Thursday, November 3, 2011

नरसोबाची वाडी


दिवाळी म्हटलं की, मला आठवण होते नरसोबाच्या वाडीची.

नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे दत्तात्रय महाराजांचं एक जागृत असं देवस्थान कृष्णामाईच्या तिरावर वसलेलं आहे.

सांगली पासून २५ किमी अंतरावर असणारं हे गाव म्हणजे साक्षात दत्तभूमीच. ही भूमी श्री.दत्तमहाराजांचे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतींच्या १२ वर्षे वास्तव्याने पावन झालेली आहे.

आमच्या घरामधे श्री.दत्तमहाराजांची आराधना केली जात असल्यामुळे, आम्ही दिवाळी च्या आधी येणा-या गुरूव्दादशी ला नरसोबाच्या वाडी ला जायचो. तिथे ह्या काळात खूप मोठा उत्सव असतो.

पुण्याहुन सांगलीला जाणा-या बस मधे बसलं की शेवटचा स्टॉप म्हणजे नरसोबाची वाडी. रात्री अगदी उशीरा पोहोचल्यावर विनोद पुजारी म्हणून बाबांचे मित्र होते आम्ही त्यांच्याकडे उतरायचो. त्यांचं घर मस्त दुमजली होतं. राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था तेच बघायचे.

दिवाळी म्हणजे अगदी कडक थंडी, तरीपण आम्ही एकदा का होईना कृष्णामाईला पहाटे जाउन आंघोळ करायचो. त्यानंतर मंदिरातील काकड आरती व प्रात:कालपूजेला हजर व्हायचो.

मंदिराचा आवार खुप मोठा आहे, प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पहिले डाव्या बाजूची दुकानं तुमचं स्वागत करतात, ह्या दुकानांमधे पुजासाहित्य, प्रसाद आणि थोरा-मोठयांना वाचायला उपयुक्त अशी पुस्तकं देखील मिळतात. इथे मिळणारे पेढे अतिशय चविष्ट असतात आणि इथली खासियत म्हणजे कवठ बर्फी आणि ड्रायफ्रुट बर्फी, ह्या दोन प्रकारच्या बर्फी तुम्हांला दुसरीकडे कुठेच इतक्या छान मिळणार नाहीत. आणि इथली बासुंदी तुम्ही एकदा चाखलीत की तिची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत.

तर, आत आल्यावर उजव्या बाजूला, नारायणस्वामींचं मंदीर आहे. त्यामागे, मोठी धर्मशाळा बांधलेली आहे.थोडंसं पुढे गेलं की, डाव्याबाजूला मुख्य मंदीर आहे जेथे औदुंबराच्या (झाडाच्या) सावलीमधे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाची वाडी सोडण्यापूर्वी ह्या जागी आपल्या मनोहारी पादुकांची स्थापना केली होती ज्याचा पुढे श्री.गुळवणी महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि सध्यस्थितीतील मंदीराची रचना झाली.

आता थोडी नजर वळवा, समोरच कृष्णामाईचं दुथडी भरून वाहणारं स्वच्छ, नितळ पाणी चकाकतांना दिसेल. असं म्हणतात की, पूर्वी पावसाळ्यामधे कृष्णामाईला इतका पूर यायचा की पाणी मंदिरातील पादुकांना स्पर्श करीत असे. पण, आजही कृष्णामाईच्या पात्राला पाणी अगदी काठोकाठ असतं. नदीकाठी बांधलेल्या सुंदर घाटामुळे मंदीर परिसराला एक उठाव आलेला आहे. असं हे प्रसन्न वातावरण असलेल्या मंदिराचं दर्शन घेउन आम्ही घराकडे परतायचो.

पुढे घराकडे जातांना, रस्त्यावर थोडंसं धुकं असायचं आणि सकाळच्या शुध्द हवेत धुपा-दिपाचे वास दरवळत असत आणि क्वचित कुठुन तरी गरमपाण्याच्या बंबाचा धुर दिसत असे. दुतर्फा असणा-या घरांची अंगणं सुध्दा सडा-संमार्जन करून सिध्द असत.सुवासिनी मंदिरामधे पुजायला जातांना दिसत. दिवाळी सुरू होण्यास अवकाश असून देखील अगदी मंगलमय वातावरण असायचं.

नरसोबाच्या वाडीला, मंदीरामधे सकाळी ९ ते १२ ह्या वेळेत मनोहारी पादुकांची पुजा करण्याची संधी भाविकांना मिळते.आम्हीदेखील एकादशीच्या दिवशी ही पुजा करीत असू. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान खिडक्या बसवलेल्या आहेत ज्यामधून पुजा करणा-या व्यक्तीला पादुकांची होणारी पुजा व्यवस्थित बघता येते. तसंच मुख्य व्दारातून इतर भाविकांना दर्शन घेता येते. ह्या तीर्थक्षेत्री असणारे ब्राम्हणवृंद आपल्याकडून यथासांग पुजा करवून घेतात. दुपारी १२ ते १ च्या सुमारास महापुजा, नैवेद्द व आरती होते.

त्यानंतर आम्ही परतायचो. दुपारी विश्रांती घेउन मग संध्याकाळी आम्ही कृष्णामाईच्या पैलतीरी वसलेल्या ’अमरेश्वर’ ह्या शंकराच्या मंदिराला भेट देत असू. हे मंदीर कृष्णामाईच्या काठावर वसलेलं असल्याने तुम्ही नावेतून जाउ शकता किंवा चालतही जाउ शकता.

संधीकालच्या प्रकाशात कृष्णामाईचं पात्र अधिकच सुंदर भासतं, त्या प्रवाहाकडे बघता बघता संध्याकाळच्या पुजेची वेळ कधी होते कळतच नाही.

सकाळी झालेल्या महापुजेपेक्षाही मला संध्याकाळी असणा-या पालखीचं खुप आकर्षण असायचं. नारायणस्वामींच्या मंदिरामधे पालखीची तयारी केली जाते. विशेष म्हणजे ही तयारी सर्व भक्तगणांना बघायला मिळते.सर्वप्रथम उत्सवमूर्तीला अभिषेक केला जातो.त्यानंतर चंदनगंध,कुकुम,काजळ आदिंनी मुखवटयाची सजावट केली जाते. त्यानंतर पुणेरी फेटा बांधला जातो. सरतेशेवटी ताज्या फूलांची आरास केली जाते. त्यानंतर आरती-वात,नैवेद्द होतो आणि "राजाssधिराज, महाराज" च्या गजरात मिरवणुकीची सुरूवात होते. पालखीसोबत चंद्र, सूर्य, चवरी (वारा घालण्याचा पंखा) घेउन तसंच भालदार, चोपदार औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करतात. भक्तांना देखील ह्या पालखीमधे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते. दत्तात्रय महाराजांची विविध स्तुतीपरपदं म्हणत म्हणत ही मिरवणूक साधारण तासभर चालते आणि दिवसाची सांगता होते.

दुसरा दिवस असतो गुरूव्दादशी चा, ह्या दिवशी मोठया प्रमाणात भक्तगण आपल्या गुरूमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता येतात. महापुजा झाल्यानंतर प्रसाद असतो. नरसोबाच्या वाडीला मिळणा-या प्रसादाचं पण एक वैशिष्ठय आहे. इथे पुरी-भाजी असा प्रसाद नसून खीर व वांग्याची भाजी हा प्रसाद असतो. प्रसादाची खीर ही भरडलेला गहू आणि गुळाची केलेली असते. अतिशय चविष्ट अशा या प्रसादाचं सेवन केल्यावर आत्मा तृप्त होतो.त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी पालखी असते. अशात-हेने गुरूव्दादशीचा उत्सव पार पडतो.

...आज कित्येक वर्ष झाले आम्ही नरसिंहवाडीला गुरूव्दादशीच्या निमित्ताने जाउ शकलो नाही पण, दिवाळी म्हटलं की आम्हांला ह्या सगळ्या उत्सवाची आठवण होत नाही असं कदाचितच घडत असेल..

जसा हा उत्सव माझ्या लक्षात आहे तशीच नरसोबाच्या वाडीशी निगडीत एक आठवण खुप वेगळी आणि छान आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे किल्ला करायची पध्दत आहे. तिथे तर किल्ला बनविणे स्पर्धा घेतली जाते आणि ही स्पर्धा अशी तशी नाही तर अगदी अटीतटीची असते. फक्त २,४ विटा घेउन थोडी माती थापली की किल्ला तयार ही तिथे किल्ल्याची व्याख्या नाही. तर, तिथे लहान-मोठे सगळे मुलं व्यवस्थित आखणी करून, विचार करून शिवाजी महाराजांचा एखादा फेमस किल्ला निवडतात मग माती, विटा, चुना, विविध रंग ह्या सर्व साहित्यासह किल्ला बांधणीला सुरूवात करतात आणि साधारण २-४ दिवसात त्या फेमस किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती बनवतात. त्यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे तसंच किल्ल्याच्या आवारात छोटंसं तळं करून त्यात दिव्यावर चालणारी बोट अशा गोष्टी रचून सजावट करतात. आम्ही सर्वजण तर हे सगळं बघून अगदी हरखून जायचो आणि आपण पण असाच किल्ला करायचा घरी गेल्यावर हा विचार घेउन नरसोबाच्या वाडीचा निरोप घ्यायचो..

