Thursday, April 19, 2012

बालमित्र


त्याची अन माझी ओळख मी १० वर्षांची असतांना माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला झाली. साधारण माझ्याच वयाचा, गोरा-गुटगुटीत आणि खटयाळ डोळ्यांचा हा मुलगा मला खुपच आवडला आणि अगदी पहिल्या भेटीतच मी त्याची खुप मोठ्ठी फॅन होउन बसले. त्या दिवसापासून ते आजपर्यंत आमची ही दोस्ती कायम आहे, तो रोज सकाळी मला म्हणजे आपल्या सगळ्यांना भेटतो, कळालं..हो हो तोच तो आपला खोडकर, खटयाळ, करामती चिंटू.

चिंटू..चारूहास पंडीत आणि प्रभाकर वाडेकरांचं हे अपत्य २१ नोव्हेंबर १९९१ ला पहिल्यांदा सकाळ मधे झळकलं आणि त्या दिवसापासून ते आजतागायत अगदी रोज न-चुकता आपल्या सगळ्यांना भेटत आहे.कोणत्याही वयाची व्यक्ती असू दे ती चिंटूच्या प्रेमात पडायला वेळ लागत नाही.

सुरूवातीला चिंटू आला, त्यासोबत त्याचे मित्र-मैत्रीणी आले मग हळू-हळू आपल्याला त्याच्या आजी-आजोबा,शेजारच्या जोशी काकू,मारकूटा राजू ह्यांची ओळख होत गेली आणि हे चिंटूच सगळं जग जणू आपल्या कुटुंबाचा एक भागच होउन गेलं.रोजचा सकाळ उघडल्यावर जर चिंटू दिसला नाही तर काहितरी चुकल्यासारखं वाटतं, त्याला जर भेटलं नाही तर दिवसाची सुरूवात चांगली झाल्यासारखं वाटतच नाही मला तर.

तुमच्या-आमच्या घरी साजरे होणारे दसरा-दिवाळी,गणपती ह्यांसारखे सणही तो साजरे करतो आणि नविन वर्ष, मित्र-मैत्रिणींचे वाढदिवसही.
शाळेचा अभ्यास, मित्रांशी होणा-या गप्पा, आई-बाबांचं त्याच्यावर चिडणं, मिनेची कविता, त्याची आजारपणं ह्या सगळ्या गोष्टी जणू तो आपल्या सोबत रोज शेयर करत असतो.आपल्या आयुष्यात जरी त्याच घटना घडत असतील तरी ह्या गप्पा आपल्याला बोअर होत नाहीत.

त्याचे आई-बाबा अगदी छान आहेत, साधे-सरळ, आपल्या मुलाला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून झटणारे आणि पुत्ररत्नाच्या करामातींनी हताश होऊन त्याला शरण जाणारे! चिंटूच्या आईच्या तर अगदी नाकी नऊ येतात त्याला आणि त्याने घरभर केलेला पसारा आवरता आवरता आणि कधी-कधी तर त्याचे बाबासुध्दा आईला त्रास देण्यात सामील होतात. अशा ह्या क्युट कुटंबासोबतच चिंटूची मित्रमंडळी सुध्दा अगदी खास आहेत. त्यांच्या पूर्ण ग्रुपमधे सगळ्यात हुशार असणारी मुलगी मिनी, हिला शाळेत जायला,नियमित अभ्यास करून परिक्षेत सर्वात जास्त गुण मिळवायला आणि कविता करून बाकींच्याना त्या ऎकवून हैराण करायला खुप आवडतं. चिंटू चा घट्ट मित्र पप्पू मात्र त्याच्यासारखाच खोडकर आहे पण एका बाबतीत तो वेगळा वाटतो जेंव्हा तो चिंटू आणि मिनी किंवा चिंटू आणि राजूच्या भांडणातून चिंटूला वाचवतो. बगळ्या हा थोडासा वेंधळा मुलगा आहे तर राजू हा आडदांड. बाकी मंडळी देखील मधून भेटून जातात जसं, बगळ्याचा कुत्रा, ज्याच्याशी खेळल्यावर चिंटू ला कुत्रा किंवा एखादा प्राणी पाळायची लहर येते. तसंच चिंटूचे आजी-आजोबा, त्यांच्या कॉलनीमधे राहणारा एक कॉलेजवीर, जोशी काकू इ.

जीवनातल्या छोटया-छोटया गोष्टी अगदी सहजपणे आपल्या निदर्शनास आणून हा चिंटू आपल्या चेह-यावर एक स्मितहास्याची लकेर पसरवून जातो. मराठी साहित्य जगतातली ही अगदी आगळी-वेगळी कलाकृती आहे जिचे आत्तापर्यंत ५००० च्या वरती भाग झाले आहेत आणि चित्ररूपाने ही गोष्ट अजुनही सुरूच आहे.
चिंटूचं वय विचारलं तर त्याने २० वर्ष पूर्ण केली आहेत पण अजुनही तो तुमचं-आमचं बालपण कायम राखत आपल्याशी बोलतो, खेळतो आणि कधी कधी कानपिचक्याही देतो. चिंटूच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या अगदी मन:पूर्वक शुभेच्छा आणि हा तुमचा-आमचा लहान मित्र आपल्याला रोज असाच भेटू देत हीच त्याच्या पालकांना विनंती.

तुम्ही आज चिंटूला भेटलात की नाही?

आजच मी माझ्या भाच्यांसाठी पुस्तकरूपी चिंटूचे सगळे भाग विकत घेतले  एका गोष्टीचं समाधान वाटतं की माझ्या लहानपणी भेटलेला हा मित्र मी माझ्या भाचेमंडळींना देखील भेटवू शकते  :)


चिंटू


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check