Tuesday, March 8, 2022

कळतं पण वळत नाही

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आजच्या दिवशी काय विशेष केलंत? कदाचित काही जणींनी आॅनलाईन डिस्काउंट्स मिळाले म्हणून मनासारखी शाॅपिंग केली असेल, काहींनी छोटी पार्टी/आऊटींग केलं असेल किंवा काही जणींच्या घरच्यांनी त्यांना सरप्राईज पार्टी दिली असेल.
पण आज महिला दिनाचं खास निमित्त म्हणून स्वतःला काय दिलं?

आता मी ज्या विषयाला सुरूवात करणार आहे तो विषय जरा ओळखीचा झालाय पण तरी 'कळतं पण वळत नाही', या सदरात मोडणारा आहे!
हा लेख वाचणा-या ज्या पण माझ्या मैत्रिणी आहेत - तुम्ही शेवटचं हेल्थ चेक-अप कधी केलं होतं? नाही नाही डायट सुरु करायच्या आधी चेक केलेलं वजन विचारत नाही मी! तर डाॅक्टरशी सविस्तर चर्चा करुन स्वतःच्या वयोगटाला आवश्यक अशा विविध चाचण्या - रक्त,लघवी,स्तन परिक्षण हे केलं आहे का? एकदा तरी?

तुमच्यापैकी ब-याचजणी 'आई' असाल, बाळ झाल्यावर तुम्ही स्वतःहून डाॅक्टरला विचारलंत का यापुढे तब्येतीची काळजी कशी घेऊ ते?
काही जणींच्या घरात ४०+ वयोगटातल्या महिला असतील, त्यांना मेनोपा‌ॅज, त्या दरम्यान होणारे शारिरीक आणि मानसिक त्रास याबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर ओळखीतल्या डाॅक्टरांशी याबाबत चर्चा केली आहे का?
जो महिला वर्ग नोकरी करत नाही त्यांचा स्वतःचा 'हेल्थ इन्शुरन्स' आहे का?

महिला,बायका, मुली या स्वतःच्या आरोग्याबद्दल काही प्रमाणात अजूनही अनभिज्ञ आहेत असं मला माझ्याच घरातल्या उदाहरणांवरून वेळोवेळी लक्षात आलं.
म्हणून आजच्या या खास महिला दिनाच्या दिवशी हा प्रश्न उपस्थित करावासा वाटला.
पुष्कळ कारणं आहेत की महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि दुर्दैवाने जेंव्हा वेळ निघून जाते तेंव्हा केलेल्या उपचारांचा उपयोग होतोच असं नाही!
तुम्ही स्वतःशीच याबाबतीत मोकळेपणाने बोलायला हवं - मला काही त्रास होत आहे का? जर शारीरिक असेल तर ओळखीतल्या डाॅक्टरांशी मोकळेपणाने त्याबद्दल बोलता येईल का? जर नाही जमणार तर मी कोणी महिला डाॅक्टर कशी शोधायला हवी? घरच्यांना कसं पटवून द्यायचं की,'हो मला सुद्धा स्वतःला ठणठणीत ठेवायचं आहे, त्यासाठी डाॅक्टरची गरज लागू शकते!'

कदाचित असे प्रश्न विचारून सुरूवात करता येईल.
दुसरा मुद्दा असतो - पैसा! हो! जो महिलावर्ग नोकरी करत नाही त्यांना 'माझ्यावर' पैसा नको बाई खर्च व्हायला, मला काय धाड भरली आहे - हा विचित्र भ्रम असतो!! जो सरतेशेवटी त्या महिलेचं आरोग्य आणि पर्यायाने कुटुंब उध्वस्त करतो!!!

मान्य आहे की, आरोग्य तपासण्या करणं खर्चिक होऊन बसलं आहे म्हणून ना ऊठसूट क्षुल्लक कारणांसाठी दवाखान्यात जायचं ना अति त्रास झाला तरी गप्प बसायचं! 

आपलं शरीर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला आत काहीतरी बिघडलं आहे याचे संकेत देत असतं, ते संकेत वेळेत ओळखायचे आणि नव-याला किंवा मुलांना त्याबद्दल लगेच कल्पना देऊन चांगल्या डाॅक्टरचा सल्ला घ्यायचा. जो महिला वर्ग नोकरी करतो त्यांना याबाबतीत क्वचित प्रसंगी आॅफिसमधून काही कार्यक्रमांमधून माहिती पुरवली जाते पण त्यांचा दृष्टिकोन यामुळे कितपत बदलतो हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो.

