Thursday, August 5, 2021

चुपके चुपके

  'चुपके चुपके'(१९७५) बघितला आज परत!कितव्यांदा ते काही आठवत नाही.खरं म्हणजे अशा बहारदार सिनेमांच्या पारायणांसाठी मोजणी करायचीच नसते मुळी, हो ना 😄

धर्मेंद्र कसलाsssssss चिकणाsss आणि क्यूsssssट आणि हँडसम 😘😘😘😘😘 दिसतो त्यात हाय 😍😍😍😍😍!!
अमिताभ तर त्यात आहे हे लक्षात पण येत नाही धर्मेंद्र समोर😄

हँडसम आणि हिरो असावं तर धर्मेंद्रनेच😘😘😘! बाकी सब पानी कम चाय, का काय म्हणतात ते😜

   एकूणच किती सहज-सुंदर कलाकृती आहे हा सिनेमा म्हणजे!एकापेक्षा एक सरस प्रसंग, हलकाफुलका पण सकस विनोद, सगळ्या कलाकारांचा अभिनय जणू आपल्या घरातली माणसं वाटावीत इतका सुंदर आणि! धर्मेंद्र 😍😍😍😍😍

  ओम प्रकाश आणि धर्मेंद्र चे सगळे प्रसंग कितीही वेळा बघितले तरी अज्जिबात कंटाळवाणे वाटत नाहीत😄 आणि चोराचा प्रसंग तर अफलातूनच आहे. मला कधीही, कुठेही आठवला की मी हसत सुटते 😜 😁 😁

  आज इतकी वर्षं उलटून गेली आहेत या सिनेमाला पण त्यातला विनोद अजूनही टवटवीत वाटतो मला आणि गाणी तर अहाहा! सगळीच 'लूप'वाली गाणी आहेत!

या सिनेमाचे दिग्दर्शक, संगीतकार, लेखक सगळीच दिग्गज माणसं आणि कलाकृती बद्दल तर वर्णन करायला शब्दच अपुरे आहेत माझ्याकडे! 

मला वाटतं, वर्णन करण्यापेक्षा पण ना अशा कलाकृतींचा आस्वाद घेऊन आनंदी व्हावं आणि डोक्यावरचा भार, मनावरचा ताण हलका करुन घ्यावा, बास!

आज परत एकदा या सिनेमाने माझा शुक्रवारचा आणि एकूणच आठवड्याभराचा शीण कुठल्या कुठे पळवून लावला, आता विकेंड मस्त जाणार यात शंकाच नाही 😊  

Sunday, August 1, 2021

१०१ वर्षं! लोकमान्य बालगंगाधर टिळक!

  १०१ वर्षं झाली एक वादळ नियतीच्या पोटात गडप होऊन!

काही दिवसांपूर्वी एका स्पर्धेच्या निमित्ताने मी परत एकदा लोकमान्य टिळकांच्या बाबतीतली माहिती वाचण्यासाठी काही संदर्भ चाळले आणि असं लक्षात आलं की, टिळकांविषयी किती थोडी माहिती आहे मला! किंबहुना त्यांच्याबद्दल जितकं वाचावं तितकं नवीन काहीतरी त्यातून कळायला लागतं!

शेंगांची गोष्ट किंव्हा 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', फक्त इतकीच ओळख शालेय पुस्तकातून आपल्याला टिळकांची झाली, लोकमान्यांवरचा सिनेमा आला त्यातून थोडेफार संदर्भ उजळल्या गेले. पण आज आपल्या घरात वावरणाऱ्या नव्या पिढीला लोकमान्य टिळक कितपत माहित आहेत? मुळात आपण त्यांना किती समजून घेतलंय?

या थोर व्यक्तिमत्वाच्या विचारांची उजळणी करायची गरज पडावी अशी परिस्थिती आहे का आपल्या आसपास?

भारतात शाळेत जो इतिहास शिकवला जातो त्यात अशा थोर स्वातंत्र्यसेनानींची माहिती तरी आहे, भलेही मग परीक्षेनंतर ती अडगळ का होईना, पण परदेशात असणारी मुलं जो इतिहास शिकतात विशेषतः इंग्लंडात शिकणाऱ्या पोरांना काय बरं शिकवत असतील? टिळक हे कसे राणीच्या विरुद्ध वागणारे होते? देशद्रोही होते?

खरंच या लोकांचं बलिदान आपल्याला आज 'गरजेचं' उरलंय का? की फक्त फेसबुक वर अशा नेत्यांचा फोटो आणि २-४ ओळी लिहून विनम्र अभिवादन केलं की संपला विषय?

