Friday, February 8, 2013

थेट भेट - कालाघोडा आर्टस फेस्टीव्हल २०१३

दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही फेब्रुवारी सुरू झाल्यावर 'काला-घोडा फेस्टीव्हल' कधी सुरू होणार हे बघतांना कळालं की ते ३ तारखेला सुरू होणार आहे. मग मागच्या रविवारी कॅमेरा घेऊन मी थेट भेट घ्यायला गेले काला घोडाची.

काला-घोडा असोसिएशन ने हे फेस्टीव्हल १९९९ पासून सुरू केलं. हे फेस्टीव्हल म्हणजे प्रतिथयश तसेच हौशी-नवशे कलाकार यांसाठी कला सादर करण्याचं मोठ्ठं व्यासपीठ आणि तुमच्या-आमच्या सारख्या कलाप्रेमींसाठी पर्वणी :-)
एकुण १०-११ दिवस चालणारा हा सोहळा अगदी भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला असतो सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ११ पर्यंत!

चित्रकला, फोटोग्राफी, नृत्य, नाटक, साहित्य, संगीत, मूर्तिकला अशा कलेच्या विविध दालनांचा ह्यामधे समावेश आहे. आपल्या देशातील काना-कोप-यातून तसेच जगभरातून कलाकार तसेच प्रेक्षक ह्या सोहळ्याचा आनंद लुटायला येतात.

चर्चगेट किंवा सी.एस.टी. स्टेशनपासून अगदी दहा रूपयांमधे तुम्ही 'काला-घोडा फेस्टीव्हल' ला पोहोचू शकता.

सगळ्यांसाठी फ्री एन्ट्री आहे बरंका..तर आल्यावर लगेचच तुम्हांला छोट्या-मोठ्या आकारातील वेगवेगळ्या विषयावरील ऑब्जेक्ट्स ठेवलेले दिसतील. ह्या वर्षीचा विषय आहे 'इलेक्ट्रॉनिक वेस्ट'.

रोजच्या जीवनात आपल्याला जे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न छळतात त्यांसाठी ह्या कलाकारांनी काहीतरी वेगळं उत्तर शोधून ते कलेच्या माध्यमातून आपल्यासमोर इथे मांडलेलं दिसतं.

ह्या सगळ्या गोष्टी बघून झालं की आजूबाजूला थोडी नजर फिरवा तिथेच तुम्हांला भरपूर स्टॉल्स दिसतील. ह्या स्टॉल्स मधे भरपूर कलात्मक गोष्टी विकायला ठेवलेल्या असतात. जितक्या त्या आकर्षक तितक्याच अव्वाच्या सव्वा किमतीच्या असतात पण ठीके जे लोक दर्दी आहेत ते खरेदी करतातही..
पुढे 'स्ट्रीट' म्हणून एक कॅटेगिरी अशी आहे ज्यामधे वेगवेगळे कलाकार त्यांची कला रस्त्यावर सादर करतात. ह्यावेळेस डोंबा-याचा खेळ आणि कठपुतली आहेत. तसंच वेगवेगळे रॉक-सॉफ्ट बँन्ड्स सुध्दा परफॉर्म करतात.

जसा कलाप्रेमींसाठी हा पंचपक्वानांचा बेत असतो तशीच पोटपुजेची सुध्दा सोय भारी केलेली आहे इथे :-)
एकुण ६ वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य, नाटक, साहित्यावरील चर्चा, संगीताचे लाईव्ह प्रोग्रॅम्स सुरू असतात. ह्यावेळेस उषा उथुप ह्यांचा कार्यक्रम होता ३ तारखेला. याआधी सोनू निगम, शान ह्यांसारख्या कलाकारांनी देखील लाईव्ह परफॉर्मनसेस दिले आहेत.
एकुण काय अगदी धमाल असते ह्या फेस्टीव्हल मधे.
चला आता सफर घडवून आणते तुम्हांला ह्यावर्षीच्या फेस्टीव्हल मधल्या स्ट्रीट कॅटेगिरीमधून :)
































 

Saturday, February 2, 2013

जिभेचे चोंचले - चटपटा पराठा


आज अगदी कंटाळा आला भाजी-पोळी करायचा आणि विकांत असल्याने फ्रिजमधल्या भाज्यासुध्दा संपल्या होत्या. थोडी शोधाशोध केली तर कोथिंबीर तेवढी सापडली. थोडंसं डोकं चालवलं आणि तय्यार झाला चटपटा पराठा :)

तर साहित्य असं आहे

  • कोथिंबीर - १/२ जुडी (किंवा फ्रिजमधे जितकी उरलेली असेल तितकी) ;)
  • गव्हाचं पीठ - मोठे ३ चमचे
  • दही - १२५ ग्रॅम
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा तिखट
  • १ चमचा तीळ
  • १ चमचा हळद
  • ११/२ चमचा मीठ

आता कृती अशी आहे हं

कोथिंबीर स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्या. गव्हाचं पीठ घेऊन त्यामधे दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरती दिलेले सर्व मसाले घाला. आवश्यक तितकं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या. दही घातल्यामुळे कदाचित थोडी पातळ होऊ शकते कणीक पण तरीही थोडं जास्त पीठ घालून व्यवस्थित गोळे बनवता येतील असं मळून घ्या. साधारण मध्यम आकाराचे गोळे बनवा आणि नेहमी पोळी जशी लाटतो तसे पराठे लाटून घ्या. पोळी भाजण्यासाठीचा तवा किंवा नॉन-स्टीक पॅन वापरून पराठा भाजून घ्या.
पराठा भाजतांना दोन्ही बाजूला व्यवस्थित तेल लावा म्हणजे खमंग टेस्ट येईल आणि पराठे पटापट तयार होतील :)
 
तर तय्यार झालेले पराठे असे दिसतील


आता हे गरमा-गरम पराठे लिंबाच्या आंबट-गोड लोणच्यासोबत किंवा कांद्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता आणि जर खूप जास्त भूक लागली असेल तर तसेच गपागप हाणा, क्योंकी ये चटपटा परांठा है ;)