Tuesday, August 27, 2019

#मुक्कामपोस्टUK : मृद्-गंध?

हे सुख फक्त आपल्या देशात आपल्या मातीतच अनुभवता येतं!! युके मधे आल्यापासून केंव्हाही आणि कितीही पाऊस पडतो त्यामुळे दुर्दैवाने त्याचं अप्रूप आणि त्याच्याविषयीचं प्रेम, आसक्ती सगळी लोप पावली 😢 मुळात हा देश बारमाही पावसाचा आणि उरलेले दिवस कडक थंडीचा त्यामुळे पाऊस आणि त्यानंतरचा गारवा जो पुण्यात हवाहवासा वाटतो तितका इथे अज्जिबात नको रे देवाss झाला आहे!!
बरं पावसाची चाहूल घेऊन येणारा मनमोहक सुगंध जरी असता ना इथे तरी इथला पाऊस मी सहन केला असता पण 😒 ना इथे धूळ ना माती ना सूर्य..माती नाही तर आलेल्या चार सूर्यकिरणांनी काय तापणार ती जमीन आणि कसा येणार तो हवाहवासा वाटणारा मृद््गंध 😭 😢

Thursday, August 15, 2019

माई

माई..आमची गोड, क्यूटशी हसरी आज्जी..वयाच्या पंचाहत्तरी नंतरही ipad अगदी सहज हाताळू शकणारी अशी स्मार्ट 😁 आणि संत्री गोळ्या,चाॅकलेट्स वगैरे दिलं की आवडीने खाणारी अशी तिच्या नातू-पणतूंपेक्षा पण लहान वयाची 😄 😄
तिचा उत्साह आम्हा नातवंडांना पण लाजवेल असा होता.
तिला खूप गाणी पाठ होती,सणा-सुदीच्या-मंगलकार्याच्या प्रसंगी अगदी सुरात गायची. 'रमला कुठे गं कान्हा, बाई तिन्हीसांजा झाल्या' हे तिचं सर्वात आवडतं गाणं..मनात आलं की ती सतत गुणगुणत असायची..माझ्या लहानपणी शाळेच्या प्रत्येक सुट्टीत मी आजोळी जायचे. तिथे गेल्यावर जी धमाल यायची त्याची सर कोणत्याच गोष्टीला नाही.
तिच्याजवळ गोष्ट सांग म्हणून हट्ट केला की 'खडकावरच्या कोथिंबीरची' गोष्ट सांगितल्याचं मला अजूनही आठवतं 😄 😄
ती घरातली सगळ्यात मोठी सून त्यामुळे अगदी वयाच्या बाराव्या वर्षी लग्न होऊन आली तेंव्हापासूनच जबाबदारी अंगावर घेत-घेत मोठी झाली. माझ्या आजोबांचं कुटुंब म्हणजे मोठं खटलं होतं.आजोबांना तीन लहान भाऊ आणि दोन बहिणी,सासू आणि शेतात राबणारे गडी इतकी घरातली माणसं यासोबतच येणारे-जाणारे,शेजारी,भावकीतले अगणित लोक. सण-वार, सोवळं-वोवळं सगळं जिथल्या तिथे करत तिने कुटुंबाचा डोलारा सांभाळला. आजोबा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात उतरले तेंव्हा आजीनेच घरच्या सर्व लढाया सांभाळल्या.
तिला प्रत्येक गोष्टीची आवड होती. वर्तमानपत्रं,पुस्तकं जे समोर असेल ते ती वाचायची. टी.व्ही., सिनेमा, नाटक असू देत किंवा कुठे फिरायला जाणं असू देत, सगळ्यांच्या आधी तयार होऊन ती आनंद लुटायला बाहेर पडायची.
घरातल्या छोट्या-मोठ्या सणा-समारंभात तिच्याशिवाय पान हलायचं नाही कधी आमचं. ती आहे म्हणजे सगळं सुरळीतच होणार हा विश्वास प्रत्येकाला असायचा.
तिच्या सगळ्या छान सवयींपैकी सगळ्यात बेस्ट सवय म्हणजे तिने वेळ कधीही वाया घालवला नाही. सगळी कामं झाल्यावर टिवल्या-बावक्या करण्यापेक्षा हातवाती वळणं किंवा देवाला नैवेद्यासाठी लागणारं शेवयांसारखा एक पदार्थ असतो तो हातावर वळून ठेवणं,धान्य निवडणं असं सतत काहीबाही करतच असायची.
वयोमानानुसार तिला काही व्याधी जडल्या, दात काढून कृत्रिम दात म्हणजे कवळी/बचळी 😜 बसवावी लागली.तिचे ते कृत्रिम दात आम्हा एकाही नातवंडाला आवडायचे नाही, भेटल्यावर आधी तिला ते काढायला लावायचो मग ती अगदीच एखाद्या लहान बाळासारखी दिसायची आणि तोंडभरुन हसायची 😍 😍 😍 😍
पण सात वर्षांपूर्वी आजोबा देवाघरी गेल्यावर मात्र तिची तब्येत ढासळायला सुरूवात झाली 😢 शेवटी शेवटी तर तिचं बोलणं समजेनासं झालं पण तिची स्मृती अगदी शाबूत होती. भेटल्यावर अगदी तश्शीच गोड हसायची आणि तिचे डोळे आनंदाने लुकलुकायचे..
पण..काळाने शेवटी त्याचं काम चोख बजावलं आणि तिलापण आमच्यापासून हिरावून घेतलं..तिच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही..कधीच नाही..
आमचं आजोळच आता हरपलं 😟😞😓😭😭😭😭

