२०२० साल हे सगळ्यांसाठीच चिवित्र गेलं पण माझ्यासाठी तर अगदीच roller coaster ride होती! म्हणजे बघा १ जानेवारी २०२०ला मी बेरोजगार झाले होते, सगळं जग नवीन वर्षाचं स्वागत करत असतांना मी मात्र 'आता पुढे काय'? ह्या विचारांच्या गोंधळात २०२०मधे पाऊल ठेवलं!! जानेवरी मधे युके मधे कोणीही लवकर जागं होत नाही त्यात भरीतभर ब्रेक्झिट झालेलं त्यामुळे नोकरीचं मार्केट सुस्तचं होतं. होता होता फेब्रुवारी पण संपला पण काहीच चिन्ह दिसेनात! नव-याने मदत केली आणि थोडी शिल्लक जमा होती म्हणून घराचे हफ्ते आणि बाकी खर्च निभावले पण नोकरी नसल्यामुळे जबरदस्त डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन यायला लागलं! अभ्यास, नोकरीसाठी तयारी, घरातील कामं, काही काही करावंसं वाटेना 😢 फक्त आला दिवस कोणीतरी नोकरीसाठी काॅल करेल याच विचारात जायला लागला. मार्च उगवला पण एकही काॅल आला नाही, आता तर मी दिवसेंदिवस फक्त रडण्यात घालवायला सुरूवात केली 😭 घरी परत जाऊन नोकरी शोधावी हा विचार जोर धरायला लागला पण नव-याला एकटं सोडून जावंसंही वाटेना! बरं माझ्या ओळखीतल्या जितक्या म्हणून मुली/बायका होत्या त्या सगळ्यांना नविन वर्षात पटापटा नोक-या मिळाल्या त्यामुळे आपल्यालाही आज न उद्या नोकरी मिळेलच असा पिटुकला आशेचा काजवा मनात चमकत होताच 😐 पण! हा पण काही पिच्छा सोडेचना!! ओळखीतल्या होत्या नव्हत्या त्या सगळ्यांना रेझुमे पाठवला, नुसतंच बसून नको राहायला म्हणून माझ्या टेक्नॉलॉजी मधल्या परिक्षा देत सुटले पण कसला उपयोग होईल तर शप्पथ!!😖😖 आता बास, घरीच जायचं आणि नोकरी शोधायची हा विचार पक्का करतच होते की एका कंपनीतून काॅल आला, पहिला इंटरव्ह्यू झाला-चांगला झाला, दुसरा झाला तोही पास झाले आणि आता तिसरा इंटरव्ह्यू चा काॅल येईलच म्हणेतो एक आठवडा गेला- २ गेले- एक महिना गेला पण 😤😤 आणि एके दिवशी जादूची कांडी फिरवल्यासारखं झालं आणि तिसरा इंटरव्ह्यू होऊन मला नोकरीची आॅफर एकदाची मिळाली 💃💃 नोकरी दुसर-या गावात होती म्हणून तिकडे रहायला जागा शोधायला सुरूवात केली, तीनच दिवस झाले जेमतेम आणि कोरोनाने आॅफिसमधे शिरकाव केला आणि 'वर्क फ्राॅम होम' चा फतवा काढला गेला. मी एकदम खुश झाले😄 आयुष्यात पहिली नोकरी लागल्यापासून असणारं स्वप्न, 'घरुन काम करायला मिळावं', हे आता पूर्ण होतांना दिसायला लागलं 😜 एक महिना मस्त गेला, घरुन काम करायचं, ट्रेनचा प्रवास नाही की पहाटे लवकर उठणं नाही 😄 पण घरात बसून काम करणं तेही धड डेस्क नसतांना हे काही सोपं नाही 🤪 अचानक मला पाठदुखीचा त्रास सुरु झाला, थोडे व्यायाम प्रकार करुन बघितले पण विशेष फरक वाटेना. पाठदुखी वर उपाय शोधेतो muscle pain चालू झालं. रोज वेगळ्या ठिकाणी दुखायला लागलं. एक-दोन आठवडे हा त्रास कसा घालवावा याचा विचार करतो न करतो तोच migrain चा जबरदस्त त्रास चालू झाला! डोकं इतकं प्रचंड दुखायचं की मला काही म्हणजे काही सुचायचं नाही! भिंतीवर डोकं आपटायची इच्छा व्हायची नाहीतर दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवावसं वाटायचं पण किमान दोन तास ते कमाल २४तासा पर्यंत डोकंदुखीची मजल गेली 😖😖😖 बरं डाॅक्टर कडे जावं म्हणाल तर कोरोनाचा लाॅकडाऊन चालू झालेला. शेवटी पेनकिलरचा आधार घेत घेत कसंबसं दोन-तीन महिने असह्य त्रास सहन करत करत अचानकच एक दिवस डोकं दुखणं बंद झालं!! 😌 आज नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो इतका भयानक त्रास त्या दिवसांमधे झाला 😡 देव करो अन कोणाला हा आजार नको व्हायला!!🙏 आजवर मी इतक्या पेनकिलर्स कधी घेतल्या नसतील जितक्या त्या दोन-तीन महिन्यांमधे घ्याव्या लागल्या मला 😢 😭 आजारपणातून बाहेर पडत पडत आळशीपणाने मला जकडलं! 