Sunday, March 10, 2019

#आठवणी_लहानपणाच्या - न्हाव्याचं दुकान

आज जवळजवळ १८-२० वर्षांनी मी न्हाव्याच्या दुकानात गेले!! निमित्त? नव-याला केस कापून घ्यायचे होते म्हणून 😜 आता तुम्ही म्हणाल त्यासाठी तू कशाला गेली होती? कारण हे की, इथे युके मधे छान युनिसेक्स सलाॅन्स असतात.जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी दोघांसाठीच्या सर्व्हिसेस उपलब्ध करुन दिलेल्या असतात. हल्ली आपल्याकडेही अशी दुकानं थाटलेली दिसायला लागली आहेत. तर, आम्ही सलाॅन मधे म्हणजे आपल्या भाषेत न्हाव्याच्या आधुनिक दुकानात गेलो. नवरा एका छानश्या आॅटोमॅटीक खुर्चीत विराजमान झाला आणि मी दुकान न्याहाळायला लागले.

चार न्हावी पुरुष केस कापायचं काम अगदी सराईतपणे करत होते. दुकानामधे मोठ्ठा टीव्ही लावलेला होता एका बाजूला आणि चार खुर्च्यांच्या समोर पण ३ छोटे टीव्ही होते ज्यावर फुटबाॅल मॅच चालू होती. मोठे छान स्वच्छ आरसे लावलेले होते आणि एका बाजूला कपाटामधे सगळ्या ब्रँड्सची हेअर जेल, क्रीम्स सजवून ठेवलेली होती. केस कापणारे न्हावी पण एकदम टकाटक ब्रँडेड कपडे आणि शूज घातलेले आणि विशेष म्हणजे आकर्षक केशरचना असलेले दिसत होते. चकचकीत असणारं हे केशकर्तनालय बघून माणूस कितीही पैसे मोजायला सहज तयार होईल 😄 😄

नाही नाही मी त्या सलाॅन वाल्याची जाहिरात करत नाहीये हो, गैरसमज नका करून घेऊ हं 😁

हां बरोब्बर, तुमच्यापैकी काही चाणाक्ष वाचकांना प्रश्न पडला असेल की मी १८-२० वर्षांपूर्वी न्हाव्याच्या दुकानात का गेले असेन बरं 🤔

तर गम्मत अशी आहे की लहानपणी म्हणजे मी साधारण ६-७वीत असेपर्यंत न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घ्यायचे 😁 मी आणि माझा लहान भाऊ आमच्या बाबांसोबत जायचो महिन्यातल्या एखाद्या रविवारी.

आमच्या भागातलं ते न्हाव्याचं दुकान खूप वर्षांपासूनचं होतं. मला आठवतं तसं बहुदा मळकट हिरव्या रंगाच्या भिंती असाव्यात दुकानाच्या.तीन भिंतींपैकी समोरासमोरच्या दोन भिंतींवर आरसे लावलेले होते. ते सलग आरसे असतात नं, हां सगळ्या न्हाव्यांच्या दुकानात दिसतात तसेच. ज्या आरश्यासमोर बसायचं त्यावर एक ट्यूबलाईट लावलेली होती आणि पाठीमागचा आरसा पारा गेलेला होता.पारा गेलेला म्हणजे त्यात आपलं प्रतिबिंब मजेशीर दिसतं, नसेल माहित तर गुगल करा 😜

वरती पत्र्याचं छप्पर आणि त्याला लटकलेला अंगात अज्जिबात त्राण नसलेला मळकट्ट पांढऱ्या?? रंगाचा स्वतःला वारा घालणारा पंखा! उरलेल्या तिस-या भिंतीवर कुठल्याशा को-ऑप बँकेचं कॅलेंडर लटकवलेलं.

L आकारामधे ठेवलेली दोन बाकडी ज्यावर केस कापून घ्यायला कमी पण फुकट पेपर वाचायला आणि गावगप्पा करायला बसलेले रिकामटेकडे आणि काही वयस्क लोक.

