Tuesday, October 6, 2020

#मुक्कामपोस्टUK : ट्रेन जर्नी

  सहाsss महिन्यांsssssनी आज ट्रेनमधून फेरफटका मारायची संधी मिळाली आणि लहानपणी जसं मावशीकडे ट्रेनने जायचं म्हणून आनंद व्हायचा ना अगदी तस्सा झाला 😄 💃💃💃💃
युकेला आल्यापासून इंटरव्ह्यूजच्या निमित्ताने आणि नंतर नोकरीच्या ठिकाणी जायचं म्हणून ट्रेनने जवळजवळ ६-८ महिने सलग प्रवास केला. रोज सकाळी धावत ७.१५ची फास्ट ट्रेन पकडायची आणि बर्मिंगहॅमला उतरून नोकरीच्या गावी पोहोचायला एका लोकलवजा झुकझुकगाडीतून प्रवास करायचा.
जेंव्हा आॅफिसमधल्या कलिग्जना कळालं मी इतक्या?? लांबवरुन मजल-दरमजल करत येते तेंव्हा त्यांना कोण कौतुक वाटायचं आणि थोडं आश्चर्यही🤔
कारण इथे प्रत्येक घरात माणशी एक कार असते. नाही नाही लक्झरी कसली हो गरज आहे इथली. अशी पण काही गावं आहेत जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही(राणीचा देश इतका प्रगत तरीही? ? हम्म आहेत असे काही भाग 😉 ) त्यामुळे तिथे नोकरीच्या इंटरव्ह्यू मधे पहिला प्रश्न 'स्वतःची गाडी आहे का?' हाच विचारला जातो म्हणे 😄
माझ्या मते इथल्या ट्रेनने प्रवास करायची मज्जा का येते तर १) स्वच्छ काचेच्या मोठाल्या खिडक्या, बाहेरचा निसर्ग मनसोक्तपणे बघता येईल अशा 😍 २)बसायला आरामदायी खुर्च्या आणि ३)ट्रेनचं फ्री वाय-फाय 😜
हेही नसे थोडके म्हणून की काय स्टाफ पण इतका आदबशीर असतो की उन्हाळ्यात पाण्याच्या बाटल्या फुकटात काय देतात आणि जर अतिवृष्टीमुळे ट्रेन लेट झाली तर इतक्या वेळा साॅरी म्हणतात की शेवटी वाटतं, रडतो बहुदा हा ड्रायव्हर आता 😄 😄
ट्रेनमधे चढल्यावर बसायला एकदा जागा मिळाली नं की, खिडकीबाहेर बघत बसणे हा माझा अतिशय आवडता छंद.
एकतर इथला निसर्ग अशक्य सुंदर आहे.उन्हाळ्यात लख्ख सूर्यप्रकाशात सोन्याहून पिवळंधम्म असणारं ऊन इतकं सुखावून जातं नं डोळ्यांना की मला वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत 😊 हो पण पावसाळा जो वर्षातले ८ महिने तर नक्कीच त्रास देतो तो मात्र मला अतिशय छळवादी वाटतो 😒 आज त्याच्यावर करवादायची इच्छा नाहीए त्यामुळे 'पावसाळ्यावर (नंतर) बोलू काही'😜
तर अगदी नुकताच चालू झाला आहे autumn 😍 😍 😍
अहाहा
झाडांची हिरवी पानं आता अगदी सुरेख अशा पिवळ्या-केशरी-गुलाबी-लालसर रंगांनी नटून बोच-या वा-याला वाकुल्या दाखवत दिवसरात्र खिदळत असतात 😄 😄
मला तर त्यांचं डोलणं बघून असं वाटतं, की लहान मुलींचा घोळका सणावाराला नटूनथटून एकमेकींचे रंगीबेरंगी कपडे बघत कशा उत्साहाने गप्पा मारत असतात तसं या झाडांचं चालू असतं 🤭🤭 माझ्या घरासमोरचं झाड आणि रस्त्याच्या कडेला असणारं, या दोघांचं तर खरंच गुळपीठ असावं इतके दोघे एकत्र डोलत बोलत असतात 😘
अशी सुरेख रंगांनी नटलेली पळती झाडं बघायला ट्रेनमधून फार फार मज्जा येते मला 😍
पण! पण!! पण!!!
या कोरोनाने सगळ्यांच्या आयुष्याला अशी काही चिवित्र कलाटणी देऊन टाकली ना की, सहा महिन्यांपूर्वी काय होतं आयुष्य आणि आज काय होऊन बसलं आहे 😢
गरज म्हणजे अगदी खर्रच गरज आहे नं असं स्वतःला १० वेळा विचारून घराबाहेर पडा!
घराबाहेर पडायचं तर तेही नाक मुठीत आपलं मास्कमधे घालून बाहेर पडा. बाहेर शक्यतो गरजेनुसारच वस्तूंना हाताळा अन घरी परतल्यावर सगळ्या वस्तूंसकट स्वतःला सॅनिटाईज करा 🤦😤
यामुळे ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा म्हणजे 'नको बाबा कशाला कोरोनाला आमंत्रण 😳' या विचाराने टेन्शनच आलेलं मला!
पण जेंव्हा ट्रेनमधे चढलो तेंव्हा अपेक्षेप्रमाणे अगदी योग्य काळजी घेतली जाते हे दिसलं. दोन सीट्स पैकी एका सीटला कापडी पट्टीवर 'सोशल डिस्टन्स पाळा-कोरोना टाळा' सदृश नम्र विनंतीवजा संदेश लिहिलेला दिसला. ट्रेनचा स्टाफ येऊन सीट्सचे काॅर्नर्स जिथे सतत हात ठेवले जातात, स्वच्छ करत होते. गर्दी तर नव्हतीच,अख्ख्या डब्यात मिळून मोजून चार जण होते! त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन मी आमची ही छोटेखानी ट्रेन जर्नी एंजाॅय केली 👏👏👏👏😊😊
#मुक्कामपोस्टUK

Friday, September 4, 2020

#मुक्कामपोस्टUK : लाईट गेले!!

  आज पहाटे साधारण ४.३० च्या सुमारास मला जाग आली, पाणी प्यावं म्हणून उठले आणि लक्षात आलं लाईट गेलेत. लाईट गेले 😳😱??
डोळ्यावरची झोप खाड्कन उडालीच माझी!
कारण यूके वास्तव्यामधे असा प्रसंग एकदाही आला नाही ना आमच्या मित्र-मंडळींपैकी कोणी अनुभवल्याचं ऐकलं!
एक क्षण असं वाटलं की कदाचित खोलीतला दिवा गेला असेल म्हणून बाहेर येऊन इतर ठिकाणचे दिवे लावले पण अं हं! खरंचंच लाईट गेले होते!! आता काय करायचं? फ्यूज गेला असेल का? पण आवाज तर नाही आला 🤔
शेजारच्यांकडे, खाली राहणाऱ्या घरांमधे पण झालंय की फक्त आपल्या घरात म्हणून खिडकीतून डोकावून बघितलं तर बाहेर मिट्ट काळोख! रस्त्यावरचे दिवे पण डोळे मिटून गप उभे होते!
बापरे! आता काय करायचं म्हणून नव-याला वार्ता दिली तर झोपेतंच त्याने, 'येतील गं, झोप झोप' म्हणत कूस बदलली!
पण मला कसली येते झोप 😢 लाईट नाही म्हणजे मोठ्ठा प्रश्न आला इंटरनेटचा!
आॅफिसला लाॅगिन कसं करणार? फोनचं हाॅटस्पाॅट वापरायचं म्हटलं तरी स्पीड नाही मिळाला तर??
भरीत भर फोन आणि लॅपटाॅपच्या बॅट-या पुरतील का(२४ तास लाईट असतात त्यामुळे बॅटरी शेवटच्या घटका मोजायला लागली की मगच आम्हांला तिला जीवदान देणाऱ्या चार्जरची आठवण येते चे परिणाम 😟 कोथरूडात राहतांना कसं लोड-शेडिंगची सवय असल्यामुळे सगळे कंदील घासून स्वच्छ करुन ठेवायची म्हणजे आपलं सगळ्या बॅटरीज, पाॅवर बँक्स चार्ज करुन ठेवायची सवय होती हो 😜 )??
हे तर झालं आॅफिसचं पण लाईट नाही मग गिझर चालणार नाही म्हणजे गरम पाणी नाही 😳अरे देवा🤦
एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले आणि अचानक आठवलं की गुगल बाबा आहे की, त्याला विचारूया ना 😃
लगेच गुगलबाबाला पाचारण केलं, माझ्या घराचा पोस्टकोड टाकला आणि सांगितलं लाईट गेले आता काय करू? लगेच एक फोन नंबर मिळाला आणि फोन लावला पण रेकाॅर्डेड मेसेज ने एक एक आॅप्शन द्यायला सुरूवात केली. मी योग्य पर्याय निवडला आणि 'इतक्या फाटे फाटे कोण आॅपरेटर बसला असणार माझी तक्रार ऐकायला 😒', असं म्हणेपर्यंत समोरून एका माणसाने, 'यू आॅलराईट, हाऊ कॅन आय हेल्प यू', म्हणत स्वागत केलं. मी पटकन झालेला प्राॅब्लेम सांगितला. त्याने माझा घर नंबर एकदा परत विचारला आणि सांगितलं की,'हो तुमच्यासारख्या अजून १२५ घरांना हा प्राॅब्लेम झाला आहे, आम्ही दुरूस्ती करत आहोत, तुम्ही काळजी करु नका दोन तासात सगळं पूर्ववत होईल. तुम्हांला होणा-या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो'. हुश्श!
चला ही लोकं काम करत आहेत म्हणजे, हे ऐकून माझं सगळं टेन्शन पळालं आणि त्याला धन्यवाद देत फोन बंद केला.
या सगळ्या गोंधळात झोपेचं पार खोबरं झालं पण आता दिवस वेळेत उगवतो उन्हाळा संपत आल्यामुळे म्हणून तासभर पहुडले.
७च्या सुमारास खरंच लाईट चालू झाले 😃👏👏
रोजच्याप्रमाणे आमचा दिवस सुरु झाला. साधारण ११वा. मला एक काॅल आला, एक बाई बोलत होत्या, म्हणाल्या तुम्ही आज सकाळी काॅल करुन लाईटचा प्राॅब्लेम झाल्याची तक्रार केली होती त्याबद्दल हा फाॅलोअप काॅल आहे. आता तुमच्याकडे लाईट व्यवस्थित चालू आहेत नं? मी सांगितलं सगळं व्यवस्थित आहे. त्यावर तिने परत एकदा माफी मागत नेमकं काय झालं आणि किती घरांना याचा फटका बसला हे थोडक्यात सांगितलं. तसंच, यापुढे परत कधी असा प्राॅब्लेम आला तर नक्की कळवा ही विनंती पण केली 😊
इतकं छान वाटलं नं हा फाॅलोअप काॅल आहे कळालं तेंव्हा.
म्हणजे फक्त तत्पर सेवाच नाही तर झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करणं आहेच शिवाय फाॅलोअप काॅल 😃 ह्याला म्हणतात खरी सर्व्हिस 👏👏👏
#चांगल्याकामाचंकौतुक #मुक्कामपोस्टUK