Thursday, May 28, 2020

#Menstruationhygieneweek2020

२८ मे हा दिवस जागतिक पातळीवर Menstrual Hygiene Day म्हणून साजरा केला जातो.

फेबुवर आज ब-याच चॅनेल्सकडून याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात आणि लगेहात जनजागृती करायचा पण प्रयत्न होतांना दिसत आहे.

बाॅलिवूडच्या आघाडीच्या कलाकाराने त्याच्या सिनेमाबद्दलही परत एकदा आठवण करुन दिली वग्रै वग्रै!

पिरीएड्स मधे 'पॅड'च वापरा! तेच कंफर्टेबल कसे आहेत हे बहुतांश कंपन्या गेली कित्येक वर्ष आपल्या आई-ताई-माझ्या आणि माझ्या नंतरच्या जनतेच्या मनावर ठसवत आल्या आहेत आणि पुढेही करणार आहेत!

रोज नव्या कंपन्या या क्षेत्रात येतात आणि बाॅलिवूडच्या ग्लॅमरस हिरोईन्सना घेऊन जाहिरात करतात, त्या बापड्या देखील आपण किती मोठं समाजकार्य करतो आहोत या भावनेने त्यात काम करत असाव्यात अर्थात पैसा घेऊन वगैरे!

असो, नमनाला घडाभर तेल ओतायचं कारण हे आहे की, एक महत्वाचा मुद्दा या 'बेसिक-नीड,कम्फर्ट,आझादी' च्या शोबाजी मधे आपसूक बाजूला पडला आहे!!

चकचकीत-गुळगुळीत-सुगंधीत-लहान-मोठ्या आकाराचे जितके म्हणून ब्रँडेड पॅड्स आज बाजारात उपलब्ध आहेत ते अविघटनशील आहेत!! एकदा वापरलेलं पॅड विघटित न-होता कित्येक वर्षं सहज त्या कच-याच्या ढिगात आरामात पडून राहू शकतं!! गुगल करा सगळी आकडेवारी मिळेल!

आता एक गणित सोडवा -
मला पाळीच्या दिवसांत लागणारे/वापरलेले पॅड्स किती = ५ दिवस x दिवसाला सरासरी २,३ पॅड्स x आयुष्यातली मेनोपाॅज येईपर्यंतचे महिने!

जो आकडा असेल तो फक्त एका बाई/मुली साठीचा आहे अशा लाखोंनी महिला जगभरात रोज पॅड्स वापरतात आणि कच-यात फेकून देतात!
५-६ वर्षांपूर्वी मी ही त्यातलीच एक होते. पण एका प्रवासात मुंबई एक्सप्रेस-वे ला मला She cupची जाहिरात दिसली. काय बरं असावं हे, या कुतूहलापोटी मी गुगलबाबाकडून सगळी माहिती मिळवली आणि अॅमेझाॅन वरुन मागवला. पण सुरूवातीला भीती वाटायची😟

शरीराच्या अतिनाजूक भागात काढ-घाल करणं म्हणजे जिवावर बेतलं तर? पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे म्हणून मी सुरूवात केली.

खूपदा चुका झाल्या पण सिलिकाॅन चा कप असल्यामुळे दुखापत कुठे झाली नाही आणि मग एकदा मला नॅक सापडली आणि हुश्श 😊

हा कप लावला की अगदी विसरायला होतं पाळी चालू आहे म्हणून. बरं दर ३/६ तासांनी पॅड बदलायचं टेन्शन उरत नाही कारण हा कप जास्तीत जास्त १२ तासांपर्यंत वापरता येतो. तुमच्या सायकलनुसार ५-६ दिवस वापरून झाला की स्वच्छ पाणी आणि डेटाॅलने धुवून सुकवून ठेऊन द्यायचा.

प्रत्येकीचा 'कप'चा अनुभव वेगळा असू शकतो. शंकानिरसन करण्यासाठी तुमच्या डाॅक्टर ला भेटून मग ठरवा वापरायचा की नाही ते.

मी मात्र अतिशय खुश आहे हा कप वापरून कारण १) ऊठ-सूठ पॅड बदलायची गरज नाही! २) लांबच्या प्रवासात टाॅयलेटची धड सुविधा नसली तरी काळजी नसते. ३) पॅड्स मुळे होणा-या त्रासापासून कायमस्वरूपी सुटका झालेली आहे 💃💃

हा झाला स्वार्थाचा भाग!

