काही दिवसांपूर्वी पुण्याला काही कामानिमित्त चक्कर झाली. माझ्या कॉलेजच्या भागामधेच काम होतं, काम आटोपलं आणि सहज फेरफटका मारावा म्हणून मी चालत निघाले. कॉलेजच्या दिवसांपेक्षा थोडाफार बदल झालेला दिसत होता त्या भागामधे, त्या वेळच्या आठवणींमधे चालतानाच समोर एकदम ’ब्राउनी’ दिसला आणि त्या पाठोपाठ काकूंचा मुलगा! हो तोच होता तो, थोडासा ढोला झालाय बहुतेक पण चेहरा सेमच आहे अजुन! मी लगेच नजर वळवली आणि रस्ता क्रॉस करून जायला लागले. ते दोघे पुढे निघून गेले पण, माझे विचार मात्र त्या घराकडे वळले जिथे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ’पेईंग गेस्ट’ म्हणून राहायला गेले होते!
मला अगदी व्यवस्थित आठवते आमची पहिली भेट! २९ जुलै चा तो दिवस होता..पुण्यामधे नेहमी असतो तसा भुरभुर पाऊस सुरू होता..दुपारचा १.३०वाजला होता..कॉलेजमधे फीस भरून मी,बाबा, नुकतीच भेटलेली माझ्याच कोर्सची मैत्रीण आणि तिचे बाबा असे चौघेजण तो पत्ता शोधत निघालो..घर लगेच सापडलं, अगदी पाचच मिनीटावर आहे म्हणून आम्ही सगळे एकदम खुश होतो.दुमजली घराचं छोटसं गेट उघडून आम्ही आत गेलो.पुणेकराचं घर म्हणून थोडी धाकधूक होती मनात पण गेटवर कुठेही पाटी दिसली नाही तसे आम्ही बिनधास्त झालो की आत कुत्रा नसणार.त्यातही दारातली रांगोळी बघून मला थोडं बरं वाटलं.पुढे दारावर देखील कुठे पाटी नव्हती म्हणून आम्ही बेधडकपणे बेल वाजवली..आतून एकदम जोरात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला..आम्ही दोघी घाबरून थोडं मागे सरकलो..कोणी तरी कुत्र्याला थोडसं आवरलं आणि करडया आवाजात विचारलं,’कोण आहे?’ मराठी असल्यामुळे मी पुढे होउन सांगितलं, ’पेईंग गेस्ट साठी आलो आहे’. मग एका माणसाने फक्त अर्धाच दरवाजा उघडला आणि बघितलं की बाहेर कोण आलं आहे. शहानिशा करून मगच त्यांनी आमच्यासाठी पूर्ण दरवाजा उघडला. आत गेल्यावर पहिलं दर्शन झालं, ब्राउन कलरच्या एका कुत्र्याचं. तो अगदी रागात आमच्याकडे बघत होता आणि त्याला एका बाईने हाताने आवरलं होतं. त्या बाईने आम्हांला एक-एक प्रश्न विचारायला सुरूवात केली.कोणत्या कॉलेजमधे अॅडमिशन घेतलं,कोणत्या गावचे आहात,आमच्या दोघींच्या वडिलांना कुठे काम करतात वगैरे विचारलं.आम्ही योग्य ती माहिती पुरवली आणि मग विचारलं की जागा कोणती आहे? त्यावर त्या म्हणाल्या की, आधी मी सगळे नियम सांगते त्यानंतर तुम्हाला जागा दाखवते, जर पटत असेल तर पुढचं बोलूया. मला ह्या आधी कधीही घराबाहेर राहण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे मी फक्त ऎकत होते.माझी मैत्रीण तर हिंदी भाषिक होती त्यामुळे ती आणि तिचे बाबा पार गोंधळून गेले होते, त्यावेळेस खरं तर आम्हांला गरज होती त्यामुळे त्यांचं ऎकुन घेण्याशिवाय पर्याय नव्हता,म्हणून माझे बाबा म्हणाले ठीक आहे, सांगा.
नियमावली सांगायला सुरूवात झाली.
१. महिन्याचं भाडं अमुक रुपये आहे, ह्यामधे कमी-जास्त काही होणार नाही, उगाच रिक्वेस्ट करू नका.
२. पहिल्या दोन दिवसात पूर्ण भाडं द्यावं लागेल.
