Thursday, June 23, 2016

ओ वुमनिया

नाटकः ओ वुमनिया
लेखक: शेखर ढवळीकर
दिग्दर्शकः मंगेश कदम
कलाकारः सुहास जोशी (माय फेव्हरेट),सतिश पुळेकर (अजुनही हॅण्डसम दिसतो यार हा माणुस ;) ), स्वाती चिटणीस, जयंत सावरकर, कादंबरी कदम, आशुतोष गोखले.

नाव ऐकून तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे नाटक तुमच्या-आमच्या मुली/स्त्रिया/बायका ह्यांवर बेतलेलं आहे. आजीपासून ते पार आजच्या पिढीतल्या माझ्यासारख्या मिसळपाव विचार करणा-या मुलीपर्यंतचा स्त्रीचा प्रवास ह्या नाटकात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

स्टोरीलाईन हिच आहे आणि आजीची पिढी मग आईची पिढी आणि आजच्या मुलीची पिढी असं तिन जणींनी आपल्याला दाखवलं आहे. बघतांना असं वाटत होतं की हे रोजच आपण आपल्या घरामधे, आजुबाजूला बघत आलो आहे आणि बघत आहे.

याबरोबरीनेच आणखिन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे - पुरूष. अर्थात स्त्रीयांबाबतीत त्यांचं वागणं पिढ्या दर पिढ्या कसं बदललं किंवा नाहीच बदललं हे यातून सांगायचा प्रयत्न केला आहे. मुख्य भर स्त्रीविषयी आहे आणि योग्य ठिकाणी नवरा ह्या प्राण्याला अगदी कोपरखळीपासून ते ढोपर मारण्यापर्यंत सगळं दाखवलं आहे.

विषय जरी तोचतोच असला तरी संवाद हलके-फुलके आहेत आणि मुख्य म्हणजे कसदार कलाकार आहेत त्यामुळे नाटक व्यवस्थित एंजॉय करता येतं :) :)

सुहास जोशी खुपच मस्त आहेत, त्यांचा रंगमंचावरचा वावर इतका सहज आहे की जणू आपण त्यांच्याशी त्यांच्या घरात गप्पा मारत बसलो आहोत.आजी आणि सासू ह्या दोन पात्रामधे त्यांच्या चेह-याचे हावभाव, आवाजाची पट्टी इतकं सुरेख आहे की आपण एक क्षण अचंबित होतो इतका नैसर्गिक अभिनय, वाह!

सतिश पुळेकर प्रदिर्घ काळानंतर नाटकामधून प्रेक्षकांसमोर आले आहेत पण अभिनयाबाबतीत काही वादच नाही.दिसायला तो माणूस अजुनही भारी दिसतो, मुळात मी लहान असतांना त्यांचे चित्रपट बघितले होते तेंव्हाचा चेहरा-अंगकाठी आणि अभिनय अगदी तस्सच आहे.

स्वाती चिटणीस ह्यांचं हे दुसरं नाटक बघितलं मी, त्यांचा अभिनय सुद्धा सहज आहे पण शरीरयष्टी ब-यापैकी बेढब वाटत आहे निदान 'शेवग्याच्या शेंगा' नाटकापेक्षा.

जयंत सावरकर हे तर अगदी नावाजलेले चित्रपट-नाट्यसृष्टी गाजवलेले मातब्बर कलाकार आहेत, त्यांच्याविषयी मी काय बोलणार.मला त्यांचा मेक-अप विशेष म्हणजे मिशी फार आवडली ;)

कादंबरी कदम! हिचं पण मी हे दुसरं नाटक बघितलं, ह्यावेळेस जरा कमी शिरा ताणून अभिनय करायचा प्रयत्न केला आहे, जरा बरं वाटलं त्यामुळे. बाकी तिची उंची कमी असल्यामुळे की काय तिच्या उभं राहण्याची पध्दत आणि चेह-यावरचे हावभाव यांची सांगड काय अजून जुळली आहे असं वाटत नाही! बाकी एका प्रसंगामधे तिने गुजराथी मुलीचं जे बेअरिंग घेतलंय ते छान जमलं :)

आशुतोष गोखले ह्या कलाकाराला मी पहिल्यांदा बघितलं, त्याला विशेष काम नाही एक प्रसंग सोडला तर पण त्याचे कपडे किंवा मेक-अप हे फारच बोरिंग आहे.तो काटकुळा आहे त्यामुळे अजूनच विचित्र वाटतं.हे लोक थोडी बॉडी का बनवत नाहीत? साधारण सगळेच मराठी कलाकार/ हिरो असेच आहेत,स्वतःच्या शरिरयष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

असो, तर नाटक छान आहे आणि शक्य असेल तर नवरा/बॉयफ्रेंड ह्यांसोबत बघा म्हणजे त्यांना न-कळत पणे थोडं फार त्यांच्या पार्टनरचं महत्त्व कळेल( जर अजून कळालं किंवा व्यक्त केलं नसेल तर )

Wednesday, May 11, 2016

म्युझिक रिव्ह्यू अर्थात सैराट चा

सध्या सगळीकडे 'सैराट'ची हवा जोरदार चालू आहे. मी तो चित्रपट अजून बघितला नाही पण गाणी कालच पहिल्यांदा व्यवस्थित ऐकली.