म्हणजे एकूणात मुद्दा हा आहे की कधी संकोच आडवा येतो तर कधी पैसा, पण अशाने निदान शारीरिक-मानसिक तक्रारी कमी न-होता वाढत राहतात.
क्वचित कोणाला ही पण भिती असते की, मी टेस्ट करून घेतल्या आणि काही भलतं-सलतं समोर आलं तर?? पण मी म्हणते ऊलट विचार करा ना,जितक्या लवकर आजारांबद्दल लक्षात येईल तितक्या लवकर उपाय नाही का करता येणार??पर्यायाने तुमचा फायदाच होईल ना!

आणि टेस्ट रिपोर्टस् मधे सगळं चांगलं आहे, असं डाॅक्टर म्हणाले तर,'माहित होतं हो मला, मला मेलीला कसली धाड भरली आहे. विनाकारण पैसा वाया गेला हो!' - चूक! सपशेल चूक!!जर तुमचे रिपोर्ट्स नाॅर्मल आहेत असं डाॅक्टर म्हणाले तर आनंद व्यक्त करा की तुमचं आरोग्य छान आहे आणि त्याला तसंच सांभाळा म्हणजे पुढचे धोके टाळता येतील

माझं तर स्पष्ट मत आहे, हे शरीर-हा मानवी जन्म आनंदात जगण्यासाठी आपल्याला मिळाला आहे. जर तुम्ही त्याची नीट काळजी घेतली तर टकाटक जगता येईल नाहीतर...करा विचार!!
आणि हो जर खरंच हा लेख आवडला तर यावर्षी फुल हेल्थ-चेक अप करायचं मनावर घ्याच!!!

Monday, February 21, 2022

धीरोदात्त

हजारो सुया सतत शरीरात टोचत आहेत इतक्या प्रचंड वेदना.. असह्य आणि अशक्य त्रास..नेमकं काय होतंय हे सांगता न-येणं..या आणि अशा शब्दांत सांगता येणार नाहीत अशा मरणयातनांमधून जात असतांना सुद्धानशिबाला दोष देणं नाही की परमेश्वराशी भांडणं नाही की घरातल्या कोणावर चिडचिड करणं नाही!

जीवघेण्या यातना सहन करणं, निमूटपणे सगळ्या प्रकारची औषधं पचवणं, किमो म्हणू नका रेडिएशन म्हणू नका - सगळ्या छळवादी ट्रीटमेंट्स ना शांतपणे सामोरं जाणं हे काही ये-यागबाळ्याचं काम नाही! पण या अग्निदिव्यातून जातांना देखील देवाचं नामस्मरण करणं एका क्षणासाठी सुद्धा बंद न-करता आमचे बाबा श्री.जगदीश जोशी, जवळपास १.५ वर्षं एका दुर्धर कॅन्सरशी लढाई देत शेवटी ५फेब्रुवारी २०२२ रोजी चिरनिद्रेत विसावले!!

आमचे बाबा म्हणजे आदर्श मुलगा-भाऊ, समजूतदार पती आणि कर्तव्यनिष्ठ कुटुंबपालक होते.

देवावर प्रचंड श्रद्धा, स्वतःवर अढळ विश्वास, कोणतंही काम असो, ते करायचं एकदा ठरवलं तर अगदी उच्च दर्जाचं तर करणारच पण, शक्य तितक्या कमी वेळेत पूर्ण सुद्धा करणार, हे त्यांचे काही गुण उदाहरणादाखल.त्यांचं व्यक्तीमत्व भारदस्त होतं आणि नजरेत अशी जरब होती की समोरचा माणूस काही वावगं करायच्या/बोलायच्या आधी १० वेळेस विचार करेल!

फिरतीची सरकारी नोकरी, घरात आई-वडील,बायको-मुलं इतकं मोठं कुटुंब असतांना सुद्धा आम्हा पोरांनी कधि म्हणजे कधीच आमच्या आई-बाबांचं एका शब्दाने भांडण झाल्याचं आजतागायत माहीत नाही.

आमच्या बाबांची राहणी अगदी साधी पण विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याचा निर्भयपणा आणि घेतलेल्या निर्णयाचे जर परिणाम विचित्र झालेच तर ते झेलण्याची ताकद अफाट होती!

