Sunday, February 24, 2019

आनंदी-गोपाळ


UK मधे आम्ही एका छोट्या खेडेगावात राहतो. बघायला गेलं तर हे गाव तसं समृद्ध आहे पण क्षेत्रफळाच्या मानाने खेडंच आपल्या भाषेत. तर मी इथे येण्याच्या काही दिवस अगोदरच आनंदी-गोपाळ सिनेमाचा ट्रेलर बघायला मिळाला आणि प्रदर्शनाची तारीख १५ फेबु!तारीख बघून हिरमुसले कारण तेंव्हा मी UK मधे असणार आणि ह्या इतक्या चांगल्या सिनेमाला मुकणार म्हणून फार वाईट वाटलं होतं 😞

पण जेंव्हा लंडनच्या महाराष्ट्र मंडळ पेजवर ह्या सिनेमाची जाहिरात बघितली तेंव्हा क्षणाचाही विलंब न-करता तिकिटं बुक केली 😁

काल म्हणजे २३ फेबुला हा सुरेख चित्रपट बघायचा योग आला. एव्हाना बहुतेक जणांचा बघून झाला असेलच म्हणा पण तरी, मला पण ह्या चित्रपटाचं कौतुक केल्याशिवाय राहवत नाही.
दिग्दर्शन,पटकथा,संवाद,अभिनय,सिनेमॅटोग्राफी सगळ्या बाबतीत अगदी अप्रतिम असा हा चित्रपट आहे.

१८००चा भारतातला किंवा परदेशातला काळ दाखवणं असो किंवा तत्कालीन परिस्थितीत असणारी लोकांची मानसिकता असो, सगळे बारकावे व्यवस्थितपणे हाताळले आहेत.

ललित प्रभाकरने उभे केलेले गोपाळराव अतिशय भावले. इतिहासातलं हे पात्र ज्याच्याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नसतांनाही ही भूमिका समजून घेऊन तिला ज्या मेहनतीने साकारलं आहे त्याबद्दल हॅट्स-आॅफ!

भाग्यश्री मिलिंद हिने साकारलेली आनंदीबाई बघतांना ऊर अगदी अभिमानाने भरून येतो. बीपी सिनेमा मधे तिच्यातल्या उत्तम अभिनेत्री असण्याची चुणूक जाणवली होतीच पण ह्या सिनेमामधे तिने 'आनंदीबाई' साकारण्याचं शिवधनुष्य अगदी लीलया पेललं आहे असंच म्हणावं लागेल.

गोष्ट म्हणावी तर अगदी एका ओळीची - भारताच्या पहिल्या महिला डाॅक्टर! पण तिथवर पोहोचण्याचा प्रवास म्हणावा तर अतिशय कष्टप्रद आणि जीव पिळवटून टाकणारा 😢

मला सगळ्यात जास्त आवडलेला सीन म्हणजे - जेंव्हा आनंदी-गोपाळ यांचं बाळ जाऊन दोन महिने लोटलेले असतात आणि गोपाळराव हताश झालेल्या आनंदीबाईंना समजावून सांगतात, परत एकदा अभ्यास सुरु करा.त्यावर ठामपणे आनंदीबाई 'मी डाॅक्टर होऊन दाखवते की नाही बघाच' असं म्हणतात तेंव्हा आनंदीबाईच्या डोळ्यातलं तेज आणि गोपाळरावांचे आनंदाने डबडबलेले डोळे!! व्वाह! बेस्ट सीन अॅण्ड मार्व्हलस अॅक्टींग!!

तो सीन बघतांना अंगावर शहारे उठतात, डोळ्यात आनंदाश्रू तरळतात आणि मन आपोआप त्या आनंदीबाईच्या जिद्दीला सलाम करतं!!

अजून बरेचसे प्रसंग जसं की, गोपाळरावांच्या सासूबाई दारामधे पडलेली घाण, कचरा टाकणाऱ्यांना सडेतोड उत्तरं देत हाकलवून लावतात आणि आनंदीबाईंना धीर देत शाळेत जायला सांगतात किंवा जेंव्हा गोपाळराव आनंदीबाईंसाठी कलकत्त्याच्या काॅलेजमधे डबा घेऊन जातात आणि त्यांचा बायकोने शिकावं ह्या आग्रहामागचा विचार लहानपणापासून कसा बळकट होत गेला हे सांगतात आणि शेवटच्या सीनमधे जेंव्हा आनंदीबाई समुद्राकडे जायला उभ्या राहतात तर त्यांच्या पदराचं टोक गोपाळरावांच्या सद-याला बांधलेलं असतं...असे कित्येक प्रसंग आपल्याला अंतर्मुख करतात.

याचबरोबर ह्या चित्रपटाची गाणीसुध्दा प्रसंगानुरूप अतिशय साजेशी आहेत.वैभव जोशी यांचे चपखल शब्द आणि जसराज जोशी-ऋषिकेश दातार-सौरभ भालेराव ह्या त्रयींनी दिलेलं संगीत कान तृप्त करणारं आहे.ह्या चित्रपटाची सर्व गाणी यूट्युबला किंवा गाना अॅपमधे ऐकता येतील, जरुर ऐका.त्यातलं 'तू आहेस ना-anthem' हे गाणं अशक्य सुंदर आहे.

एकूणच प्रचंड मेहनतीने बनविलेल्या ह्या विलक्षण चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्यात मोलाची भर नक्कीच घातली आहे.