'याड लागलं' ह्या गाण्याचं म्युझिक आणि रेकॉर्डिंग प्रसिद्ध 'सिफ्मनी स्टुडियो' मधे झालं आहे. गाण्याची सुरूवात ऐकतांना जाणवलं की किती मधुर संगीत आहे आणि त्याची ओरिजिनॅलिटी लगेच लक्षात आली पण जेंव्हा मराठी शब्द कानावर पडले तेंव्हा अगदी जमिनीवर आल्यासारखं वाटलं.

अर्थात गायकाचा आवाज, शब्द छान आहेत पण हे गाणं कानात हेडफोन्स लावून ऐकत बसलोय असं नाही करता येत कारण त्यात ज्या लो व्हॉल्यूम नोट्स आहेत त्या ऐकण्यासाठी आवाज वाढवा आणि लगेच हाय व्हॉल्यूम नोट्स आल्या की आवाज कमी करा असं सतत करावं लागलं जे मला तरी अजिब्बात आवडत नाही, त्यामुळे ते गाणं अनुभवायची मजा सगळी निघून जाते. अजय-अतुल ह्या जोडीला संगिताची व्यवस्थित जाण आहे आणि त्यांनी योग्य तेच ह्या गाण्यासाठी केलं असेल पण मला नाही ते पटलं,मग भलेही ते सिफ्मनी स्टुडियो मधलं रेकॉर्डिंग का असेना.

दुसरं गाणं - 'आताच बया का बावरलं' हे श्रेया घोषाल ने गायलं आहे जे मला सगळ्यात जास्त आवडलं. तिचा आवाज प्रचंड गोड आहे यार :) :) सतत ऐकावा इतका गोड आहे. ह्या गाण्यासाठी सुरूवातीला घेतलेला कोरस पण फार भारी वाटला मला, त्यात अगदी शेवटच्या शब्दाला घेतलेली हरकत तर लाजवाब आहे, बहोत खुब अजय-अतुल :)

ह्या गाण्याचे बोल पण अगदी त्या मुलीच्या कोवळ्या मनातल्या आणि तिच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या गाण्यांचे बोल 'अजय-अतुल' जोडीनेच लिहीले आहेत, त्यातही मी त्यांना ब-यापैकी मार्क्स देईन :)

तिसरं गाणं - 'सैराट झालं जी' हे गाणं सगळ्यात पहिले प्रसिद्ध केलं होतं. हे तसं स्लो पण रोमँटिक गाणं आहे, जे ऐकतांना जोगवा मधल्या 'जिव रंगला' ह्या गाण्याची आठवण येत राहते.ह्यामधे असणारं संगित अगदी 'अजय-अतुल' जोडीचंच आहे हे कोणीपण सांगु शकेल इतकी त्यामधे त्यांच्या आधीच्या गाण्यांना दिलेल्या संगिताची झाक आहे.असो, ह्या गाण्याचे बोल मला आवडले. दोघांच्या मनामधे असलेली नव्या प्रेमाची चाहूल, त्यामुळे आलेली हुरहुर,

प्रेमाच्या घेतलेल्या आणाभाका सगळं सगळं अगदी अलगदपणे टिपलं आहे.त्या दोघांच्या गोड-गुलाबी प्रेमाचा प्रवासच जणू ह्यामधून सांगितला आहे.

चौथं गाणं - 'झिंग झिंग झिंगाट' - हे तर सगळ्या लहान मुलांचं अत्यंत फेव्हरेट गाणं आहे आणि ह्या वर्षीच्या गणपती महोत्सवामधे फक्त ह्याचाच आवाज असणार गॅरेंटीड! ह्या गाण्याचे बोल आणि संगित दोन्ही मधे अगदी तुफान मस्ती करून घेतली आहे अजय-अतुल जोडीने.

तर माझ्या मते पहिलं गाणं सोडलं तर हा अल्बम तुम्ही नक्कीच ऐकू शकता आणि ऐजाँय करू शकता.