तुम्हांला वाटेल माझे बाबा होते म्हणून इतकं कौतुक करत आहे पण, तसं अजिबात नाही. आमच्या बाबांनी स्वतः च्या कुटुंबातल्या अगदी दूरच्या नातेवाईकासोबत जितके चांगले संबंध जपले होते तितकेच आईकडच्या सुद्धा प्रत्येक नातेवाईकाला आपलंसं केलं होतं.

कोणालाही अडचण असली तर शक्य तितक्या प्रकारे मदत करणं हे तर होतंच पण घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची सेवा, सुश्रुषा करणं यातही त्यांनी कधी टाळाटाळ केली नाही.बरं, इतकं सगळं करून एखादा माणूस त्याची वाच्यता कोणाकडे उभ्या आयुष्यात एकदा तरी करेलच ना? पण नाही, आमचे बाबा केलेल्या कोणत्याही कामाबद्दल कधी एका शब्दाने बोलत नसत ना त्यांना त्याबद्दल केलेलं कौतुक आवडत असे.

आजारपणात सुद्धा आईला आपला त्रास होतो आहे, या जाणिवेने ते अस्वस्थ व्हायचे पण नाईलाज होता. बाबांचा कॅन्सर इतका विचित्र होता की तो झपाट्याने वाढायचा आणि किमो दिला की कमी व्हायचा आणि परत उसळी मारायचा. हे सगळं सांगायला किंवा वाचायला एक वेळ सोपं वाटेल पण माझ्या बाबांनी अक्षरशः मरणयातना भोगल्या आहेत. आणि जितका त्रास बाबांना शरिराच्या आत होत होता तितकाच किंबहुना त्याहून जास्त आईला होत होता! अशक्य कष्ट सोसले आहेत दोघांनी गेल्या १.५वर्षांत !!!

आमच्या बाबांना देव-देव करायचा प्रचंड नाद. अगदी पहाटे तीन ला उठून देवाची पूजा करुन ५.३०ची ट्रेन पकडून बाबा कित्येक वर्षं आॅफिसला जात होते. इतकंच नाही तर सगळी व्रतं-वैकल्य, सोवळं-ओवळं यामधे कधीच खंड पडला नाही. कित्येक प्रसंगी तर बाबांनी देवाचा पुरणा-वरणाचा स्वयंपाक स्वतः करून सण साजरे केले आहेत.वाचून खरं वाटणार नाही तुम्हांला पण माझ्या बाबांना गुरूचरित्र, भगवद्गीता हे ग्रंथ मुखोद््गत होते. घरात होणाऱ्या सत्यनारायण, गौरी-गणपती स्थापना यांसारख्या पूजा तर बाबा डोळे झाकून सहज सांगू शकत. कधी कोणी ऐकली नसतील अशी महत्वपूर्ण व्रतं-वैकल्य सुद्धा आई-बाबांनी तीन ते चार दशकं सलग केली!

बाबांना पंचांग व्यवस्थित सांगता यायचं. देवादिकांची पुस्तकं वाचल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नसे. विपुल ग्रंथसंपदा आहे त्यांची आणि प्रत्येक पुस्तक-ग्रंथ किमान एकदा वाचून-टिपणं काढून ठेवलेला आहे!

इतकं सतत देव-देव करणाऱ्या माणसाला इतर छंद असूच शकत नाही, असं नका वाटू देऊ! आमच्या बाबांना जुन्या हिंदी चित्रपट आणि गाण्यांचं सुद्धा प्रचंड वेड होतं. त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून सुद्धा आवडते चित्रपट बघायला ते बरोबर वेळ काढत आणि कॅसेट्स चा संग्रह करण्याची सवय आम्हांला त्यांच्यामुळेच लागली

बाबांना शिक्षक व्हायचं होतं, तशी त्यांनी एके ठिकाणी काही काळ शिक्षक म्हणून पण नोकरी केली होती. त्यामुळे कोणताही विषय असो विशेषतः गणित ते फार अचूक समजावून सांगायचे.

