सध्या सगळीकडे 'सैराट'ची हवा जोरदार चालू आहे. मी तो चित्रपट अजून बघितला नाही पण गाणी कालच पहिल्यांदा व्यवस्थित ऐकली.
'याड लागलं' ह्या गाण्याचं म्युझिक आणि रेकॉर्डिंग प्रसिद्ध 'सिफ्मनी स्टुडियो' मधे झालं आहे. गाण्याची सुरूवात ऐकतांना जाणवलं की किती मधुर संगीत आहे आणि त्याची ओरिजिनॅलिटी लगेच लक्षात आली पण जेंव्हा मराठी शब्द कानावर पडले तेंव्हा अगदी जमिनीवर आल्यासारखं वाटलं.
अर्थात गायकाचा आवाज, शब्द छान आहेत पण हे गाणं कानात हेडफोन्स लावून ऐकत बसलोय असं नाही करता येत कारण त्यात ज्या लो व्हॉल्यूम नोट्स आहेत त्या ऐकण्यासाठी आवाज वाढवा आणि लगेच हाय व्हॉल्यूम नोट्स आल्या की आवाज कमी करा असं सतत करावं लागलं जे मला तरी अजिब्बात आवडत नाही, त्यामुळे ते गाणं अनुभवायची मजा सगळी निघून जाते.
अजय-अतुल ह्या जोडीला संगिताची व्यवस्थित जाण आहे आणि त्यांनी योग्य तेच ह्या गाण्यासाठी केलं असेल पण मला नाही ते पटलं,मग भलेही ते सिफ्मनी स्टुडियो मधलं रेकॉर्डिंग का असेना.
दुसरं गाणं - 'आताच बया का बावरलं' हे श्रेया घोषाल ने गायलं आहे जे मला सगळ्यात जास्त आवडलं. तिचा आवाज प्रचंड गोड आहे यार :) :) सतत ऐकावा इतका गोड आहे. ह्या गाण्यासाठी सुरूवातीला घेतलेला कोरस पण फार भारी वाटला मला, त्यात अगदी शेवटच्या शब्दाला घेतलेली हरकत तर लाजवाब आहे, बहोत खुब अजय-अतुल :)
ह्या गाण्याचे बोल पण अगदी त्या मुलीच्या कोवळ्या मनातल्या आणि तिच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या गाण्यांचे बोल 'अजय-अतुल' जोडीनेच लिहीले आहेत, त्यातही मी त्यांना ब-यापैकी मार्क्स देईन :)
तिसरं गाणं - 'सैराट झालं जी' हे गाणं सगळ्यात पहिले प्रसिद्ध केलं होतं. हे तसं स्लो पण रोमँटिक गाणं आहे, जे ऐकतांना जोगवा मधल्या 'जिव रंगला' ह्या गाण्याची आठवण येत राहते.ह्यामधे असणारं संगित अगदी 'अजय-अतुल' जोडीचंच आहे हे कोणीपण सांगु शकेल इतकी त्यामधे त्यांच्या आधीच्या गाण्यांना दिलेल्या संगिताची झाक आहे.असो, ह्या गाण्याचे बोल मला आवडले. दोघांच्या मनामधे असलेली नव्या प्रेमाची चाहूल, त्यामुळे आलेली हुरहुर,
प्रेमाच्या घेतलेल्या आणाभाका सगळं सगळं अगदी अलगदपणे टिपलं आहे.त्या दोघांच्या गोड-गुलाबी प्रेमाचा प्रवासच जणू ह्यामधून सांगितला आहे.
चौथं गाणं - 'झिंग झिंग झिंगाट' - हे तर सगळ्या लहान मुलांचं अत्यंत फेव्हरेट गाणं आहे आणि ह्या वर्षीच्या गणपती महोत्सवामधे फक्त ह्याचाच आवाज असणार गॅरेंटीड! ह्या गाण्याचे बोल आणि संगित दोन्ही मधे अगदी तुफान मस्ती करून घेतली आहे अजय-अतुल जोडीने.
तर माझ्या मते पहिलं गाणं सोडलं तर हा अल्बम तुम्ही नक्कीच ऐकू शकता आणि ऐजाँय करू शकता.