आता माझ्या या एका छोट्याशा बदल करण्यामुळे मी पर्यावरणाला होणाऱ्या हानीला रोखू शकले हा त्यातला समाधानाचा सर्वात मोठ्ठा भाग 😊

हल्ली नाहीतरी चॅलेंजेसचं पेव फुटलंय तेंव्हा माझा हा लेख वाचणा-या प्रत्येकीला मला एक चॅलेंज द्यायचं आहे - विघटन न-होऊ शकणाऱ्या कोणत्याही पॅड ऐवजी she cup, काॅटन पॅड्ज किंवा तत्सम पर्याय वापरुन बघा. आपल्या या एका बदल करण्यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो!

करके देखो, अच्छा लगेगा 😊

It's a humble request to spread the awareness atleast now!

बाकी Happy Menstrual Hygiene Day हं 😊

Wednesday, May 27, 2020

नशीब हमखास

आईच्या कुशीत शिरावया बाळ करी धिटाई
ठाऊक नसे त्या वेड्या गेली निघून आई 😟

अन्न-पाण्याविना तडफडला तो जीव दिनवाणा
निर्दयी जगात राहिला मागे बाळ केविलवाणा 😓

सुन्न झाल्या भावना, थिजले विचार सारे..
चालवली का क्रुर थट्टा निष्पापांची रे..

दोषी कोण, कोण जबाबदार या दुर्दैवास
मंत्री-व्यवस्था-पैसा की? नशीब हमखास 😤

Sunday, May 24, 2020

#आठवणीलहानपणाच्या - उन्हाळी कामं - भाग ३ (अंतिम)

तर उन्हाळी कामांचे दोन महत्वाचे टप्पे महत्प्रयासाने पार पाडल्यावर तिसरा आणि शेवटचा टप्पा आकार घ्यायला लागायचा.
कैरीचं लोणचं, तक्कू, पन्हं, आंबा पोळी हे सगळे चटक-मटक जिन्नस बनवण्याचं काम चालू असायचं.
तसं बघितलं तर उन्हाळा सुरु झाल्यापासून आमचे बाबा आठवडी बाजारातून कै-या आणायचे, ज्याचं इन्स्टंट लोणचं आई करायची. म्हणजे फक्त २/४ कै-या बारीक चिरून त्याला तिखट-मीठात घोळवून त्यावर जिरे-मोहरी-हिंगाची खमंग फोडणी 😋 अहाहा आठवलं तरी तोंडाला पाणी सुटलं. ती आंबटढाण कैरी त्यात तिखट-मीठ अहाहा,लाजवाब 😘 😘 😘 पण हे इन्स्टंट लोणचं एका दिवसात संपायचं, वर्षभरासाठी जे बनवलं जायचं ते पहिला पाऊस झाल्यावर ज्या कै-या मिळतात ना त्याचं बनवतात म्हणजे ते मस्त मुरतं आणि पुढचं अख्खं वर्ष खराब न-होता राहतं.
लोणचं म्हणजे आम्हा पोरांचा अतिशय आवडता 'पदार्थ'! नाश्त्याचा सोबती, जेवणाच्या ताटातला अविभाज्य भाग आणि लगे हात काकडी नाहीतर नुसताच खायला म्हणून पण अत्यंत उपयुक्त असा हा 'आॅलराऊंडर' पदार्थ 😄 😄 म्हणजे मला आठवतं की शाळेच्या डब्यात ब-याचदा फक्त लोणचं-पोळी असं पण घेऊन जायचो आम्ही किंवा घरी आल्यावर नावडती भाजी असेल तर लोणचं(भाजी इतकी क्वांटिटी हं) त्यावर थोडंसं तेल घालून पोळीसोबत मिटक्या मारत खायचं, यापेक्षा टेस्टी मेन्यू अजूनही सापडला नाही मला 😜
आणि फक्त कैरीचंच लोणचं हवं असं नाही आमच्याकडे लिंबाच्या लोणच्याचे पण दोन-तीन प्रकार करायची आई - साधं तिखट-मीठाचं लोणचं, उपासाचं काळीमिरी-सैंधव मीठ घातलेलं लोणचं आणि गोड लोणचं 😘 😘 पण ते पावसाळा-हिवाळ्यात जेंव्हा लिंबं स्वस्त मिळतात तेंव्हा बनायचं.
लोणच्याचा कंटाळा, नाही हो तो तर आज ३४वर्ष झाली कधी आला नाही मला आणि यापुढे कधी येईल असं वाटत नाही😄 म्हणण्यापेक्षा कैरीचा आणखीन एक असाच चविष्ट पदार्थ म्हणजे तक्कू किंवा टक्कू. हिरवीगार,करकरीत आंबट कैरी खिसून त्यात तिखट-मीठ घालून मस्त मुरु द्यायचं जेंव्हा खायचं तेंव्हा त्यातला थोडा खिस घेऊन त्यावर खमंग फोडणी घालायची आणि तक्कू तय्यार तुमच्या जिभेची तृष्णा भागवायला 😊 😊 आठवणीनेच I am drooling mannn 🤤😋😋
तप्त उन्हाळ्यामधे बाहेरून काम करुन आलं किंवा चार-पाच वाजता चहाऐवजी काय 'थंड' पेय घ्यावं यासाठी हमखास एक उत्तर म्हणजे कैरीचं पन्हं! तसं ते बनवणं थोडं जिकिरीचं आहे पण आई महत्वाचा टप्पा पार करवून द्यायची. कैरी उकडून त्याचा गर काढून दिला की त्यात पाणी, मीठ, गुळ(काहीजण साखर पण टाकतात) हे टाकून ढवळत बसायचं आणि मधून मधून चमचा-चमचा औषध प्यायल्यासारखं ते पन्हं पिऊन बघायचं. मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं मग गूळ कमी पडला की गूळ घालायचा असा चांगला तासाभराचा कार्यक्रम आमच्यापैकी कोणीतरी करत बसायचं!
एकदा का सगळी परफेक्ट चव तयार झाली की त्यात वेलची पूड घालून ते पन्ह्याचं भांडं फ्रिजमधे ठेऊन द्यायचं आणि हुक्की आली की ग्लास भरभरून पीत बसायचं 😄 😄 काय सुखाचे दिवस होते यार ते 😍 😍
जसजसे आंबे मिळायला लागायचे तसा आंब्याचा रस हाही एक असाच 'मेडिटेशन' करायचा उत्तम पर्याय सुरु व्हायचा.
आंबे स्वच्छ धुवून त्यांना माचून एका ताटात ठेवायचं. आमचं कुटुंब मोठं त्यामुळे एकावेळेला रस करायचा म्हणजे क्वांटिटी पण जास्त लागायची. आंब्यांना माचून माचून हात गळून जायचे! एक एक आंबा घेऊन त्याचा देठ काढून अगदी एक म्हणजे एकच थेंब रस टाकून द्यायचा म्हणजे आंब्याच्या देठाला चुकून माकून काही तेल असेल तर निघून जायला. मग तो आंबा पिळायचा आणि त्यातला रस एका भांड्यात गोळा करायचा. मग कोय अगदी पिळून तिला असलेला रसाचा शेवटचा थेंबही निपटून काढायचा.कोयीची ही कथा तर सालींवर अत्याचार होणार नाही असं कसं शक्य आहे! शेवटी आंबा आहे यार तो, त्याचा एकेक थेंब अमृतापेक्षा मौल्यवान आहे 😘 😘 साली-कोयींना अगदी निपटून काढत सगळ्या आंब्यांचा रस काढून झाला की त्याला मिक्सरमधून एकदा एकजीव करुन घ्यायचं आणि रस भरलेलं ते भलं-मोठं भांडं फ्रिजमधे जाऊन गाssर व्हायला विराजमान व्हायचं!
यानंतर दोन्ही हाताच्या बोटांना लागलेला रस, मिक्सरचं भांडं चाटून लख्ख स्वच्छ करणे हा माझा अत्यंत आवडता छंद, जो अजूनही जोपासलेला आहे 😄 😄
आमरसासोबत खायला म्हणून कुरडया तळल्या जायच्या.आंब्याच्या रसात ती कुरडई बुडवली की चर चर असा आवाज येतो 😄 😄 आंबट-गोड रस आणि कुरडया हे एक जबरदस्त काॅम्बिनेशन आहे 👍👏👏
उन्हाळ्यात जसे कैरी, आंबे महत्वाचे तितकंच महत्व टरबूज(कलिंगड) आणि खरबूजाला सुध्दा होतं आमच्यासाठी. आठवडी बाजारातून अगदी पाच-पाच किलोचं भलं-मोठ्ठं कलिंगड आणायचं. विकत घेतांनाच त्याला एक चिर पाडून ते लालचुटूक आहे की नाही याची खात्री करुन घ्यायची.घरी आणलं की स्वच्छ धुवून त्याला कापड गुंडाळून माठाखाली थेंब थेंब होणा-या अभिषेकाखाली गार व्हायला ठेऊन द्यायचं.
आमच्या घराला मोठा चौक होता तिथे सगळेजण रात्रीची जेवणं झाली की कलिंगडावर ताव मारायला बसायचो. आमचे बाबा या मोहिमेचं नेतृत्व करायचे.भल्यामोठ्या कलिंगडाला चिरून त्याचे एकसारखे काप करुन आम्हा सर्वांना द्यायचे.रात्रीच्या क्वचित उष्ण-क्वचित गार अशा हवेत बसून गारेगार कलिंगडाच्या फोडी खाणं हा सुखाचा परमोच्च बिंदू असायचा 😊 😊 😊
टरबूज आणि विशेषतः खरबूजाच्या बिया स्वच्छ धूवून वाळवून फोडून खाण्याचे अयशस्वी प्रयत्नही क्वचित केले होते पण ते वेड काही फार उन्हाळे टिकलं नाही आमच्यात 😜
या सगळ्या आनंदलहरींवर स्वार होत होत मे महिना संपायचा. पावसाळ्याची चाहूल लागायची. कै-या,आंबे,कलिंगड सगळं आपसूक मागे पडायचं.. आदल्या वर्षी केलेलं लोणचं संपून त्याची बरणी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून नवीन लोणच्याचं स्वागत करायला सज्ज व्हायची. पहिला पाऊस झाला की आमचे बाबा एका खास मार्केट मधे जाऊन लोणच्याची जी स्पेशल कैरी असते तिचे काप करुन आणायचे. साधारण १०किलो+ कै-यांचे काप घरी आल्यावर स्वच्छ पुसून घ्यावे लागायचे.आम्ही चिल्लर पार्टी हे कै-यांच्या फोडी पुसणे, मधूनच तोंडात टाकणे असं करेपर्यंत आईची पुढची तयारी चालू असायची. फोडींना लावायला म्हणून तिखट आणि मीठ योग्य प्रमाणात मिसळून ठेवलं जायचं. ते कै-यांच्या फोडींना लावतांना हाताची मस्त आगाग व्हायची आणि तोंडाला पाणी सुटायचं 😄 अजूनही त्या तिखट-मिठात घोळवलेल्या फोडींची चव जिभेवर रेंगाळते 😘 😘 तोवर आईचं पुढचं काम चालू झालेलं असायचं, मोहरीची दाळ आणि मेथ्या किंवा मेथीचे दाणे खरपूस भाजणे. ते गार होईपर्यंत तेल कडकडीत गरम करुन त्यात जिरे-हिंगाची फोडणी तडतडायला लागायची. मग भाजून ठेवलेल्या मेथ्या आणि मोहरीच्या दाळीची भरड केली जायची. सगळा माल छान गार झाला की एकत्र केला जायचा. तेलामधे मेथ्या-मोहरीची भरड केलेली पूड आणि तिखट-मिठाने माखलेल्या कैरीच्या फोडी टाकून व्यवस्थित मिसळल्या जायचं. प्रत्येक फोडीला सगळा मसाला लागलाय की नाही ह्याकडे आईचं बारीक लक्ष असायचं. एकदा का हे मिश्रण तयार झालं की त्याला लोणच्याच्या बरणीत भरून,बरणीचं तोंड घट्ट बंद करुन जिथे ऊन लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलं जायचं. मग रोज सकाळी आई ती बरणी उघडून लोणचं वर-खाली हलवायची,कधी कधी अख्खी बरणी पण गदागदा हलवली जायची! हळूहळू मग या लोणच्यावर आमच्या उड्या पडायला सुरूवात व्हायची. सुरूवातीला फोडी अगदी टणक लागायच्या मग हळूहळू लोणचं मुरायला लागायचं 😋😋😋 इतक्या निगुतीनं केलेलं आईच्या हाताची चव घेऊन मुरलेलं ते लोणचं म्हणजे लाजवाबच!
सिट्रीक अॅसीड किंवा कृत्रिम आंबटपणा टाकून बनवलेल्या विकतच्या 'ब्रँडेड' लोणच्यांना त्याची सर येणं कधीच शक्य नाही!

Monday, May 4, 2020

#आठवणीलहानपणाच्या - उन्हाळी कामं - भाग २

तर मे महिना उगवला की वर्षभर लागणाऱ्या धान्याची, हळद, तिखट, गरम मसाला, शिकेकाई इ. गोष्टींची तरतूद करायला आई-बाबांची लगबग सुरु व्हायची.
औरंगाबाद मधे मोंढा म्हणून एक भाग आहे, ते नाव असं का आहे नो आयडिया पण मी कायम तेच नाव ऐकत आले, तर तिथून सगळी खरेदी केली जायची. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तुरीची डाळ, चण्याची डाळ ह्या गोष्टी मुख्यत्वेकरून आणल्या जायच्या.
हे सगळं धान्य साठवायला आईने खास कोठ्या (पत्र्याचे मोठे चौकोनी बाॅक्स) बनवून घेतले होते. आधीच्या वर्षीचं धान्य संपलं की ह्या सगळ्या कोठ्या आम्ही स्वच्छ धुऊन म्हणजे, पार त्यात आत जाऊन बसून वगैरे स्वच्छ केल्याचं आठवतं मला 😜 कारण गहू साठवायची कोठी चांगली १क्विंटल म्हणजे १००किलो गहू साठवू शकतो इतक्या ताकदीची होती!
ह्या कोठ्या धुतल्यावर चांगल्या आठवडाभर उन्हात ठेऊन वाळवल्या जायच्या.
ठरलेल्या दिवशी आमचे बाबा त्या होलसेल धान्याच्या दुकानातून गहू, तांदूळ,ज्वारी आणि डाळींची पोती घेऊन यायचे. आमचं घर तीन मजली होतं त्यामुळे ही सगळी पोती पाठीवर टाकून बाबांना वर घेऊन यावी लागायची! आमचे बाबा म्हणजे उत्साह आणि ताकदीचा सुंदर मिलाफ!२५किलोचं पोतं बाबा खांद्यावर सहज उचलून तीन मजले चढून वर गच्चीवर नेऊन ठेवायचे!
धान्य एकदा घरात आलं की त्याला ऊन देणे हे सगळ्यात महत्वाचं काम असायचं. कारण, वर्षभराची ही बेगमी सगळे सोपस्कार न-करता जर तशीच ठेवली तर नुकसान झालंच म्हणून समजा!!

तांदूळाव्यतिरिक्त बाकी सगळं धान्य आठवडाभर उन्हात लोळवत ठेवलं जायचं! तांदूळाला मात्र ऊन वर्ज्य बरं! आई म्हणायची तांदूळाला ऊन सहन होत नाही, त्याचे लगेच तुकडे पडतात. त्यामुळे नाजूक-साजूक तांदुळाची रवानगी सावलीची मजा चाटवून, एखाद-दोन दिवसात कोठीमधे केली जायची.
गहू वाळवायला भलंमोठं प्लास्टिक वापरलं जायचं आणि एक एक करुन गव्हाची पोती उघडून त्यातला गहू हाताने, डबा, वाटी ज्याला जे साहित्य वापरून करायचं त्याने बाहेर काढून त्या जाजमावर पसरवला जायचा. सरतेशेवटी पोतं उलटं करुन, झटकून त्यातला एक न एक दाणा बाहेर काढला जायचा.मग सगळे गहू एकसारखे पसरवले जायचे जेणेकरून सगळ्या दाण्यांना व्यवस्थित ऊन लागेल. हे काम माझ्या खास आवडीचं, त्या गार गार दाण्यांचा तळहाताला गुदगुल्या करणारा स्पर्श फार आवडायचा मला 😊 पण, या सगळ्या उद्योगात हातांना, कपड्यांवर क्वचित तोंडावर त्या गव्हाला लागलेला 'खकाना' (म्हणजे धूळ हो) जी चिकटायची ती पार आंघोळ केली तरी नीट निघायची नाही 😟 शेतात लोक कसे काय काम करतात खरंच हॅट्स-आॅफ टू देम!

तर, गव्हाची पोती, त्यांचं तोंड बंद करायला वापरलेली सुतळी ह्या गोष्टी सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवायचे आई-बाबा, त्यांनी याबाबतीत कधी काही ज्ञानामृत नाही पाजलं आम्हांला पण, त्यांच्या ह्या साध्या कृतीतून सगळं व्यवस्थितपणे करायच्या सवयी मात्र सहज लागल्या.

गहू आणि इतर धान्य गच्चीभर वाळत घातलेलं असायचं, पण नुसतंच वाळत पडलंय असं करुन चालत नव्हतं! चिमण्या, कबुतरं टपलेलीच असायची धान्याची नासधूस करायला. त्यामुळे मग हातात भली मोठी काठी घेऊन राखणदार म्हणून एकेकाची ड्युटी लागायची. आमच्या गच्चीवर काही विशेष आडोसा किंवा खोली नव्हती बांधलेली त्यामुळे, डोक्याला रुमाल बांधून एखाद्या दगडाच्या तुकड्यावर नाहीतर लाल मातीच्या विटेवर बूड टेकवून हातात काठी घेऊन बसावं लागायचं. थोड्या थोड्या वेळाने बदलीचा माणूस म्हणजे आई-बाबा, ताई पैकी कोणी यायचं आणि तात्पुरती सुटका व्हायची.निघतांना किंवा आल्यावर त्या गरमागरम धान्यावरुन एकवार हात फिरवला जायचा, क्षुल्लक वाटणारी पण अतिशय महत्वाची स्टेप!
सुटका झाली की खाली येऊन हाशहुश करत घरात आलं की डोळ्यासमोर अंधारीच यायची, पटकन दिसायचं नाही,मग उगाच आपलं आंधळ्यासारखं चाचपडत चालायचं 😜
धान्य साठवणं फार जिकिरीचं काम हो! ज्या कोठ्यांंमधे साठवायचं त्यांची जागा पण पाण्यापासून लांब असायला हवी, जमिनीपासून थोड्या उंचीवर हवी, अगदीच भिंतीला खेटून नको, एक ना दोन शंभर गोष्टी!! बापरे 🙏
हे तर कौतुक फक्त कोठ्यांचं, धान्याचे तर वेगळेच लाड पुरवावे लागायचे! त्यांना पावडरी काय लावा, इंजेक्शनं काय द्या, कधी कडुलिंबाचा पालाच ठेवा तर कुठे आयुर्वेदीक गोळ्या खाऊ घाला 😜
बरं हे सगळं धान्य वाळवणं झालं की लगेच कोठीत भरलंय असं नव्हतं काही! ते चाळून, निवडून क्वचित पाखडून ठेवावं लागायचं. उग्गाच नाही अख्खी दोन महिन्याची सुट्टी द्यायचे आमच्या शाळेवाले, घरोघरी हीच कामं चालायची मग पोरांची फौज हाताशी हवीच नं 😁 😁
गव्हाला 'टॅन' करुन झालं की सुरु व्हायचा दुसरा टप्पा! ते चाळून,स्वच्छ करुन कोठीत भरणे! त्यासाठी खास अशी चाळणी वापरतात. त्या चाळणीची खासीयत म्हणजे, गव्हाचा टपोरा दाणा बरोबर चाळणीत राहतो आणि त्यापेक्षा आकाराने लहान दाणे, खडे (हो त्याकाळी गव्हामधे प्रचंड म्हणजे Mr.India सिनेमात दाखवले आहेत नं, तितकेच खडे पण असायचे!), काडी-कचरा, चिमणी-कावळ्याची शी असला कै च्या कै असलेला कचरा खाली पडायचा.पण तो कचरा सरसकट फेकायचा नाही बरं, त्यात जे गव्हाचे दाणे असतात ते वेगळे करायला अजून एक चाळणी वापरायची माझी आई.दिवसेंदिवस हे काम चालायचं, करतांना कंटाळा यायचा, वाटायचं कित्ती गं हे काम आई, देना फेकून तो कचरा 😩
पण शेतक-याची पोर ती, दाण्या-दाण्याचं महत्व तिच्याइतकं कोणाला असणार, म्हणायची हे दाणे सुद्धा स्वच्छ करुन निवडून वापरता येतात, फेकायचे कशाला! अर्थात तेंव्हा या वाक्यातला सगळाच अर्थ समजायचाच असं नाही पण, ते बघून किंवा करुन मनावर संस्कार नक्कीच होत होते.

