आज सकाळी ॐकार म्हणून झाल्यावर डोळे बंद करुन बसले होते काही क्षण आणि अचानक असं वाटलं की मी माझ्या शाळेच्या पटांगणात वर्गाच्या रांगेत बसलेली आहे :)
रोज सकाळी प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणून झाल्यावर सगळ्यांना आहे त्या जागेवर मातीमधे बसावं लागायचं.
माइकवरुन एक मॅडम सुचना द्यायला सुरूवात करायच्या आणि त्यानुसार आम्ही डोळे मिटून, पाठीचा कणा ताठ करुन ॐकार म्हणायला सुरूवात करायचो.जेंव्हा पटांगणातल्या सगळ्या विद्यार्थिनी ॐकार म्हणत असायच्या तेंव्हा अगदी श्वास संपेपर्यंत होणारा म् चा उच्चार अजूनही कानात घुमत आहे.:):) मस्त वाटलं खूप वर्षांनी शाळेची अशी आठवण झाली
Monday, June 26, 2017
Wednesday, June 21, 2017
आहे हे असं आहे - गौरी देशपांडे
हुश्श!! संपवलं एकदाचं 'आहे हे असं आहे' पुस्तक मी!!
गौरी देशपांडे यांचं हे दुसरं पुस्तक वाचलं आणि कदाचित परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असं वाटतं. मुक्काम कादंबरी वाचली तेंव्हा अगदी पुसटसा अंदाज आला होता आणि वाचतांना काही ठिकाणी बिचकायला झालं होतं. पण जेंव्हा आहे हे असं आहे हा कथासंग्रह हातात घेतला तेंव्हा पहिलीच कथा वाचल्यावर धाप लागली. डोळे नुसतेच फिरत होते अक्षरांवरुन मेंदूला काही समजतच नव्हतं!! किती अबस्ट्रॅक्ट आहे हे लिखाण बापरे! पुढच्या २-३-४ कथा वाचल्या तेंव्हा तर भोवळ, शीण, मेंदूला झिणझिण्या असे सगळे प्रकार झाले आणि मी का विकत घेतलं हे पुस्तक असा आयुष्यात पहिल्यांदाच पश्चात्ताप झाला मला 😳 मी अगदी सामान्य वाचक आहे ( हो हो मला फक्त वपुच कळतात आणि आवडतातही) म्हणून दुसरं काही वाचूच नये असं नाही ना म्हणून हात घातला आणि थेट चटकाच बसला नं!!
काही वर्षांपूर्वी असंच सुनिता देशपांडे यांचं कुठलसं पुस्तक वाचलेलं बहुतेक,'आहे मनोहर तरी' तेंव्हाही त्यातलं बरंसचं माझ्या सामान्य बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं वाटलं मला:(
मी आजवर जे अगदी साधं, सोपं, गोड-गोड लिखाण वाचलं आहे त्याच्या अगदी विरूद्ध पण धारदार असं सत्य 'आहे..' मधल्या काही कथांमधून वाचायला मिळालं, ते पटलं पण तरी पचवता आलं नाही असं काहीसं झालं बहुतेक. पण विक्षिप्तपणाची झाक मात्र दोन्ही पुस्तकामधे बहुतांश वेळा जाणवली.
चूक की बरोबर असं काही पुस्तकाबद्दल असतं का हे मला नाही कळत पण हे पुस्तक मला पेलवलं नाही इतकंच आत्ता तरी वाटत आहे. त्यातलं लिखाण जाणिवेच्या पातळीवर तरी नाही पोहोचलं पण नकळतपणे काही जर आत झिरपलं असेल तर पुढे क्वचित उलगडा होईलही आणि न-जाणो मला परत एकदा वाचायची इच्छा होऊन आवडेलही
Subscribe to:
Posts (Atom)