळ उशीरच लागला. पण, दुसऱ्या वर्षीपासून मात्र, 'शोध नव्या डब्याचा' हे एक काम दर ३-४ महिन्यांनी अंगावर आदळायला लागलं!

माझी रूम पार्टनर उत्तर भारतीय होती, त्यामुळे तिला तर डब्यातलं जेवण असं का असतं? हा प्रश्न अगदी शिक्षण पूर्ण करून घरी जाईपर्यंत सतत छळायचा, बिचारी 😥

दर दोन दिवसांनी पाणीदार बटाटा भाजी आणि दर शनिवारी पाव-भाजी हे खाऊन खाऊन मला बटाटा आणि पाव-भाजी ची इतकी शिसारी बसली होती की, डबा बंद केल्यावर निदान एखादा वर्ष तरी मी त्या भाज्यांकडे पाठ फिरवली होती 😕

वरण किंव्हा आमटी हा प्रकार इतका पाणीदार असूनही डब्यातून अज्जीबात सांडत नाही, ही जादू/कला डबेवाल्याना कशी काय साधते, खरंच मला कायम आश्चर्य वाटायचं!

पोळी/ चपाती/ फुलके इतके पातळ/ ट्रान्स्परन्ट लाटता येणं, हेही एक जगावेगळं स्किल म्हणायला पाहिजे!

एकदा माझी आई आली होती रूमवर आणि तिला माझा डबा खाऊन बघायची दुर्बुद्धी सुचली, मी मागवला मग अजून एक डबा. त्या दिवशी मेसवाल्या काकूंनी 'मेथीचे थेपले' दिले होते. आईने डबा उघडला आणि थेपला बघून म्हणाली,' अगं, हे काय? एकच थेपला दिलाय तुझ्या मेसवालीने डब्यात??' मग मी तिला गम्मत दाखवली - एकाला एक असे ४ थेपले कसे चिटकवलेले होते ते वेगळे करून दाखवले आणि ती जादू बघून आई आणि मी, जे हसत सुटलो ते अजूनही हा प्रसंग आठवला तरी हसत बसतो 😂

पण आईला वाईटही वाटलं, पोरीला असं विचित्र जेवण जेवावं लागतं म्हणून! तरी माझी अवस्था बरीच बरी होती, असं म्हणावं लागेल इतर मुलांपेक्षा!

या मेस वाल्यांचे काही नियम मात्र मला कधीच कळाले नाहीत, जसं की, रविवारी एकच वेळ डबा!

हा जो काही अन्याय हॉस्टेल च्या पोरांवर हे मेस वाले करतात ना, त्यासाठी खरंच त्यांना न्यायालयात खेचलं पाहिजे! अरे परीक्षा सुरु असताना कुठे जायचं रात्रीचं जेवण हुडकायला?? एक वेळ ती बटाट्याची भाजी चालेल पण डबा नाही, हे असहनीय होतं!

सुकी, ओली, पातळ - बटाटा+ वाट्टेल ती भाजी मिक्स = हाच मेनू वर्षानुवर्षे, अगदी कोणताही डबा लावला तरी खावा लागणे याचा अर्थ लक्षात येतोय ना - काय एकी आहे बघा मेसवाल्यांमधे, काय हिम्मत कोणाची नवीन मेनू खाऊ घालेल तर!! खात्री आहे मला, आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मेस चा मेनू 'बटाटामय'च असणार!

त्यातल्या त्यात एक बरं होतं की, मित्र-मैत्रिणी एखादी नवीन मेस सापडली की लगेच तिथून मिळणाऱ्या डब्याबद्दल अहवाल सादर करायचे, म्हणजे मग आपण घेत असलेला डबा आणि तो डबा यात फरक आहे की नाही हे तपासायला जरा सोपं व्हायचं, तरी ते काम कठीणच होतं म्हणा, पण नवीन डबा लावला की निदान काही दिवस जरा बरे जायचे पोटाचे आणि जिभेचेही 😆

माझ्या शिक्षणाच्या ५ वर्षांपैकी ४-४.३० वर्षं मला या ना त्या मेस चे डबे खाऊन खाऊन जिभेला वेगवेगळी चव अजूनही कळते, हा विश्वासच मावळल्यासारखा झाला होता 😭

म्हणून मी शेवटचे काही दिवस कॉलेज च्या कॅन्टीन मधून जेवावं हा आणखीन एक खोल खड्ड्यात जाणारा निर्णय घेतला!

सुरुवातीला चवीत झालेला बदल जरा बरा वाटला पोटाला पण, रोज तेच?! बटाटा, बटाटा आणि बटाटाच!

