Friday, December 13, 2019

#मुक्कामपोस्टUK : कॅब

आज घरी येतांना कॅबचा ड्रायव्हर पंजाबी होता. माझ्या नावावरून त्याने ताडलं की मी भारतीय किंवा भारतातून आले आहे. आत बसल्या बसल्या त्याने विचारलं are you from India?' मी हसून हो म्हणाले आणि संभाषणाला सुरूवात झाली.

साहजिकच मी त्यालाही विचारलं की तू पण भारतीय आहेस का, तर कळालं त्याचे आजोबा भारतीय आहेत आणि ६०-७० वर्षांपूर्वी इथे येऊन स्थायिक झाले मग ही त्यांची तिसरी पिढी वगैरे. मी जिथे काम करते तिथे या आधीही बरीच मंडळी भारतातून कामानिमित्त येऊन गेल्याची माहितीही त्याने मला दिली. त्यानंतरचा अपेक्षित प्रश्न की मी इथे नेमकं काय काम करते, मी त्याला कळेल असं सुटसुटीत उत्तर दिलं.म्हणजे मी काही फार जगावेगळं काम करते किंवा अगदीच जटिल स्वरुपातलं करते असं नाही काही. पण आपल्याला कौतुक असतं नं जे काम करतो त्याबद्दल (निदान मला तरी आहेच 😌) त्यामुळे थोडंसं असं नाक उडवत वग्रै 😁

हां तर, असा मायदेशाशी निगडीत कोणीही माणूस इथे यूके मधे भेटला की मला अगदी छान वाटतं बाई आणि समोरचा जर गप्पीष्ट असेल तर मग तर बघायलाच नको, माझ्या बडबडीला जणू ऊधानच येतं 😄 😄
आमचं संभाषण आता मस्त रंगायला लागलं होतं त्यातून कळालं, त्याचा कोणी मित्र चेन्नईचा आहे. ते दोघे प्रोजेक्ट पार्टनर्स आहेत आणि त्याच्या निमित्ताने का होईना हा पठ्ठ्या भारतात जायला सुरूवात झाली.
मी म्हटलं काय शिकता तुम्ही? तो म्हणाला
Quantum physics आणि नुकताच ISRO सोबत एक छोटा प्रोजेक्ट पूर्ण केला.
मी - क क्काय 😳 😳 ?? Oh woww 😃👍👍
तो - शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आणि अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून मी टॅक्सी चालवतो.
पुढे आम्ही भारताबद्दलच्या शक्य तितक्या गोष्टींबद्दल बोललो; माझं घर आले मी उतरले, तो निघून गेला.पण त्याचं शिक्षण, असं काम करणं आणि तरीही इतकं निगर्वी वागणं हे कुठेतरी मनात रेंगाळत राहिलं..
#मुक्कामपोस्टUK

Tuesday, December 3, 2019

अलिप्तता

कमळाच्या पानासारखं मेणाचं कवच स्वतःच्या मनाला चढवायची इच्छा हल्ली सतत होते, जेणेकरून आजूबाजुला घडणाऱ्या वाईट आणि चांगल्या गोष्टींचा सुद्धा मनाला स्पर्शच नको व्हायला.. अलिप्तपणे राहता यायला हवं कोणी कोणत्याही गोष्टीबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया कानांवर आदळूनही!
पण नको नको म्हणतांना सुद्धा मनाचे कान अती तिखट आहेत, डोळे सताड उघडे आहेत आणि त्याची बुद्धी तर नको तितकी तीक्ष्ण आहे🤦 जे जे म्हणून ऐकायला, बघायला आणि लक्षात ठेवायला नको तेच बरोब्बर केलं जातं मनाकडून. आणि एकदा करुन त्याचं पोट भरत नाही तर नको त्या वेळी नको तिथे त्याची उजळणी करायची आणि मग डोळे तयारच असतात त्याबरहुकूम भरून यायला 😒😣😣
म्हणून आताशा सतत हाच विचार येतो की मन नावाच्या या दुष्ट प्राण्याला असं गुळगुळीत प्लास्टिकचं आवरण घालून टाकायचं म्हणजे जे आत आहे त्यात अजून भर पडणार नाही. मात्र त्याचसोबत असंही काही तंत्र सापडायला हवं जेणेकरून जुनेरी सगळी अगदी पाळा-मुळांसकट उपटून टाकता यायला हवी. मग मात्र लगेचच अशा नितळ, स्वच्छ मनाला त्या प्लॅस्टिक च्या आवरणात झक्कपैकी बंद करून अगदी माळ्यावर टाकून द्यायचं अडगळीत,कायमचं!!!
यामुळे काय होईल तर ऊठ-सूट जो त्रास होतो नं मनाच्या भोचकपणाचा तो संपून जाईल!!
ना कसला त्रास जाणवेल ना कसला आनंद..तेंव्हा कदाचित अशी तरल अलिप्तता ह्या 'आयुष्य' नावाच्या दिव्यातून तरुन जायला उपयोगी पडेल...
#triggeringthoughts