आज पहाटे साधारण ४.३० च्या सुमारास मला जाग आली, पाणी प्यावं म्हणून उठले आणि लक्षात आलं लाईट गेलेत. लाईट गेले 😳😱?? डोळ्यावरची झोप खाड्कन उडालीच माझी! कारण यूके वास्तव्यामधे असा प्रसंग एकदाही आला नाही ना आमच्या मित्र-मंडळींपैकी कोणी अनुभवल्याचं ऐकलं! एक क्षण असं वाटलं की कदाचित खोलीतला दिवा गेला असेल म्हणून बाहेर येऊन इतर ठिकाणचे दिवे लावले पण अं हं! खरंचंच लाईट गेले होते!! आता काय करायचं? फ्यूज गेला असेल का? पण आवाज तर नाही आला 🤔 शेजारच्यांकडे, खाली राहणाऱ्या घरांमधे पण झालंय की फक्त आपल्या घरात म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर बाहेर मिट्ट काळोख! रस्त्यावरचे दिवे पण डोळे मिटून गप उभे होते! बापरे! आता काय करायचं म्हणून नव-याला वार्ता दिली तर झोपेतंच त्याने, 'येतील गं, झोप झोप' म्हणत कूस बदलली! पण मला कसली येते झोप 😢 लाईट नाही म्हणजे मोठ्ठा प्रश्न आला इंटरनेटचा! आॅफिसला लाॅगिन कसं करणार? फोनचं हाॅटस्पाॅट वापरायचं म्हटलं तरी स्पीड नाही मिळाला तर?? भरीत भर फोन आणि लॅपटाॅपच्या बॅट-या पुरतील का(२४ तास लाईट असतात त्यामुळे बॅटरी शेवटच्या घटका मोजायला लागली की मगच आम्हांला तिला जीवदान देणाऱ्या चार्जरची आठवण येते चे परिणाम 😟 कोथरूडात राहतांना कसं लोड-शेडिंगची सवय असल्यामुळे सगळे कंदील घासून स्वच्छ करुन ठेवायची म्हणजे आपलं सगळ्या बॅटरीज, पाॅवर बँक्स चार्ज करुन ठेवायची सवय होती हो 😜 )?? हे तर झालं आॅफिसचं पण लाईट नाही मग गिझर चालणार नाही म्हणजे गरम पाणी नाही 😳अरे देवा🤦 एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले आणि अचानक आठवलं की गुगल बाबा आहे की, त्याला विचारूया ना 😃 लगेच गुगलबाबाला पाचारण केलं, माझ्या घराचा पोस्टकोड टाकला आणि सांगितलं लाईट गेले आता काय करू? लगेच एक फोन नंबर मिळाला आणि फोन लावला पण रेकाॅर्डेड मेसेज ने एक एक आॅप्शन द्यायला सुरूवात केली. मी योग्य पर्याय निवडला आणि 'इतक्या फाटे फाटे कोण आॅपरेटर बसला असणार माझी तक्रार ऐकायला 😒', असं म्हणेपर्यंत समोरून एका माणसाने, 'यू आॅलराईट, हाऊ कॅन आय हेल्प यू', म्हणत स्वागत केलं. मी पटकन झालेला प्राॅब्लेम सांगितला. त्याने माझा घर नंबर एकदा परत विचारला आणि सांगितलं की,'हो तुमच्यासारख्या अजून १२५ घरांना हा प्राॅब्लेम झाला आहे, आम्ही दुरूस्ती करत आहोत, तुम्ही काळजी करु नका दोन तासात सगळं पूर्ववत होईल. तुम्हांला होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो'. हुश्श! चला ही लोकं काम करत आहेत म्हणजे, हे ऐकून माझं सगळं टेन्शन पळालं आणि त्याला धन्यवाद देत फोन बंद केला. या सगळ्या गोंधळात झोपेचं पार खोबरं झालं पण आता दिवस वेळेत उगवतो उन्हाळा संपत आल्यामुळे म्हणून तासभर पहुडले. ७च्या सुमारास खरंच लाईट चालू झाले 😃👏👏 रोजच्याप्रमाणे आमचा दिवस सुरु झाला. साधारण ११वा. मला एक काॅल आला, एक बाई बोलत होत्या, म्हणाल्या