Friday, June 27, 2014

आरक्षण

आरक्षण मिळालं! सही है!! मज्जाच मज्जा! आता काय शाळेमधे शिका नाही तर नका शिकू तुम्हांला कॉलेजमधे स्पेशल कोट्यामधे अ‍ॅडमिशन मिळणारच. ज्या काही सवलती कॉलेज देत असेल म्हणजे लायब्ररीतून पुस्तकं, वर्षभराची फीस वगैरे त्यातही सूट मिळणारच. मग पुढे काय तुम्ही इंजिनिअर, डॉक्टरच्या डिग्र्या घेऊन लोकांचे जीव घेणार नाही तर राज समाजकारण करून 'एवढुस्स' पोट भरणार!!!

आमच्यासारखे अनारक्षित कुठे जाणार? शाळेमधून कितीही चांगले मार्क्स घेऊन पास झालो तरी चांगल्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन मिळेल की नाही ह्याची धास्ती असणार कारण, आम्हा अनारक्षितांना फक्त आणि फक्त मार्कांच्या बळावरच आत जाता येणार. कमी मार्क्स म्हणजे मग अगदी सुमार कॉलेजात जा. बरं जरी तिथे जाऊन शिक्षण घेतलं तरी पुढे सरकारी नोकरी मिळणं वगैरे तर स्वप्नच होणार कारण परत तिथे आमच्यासारखे अनारक्षित ढिगानी असणार आणि ज्यांची लायकी नाही असे लोक आमच्या नाकावर टिच्चून आरक्षणाची शिडी घेऊन वर-वर चढत जाणार!!

मग आमच्यासाठी काय तर फक्त प्रायव्हेट सेक्टर! म्हणजे इतक्या खस्ता खाऊन घेतलेलं शिक्षण पदरात काय दान देतं तर आयुष्यभराची खर्डेघाशी! हां पण जर तुम्हांला अगदी फारच हौस असेल डॉक्टर किंवा इंजिनीयर बनायची तर मग ओता पैसा! म्हणजे शिक्षणापासून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घ्या आणि आयुष्यभर फेडत रहा आणि आपणच का ह्या 'अनारक्षित' जातीमधे जन्माला आलो म्हणून नशिबाला आणि आई-बापाला दूषणं देत रहा!!!

ज्या महान कार्यकर्त्यांनी आरक्षण प्रकरण करवलं आहे त्यांना माझ्यासारख्या अनारक्षित व्यक्तिकडून अगदी कळकळीची विनंती आहे की निदान प्रायव्हेट सेक्टरमधे तरी हा किडा नका सोडू हो नाहीतर आम्हांला खरंच हातामधे कटोरं घेऊन भीक मागावी लागेल!!

Tuesday, June 24, 2014

किंमत

परवा एका कार्यक्रमाला गेले होते,घरगुतीच होता,पण लग्न झाल्यावर हजेरी लावायचा तसा पहिलाच प्रसंग.अलिखित नियमानुसार भरजरी साडी घालायचीच होती त्यामुळे, सगळा जामानिमा करून मी पैठणी नेसून त्यावर साजेसे असलेले दागिने घालून गेले.

कार्यक्रम सुरू झाला,माझ्यासारख्या बघ्यांची संख्या बरीच होती म्हणून गप्पा चालू झाल्या.माझ्या वयापेक्षा मोठ्या असलेल्या ब-याच जणी होत्या.गप्पांमधे साहजिकच साडी कुठे घेतली,कोणी दिली वगैरे वरून चर्चा समस्त भारतीय स्त्रीवर्गाच्या जिव्हाळ्याच्या म्हणजेच दागिन्यांच्या विषयावर आली! मला विचारणा झाली मी घातलेले दागिने किती तोळ्याचे वगैरे..मी माझ्या सवयीप्रमाणे काहीही आव न-आणता सांगितलं 'खोटे आहेत'.मी तर सहजच बोलले पण त्या दोन शब्दांनी ऐकणा-यांच्या डोक्यावर घणाघाती वार केल्यासारखं झालं!! चक्क खोटे दागिने??? अगं तुझ्या माहेरच्यांनी,सासरच्यांनी काही दागिने नाही घातले तुझ्या अंगावर?? हे ऐकून मी दचकलेच आणि कसंबसं उत्तर देऊन तिथून निघून गेले.