२. इथे फक्त १० महिने राहू शकता, पुढे जर राहायचं असेल तर दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर येउन चौकशी करायची, जागा रिकामी
असेल तरच मिळेल. ( बापरे! म्हणजे फस्ट इयर झाल्यावर काय सगळं सामान घेउन घरी जायचं आणि परत घेउन यायचं! )
३. दिवाळीनंतरच्या ५ महिन्यांचं भाडं तुम्हांला सुरूवातीला द्यावं लागेल मगच राहायची परवानगी मिळेल.( अरे देवा! इतके पैसे तर आज आणलेच नाहीत आपण :-( बाबा आता काय करायचं?? )
४. जेवण, सकाळचा नाश्ता, दूध ह्यापैकी काहिही किंवा सर्व काही हवे असल्यास वेगळे पैसे पडतील. ( चला म्हणजे खाण्याची तरी सोय इथे होउ शकते. )
५. खोलीतला दिवा,पंखा ह्या गोष्टी फक्त गरजेपुरत्या वापरायच्या कारण विजबील वेगळ घेतलेलं नाही.
६. इस्त्री अजिबात वापरायची नाही.
७. गरम पाणी फक्त एक बादली दिले जाईल. ( फक्त एकच बादली ??? )
८. गादी आणि पलंग दिलेला आहे, बेडशीट स्वत:च वापरावं लागेल. उशी मिळणार नाही कारण आमच्याकडे उशी वापरायची पध्दत नाही. ( शेवटचं वाक्य ऎकून तर मला इतकं ह्सू आलं पण वातावरणाची गांभिर्यता बघता मी ते दाबलं. )
९. कपाट फक्त एकच दिलेले आहे, दोघींनी मिळून त्यातील अर्धा-अर्धा भाग वापरायचा. ( हे भगवान! हा कसला नियम?? पैसे घेत आहात तर निदान कपाट तरी सेपरेट द्याना !! )
१०. रात्री ९ नंतर बाहेर जाण्याची परवानगी नाही.
११. इथे असणा-या फोनवर तुमच्या घरच्यांचा फोन आठवडयातून फक्त एकदा घेण्याची सोय आहे, वार तुम्ही ठरवू शकता. ( नशीब! मला वाटलं ह्याचे पण पैसे आकारणार की काय! ;-) )
हूss! हे नियम ऎकुन आम्हांला दोघींना तर टेन्शनच आलं आणि बाबा लोकांच्या कपाळावर घाम! पण आमच्यावर वेळ अशी आली होती की, अडला हरी अन...म्हणून आम्ही चौघांनी सगळे नियम मान्य केले.त्यानंतर आम्हांला खोली दाखवली गेली, खोली तशी मोठी होती, दोन बाजूला खिडक्या होत्या,तिथेच दोन कॉट्स टाकले होते आणि समोर एक गोदरेजचं दोन दरवाजे असलेलं कपाट होतं, त्याला वेगवेगळ्या किल्ल्या देखील होत्या. ते बघून मला जरा हायसं वाटलं.खोली बघून आम्ही दोघींनी आपापल्या बाबांना ’चालेल’ म्हणून सांगितलं. तसे माझे बाबा पुढे झाले आणि म्हणाले की, ’ह्या मुली आजपासून इथे राहू शकतील का?’ लगेच काकू म्हणाल्या, ’पूर्ण महिन्याचं भाडं द्या आणि सामान लगेच आणा, काहीच हरकत नाही!’ आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो, फक्त ३ दिवसांकरता पूर्ण महिन्याचं भाडं?? काय हे पुणेकर रे देवा! मी तर बाबांना म्हणाले की राहू देत मी मामाकडे राहीन आणि १ तारखेला इकडे शिफ्ट होइन. माझ्या मैत्रीणिने पण असच ठरवलं आणि १ तारखेला येतो म्हणून निघायला लागलो तसं काकूंनी सांगितलं की, ’ऑगस्ट महिन्याचे पूर्ण पैसे द्यावे लागतील तरच जागा राहील नाहीतर ३ दिवसात कोणा दुस-याला दिली जाउ शकते! मला तर इतका राग आला ना, ह्या लोकांना काही माणुसकी आहे की नाही, सगळ्या गोष्टी फक्त व्यवहार म्हणूनच बघायच्या आणि प्रत्येक गोष्ट पैशातच मोजायची!! आमचे हात दगडाखाली अडकले होते त्यामुळे पैसे दयावेच लागले!
आम्हां दोघींचे बाबालोक राहायला चांगली जागा मिळाली ह्या निश्चिंतीत परतीच्या प्रवासाला निघाले.
क्रमश: