Wednesday, July 29, 2020

My sweet home

 

काल माझ्या पुण्याच्या घराचा व्हर्च्युअल टुअर करायला मिळाला मला आणि इतकं छान वाटलं नं..कित्ती महिन्यांनी घर बघता आलं मला 😘
घरी काम करणाऱ्या मावशींनी व्हिडिओ काॅल वर जसं जसं दाखवायला सुरूवात केली त्या क्षणी टुणकन उडी मारून घरात जावंसं वाटलं.. काशsss ऐसा हो पाता 😩😩..

मुळात हे घर बघितल्यापासूनच आम्ही दोघेही त्याच्या प्रेमात पडलो.
'घर बघावं बांधून', असं जुनी माणसं म्हणायची, ते सद्य परिस्थितीत माझ्यासारख्या सामान्य माणसाला तरी शक्य नाही, म्हणून मग 'घर बघावं विकत घेऊन' चा प्रयत्न करुन बघितला. हे घर घ्यायचं असं ठरवल्यापासून अनंत अडचणी आल्या ख-या पण ह्या घराने भूरळच पाडली होती आम्हांला, त्याच्याच बळावर मग एक एक करत अडचणींचा डोंगर पार करुन या घराचं दान आमच्या पदरात पाडून घेतलं 😊

माझ्या घराला मिठी मारणं जर शक्य असतं नं तर मी ते रोज केलं असतं 🤗 इतकं प्रेमळ आणि ऊबदार वाटतं मला त्याच्यासोबत राहतांना 😍

माझ्या घराचा भला-मोठा दरवाजा उघडून आत पहिलं पाऊल टाकलं की फरशीचा गार गुळगुळीत स्पर्श पायाला गुदगुल्या करतो..हाॅलमधल्या मोरपंखी भिंतीवरची नक्षी, जी मी माझ्या हातांनी चितारली आहे ती हसतमुखाने स्वागत करते..

हाॅलच्या उजव्या हाताला मोठ्ठी बॅल्कनी आहे.

या बॅल्कनीत बसून हिवाळी धुक्यातल्या गारव्याची मजा घेणं किंवा पुणे स्पेशल मखमली पावसाचा अनुभव काॅफीसोबत घेणं यासारखं सुख नाही 😍

आळसावलेल्या रविवारी एखादी पुरवणी किंवा मासिक वाचत बसायला ही जागा अगदी योग्य आहे किंवा रिलॅक्स व्हायला म्हणून नुसतंच उंच दिसणाऱ्या आकाशाकडे बघत बसावं..

पण एक छोटी अडचण आहे या बॅल्कनीची, आमच्या वरच्या फ्लॅटमधे राहणाऱ्या कुटुंबाला सगळं दिसतं त्यामुळे उगाच cctv ची भावना टोचत राहते, असो.

जितकं घर मोठं आहे तितकंच आमच्या 'देव'सेनेसाठी सुद्धा सुबक कोरीवकाम असलेलं प्रशस्त देवघर आम्ही बनवून घेतलं.आमच्या कुलदेवीची स्मितहास्य करणारी मूर्ती बघितली की आपोआप हात जोडले जातात आणि एक आश्वस्त करणारी भावना मनात उमलते 'सगळं चांगलं होईल' 🙏

एका खोलीत तर खिडकीमधे रोज सकाळी पोपटांचं त्रिकूट येऊन बसतं न-चुकता. समोरच्या झाडावरून आमच्या खिडकीत आणि परत त्या झाडावर असा त्यांचा खेळ बघायला मज्जा वाटते 😄 त्याच खिडकीजवळ माझ्या पुस्तकांचं छोटंसं दोन खणी कपाट आहे.निगुतीनं ठेवलेली पुस्तकं म्हणजे माझा आजवरचा सगळ्यात मोठा खजिना आहे..जो आत्ता मला हाताळता येत नाहीए याचं पण अतीव दु:ख होतंय मला 😩😩

माझ्या घरातली माझी सगळ्यात आवडती जागा कोणती असेल तर दुस-या बेडरूम मधला माझा खास कोपरा.छानशी खिडकी आहे त्या कोपऱ्यात आणि बसायला कट्टा. त्यावर ऐसपैस बसता यावं म्हणून मी मऊसूत गादी आणि चंद्र-चांदण्या आणि हस-या ढगाच्या आकाराच्या उशा बनवून घेतल्या आहेत 😘 😘 😍 😍 आॅफिसचं काम असो वा एखादं पुस्तक वाचायचं असो मी हमखास तिथेच बसते.

याच खोलीला नं एक छानशी आटोपशीर प्रायव्हेट बॅल्कनी आहे. येस्स प्रायव्हेट कारण वरच्या मजल्यावरच्या लोकांचा cctv नाहीए इथे 😜 रोज सकाळचा व्यायाम करायला अगदी उत्तम जागा 👌 संपूर्ण घराला आम्ही मोरपंखी रंगसंगती चे पडदे लावले आहेत.त्यामुळे कितीही प्रखर ऊन असलं तरी हलका निळसर प्रकाश घरभर भरलेला असतो विशेषतः उन्हाळ्यामधे फार गारवा मिळतो डोळ्यांना 😊

माझ्या घराची दिशा इतकी व्यवस्थित आहे नं की उन्हाळ्यामधे उन्हाचा तडाखा अज्जिबात जाणवत नाही पण हिवाळ्यात मात्र ऊबदारपण जाणवत राहतो 🤗

सकाळी उठल्यावर खिडकीचा पडदा बाजूला सारला की समोरच सूर्यनारायणाचं प्रसन्न दर्शन होतं आणि मन ताजतवानं होतं..

आणि दिवसभराची धावपळ आटपून रात्री याच खिडकीतून हसरा चंद्र गप्पा मारायला आला की अलगद डोळे कधी मिटले जातात तेही कळत नाही 😊

Saturday, July 18, 2020

रटाssssळ

Breathe in the shadows ही रटाssssळ सिरिज एकदाची मी संपवली 😤

संपता संपेना रे देवा 🤦

पहिला सिझन-Breathe इतका मस्त होता ना 👏

एकतर त्यात मॅडी म्हणजे आर.माधवन 😍, उत्तम कथा, उत्कंठावर्धक सादरीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक एपिसोडचा आणि एकूण सिरिजचा स्पीड!

आर.माधवनच्या अभिनयाबद्दल बोलावं तितकं कमीच आहे.

ग्रे शेडचं कॅरेक्टर पण इतकं सहजपणे उभं केलंय नं त्याने की बघतांना त्याचं वागणं बरोबरच आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. चेहऱ्यावरचे हावभाव बघावे फक्त त्याच्या, इतके साळसूद की विश्वास बसणार नाही पण डोळ्यातून सगळं कळत जातं! एका प्रसंगामधे तर 'खुनशी आनंद,दु:ख,खिन्नता,हतबलता' असे झरझर त्याच्या चेहऱ्यावर उमटतात की बघणारा थक्क होतो!

मुख्य कथानकाच्या प्रवाहात उप-कथानकं सहजपणे वाहत राहतात, उगाचंच ओढून-ताणून केल्यासारखं वाटत नाही.

बाकी कलाकारांचं काम पण पूरक आहे. नाही म्हणायला हृषिकेश जोशींचं कॅरेक्टर बघून हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकाराची नोकराच्या रोलवरुन सब-इंस्पेक्टर रोलवर बढती झाल्याचं बघून बरं वाटतं.

अमित सध या कलाकाराचं पण कौतुक करायला हवं, त्यानेही तोडीस तोड काम केलं आहे.

एकूणात काय तर सिझन वन ची भट्टी एकदम झकास जमली होती. त्याचमुळे सिझन दोन कडून अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या सपशेल फोल ठरल्या!!

मुळात कथानक अतिशय ढिसाळ वाटलं, एकूण एपिसोड्सची आणि सिरिझची लांबी त्यामुळे वाढली की काही कारणास्तव वाढवली गेली माहीत नाही. उप-कथानक उग्गाच घुसवलं आहे असं पहिल्या सीनपासून जाणवत राहिलं.

आणि या सिझनचं मुख्य आकर्षण जे होतं म्हणजे ज्यु.ए.बी. त्याने तर फक्त शेवटच्या एपिसोडमधे अभिनय केला आहे! त्याआधीच्या ११भागांमधे तो फक्त वावरला आहे. अमित सध सुद्धा समोर ज्यु.ए.बी आहे म्हणून दबकत नाही नाही त्याच्या वाट्याला आलेल्या रोलला मुळातच काही महत्व नसल्यामुळे ढीम्म बघत राहतो!

एकूणात काय तर Breathe च्या सीझन दोन ने एक प्रेक्षक म्हणून माझा अपेक्षाभंग केला आहे, नक्कीच!

Thursday, July 16, 2020

नेत्रसुखद

अहाहा किती सुरेख, नेत्रसुखद चित्र आहे नं..
बघितल्या क्षणी त्या चित्रातल्या मुलीसारखं सायकलवर स्वार होऊन हुंदडायची इच्छा झाली 😊
आल्हाददायक वा-याच्या झुळकांवर स्वार होऊन तरंगत लहरत पिसासारखं हलकं होऊन निरुद्देश भटकावंसं वाटलं..
उन्हाच्या स्वच्छ प्रकाशाने मेंदूला चिकटलेली जळमटं झाडून टाकावीशी वाटली..
निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचं अस्तित्व जाणवूच नये इतपत स्वतःला विसरून जावंसं वाटलं..

Monday, July 13, 2020

विटंबना

कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहेच पण ज्यांचा या रोगामुळे मृत्यू होतो, त्यांच्या देहाची जी विटंबना होत आहे 😞ही बाब जास्त धक्कादायक आहे!
फक्त भारतातच नाही तर जगभरात अशा मृतदेहांना हाॅस्पिटल ते स्मशानभूमी पर्यंतचा करावा लागणारा खडतर प्रवास विषन्न करणारा आहे.
म्हणजे कोरोनामुळे जिवंत असतांना ज्या यातना भोगल्या त्या तर आहेतच पण मेल्यावरही सुटका नाही अशी गत होऊन बसली आहे!!!
या सर्वाचा जाब नेमका कोणाला विचारणार सद्य परिस्थितीत हे सांगणं कठीण आहे पण, निदान आपल्या हलगर्जीपणा मुळे इतरांना करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही इतकी जबाबदारी तर आपण स्वतः घेउच शकतो!
बघा जमलं तर आचरणात आणा!