लोकसत्ता रविवार पुरवणी मधील ’सर्किट’ ह्या सदरातील आवडलेला लेख इथे शब्दश: देत आहे.
जगण्याचे, व्यवहाराचे सामान्यांचे नियम धुडकावून आपल्याच मस्तीत जगणाऱ्या विक्षिप्त..सर्किट माणसांमुळेच खरे तर हे जग तोलून धरले आहे. अशा विलक्षण तऱ्हेवाईक माणसांविषयीचे हे साप्ताहिक सदर..
सदाशिव पेठेतील ‘भाग्यश्री’ या बंगल्यासमोर उभे राहिलात की एक पाटी दिसते, ‘माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा. (गणगोतासह)’ या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला! अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या. सगळ्याच भारी. ‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’ किंवा ‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.’ तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका, असा सल्ला देत असतानाच खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ कोणीही येऊ नये, अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे : वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व! - प्र. बा. जोग
अस्सल पुणेरीपणा ओतप्रोत भरलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्र. बा. जोग यांना अग्रक्रमच द्यायला हवा. आयुष्यभर अन्यायाशी झगडताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, त्याला शिंगावर घेण्याचे धाडस करणारा हा पुणेकर म्हणजे पुण्याची शानच! व्यवसाय वकिलीचा. उत्तम चालणारा. खरेतर खोटय़ाचे खरे करू शकणारा असा हा व्यवसाय! पण जोगांनी त्याबाबत आपली शुचिता आयुष्यभर सांभाळली. आपण चुकलो नसू तर उगीचच कुणाच्याही शिव्या खायच्या नाहीत, उलट त्याला चार अस्सल शिव्या हासडून त्याची बोलती बंद करण्याची प्र. बां.ची हातोटी जगावेगळी होती. त्यामुळेच त्यांची भाषणे म्हणजे श्रोत्यांसाठी हास्याचा धबधबा आणि मनमुराद करमणूक. जोग मात्र आपली परखड मते जाहीरपणे मांडण्यास कधी कचरले नाहीत. महापालिकेच्या कारभारावरचे वाभाडे काढणारा जोगांसारखा नगरसेवक आणि वक्ता पुन्हा झाला नाही, हेच खरे! नगरसेवक झाल्यानंतर ते पुण्याचे उपमहापौरही झाले आणि त्यांनी प्रत्येक बाबतीत आपली मते शक्य तेथपर्यंत रेटण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
पण जोग विक्षिप्तपणे वागतात, असा सगळय़ांचा समज होता. समोरच्या माणसाच्या कानफटीत वाजवण्याची क्षमता असणाऱ्याला सगळे घाबरतात, पण जोग कुणालाही न भिता आयुष्यभर सगळय़ांशी भांडत राहिले. या भांडणांचा इतिहास त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवला होता. नंतर त्याचे त्यांनी पुस्तकही लिहिले. त्याचे शीर्षक आहे.. ‘मी हा असा भांडतो’. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जोगांनी लिहिलंय की, पुस्तक प्रकाशनापर्यंत झालेली १३०५ भांडणे देणे शक्य नाही, मात्र ही भांडणे तत्त्वाची आहेत. त्यांचे तात्पर्य एवढेच की, ‘भांडणापासून फायदा होत नसून शत्रू मात्र निर्माण होतात. काही लोक सोडून द्या हो, असे म्हणून भांडणे वाढवीत नाहीत व माघार घेतात. मी माघार घेत नाही. शेवटपर्यंत माझे म्हणणे भांडणारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतो व भांडणारांचे दात त्यांच्या घशात घालतो.’
जोगांनी आयुष्यात काय मिळवले, असा प्रश्न कुणालाही पडेल. त्यांनीच त्याचे उत्तर ‘माझ्या सर्वागीण प्रगतीचे दहा तक्ते’ लिहून दिले आहे. त्यात आपण वकील कसे झालो, येथपासून ते भाडय़ाच्या घरातून स्वत:च्या घरात आपण कसे आलो आणि आपले वजन २३ पौंडापासून २०० पौंडापर्यंत कसे वाढले, असे अनेक तक्ते आहेत. सामाजिक प्रगती, वाहन प्रगती, वक्तृत्व प्रगती, मासिक उत्पन्न तक्ता अशांचाही त्यात समावेश आहे. जोगांना क्रिकेटचे भारी वेड. १९३९ साली साधा अंपायर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि १९४८ मध्ये ते रणजी ट्रॉफीचे अंपायर झाले. त्यांना टेस्ट मॅचचे अंपायर व्हायचे होते. ते होण्यात राजकारण आले, तेव्हा त्यांनी संबंधितांना त्यांच्या तोंडावर शिव्या तर दिल्याच, पण त्यानंतर त्यांनी एक पराक्रमच केला. तेव्हा हा सामना पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर होणार होता. जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीपेक्षाही उंच असे मचाण बांधले. आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.