दिवसभर तोच विषय डोक्यात घोळत राहिला.माझ्या दागिन्यांबद्दलची त्यांची प्रतिक्रिया इतकी भयंकर होती की जणू काही मी काहीतरी पाप केलं होतं खोटे दागिने घालून!

अचानक मला आईसोबत झालेला संवाद आठवला.माझं लग्न ठरलं तेंव्हा आई मागे लागली होती की अगं, आता लग्न आहे तुझं तेंव्हा आता तरी दागिने घे.पण, माझं आपलं एकच,नको गं आई मला काही हौस नाहीये ते सोन्याचे दागिने घालायची आणि सांभाळणार कोण गं त्यांना! नको करूस तू उगाच खर्च! तरी आईने, जे काही जुजबी दागिने असतात ते माझ्या अंगावर लग्नामधे घातले आणि सासरी पण माझा हाच सूर असल्यामुळे त्यांनीही आईचाच कित्ता गिरवला.

बरं लग्न झाल्यावरही माझे सगळे दागिने मी सासूबाईंकडे ठेवले आणि प्रत्येक साडीला शोभून दिसेल अशी वेगळी ट्रेडिशनल,आर्टिफिशीयल ज्वेलरी घेतली.

पण त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाने माझे डोळे खाड्कन उघडले आणि आईचं म्हणणं न-ऐकल्याचा जबरदस्त फटका मला बसला! मात्र एक गोष्ट जी आजवर मला समजली नव्हती ती चांगलीच कळाली! आपल्या देशामधे सोन्याची इतकी मागणी आजही का आहे ते कळालं.म्हणजे, सरकारने सोन्यावर जास्त कर आकारला तरी मागणी काही कमी झालेली नाही कारण, आजही अजूनही लोक अंगावर किती किलो सोनं आहे ह्यावरूनच तुमची किंमत ठरवतात!!

भलेही तुम्ही उच्चशिक्षित असू दे,तुमच्या मालकिची गाडी,मोठ्या शहरामधे फ्लॅट असू देत,लठ्ठ पगाराची नोकरी असू देत किंवा हि-याचे ढीगभर दागिने असू देत पण छे! जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने नाहीत तर तुम्ही कफल्लकच! तुमची किंमत शून्यच!!

पण हे काही आजच्या काळातलं दुखणं नाही अगदी पुराणकाळापासून चालत आलेलं आहे.चातुर्मासाच्या पुस्तकामधे श्रावणातल्या प्रत्येक दिवसाची कहानी दिलेली आहे त्यात मी एक गोष्ट वाचली होती.एक भाऊ आपल्या गरीब बहिणीला विचारतही नसतो पण जेंव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत होते त्यानंतर तो तिची विचारपूस करतो आणि तिला घरी जेवायला बोलावतो.पण ती बहिण तिच्या अंगावरच्या दागिन्यांना ताटासमोर मांडते आणि न-जेवता निघून जाते! काय ना माणसापेक्षासुध्दा तो पिवळा धातू किती महत्त्वाचा आणि मौल्यवान आहे!

हूssह!
बापरे! खूपच गहन की काय विचार केला मी त्या एवढ्याशा प्रसंगावर! पण आता मला चांगलंच समजलं आहे त्यामुळे आता मी ठरवलं आहे आणि नव-याला सुध्दा निटच समजावून सांगितलं आहे की, ह्यावर्षी निदान एक किलो तरी सोनं घ्यायचं म्हणजे घ्यायचंच! उगाच कोणी आपली किंमत कमी नको समजायला!!! हूं!!