बाबांचं मोत्यासारखं सुंदर अक्षर हा एक आणखीन अचंबित करणारा प्रकार वाटायचा मला कारण, शाळेची १० वर्षं + पुढच्या शैक्षणिक काळात कितीही प्रयत्न करूनही मला कधीच इतकं सुरेख अक्षर गिरवता नाही आलं   एक ना अनेक, असंख्य छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्याबद्दल बाबांचं कौतुक करावं तितकं कमी आहे

एखादं काम कधी, किती वाजता करायचं, त्यासाठी कोणाची मदत लागू शकते का, प्रवास असेल तर त्याचा जाण्या-येण्याचा मार्ग काय असेल, कोणत्या प्रकारच्या वाहनाने प्रवास करायचा, किती दिवसांकरता करायचा - या सगळ्या गोष्टींचं त्यांचं प्लॅनिंग जवळपास २वर्षं आधी ठरलेलं असायचं!

आमच्या घरातल्या बहुतांश ज्येष्ठांनी भारतभ्रमण मग त्यात चार-धाम यात्रा, वैष्णोदेवी, नर्मदा परिक्रमा असे सगळे प्रवास हे वयाच्या साठी नंतर केले पण आमच्या बाबांनी ठरवलं होतं की, जोवर शरीर धडधाकट आहे, नजर शाबूत आहे तोवर भारताचं सौंदर्य अनुभवायचं. त्यामुळे रिटायरमेंटच्या कित्येक वर्षं आधीच आई-बाबांचं भारत-भ्रमण पार पडलं होतं. 

सरकारी नोकरी करणारा माणूस ज्या दिव्यातून जातो तशाच प्रकारच्या छळवादी वातावरणातून बाबा रिटायर झाले आणि त्यानंतर तर आणखीनच व्यस्त झाले! त्यांना बिझनेस करायची हौस होती म्हणून वयाच्या ६०व्या वर्षी त्यांनी ट्रॅक्टर ची एजन्सी घेतली. त्यात येणारे चढ-उतार अनुभवले पण पार्टनरशीप च्या धंद्याला असणारा शाप त्यांच्याही बिझनेस ला लागला आणि बिझनेस बंद करावा लागला. प्रचंड नुकसान झालं पण बाबांनी ना पार्टनर ला कधी शिव्या दिल्या ना स्वतःच्या नशिबाला दोष देत हतबल होऊन हात-पाय गाळून बसले! त्यांना बिझनेसचा कैफ चढला होता तो दुर्दैवाने अशारीतीने उतरला पण बाबा सतत पुढे बघत होते.त्यांनी मग इतर गोष्टींमधे मन गुंतवलं, परदेशात फिरुन आले.यथावकाश आम्हां पोरांची लग्नं थाटामाटात, सगळ्यांच्या सासरच्या माणसांचे स्वभाव, रुढी-रितीभाती सांभाळत करुन दिली.नंतर नातवंडांमधे त्यांचा जीव रमला.

एकूणात काय तर आमच्या बाबांनी त्यांच्या वाटेला आलेला प्रत्येक क्षण परिपूर्ण जगून घेतला. No regrets at all! 

पण इतकं सगळं गोड-गुलाबी, छान सुरु असतांना नियतीला ते बघवलं नाही आणि कॅन्सर ने बाबांच्या शरीरात घर केलं आणि एकेका गोष्टीचा अंदाज घेता घेताच बाबांना आम्हांला एकटं सोडून पुढच्या प्रवासाला जावं लागलं. मला खात्री आहे की,आमच्या बाबांचे या आजारपणातून बाहेर पडल्यावर काय काय करायचं याचे प्लॅन्स नक्कीच तयार असतील पण! माणसाच्या हातात स्वतःचे श्वासही नसतात, सगळा खेळ त्या नियती-नशीब-देव-निसर्गशक्ती यांच्याच हातात आहे!

असो!

आमच्या बाबांना उगाच कशाबद्दल रडत बसलेलं आवडत नव्हतं आणि नशिबाला बोल लावणं तर त्याहून नाही, त्यामुळे मी उगाच माझ्या तुटपुंज्या आयुष्यात आलेले 'अनुभव' वगैरे सांगत पाल्हाळ नाही लावत,थांबते!

बाबा कायम आमच्या सोबत होते आणि राहतील याची मला पक्की  खात्री आहे. आणि आम्ही पोरं खूप नशिबवान आहोत की इतकी सुजाण व्यक्ती आम्हांला 'बाप' म्हणून लाभली.

या चार ओळींमधून मी बाबांना शब्दसुमनांजली वाहायचा त्रोटक प्रयत्न केला खरा पण आमचे बाबा यापेक्षा कैक पटीने 'ग्रेट' होते!