Saturday, August 10, 2019

Missing तुळशीबाग

श्रावण चालू व्हायच्या आधी तुळशी बागेत आणि अर्थातच राम मंदिरामधे एक चक्कर तर ठरलेलीच असते माझी दरवर्षी..सणा-वाराचं सगळं सामान घेतलं की मी भिरभिरत्या नजरेने अख्खी तुळशीबाग पालथी घालते नविन काय आलं आहे ते बघत-बघत. मग आपसूकच २-३ पिशव्या भरून ओसंडायला लागतात,हाताला रग लागते धरुन-धरुन..पाय पण आता बाssस म्हणतात तेंव्हा 'आता हे अगदीss शेवटचं हं' म्हणून मी पायांना राम मंदिराकडे वळवते. तिथे असलेल्या माळवदाच्या मंदिरात जाऊन पटकन देवाला नमस्कार करते आणि बाहेर असलेल्या तांबा-पितळेच्या वस्तूंच्या दुकानासमोर जाऊन उभी राहते! एकेक वस्तू न्याहाळत न्याहाळत हळूहळू अगदी गोगलगायीच्या स्पीडने सगळी दुकानं बघत बघत शेवटी बाहेर पडते..
आज कित्येक वर्षं त्या वस्तूंना बघत आले आहे क्वचित कधीतरी त्यातल्या वस्तू घरामधे विराजमान झाल्या पण तरी मला वाटणारं आकर्षण तसूभरही कमी झालेलं नाही..जादूमयी जगात गेल्यासारखं वाटतं मला त्या दुकानांसमोर उभं राहिलं की 😊 😊 😊

Thursday, August 1, 2019

#मुक्कामपोस्टUK - वाॅकिंग धुराडाज्

मी इथे आल्यापासून बहुतेक वेळा ११नंबरच्या गाडीने प्रवास करते. सकाळी स्टेशनला जाणं असो वा वाण-सामान आणायला जाणं असो. रमत-गमत आजूबाजूची घरं-त्यांसमोरचे बगीचे किंवा क्वचित दिसणारी पाळीव मांजरं बघत जाते शांतपणे..आणि एखाद्या वळणावर अचानकच धुराचा लोट दिसायला लागतो..आग लागल्यावर कसे धुराचे ढग तयार होतात तसं काहीसं दिसायला लागतं..सुरूवातीला एक-दोनदा जरा बिचकायला झालं मला पण अंदाज आला हा एकूण काय प्रकार असेल याचा!
तर इथे मी 'वाॅकिंग धुराडाज्' बघते रोज!!
सकाळी छान प्रसन्न मनाने बाहेर पडावं तर अचानकच कोणीतरी भकाभक सिगरेट फुकत जातं बाजूने😒
स्टेशनच्या बाहेर तर विचारायलाच नको, इतकी लोकं असतात सिगरेट्स-ई-सिगरेट्सचे झुरके घेत उभी की, त्या निर्माण होणा-या धुरामुळे एखादी झुकझुकगाडी सहज चालवता येईल!!
नुकतंच मिसरुड फुटलेलं पोर ते पार ९०-१०० वय असलेल्या आजीबाई पण तितक्याच जोमाने कश मारत असतांना दिसतात 😢 ई-सिगरेट्स वापरणारी लोकं तर रस्त्याने, गाडी चालवतांना आणि शक्य तिथे स्वतःभोवती धुराचं वलय घेऊनच चालत असतात 😣😣 अशा प्रकारे वायू-प्रदूषण करणाऱ्यांना मी 'वाॅकिंग धुराडाज्' नाव ठेवलं आहे 😜
आपल्याकडे जशी बिडी असते ना तसाच इथे प्युवर तंबाखू कागदाच्या पुंगळीमधे भरून ती नळकांडी पेटवून धुर घेणारे बरेच शौकीन आहेत.अशा प्रकारे तंबाखू सुपरमार्केट्स मधे मिळते. दुसरा प्रकार आहे ई-सिगरेट्सचा : ही बॅटरीवर चालणारी सिगरेट आहे. त्यात बहुदा निकोटीन किंवा तत्सम प्रकारचं द्रव्य भरून हुक्क्यासारखं त्याला वापरतात.
पण सिगरेट असू देत वा ई-सिगरेट शेवटी घाणेरडा धूर सोडतेच आणि माझ्यासारख्या नाॅन-स्मोकरला अगदी नाक मूठीत घेऊन तोंड दाबून त्याचा सामना करावाच लागतो 😖😖😖
त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे की ट्रेनस्टेशनला आणि ट्रेनमधे तसंच आॅफिसच्या आवारातही ह्या वाॅकिंग धुराड्यांना हे घाणेरडं कृत्य करण्यास मज्जाव आहे!! नाहीतर 😱😱😱
असो, तर तुम्ही यूके ला फिरायला आल्यावर अचानक धुराचे लोट दिसत आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, ते वाॅकिंग धुराडाज् असतील, तेंव्हा बिनधास्त नाकाला रुमाल लावा आणि त्या धुक्यातून बाहेर पडा 😆😆😆#मुक्कामपोस्टUK