Thursday, August 14, 2014

संस्कृतीरक्षक

लग्न झाल्यावर मुलीच्या घरचं पाणीसुध्दा चालत नाही हो आम्हांला आणि जर सुनेच्या माहेरचं कोणी आलं तर आम्ही देतही नाही!

हो बरोबर वाचलं तुम्ही, विश्वास बसत नसेल तर परत एकदा वाचा!

आज साल२०१४ चालू आहे आणि तरी एका सुशिक्षित,सुसंस्कृत आणि सुखवस्तू घरात हा संवाद ऐकायला मिळाला.

एक आजोबा अगदी संस्कृती रक्षकाचा आव आणत सांगत होते.पुढे म्हटले आम्हांला आमच्या सुनेने नोकरी केलेलं सुध्दा चालत नाही.घरामधे कर्तबगार पुरूष असतांना बायकांना घराबाहेर पडायची गरजच काय म्हणतो मी!! आणि ह्यामुळेच गोल्डमेडल मिळवलेली त्यांची सुन आजही घरामधे भाक-या थापत बसली आहे.

कधी एकदा त्या घराच्या बाहेर पडते असं झालं मला ही सगळी परिस्थिती ऐकल्यावर! मी तर विश्वासच ठेऊ नाही शकत की आजच्या ह्या प्रगत युगामधे अशी घरं अजुनही आहेत?? कधी समजणार आहे ह्या लोकांना की काही गोष्टी काळानुरूप बदलाव्याच लागतात तुमची इच्छा असू देत अथवा नसू देत!!

पण, मुलीच्या माहेरच्यांना अशी अमानुष वागणूक देण्याची पध्दत का निघाली असेल बरं? आधीच्या काळी तर पोरीचं लग्न करायचं म्हणजे आई-बापाला घरा-दारावर कर्ज घेऊन आहे नाही ती पुंजी वापरून करून द्यावं लागायचं.घरामधे जितक्या जास्त पोरी तितका त्यांच्या लग्नानंतर बाप कर्जबाजारी झालेला असायचा.बरं पोरींच्या सासरी जायचं म्हणजे मैलोनमैल प्रवास करायचा आणि तिथे पोहोचल्यावर काय तर साधं पाणी पण नाही मिळणार??!!!?? काय बरं पाप केलं आहे त्या बिचा-या बापाने म्हणून त्याला ही शिक्षा?

हे सगळं ऐकलं की हसायला येतं आणि कीव येते लोकांची जे असं काही मानत होते आणि तसं वागत होते.पण तो काळ वेगळा होता आणि आज २०१४ आहे.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकूणच जगण्यात आणि प्रत्येकाच्या मानसिकतेत बराच फरक पडला आहे त्यामुळे मुलींच्या सासरी गेल्यावर पाणी प्यायचं नाही वगैरे असं कोणी मानत नसेल अशी माझी समजूत होती.पण! वरती सांगितलेल्या आजी-आजोबांचे वचन ऐकल्यावर माझा गैरसमज अगदी स्वच्छ पुसला गेला आहे!

धन्य धन्य ती संस्कृती आणि धन्य धन्य ते संस्कृतीरक्षक!!

Monday, August 11, 2014

पोश्टर बॉईज

काल पोश्टर बॉईज चित्रपट बघितला. चित्रपटाचा पहिला भाग ठीक-ठाक आहे म्हणजे जगन आबा,मास्तर आणि अर्जुन ह्या तिघांचे पोस्टर्स सगळ्या गावभर झळकल्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात काय वादळ निर्माण होतं ते दाखवलं आहे.मध्यांतरानंतर मात्र चित्रपटाला वेग येतो जेंव्हा ते तिघे झालेल्या अन्यायाविरोधात 'उपोषण' करायचं ठरवतात.

दिलीप प्रभावळकर ह्यांनी रंगविलेला आबा एकदम भारी आहे आणि बाकी सगळे कलाकार पण साजेसे आहेत.

मला नेमकं माहित नाही की हल्ली बिनटाक्याची शस्त्रक्रिया करून घेतात की नाही ते निदान शहरांमधे किंवा टीव्ही, रेडियोवर ह्याबाबतीत कधी कोणती जाहिरात ऐकली,बघितल्याचं आठवत नाही.कदाचित हल्ली महागाई इतकी वाढली आहे की एक मुल होऊ देणं हे सुध्दा परवडेबल नाही असं वाटत असेल.असो, तर हा विषय चित्रपटासाठी का निवडला ते कळालं नाही, पण हो चित्रपटामधे शक्य तितका माल-मसाला, गाणी आणि पांचट नसणारे पण प्रसंगांनुरूप विनोद आहेत. ह्यामुळे कुटुंबासोबत बघता येईल असा चांगला चित्रपट आहे.

पुरूष नसबंदी ह्यासोबतच मुलगा/मुलगी भेद नको, सामान्य माणसांचा बळी सरकारी कामांसाठी कसा दिला जातो अशा विषयांवरही ह्या चित्रपटातून भाष्य करण्यात आलेलं आहे.श्रेयस तळपदे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक छोटंसं भाषणही ठोकलं आहे देव करो नि आपल्या राज्याला असा यंग, डायनामिक आणि जनतेचा विचार करणारा मुख्यमंत्री लवकरच मिळो

हां तर मंडळी तुम्हाला दोन तास निखळ मनोरंजन हवं असेल तर नक्कीच बघा पोश्टर बॉईज