तुम्ही आज सकाळी काॅल करुन लाईटचा प्राॅब्लेम झाल्याची तक्रार केली होती त्याबद्दल हा फाॅलोअप काॅल आहे. आता तुमच्याकडे लाईट व्यवस्थित चालू आहेत नं? मी सांगितलं सगळं व्यवस्थित आहे. त्यावर तिने परत एकदा माफी मागत नेमकं काय झालं आणि किती घरांना याचा फटका बसला हे थोडक्यात सांगितलं. तसंच, यापुढे परत कधी असा प्राॅब्लेम आला तर नक्की कळवा ही विनंती पण केली 😊 इतकं छान वाटलं नं हा फाॅलोअप काॅल आहे कळालं तेंव्हा. म्हणजे फक्त तत्पर सेवाच नाही तर झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं आहेच शिवाय फाॅलोअप काॅल 😃 ह्याला म्हणतात खरी सर्व्हिस 👏👏👏 #चांगल्याकामाचंकौतुक #मुक्कामपोस्टUK
Friday, September 4, 2020
Friday, August 14, 2020
पिरिएड्स लीव्ह
एका भारतीय कंपनीने 'पिरिएड्स लीव्ह' सुरु केली. लगेच माझ्या पेजवर भूछत्रासारखे वेगवेगळे फोरम्स उगवले आणि 'तुम्हांला याबद्दल काय वाटतं?' असा सवाल विचारू लागले! मला याबद्दल काय वाटलं - एकच वाटलं की माझी 'खाजगी' बाब आता चव्हाट्यावर आली! आता मी अशी सुट्टी घेणार हे माझ्या टीम मधल्या बहुतांश 'मेल कलिग्ज'ना समजणार. माझी पाळी येणं-न-येणं हा माझा, 'फक्त माझ्यापुरता' विषय आता इतर लोकांना सहज कळणार!! तुम्ही कितीही गफ्फा मारा हो इक्वॅलिटीच्या पण एका स्त्रीच्या 'शारीरिक खाजगी गोष्टींबद्दल' किती चवीचवीने बोललं जातं आॅफिस आणि समाजामध्ये ते सगळ्या स्त्रियांना व्यवस्थित माहीत आहे आणि प्रत्येकजण दुर्दैवाने का होईना एकदा तरी ते अनुभवतेचं!! 'सिक लीव्ह' होतीच की आणि अजूनही आहेच नं मग असं धडधडीत नामकरण करुन द्यायची गरजच काय म्हणते मी?? विकली टाईमशीट भरतांना प्रत्येक महिन्यात मी १ सुट्टी जरी घ्यायची म्हटलं तरी माझं 'बिलिंग' नाही होणार म्हणजे प्रोजेक्टला नुकसान 😳 बरं टीम मधे एकापेक्षा जास्त मुली असतील आणि त्याही त्याच दरम्यान किंवा पुढे-मागे ही सुट्टी घेणार म्हणजे एकूणच प्रोजेक्टला किती मोठं नुकसान??? असं प्रत्येक मॅनेजर म्हणेलच. मुळातच एक मुलगी कंपनीमधे काम करते म्हणजे तिची बुद्धी, क्षमता, तिच्यामधे असणारे गुण यापेक्षाही काही दिवसांनी ती लग्नासाठी सुट्टी घेईल, त्यानंतर 'पहिले १०० सण' साजरे करायला सुट्टी घेईल मग प्रेगनन्सी लीव्ह आणि त्यानंतर एक्स्टेन्शन लीव्ह पण द्यावीच लागेल!! त्यात आता भर ह्या 'पिरियड्स' लीव्हची??? कित्ती मोठ्ठा प्रश्न उभा राहिला बघा नं!!! काही जणींना वाटेल, तुला नसेल होत बाई त्रास पण आम्हांला होतो आणि सुट्टीच मिळावी अशी प्रत्येक वेळेस इच्छा होते, आता आयती मिळत आहे तर का नाकारायची! मला त्रास होत नाही असं नाही पण उलट अशावेळेस घरी बसून बोअर होण्यापेक्षा कामात मन जास्त रमतं माझं, अर्थात हे फक्त माझं-माझ्यापुरतं गणित आहे. बाकी अशी सुट्टी घेऊन किती जणींना घरी 'खरंच' आराम करायला मिळेल 🤔 हेही सगळ्यांना नीटच ठाऊक आहे!!
Subscribe to:
Posts (Atom)