वक्ता म्हणून जोग त्या काळातील सर्वाधिक गर्दी खेचणारे होते. शनिवारवाडय़ावरील त्यांच्या भाषणांना अक्षरश: तोबा गर्दी होत असे. ते त्यावेळी सगळय़ा राजकारण्यांचे शब्दश: वाभाडे काढत. आपण उत्तम वक्ता असूनही पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत आपले भाषण होत नाही, म्हणून प्र. बा. जोगांना फार राग यायचा. हा राग ते जाहीरपणे तर व्यक्त करीतच, पण त्यांनी खास त्यांच्या लकबीची एक कल्पना शोधून काढली. स्वत:च्या मोटारीच्या टपाचे रूपांतर त्यांनी व्यासपीठामध्ये केले. जिथे भाषण द्यायचे, तिथे ते आपली मोटारच घेऊन जात आणि टपावर चढून भाषणाला सुरुवात करीत. त्यांच्या भाषणाचे अध्यक्षस्थान त्यांचाच तीन-चार वर्षांचा छोटा मुलगा स्वीकारत असे. या व्याख्यानाला त्यांनी मग ‘पसंत व्याख्यानमाला’ असे नावही दिले. राजकारण्यांची जाहीर धुलाई करण्याचा हातखंडा असणारे जोग श्रोत्यांच्या फार आवडीचे होते. पण श्रोते फक्त भाषणे ऐकतात आणि टाळय़ा वाजवतात, त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे वाटून त्यांनी आपली व्याख्यानमालाही बंद करून टाकली.
वकील म्हणून प्र. बा. जोग हुशार होते. खासगी क्लास काढण्यापासून ते वकिली करण्यापर्यंत आणि नगरसेवक होऊन उपमहापौरपदी विराजमान होण्यापासून जाहीर भाषणे करण्यापर्यंत अनेक बाबतींत त्यांनी जगावेगळे विक्रम केले. क्रिकेट हा तर त्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. आयुष्यभर चौफेर कामगिरी करताना समोर येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी जागोजागी सुनावले आणि त्यामुळे त्यांच्या नादाला कुणी लागत नसे, असाही समज त्या काळात होता. ‘मी हा असा आहे’, या पुस्तकाच्या फुकट प्रती पुण्यातील वृत्तपत्रांना देऊनही त्यांनी साधी पोचही दिली नाही, अशी जाहीर टीका करताना त्यांना भीती वाटली नाही.
आयुष्यभर भांडत राहण्याचीही मजा जोगांनी घेतली. आपले हे वेगळेपण जपण्यासाठी त्यांना फारसे काही करावे लागले नाही. फक्त त्यांनी आपली वृत्ती बदलू दिली नाही. दरवर्षी आपल्या वाढदिवशी आपले मृत्युपत्र ध्वनिमुद्रित करून ठेवणारे जोग मागील वर्षांतील घटनांप्रमाणे त्यात आवर्जून बदल करीत. म्हटले तर हा विक्षिप्तपणा आणि म्हटले तर हा स्पष्ट व्यवहार! पुण्याचे पुणेरीपण जपणारा हा माणूस पुण्याचे वैभवच होता, हे निश्चित!
मला झोप लवकर येत नाही व लागलेली झोप काही आवाज झाल्याने मोडते. त्यामुळे माझी अनेकांशी भांडणे झाली. त्याचे प्रकार-
सिनेमाहून परत येताना बाहेरच्या दाराला कुलूप लावण्याची व्यवस्था नसल्याने ‘विमल, ए विमल, उठ’, ‘बाळय़ा, ए बाळय़ा, बाळय़ा रे’, ‘कमळे, अगं झोपलीस काय. उठ ना. आम्ही आलोय’, अशा प्रकारचे विविध भसाडे आवाज, किनरे आवाज निरनिराळय़ा घरांतून येत असतात. वेळी अवेळी येण्याने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो याची या लोकांना खंतच नसते.
एकदा माझ्या घराशेजारी दर गुरुवारी भजनाची प्रथा सुरू होणार होती.. मी मनात म्हटले, मेलोच. भजनकऱ्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कोण आम्हाला सांगणार दुसरीकडे जा म्हणून? मी त्यांना सांगितले, तुमचे भजन कसे होते ते मी पाहातो. पोलिसांकडे जाऊन मी कंप्लेंट दिली. ते म्हणाले, आम्ही याबाबतीत काही करू शकत नाही. आमचे घर सुदैवाने पश्चिमेस असल्याने वारा आमच्या घराकडून भजनी घराकडे जात होता. मी नवसागर आणून त्यात तंबाखूची भुकटी मिसळली आणि ते मिश्रण झाडाच्या कुंडीत खर पेटवून त्यावर हळूहळू चहाचा चमचा चमचा टाकू लागलो. भजन करणाऱ्यांची अवस्था काय झाली असेल, कल्पनाच करा. त्यातील एक मनुष्य चवताळून माझ्याकडे आला व म्हणाला, ‘हे काय चालवलंय तुम्ही?’ मी त्याच भााषेत म्हणालो, ‘हे काय चालवलंय तुम्ही?’ तो- आम्ही आमच्या घरात भजन करतोय. मी- माझ्या घरात नवसागर आणि तंबाखू जाळतोय. तो- पण तुमचा नवसागराचा धूर आणि तंबाखूचा खाट आमच्या घरात येतोय. मी- तुमचा भजनाचा आवाज इकडे येतोय ना! भजनवाला- तुम्ही बाहेर या म्हणजे दाखवतो. मी- जा हो. असे छप्पन्न पाहिले आहेत दाखविणारे.
पुढे या माझ्या तंबाखू व नवसागर जाळण्याने भजनाचा त्रास कायमचा मिटला.
(‘मी हा असा भांडतो’ या पुस्तकातून-)