नाटकः ओ वुमनिया
लेखक: शेखर ढवळीकर
दिग्दर्शकः मंगेश कदम
कलाकारः सुहास जोशी (माय फेव्हरेट),सतिश पुळेकर (अजुनही हॅण्डसम दिसतो यार हा माणुस ;) ), स्वाती चिटणीस, जयंत सावरकर, कादंबरी कदम, आशुतोष गोखले.
नाव ऐकून तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे नाटक तुमच्या-आमच्या मुली/स्त्रिया/बायका ह्यांवर बेतलेलं आहे. आजीपासून ते पार आजच्या पिढीतल्या माझ्यासारख्या मिसळपाव विचार करणा-या मुलीपर्यंतचा स्त्रीचा प्रवास ह्या नाटकात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
स्टोरीलाईन हिच आहे आणि आजीची पिढी मग आईची पिढी आणि आजच्या मुलीची पिढी असं तिन जणींनी आपल्याला दाखवलं आहे. बघतांना असं वाटत होतं की हे रोजच आपण आपल्या घरामधे, आजुबाजूला बघत आलो आहे आणि बघत आहे.
याबरोबरीनेच आणखिन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे - पुरूष. अर्थात स्त्रीयांबाबतीत त्यांचं वागणं पिढ्या दर पिढ्या कसं बदललं किंवा नाहीच बदललं हे यातून सांगायचा प्रयत्न केला आहे. मुख्य भर स्त्रीविषयी आहे आणि योग्य ठिकाणी नवरा ह्या प्राण्याला अगदी कोपरखळीपासून ते ढोपर मारण्यापर्यंत सगळं दाखवलं आहे.
विषय जरी तोचतोच असला तरी संवाद हलके-फुलके आहेत आणि मुख्य म्हणजे कसदार कलाकार आहेत त्यामुळे नाटक व्यवस्थित एंजॉय करता येतं :) :)
सुहास जोशी खुपच मस्त आहेत, त्यांचा रंगमंचावरचा वावर इतका सहज आहे की जणू आपण त्यांच्याशी त्यांच्या घरात गप्पा मारत बसलो आहोत.आजी आणि सासू ह्या दोन पात्रामधे त्यांच्या चेह-याचे हावभाव, आवाजाची पट्टी इतकं सुरेख आहे की आपण एक क्षण अचंबित होतो इतका नैसर्गिक अभिनय, वाह!
सतिश पुळेकर प्रदिर्घ काळानंतर नाटकामधून प्रेक्षकांसमोर आले आहेत पण अभिनयाबाबतीत काही वादच नाही.दिसायला तो माणूस अजुनही भारी दिसतो, मुळात मी लहान असतांना त्यांचे चित्रपट बघितले होते तेंव्हाचा चेहरा-अंगकाठी आणि अभिनय अगदी तस्सच आहे.
स्वाती चिटणीस ह्यांचं हे दुसरं नाटक बघितलं मी, त्यांचा अभिनय सुद्धा सहज आहे पण शरीरयष्टी ब-यापैकी बेढब वाटत आहे निदान 'शेवग्याच्या शेंगा' नाटकापेक्षा.
जयंत सावरकर हे तर अगदी नावाजलेले चित्रपट-नाट्यसृष्टी गाजवलेले मातब्बर कलाकार आहेत, त्यांच्याविषयी मी काय बोलणार.मला त्यांचा मेक-अप विशेष म्हणजे मिशी फार आवडली ;)
कादंबरी कदम! हिचं पण मी हे दुसरं नाटक बघितलं, ह्यावेळेस जरा कमी शिरा ताणून अभिनय करायचा प्रयत्न केला आहे, जरा बरं वाटलं त्यामुळे. बाकी तिची उंची कमी असल्यामुळे की काय तिच्या उभं राहण्याची पध्दत आणि चेह-यावरचे हावभाव यांची सांगड काय अजून जुळली आहे असं वाटत नाही! बाकी एका प्रसंगामधे तिने गुजराथी मुलीचं जे बेअरिंग घेतलंय ते छान जमलं :)
आशुतोष गोखले ह्या कलाकाराला मी पहिल्यांदा बघितलं, त्याला विशेष काम नाही एक प्रसंग सोडला तर पण त्याचे कपडे किंवा मेक-अप हे फारच बोरिंग आहे.तो काटकुळा आहे त्यामुळे अजूनच विचित्र वाटतं.हे लोक थोडी बॉडी का बनवत नाहीत? साधारण सगळेच मराठी कलाकार/ हिरो असेच आहेत,स्वतःच्या शरिरयष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत.
असो, तर नाटक छान आहे आणि शक्य असेल तर नवरा/बॉयफ्रेंड ह्यांसोबत बघा म्हणजे त्यांना न-कळत पणे थोडं फार त्यांच्या पार्टनरचं महत्त्व कळेल( जर अजून कळालं किंवा व्यक्त केलं नसेल तर )