मग कॉलेज च्या बाहेर एक सरदारजी uncle यायचे त्यांच्याकडचे पदार्थ खाऊन बघितले पण, डोळ्यासमोर दिसणारी 'स्वछता' बघून ते जेवण घश्याखाली उतरेना! मेस च्या डब्यात निदान दृष्टी आड सृष्टी तरी होती!

असो, तर असेच रडत-खडत कॉलेज चे उरले सुरले दिवस ढकलले!

शिक्षण संपलं - एक महत्वाचा टप्पा पार करून नोकरीसाठी मी मुंबई ला रवाना झाले. ते शहर तर माझ्यासाठी अगदीच नवीन होतं त्यामुळे परत एकदा पहिले पाढे ५५! आणि मी पेयिंग गेस्ट म्हणून दाखल! ज्या काकूंकडे राहायचे अर्थात त्यांचाच डबा लावला. पण मेस पेक्षा बरंच बरं जेवण होतं, त्यांच्या हाताला चव होती!

५ वर्षांचा दांडगा अनुभव पाठीशी असल्याने आता ना पोटाने तक्रार केली ना जिभेने आठवण करून दिली!

डब्याच्या भरोशे मग नोकरीची ४ वर्षं पण सरली, मात्र शरीराच्या तक्रारी जोरदार मुसंडी मारून वर आल्या! तेव्हा मात्र कानाला खडा लावला की आता नो मोर डबा!

मग मी स्वतः स्वयंपाक करायला शिकले - अर्धं कच्चं अर्धं शिजलेलं बनवत, नवनवे शोध लावत कसाबसा स्वतः पुरता डबा बनवता यायला लागला. यथावकाश लग्न झालं आणि 'स्वयंपाक' हा नेमका कसा, किती प्रमाणात, गोडा आणि गरम मसाल्यातला फरक करत करत अजूनही शिकतेच आहे 😉

पण!

आता बास!

I NEED A BREAK!!

UK ला आल्यापासून तिन्ही-त्रिकाळ काय बनवायचं, हा विचार करून करून माझा मेंदू झीजला अक्षरशः 😖

म्हणून आता परत एकदा मी 'डबा' लावायची हिम्मत करणार आहे 👹👹

कारण, आज काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न झोप पूर्ण व्हायच्या आतच डोक्यात घोळायला लागतो. उठल्यावर पण फ्रिज मधे भाज्या आहेत का आणि कितपत आहेत हे तपासा मग त्या धुवा, चिरून घ्या, शिजवा!

बरं इथे आमच्या गावात ठराविक ४च भाज्या मिळतात आणि या देशातल्या भाज्या काही मला करता येत नाहीत💁 त्यामुळे पर्याय अजूनच कमी!

बरं नुसती भाजी करून भागतंय थोडीच! त्याला पोळी नाहीतर भाकरी करावीच लागते 😏 दुपारी जी भाजी केली ती संध्याकाळी नको असते, मग परत तेच चक्र! धुवा-चिरा-शिजवा-पोळी लाटा, गर्रर्रर्र!!!!

म्हणून आता ठरलं! डबा झिंदाबाद!

डबा लावला की कसं जास्त विचार करायची गरजच नाही, फक्त दिलेल्या पर्यायातून काय हवं ते निवडा आणि ऑर्डर करा.आला डबा की मस्त जेवण करा,अहाहा! आयतं जेवण मिळणं म्हणजे निव्वळ सुख हो सुख!

हो पण मला तुमच्या शुभेच्छांची अत्यंत गरज आहे हं ह्या दिव्यातून जाण्यासाठी, नक्की मदत करा!

आणि हो तोंडी लावायला जरा तुमच्या मेस चे अनुभव पण येऊ देत की!

#मुक्कामपोस्टUK

Thursday, July 8, 2021

मुरमुरे तेल तिखट मीठ!

  हो हे पदार्थाचं नाव आहे 😃 फार चविष्ट पदार्थ आहे हं!

एखाद्या दिवशी समजा तुमचं दुपारचं जेवण नीट झालं नसेल

किंव्हा

ऑफिस चे कॉल्स घेऊन/बोलून खूप दमायला झालं असेल

किंव्हा

उगाच कंटाळा येतो ना आपल्याला कधीतरी, मग सुचत नाही काय करावं?

आणि

भूक पण लागलेली असते पण आणि नसते पण 😝

अशावेळेस ना, हा पदार्थ बनवायचा, पहिला घास खाल्ल्या खाल्ल्या मूड मस्त होतो की नाही बघाच ☺️👍

हं तर एका वाटीत मुरमुरे घ्या, त्यात शेंगदाणे टाका - दाणे भाजलेले असतील तर अजूनच मजा, दाळया किंव्हा डाळव असतील तर त्या ही टाका. आता एक छोटासा कांदा छान 'ओबड-धोबड' चिरून घ्या तोही त्या मुरमुरे मिश्रणात घाला. आता त्यात अगदी किंचित तेल + चवीनुसार मीठ + चिमूटभर तिखट घालून मस्त एकजीव करून घ्या आणि!