महत्प्रयासाने ही कामं आटपून भरलेल्या कोठ्या जागच्या जागी स्थिरावल्या की एकदाचा आम्हां पोरांचा जीव कोठीत आपलं भांड्यात पडायचा!!

आई-बाबा मात्र लगेच पुढचं मिशन सुरु करायचे.
हळद, तिखट आणि काळा मसाला बनवायचं साहित्य येऊन ठेपायचं. एकीकडे हळकुंडाचे तुकडे करुन, सुक्या तिखट मिरच्यांचे देठ काढून वेगवेगळ्या डब्यांमधे भरून तयार ठेवलेले असायचे. तोवर दुसरीकडे काळ्या मसाल्यासाठीचे जिन्नस मग त्यात धने, जिरे, दगडीफुल इ. खरपूस भाजतांना सगळं घर मसाल्याच्या घमघमाटाने भरून जायचं 😊
यासोबतच वर्षभर पुरेल इतकी शिकेकाई पावडर पण बनवण्याचं साहित्य एकत्र केलं जायचं त्यासाठी शिकेकाई, रिठा, नागरमोथा आणि बावंची/बावची हे योग्य प्रमाणात एकत्र करुन एका खास डब्यामधे दिले जायचे.
या सगळ्या डब्यांची वरात मग 'मसाला कांडप केंद्रा'कडे निघायची. तिथे नंबर लावून, 'शिकेकाई सर्वात शेवटी करा हं, नाहीतर मसाल्याला उगाच वास लागेल', असा सज्जड दम भरून आम्ही घरी यायचो.तयार झालेले मसाले,हळद-तिखट वगैरे आठवडा-पंधरा दिवसांनी बाबांसोबत जाऊन घेऊन यायचे. त्या कांडप केंद्रात येणारा सगळ्या मसाल्यांचा तो जरासा उग्र पण रिफ्रेशिंग वास फार आवडायचा मला 😊
वेळ मिळाला की बाजारातून आणलेल्या चिंचेचा नंबर लागायचा.चिंचेला शक्य तितकं स्वच्छ करुन, मीठ आणि हिंग लाऊन त्याचे गोळे एका मोठ्या काचेच्या बरणीत भरून ठेवले जायचे.आणि लगोलग ती बरणी जायची माळ्यावर. ऊन आणि पोरांच्या तावडीत सापडू नये म्हणून 😄
यानंतर आई करायला घ्यायची सातुचं/सत्तुचं पीठ - हा पण आमच्या सगळ्यांचा अतिशय आवडीचा पदार्थ, उन्हाळी मेव्यातला वन आॅफ दी इम्पाॅरटंट!
अत्यंत पौष्टिक आणि करायला, खायला पण एकदम सोप्पा.
धुतलेले गहू, फुटाणाच्या डाळ्या किंवा चण्याची डाळ, सुंठ, जिरे, वेलची किंवा जायफळ हे सगळं भाजून एकत्र दळूण आणायचं. दुपारच्या उन्हातून घरात आलं किंवा चार/पाच वाजता भूक लागलेली असली की गार दूध किंवा पाण्यात थोडं सातुचं पीठ आणि गूळ घालून खायचं 😋😋
एकदा काय झालं आई जरा बाहेर गेलेली, बाबा आॅफिसमधे, त्यामुळे फक्त आम्ही पोरं आणि आजोबा घरात होतो. पाच वाजता सातुचं पीठ खाऊया म्हणून ठरलं. मग शोधाशोध केली आणि एका डब्यात सापडलं, सगळ्यांना पुरेल इतकं पीठ घेऊन सगळ्या सोपस्कारासकट ते तयार केलं. खातांना काहीतरी वेगळा वास जाणवत होता नाकाला पण कोणी काही बोललं नाही. सगळ्यांनी अगदी मिटक्या मारत संपवलं! घरी आल्यावर आईने विचारलं, काय खाल्लं संध्याकाळी, आम्ही सांगितलं 'सातूचं पीठ!' आईला काय वाटलं माहीत नाही, तिने कोणत्या डब्यातून घेतलं विचारलं, आम्ही दाखवला. आईने कपाळावर हात मारला आणि हसायला लागली, म्हणाली अरे ती चकलीची भाजणी आहे!! 😂😂😂
अशा गमती-जमतींसकट उन्हाळी कामांचा आणखीन एक महत्वाचा टप्पा सुफळ संपूर्ण व्हायचा 👏👏👏