Sunday, December 12, 2010

’फुकटची’ करमणुक

प्रसंग १:
मला पुणे-मुंबई प्रवास करायचा होता म्हणून मी दुपारी ३ च्या नीता चं एक तिकीट बुक केलं.जेवण वगेरे करून मी साधारण २.४५ ला ज्या ठिकाणाहून बस निघणार होती तिथे आले, बस उभीच होती, त्यात सामान टाकलं अन पुस्तक वाचायला सुरुवात केली.हळु हळू सगळे प्रवासी आले अन बस निघाली, एक एक बसथांबे करत बस शहराबाहेर पड़ली..अन अचानक खूप जोरात गाण्याचा आवाज़ आला, पुस्तकातून डोकं वर काढुन बघते तर ड्रायव्हर सोबत असणा-या माणसाने टीव्ही सुरू केला होता अन 'मिलेंगे मिलेंगे' नामक एक अतिशय रटाळ सिनेमा लावला होता!! आवाजाची पातळी इतकी जास्त होती की कानात हेड-फोन्स टाकून गाणे ऐकणा-याला सुद्धा अगदी व्यवस्थित सगळा आवाज़ येत असेल!! एक-दोन प्रवाश्यांच्या कपाळावर पूसटशी आठी दिसली पण कोणाला अगदीच त्रास होतोय असं काही वाटलं नाही.

बहुतेक प्रवासी पुणे-मुंबई प्रवासात अगदी थोड़या पैश्यात फुकट सिनेमा बघायला मिळतोय ह्या आवीरभावात बघत होते.

मी ही तो सिनेमा बघायचा प्रयत्न सुरू केला पण आवाजाची तीव्रता इतकी होती की मला सहन होईना अन मी तो सिनेमा सुरू करणा-या भल्या माणसाला जाउन विनंती केली, आवाज़ थोडा कमी करण्याची, असं काहीतरी ऐकून त्याने आधी लक्ष नाही दिलं पण मी थोड़ा ज़ोर दिल्यावर क़ळत-नकाळतसा आवाज़ कमी केला..मी त्याचे आभार मानले अन माझ्या जागेवर येउन बसले..नशिबाने दिवसा प्रवास करत होते अन पावसाळ्याचे दिवस असल्याने खिड़की बाहेर बघत मी पुढचा प्रवास पूर्ण करू शकले.

प्रसंग २:
एकदा मला मुंबई-औरंगाबाद प्रवास करायचा होता म्हणून मी पुन्हा एकदा प्रायव्हेट बस वाल्याकडे तिकीट बुक केलं.प्रवासाची वेळ रात्री ११, दिवसभराचं ऑफीस आटपून मी बस मधे बसले.अगदी १ल्या रांगेतलं सीट मिळालं म्हणून मी खुश झाले.दिवसभराचा शीण आणि पुन्हा रात्रभर प्रवास ह्या विचाराने माझं शरीर आणि डोकं आधीच थकलं होतं..रात्रीचा प्रवास असल्यामुळे मी पांघरुण काढ़लं अन लगेच झोपेची आराधना सुरू केली..मला झोप लागते न लागते तोच अचानक समोरचा टीव्ही सुरू झाला,अंधारात अचानक आलेला तो प्रखर प्रकाश माझे डोळे दीपउन गेला अन पाठोपाठ आलेल्या कर्णकर्कश आवाजाने माझे कान एक क्षण बहीरे झाले..ड्रायव्हर जागा राहावा म्हणून त्याच्यासोबत असणा-या माणसाने एक बावलटपनाचा कहर असलेला असा सिनेमा सुरू केला होता, हे बघून मात्र माझ्या झोपेच्या सुखावर पार वीर्जन पड़लं!!

सिनेमातला तो गोंगाट असहय झाल्यामुळे ५ व्याच मिनिटाला मी त्या माणसाला विनंती केली आवाज़ कमी करण्याची तर माघे असलेला एक प्रवासी अगदी भांडण्याच्या स्वरात 'आम्हाला ऎकु येत नाही, आवाज़ कमी करू नका' अस जवळपास ओरडलाच..मी बापड़ी काय कारणार, शांत बसले अन प्रवास भाड्यासोबत फूकट असलेल्या हया करमणुकीचा बळी झाले!!

प्रसंग ३:
ऑफीस ला जाण्यासाठी गर्दीतुन वाट काढत बेस्ट बस मधे चढ़ले..सकाळची वेळ त्यामुळे तूफान गर्दी, महीलांसाठी राखीव असलेल्या सीट पाशी आले बघते तर काय बेस्ट च्या नवीन उपक्रमांतरगत बस मधे २ ही रांगांसाठी एलसीडी टीव्ही लावलेले.सुरुवातीला कौतुक वाटलं ह्या उपक्रमाचं पण अगदी १० मिनीटातच ते कौतुक गळुन पड़लं..त्या टीव्ही वर जोरजोरात कुठल्या तरी जुन्या सिनेमा चे गाणे वाजत होते..ते संपत नाही की लगेच कुठल्या तरी मॉल ची जाहीरात सुरू झाली, ती संपते न संपते तर लगेच एका सोन्या-चांदीच्या दुकानाची जाहीरात सुरू झाली..बघता बघता पुन्हा एकदा तिच गाणी टीव्ही वर यायला लागली...विचार आला, बस मधे टीव्ही लावण्याची कल्पना ज्याने काढली त्याचा प्रत्यक्षात जर असा उपयोग केला तर ही गोष्ट देखील ’फुकट’ करमणुकीच्या रांगेत जाउन बसेल!!

हे अगदी मोजके प्रसंग मी इथे नमूद केले आहेत पण आपल्या आजूबाजुला हल्ली रोज़च असे ’फुकटची’ करमणुक
करणारे अनेक समाजसेवक किंव्हा समाजकार्य करणारी मंडळं दिसत आहेत.गणपती उसत्सावापासून उभ्या केलेल्या स्पीकर्स च्या भिंती अगदी दीवाळी-दस-यापर्यंत इमाने-इतबारे २४तास आपली करमणुक करत असतात, ती करमणुक कमी पडू नये म्हणुन की काय राजकीय नेत्यांचे वाढदिवस ,प्रचार, सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजा, सार्वजनिक उत्सव हे ही फुकट करमणुकीच्या समाजकार्यात हातभर लावण्याचे काम वर्षाचे ३६५ दिवस करत असतात.

पण ह्या सगळ्या समाजसेवकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की, कृपा करुन, आपलं हे समाजकारण थोड्या कमी आवाजात करा जेणेकरुन आमच्यासारख्या सामान्य माणसांना स्वत: च्या कानांचा बचाव करता येइल.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check