पहिला घास स्वतःला भरवत एका अत्यंत चवदार, बहारदार आणि मॅजिकल पदार्थाचा आस्वाद घ्या 😋😋😋

मोजून २च मिनिटात बनवता येणारा हा पदार्थ मॅग्गी पेक्षा तर कैक पटीने टेस्टी आहे हे नक्की, आणि हो डाएट चिवडा म्हणून पण खाता येतो 🤭

चला माझी तर आजची संध्याकाळ चविष्ट बनली, तुम्ही पण करून बघा 😃👍

Sunday, July 4, 2021

मूलभूत प्रश्न!

  युट्युबला बघितलेल्या रेसिपी व्हिडिओज नंतर मला काही मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत.
स्वयंपाकात निष्णात असलेल्या जाणकारांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी शंकानिरसन करावं ही विनंती आहे.

१) कोथिंबीर धुवून न-घेता वापरली तर त्यातून जास्त सत्व मिळतं का?

२) धने(ज्यांना हा शब्द चूक वाटत असेल किंवा समजला नसेल त्यांनी 'धणे' वाचावा) पूड घातल्यावर परत 'बारीक चिरलेली कोथिंबीर' का घालतात? धन्यांपासूनच कोथिंबीर उगवते ना? तरी दोन वेगळ्या रुपात वापरल्यास काही वेगळा फायदा होतो का शरीराला?

३) कोणतीही भाजी (नाॅन-व्हेज पदार्थ नाही, भाजीच हो)'आलं-लसूण-कांदा-टोमॅटो' (आ.ल.कां.टो) यांचं गरगट वापरुन शिजवली तरच चवदार बनते का? (माझ्या माहेरी-सासरी क्वचितच एखाद्या भाजीचं इतकं कौतुक केलेलं मी बघितलंय हो 😢) अगदी फुलगोबी/फ्लाॅवर च्या भाजीतही लसूण घालायचा असतो का?

४) बिर्याणी करतांना तेलात तूप/ तुपात तेल का घालतात?

५) आ.ल.कां.टो शिजवतांना त्यातून तेल सुटलं पाहिजे इतपत शिजवा, तर मग त्यात काही सत्व उरतं काहो? की फक्त चव चांगली हवी हाच एकमेव निकष असतो पदार्थाचा?

६) पालेभाजी करायच्या आधी धुवून घ्यावी आणि मग चिरावी(हो आमच्यात तरी भाजी चिरतातच कारण गवत कापतात किंवा बोट कापतं) आणि शिजवतांना पण झाकण ठेवावं असं मला आईने शिकवलं. पण, बहुतेक ठिकाणी चिरलेल्या पालेभाजीला आंघोळ घालायची प्रथा दिसते मग बरोबर पद्धत कोणती?

७) हो आणि ते गव्हाच्या पिठात बचकभर मीठ टाकून कणीक मळणे हे कोडं आजतागायत मला उलगडलेलं नाहीए! म्हणजे किती मीठ खायचं ते? पोळीत मीठ-भाजीत मीठ-वरण/आमटी असेल त्यात मीठ-चटणी/कोशिंबीर असली त्यातही मीठ??? आता उरलं सुरलं पाण्यातही घाला मीठ, त्यालाच का अळणी ठेवायचं ना!
तुम्हांला माहित आहे की नाही माहीत नाही पण, दूध+मीठ खायचं नसतं त्यामुळे त्वचा रोग होतो असं डाॅक्टर सांगतात. ते चहा-पोळी साॅरी 'चपाती' खाणा-यांना कदाचित माहित नसेल नं, म्हणून फक्त माहिती दिली.

८) तेलात मोहरी टाकून ती तडतडली की मगच बाकी जिन्नस म्हणजे जिरे वगैरे टाकायचे असं असतं ना की त्या सिक्वेन्स ला काही अर्थ नाही? म्हणजे तेलात मोहरी-मेथी दाणे-जिरे असं सगळं एकत्रच टाकलेलं दिसलं. बहुतेक तरी मोहरीला फुटायला वेळ लागतो पण जिरे लवकर फुटतात नं, मग ती अर्धी फुटलेली/कच्ची मोहरी झेपते का पोटाला?

मला तर बाई फार फार गोंधळायला झालंय युट्युबच्या एक्स्पर्ट शेफ्स च्या रेसिपीज बघून आणि त्यांनी दिलेलं अगाध ज्ञान ऐकून!

म्हणून विचार केला तुम्हांला विचारून बघुया 😊