Sunday, October 9, 2011

सोलेदाद

Lyrics link

वेस्टलाईफ ह्या बॅन्ड च ’सोलेदाद’ हे गाणं ऎकलं आणि डोक्यात विचार सुरू झाले,

ह्या गाण्याची खरी कथा मला माहित नाही, पण, जेंव्हा हे गाणं मी पहिल्यांदा ऎकलं तेंव्हा वाटलं की, बहुदा ह्या कपल चं ब्रेक-अप झालं असावं आणि ह्या मुलाचं त्या मुलीवर खुप प्रेम असणार पण ती सोडून गेल्यामुळे तो दु:खसागरात पार बुडून गेला आहे.

त्या प्रियकराने आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीच्या आठवणींमधे आळवलेलं हे गाणं आहे..त्याला ती सोडून गेल्यावर झालेलं दु:ख प्रत्येक शब्दातून वाहत आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या दोघांनी पुढच्या आयुष्याची स्वप्न बघितली होती त्या जागा आता त्याला भकास वाटत आहेत.आणि म्हणूनच तो म्हणतो, You're a loss I can't replace.

ह्या गाण्यात जे काही तो कवी सांगतो आहे ते कित्येकांच्या बाबतीत घडलंही असेल पण, खरंच, असं कितपत शक्य आहे की, जी व्यक्ती तुम्हांला तुमच्या आयुष्यभरासाठी हवी होती पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगूच शकणार नाही. तुमचं त्या व्यक्तीवर अगदी जिवापाड प्रेम होतं, तिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार होतात पण, आता तिच नाही म्हणून एखाद्याला जिवंतपणी जगणं सोडून देता येतं?

मी कल्पना करू शकते ब्रेकअप झाल्याचं दु:ख किती तीव्र असू शकतं, पण आपल्याला सगळ्यांना हेही माहित आहे, की वेळ-काळ-आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही, त्याच्या गतीनुसार ते पुढे सुरूच राहतं कोणाचीही वाट न-बघता, एकदा पुढे गेलेली वेळही त्याचमुळे कितीही इच्छा असली आणि कितीही प्रयत्न केले तरी परत येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोणी स्वत:ला एकाच जागी थांबवू शकतं, मनातल्या विचारांना एकाच व्यक्तीसाठी बांधून ठेवू शकतं?  

मला तरी वाटतं, एक ठराविक काळच ह्या दु:खाची तीव्रता राहत असावी. मान्य आहे, ह्या आठवणी आयुष्यभरासाठी मनावर ठसे उमटवून जातात पण त्यामुळे माणूस जगण्याचा स्वार्थ सोडू शकत नाही.काहि देवदास झालेही असतील कदाचित अशा प्रसंगानंतर पण, कुठेतरी जगण्याची जी उमेद निसर्गाने माणसात जन्मत:च दिलेली आहे तीला इतक्या सहजा-सहजी झुगारून देणं केवळ अशक्य आहे. तुम्ही स्वत:ला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीहि, काळ, ज्याच्याशी आपलं आयुष्य बांधलं गेलेले आहे आणि आपले आप्तस्वकीय ज्यांमुळे आपल्याला जगण्याची ताकद मिळाली आहे, थांबू देत नाहीत!!

पण, मी म्हणते का थांबावं एखाद्याने? फक्त हट्ट म्हणून की दुस-याचं अटेन्शन मिळविण्याकरता? छ्या....

माझं तर स्पष्ट मत आहे की, निदान स्वत:साठी तरी माणसाने मनमुराद जगायला हवं. माणसाचा जन्म मिळाला आहे आणि ह्या पृथ्वीतलावर कित्तीतरी गोष्टी बघण्यासारख्या, करण्यासारख्या, जगण्याचा खराखुरा आनंद लुटण्यासारख्या आहेत मग का स्वत:हून आयुष्याची राख-रांगोळी करायची.

आयुष्य हे सरप्राइजेस नी भरलेलं असतं, कदाचित तुम्हांला हवी असलेली व्यक्ती पुढच्याच वळणावर भेटणार असेल, फक्त तुम्ही तीथवर जायचा उशीर...    


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check