टिळक, सावरकर किंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कालातीत आहेत पण जर ते आपल्याला माहित असतील तर ना त्यांचा अवलंब करता येईल?

'जे आहे ते झेपत नाहीए इथे आणि कुठे त्या टिळकांचे आणि सावरकरांचे विचार घेऊन बसलीस', हाही एक आवाज माझ्याच मनातून कानावर आदळला!

खूप स्वार्थी असल्याची भावना टोचायला लागते हे सगळे विचार डोक्यात घोळायला लागले की मग डोक्यातलं हे वादळ अशा २-३ ओळी खरडल्या की शमून जातं!

पण अपराधीपण पाठ सोडत नाही! काहीतरी देणं लागतो आपण या महामानवांचं!

कसलीच बंधनं माहित नसलेल्या आपल्या पिढीला, स्वात्यंत्र मिळवायला काय नरकयातना भोगाव्या लागतात याची कल्पना येऊच शकत नाही!!

पण टिळकांसारख्या हाडामासाच्या आपल्यासारख्याच दिसणाऱ्या माणसाने अशा कठीण परिस्थितीतही काय जीवनशैली अवलंबली होती याबद्दल निदान एक क्षण विचार करण्याचे कष्ट तरी घेऊच शकतो ना?!

टिळकांना मंडालेचा तुरुंगवास सोसावा लागला तेव्हा त्यांची ५०शी उलटून गेली होती, मधुमेहाचा त्रास होत होता आणि त्यात मंडालेचा अशक्य कडक उन्हाळा! पण त्यातही टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. तुरुंगातून सुटका झाली पण इंग्रजांनी त्यांच्या ग्रंथाची प्रत काही दिली नव्हती, वेळोवेळी मागणी करूनही मिळत नाही म्हटल्यावर लोकांना चिंता वाटू लागली हे जेव्हां टिळकांच्या कानावर आलं, तेव्हा ते म्हणाले, 'हस्तलिखित जरी इंग्रजांकडे असलं तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे, दोन महिने उसंत मिळाली तर परत लिहून काढेन'. अचाट बुद्धिमत्ता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती !!

टिळकांचा संघर्ष फक्त इंग्रजांशीच होता असं नाही, तर दुर्दैवाने स्वकियांशीही काही प्रमाणात होताच, ताई महाराज हे प्रकरण त्याचं मोठ्ठ उदाहरण आहे! पण असं असतानाही, 'मी कोण माहितीए का तुला?' हा विचार त्यांच्या मनात आला सुद्धा नाही मग आचरणाचा तर प्रश्नच नव्हता.

टिळक जेव्हा ६ वर्षांची कठोर शिक्षा भोगून घरी परत आले तेव्हा रात्र झाली होती, गायकवाड वाड्याचं बंद दार त्यांनी ठोठावलं पण दरवानाला टिळक कोण हे माहित नसावे, म्हणून त्याने आधी घरात जाऊन धोंडोपंतांना कळवलं, ते धावतच आले आणि लोकमान्य टिळकांना असं दारात बघून स्तिमित झाले. पण दरवानावर खेकसले तेव्हां टिळक शांतपणे म्हणाले,'तुरुंगाचं दार उघडायची जिथे ६ वर्षं वाट बघितली तिथे हे दार उघडायला थोडा उशीर झाला त्यात विशेष काही बिघडलं नाही', म्हणत शांतपणे घरात गेले - संदर्भ : दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ.

आज फ्रेंडशिप डे पण आहे ना खरं, टिळक आणि आगरकर यांची मैत्री आणि नंतर झालेली फारकत ही पण प्रसिद्ध आहे. जरी त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले होते तरी टिळकांच्या मनात आगरकरांबद्दल कधी कटुता नव्हती, उलट संधी मिळेल तेव्हा ते आगरकरांबद्दल अतिशय हृदयपणे बोलत असत, लिहीत असत. आगरकर निवर्तल्यावरही टिळक त्यांच्या कुटुंबीयांची सतत चौकशी करायचे, एव्हढच नाही तर आगरकरांच्या मुलाचं लग्नही टिळकांनी जुळवून दिलं होतं.

असे कित्येक प्रसंग आहेत ज्यातून टिळकांचा सखोल विचार समोर येतो, म्हणूनच मला वाटतं की मी कितीही वेळा टिळकांबद्दल वाचलं, तरी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सापडत जातं.
थोडंफार समजलंय असं वाटतंही पण उमजलंय का? तर नक्कीच नाही ! अजून प्रयत्न करावे लागणार इतकंच एव्हाना कळालं आहे..

लोकमान्य बालगंगाधर टिळक यांच्या स्मृतीस शतशः नमन 🙏