तर, कशी वाटली तुम्हांला ही आगळी-वेगळी सफर..जमलं तर तुम्ही पण एकदा जाउन याच, माझं तर ह्या दिवाळीचं प्लॅनिंग फिक्स झालेलं आहे.

वरील ब्लॉग जालरंग प्रकाशनाच्या दिपज्योती २०११ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



Sunday, October 9, 2011

सोलेदाद

Lyrics link

वेस्टलाईफ ह्या बॅन्ड च ’सोलेदाद’ हे गाणं ऎकलं आणि डोक्यात विचार सुरू झाले,

ह्या गाण्याची खरी कथा मला माहित नाही, पण, जेंव्हा हे गाणं मी पहिल्यांदा ऎकलं तेंव्हा वाटलं की, बहुदा ह्या कपल चं ब्रेक-अप झालं असावं आणि ह्या मुलाचं त्या मुलीवर खुप प्रेम असणार पण ती सोडून गेल्यामुळे तो दु:खसागरात पार बुडून गेला आहे.

त्या प्रियकराने आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीच्या आठवणींमधे आळवलेलं हे गाणं आहे..त्याला ती सोडून गेल्यावर झालेलं दु:ख प्रत्येक शब्दातून वाहत आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या दोघांनी पुढच्या आयुष्याची स्वप्न बघितली होती त्या जागा आता त्याला भकास वाटत आहेत.आणि म्हणूनच तो म्हणतो, You're a loss I can't replace.

ह्या गाण्यात जे काही तो कवी सांगतो आहे ते कित्येकांच्या बाबतीत घडलंही असेल पण, खरंच, असं कितपत शक्य आहे की, जी व्यक्ती तुम्हांला तुमच्या आयुष्यभरासाठी हवी होती पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगूच शकणार नाही. तुमचं त्या व्यक्तीवर अगदी जिवापाड प्रेम होतं, तिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार होतात पण, आता तिच नाही म्हणून एखाद्याला जिवंतपणी जगणं सोडून देता येतं?

मी कल्पना करू शकते ब्रेकअप झाल्याचं दु:ख किती तीव्र असू शकतं, पण आपल्याला सगळ्यांना हेही माहित आहे, की वेळ-काळ-आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही, त्याच्या गतीनुसार ते पुढे सुरूच राहतं कोणाचीही वाट न-बघता, एकदा पुढे गेलेली वेळही त्याचमुळे कितीही इच्छा असली आणि कितीही प्रयत्न केले तरी परत येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोणी स्वत:ला एकाच जागी थांबवू शकतं, मनातल्या विचारांना एकाच व्यक्तीसाठी बांधून ठेवू शकतं?  

मला तरी वाटतं, एक ठराविक काळच ह्या दु:खाची तीव्रता राहत असावी. मान्य आहे, ह्या आठवणी आयुष्यभरासाठी मनावर ठसे उमटवून जातात पण त्यामुळे माणूस जगण्याचा स्वार्थ सोडू शकत नाही.काहि देवदास झालेही असतील कदाचित अशा प्रसंगानंतर पण, कुठेतरी जगण्याची जी उमेद निसर्गाने माणसात जन्मत:च दिलेली आहे तीला इतक्या सहजा-सहजी झुगारून देणं केवळ अशक्य आहे. तुम्ही स्वत:ला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीहि, काळ, ज्याच्याशी आपलं आयुष्य बांधलं गेलेले आहे आणि आपले आप्तस्वकीय ज्यांमुळे आपल्याला जगण्याची ताकद मिळाली आहे, थांबू देत नाहीत!!

पण, मी म्हणते का थांबावं एखाद्याने? फक्त हट्ट म्हणून की दुस-याचं अटेन्शन मिळविण्याकरता? छ्या....

माझं तर स्पष्ट मत आहे की, निदान स्वत:साठी तरी माणसाने मनमुराद जगायला हवं. माणसाचा जन्म मिळाला आहे आणि ह्या पृथ्वीतलावर कित्तीतरी गोष्टी बघण्यासारख्या, करण्यासारख्या, जगण्याचा खराखुरा आनंद लुटण्यासारख्या आहेत मग का स्वत:हून आयुष्याची राख-रांगोळी करायची.

आयुष्य हे सरप्राइजेस नी भरलेलं असतं, कदाचित तुम्हांला हवी असलेली व्यक्ती पुढच्याच वळणावर भेटणार असेल, फक्त तुम्ही तीथवर जायचा उशीर...    


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check