केस कापून घ्यायला येणाऱ्या माणसांसाठी फक्त एकच खुर्ची कारण एकच काका जे बहुतेक मालक होते दुकानाचे तेच केस कापणे, दाढी करणे ही कामं करायचे. खुर्ची अगदी साधी लाकडी ज्यावर बसायला एक उशी /सीट ठेवलेलं. त्याला डार्क मरून कलरचं लेदरचं कव्हर लावलेलं होतं. ह्या खुर्चीला मागे डोकं टेकवायला एक T शेपचं खाली-वर करता येईल असं काहीतरी लावलेलं असायचं. जेंव्हा लहान मुलांना बसवायचं असेल तेंव्हा खुर्चीच्या दोन्ही हातांवर फळी ठेऊन त्यावर मुलाला/मुलीला बसवलं जायचं.

केस कापणारे काका मात्र स्वच्छ धुवट पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमधे असायचे आणि कायम तेल लावून चप्पट भांग पाडलेले दिसायचे.

केस कापून घ्यायला बसलं की अंगाभोवती काळ्या रंगाचं कापड गुंडाळल्या जायचं आणि एका हातात स्टीलची 'चक् चक्' आवाज करणारी कात्री आणि बारीक कंगवा घेऊन काकांचे दोन्ही हात केसांवर सपासप फिरायला लागायचे.जास्तीत जास्त १०-१५मीनीटांमधे माझे केस कापून व्हायचे. मग दुसरा एक छोटा आरसा हातात घेऊन ते मागच्या बाजूला थोडा तिरपा धरायचे जेणेकरून समोरच्या आरश्यामधे केस कुठवर कापलेले आहेत, व्यवस्थित कापल्या गेले आहेत का ह्याची खात्री करुन घ्यायचे.त्यानंतर ते काका माझ्या गळ्याभोवतीचं कापड काढून टाकायचे आणि मानेवरचे केस स्वच्छ करायला पावडर लावलेला खरखरीत ब्रश फिरवायचे. अशा त-हेने सगळे सोपस्कार झाले की खुर्चीतून उडी मारून १०रु.त्यांच्या हातात ठेऊन मी घरी धूम ठोकायचे 😄

त्या काकांच्या दोन गोष्टी विशेष लक्षात राहण्यासारख्या होत्या. एक म्हणजे, केस काळे असो वा पांढरे, फक्त केस कापायचे असोत वा दाढी करायची असो, ते त्यापैकी कोणतंही काम इतक्या तन्मयतेने करायचे जणू काही एखादं शिल्प साकारत आहेत किंवा पेंटींग बनवत आहेत 😊 आणि दुसरं म्हणजे त्यांचं जगातल्या सगळ्या विषयांबद्दलचं अगाध 😜 ज्ञान!

ज्या गतीने ते हात चालवायचे त्याच स्पीडने त्यांची तोंडाची तोफ पण चालू असायची. विषय कोणताही असू देत, त्यांना त्यातलं इत्थंभूत माहित असल्यासारखं अगदी आत्मविश्वासाने बोलायचे. कधीकधी तर सपशेल चुकीची माहिती पण इतक्या ठसक्यात सांगायचे की कोणीही सहज विश्वास ठेवेल 😜

तर असा तोंडाचा पट्टा आणि हाताने वस्तरा चालवत ते काका एकेकाच्या डोक्यावरचा भार हलका करायचे. एकूण काय तर तेंव्हा न्हाव्याच्या दुकानात जाऊन केस कापून घेण्यात पण वेगळी मजा होती,माझ्यासाठी तरी.

अर्थात ते दिवस बरेच बरे होते असं आज म्हणायला हरकत नाही कारण, मी एक मुलगी असून न्हाव्याच्या दुकानात बिनधास्तपणे एका वयस्क पुरुषाकडून केस कापून घेऊ शकत होते. आज मात्र लहान मुलाला जरी पाठवायचं म्हटलं एकट्याला अशा ठिकाणी तरी चार-चारदा विचार करावा लागेल 😢

असो..तर आज युकेमधल्या सलाॅनच्या निमित्ताने माझ्या लहानपणीची ही मजेशीर आठवण मनाच्या तळ्यातून वर डोकावली 😊 😊 आणि एक सांगायचंच राहिलं, ते न्हावी काका जेंव्हा वस्तरा फिरवून मानेवरचे केस बारीक कापायचे ना तेंव्हा एकदम वेलवेट चा फील यायचा केसांना, त्यावरून बोट फिरवायला फार भारी वाटायचं मला 😄 😄