😱 आॅफिसचं आणि घरातलं काम करुन इतका कंटाळा यायला लागला की व्यायामाला मी दूर ढकलायला सुरूवात केली! अगदीच बंद करुन टाकला व्यायाम असं नाही झालं, पण सातत्य राहिलं नाही आणि तोंडावरचा ताबा पण सुटला! या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच शेवटी! मी गुटगुटीत दिसायला लागले 😜 तशात दिवाळी महिन्यावर येऊन ठेपली आणि आम्हांला घरी जायचे वेध लागले पण हाय रे कोरोना! अगदी ऐन वेळेवर युके मधे दुसरा लाॅकडाऊन लागला आणि दिवाळी सुद्धा आम्ही युकेतच साजरी केली! दिवाळीच्या फराळावर ताव मारल्यावर मात्र मी आळस झटकून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व्यायाम-आहार-झोप यांचं गणित बांधलं आणि महिन्याभरात दोन किलो वजन उतरवलं 😘 😘 तर आज ३१डिसेंबर च्या दिवशी मी स्वतःला, स्वतःकडून शाबासकी देत छान छान पदार्थ खाऊन हा आनंद साजरा करणार आहे 😊 😊 अर्थात अजून वजन पूर्णपणे आटोक्यात आलेलं नाहीए त्यामुळे उद्यापासून परत सगळं रेजिम सुरु! या मग मस्त गरमागरम क्रिस्पी पोहा पॅटीस खायला 😍 आणि हो Happy New Year #31st2020celebration #मुक्कामपोस्टUK
Thursday, December 31, 2020
Friday, November 27, 2020
#खाण्यासाठी_जन्म_आपुला #हिवाळास्पेशल : पौष्टिक हलवा
#खाण्यासाठी_जन्म_आपुला हिवाळा आल्याची चाहूल जशी बोच-या हवेतून होते तशीच ती बाजारामधे टोपली टोपलीतून सजवलेल्या लालचुटूक, लांबसडक गाजरांना बघून होते 😃 हे जे गाजर असतं नं त्याला खरी चव असते😋👌 डोळ्यांना सुखावणारा लालसर-गुलाबी रंग आणि गोडुस चव असलेली ही गाजरं बाजारात मिळायला लागली रे लागली की मी किलो-किलो खरेदी करते. कारण हिवाळ्याचे ३-४ महिनेच यांचा आस्वाद घेता येतो,नाहीतर वर्षभर ती शेंदरी-बेचव गाजरं बघून खायची इच्छाच मरून जाते! असो, तर हे गोड-गोजिरे गाजरं बाजारातून आणल्यावर पहिला पदार्थ काय बनतो तर 'पौष्टिक हलवा', येस्स! आज मी तुम्हांला माझ्या या खास पदार्थाची 'सिक्रेट' रेसिपी सांगणार आहे बरं 😄 तर तुम्हांला आवडेल तितकी गाजरं घ्या म्हणजे मी तरी किमान किलोभर घेते. ती स्वच्छ धुवून-पुसून घ्या आणि त्याचा छानसा कीस/खीस करुन घ्या. यासोबतच गाजराइतकाच महत्वाचा घटक किंबहुना गाजरापेक्षा जास्त जीवनसत्त्व असणारा घटक म्हणजे बीटरुट घ्या. एक किलो गाजरासाठी बीटरुट जे वजनात साधारण १५०-२००-२५०ग्रॅ असेल असं घ्या, त्याचाही कीस/खीस बनवून घ्या. हे झाले पदार्थ बनवायला लागणारे दोन मुख्य घटक. आता तुम्ही ज्या भांड्यात गाजराचा हलवा करता ते घ्या.. हां हां हां थांबा!नाॅन-स्टीक पॅन अज्जिबात वापरायचं नाही बरं 👊 तर गॅसवर भांडं ठेवा आणि मोठ्या चमच्याने ३-४ चमचे तूप घालून ते वितळू द्या. तुपाचा सुगंध दरवळायला लागला की मग त्यात गाजराचा आणि त्यावर बीटाचा कीस/खीस घालून त्याला व्यवस्थित एकत्र करुन घ्या. भांड्यावर झाकण ठेवा आणि तूप-गाजर-बीट यांचं मिश्रण वाफेवर मस्तपैकी शिजू द्या. डोन्ट-वरी आपण अधूनमधून झाकण उघडून ते मिश्रण एकत्र करत राहणार आहोत पण आत्ताच ठेवलंय ना, जरा होऊ देत पाच मिनिटं. तर आता आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. किलोभर गाजराच्या कीसासाठी अर्धा लीटर दूध तापवायला दुस-या भांड्यात ठेवायचं. इकडे 'धीमी आँच'पे हलव्याचं मिश्रण छान तयार होतंय. झाकण उघडून बघा, कसा मस्त बीटाचा रंग घेऊन गाजराचा कीस लालचूटूक्क झाला आहे आणि तूपमिश्रित सुगंध घ्राणेंद्रियाला तयार होणाऱ्या चविष्ट पदार्थाची चुणूक देतोय 😘 हां पुरे पुरे - नैवेद्य दाखवायचा आहे म्हटलं आधी देवाला😏 मग तुमच्या पोटोबाला! तर साधारण १५मिनीटात गाजर-बीटाचा कीस तुपात वाफवून मस्त मऊसर तयार होतो, आता त्यात मगाशी तापत ठेवलेलं दूध घालायचं. दूध जितकं आहे तितकं सगळं नका घालू हं, जरा अंदाज घेत घेत पण पौष्टिक हलवा शिजायला मदत होईल इतपत घालायचं. म्हणजे बघा गाजर-बीटाचा खीस आहे नं त्याच्या साधारण अर्धा इंच वर येईल इतपत दूध घालायचं. हां आता या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून एकत्रित करायचं. परत एकदा झाकण ठेवत पुढच्या तयारीला लागायचं. या पौष्टिक हलव्यामधे एक साखर सोडली तर बाकी सगळ्या जिन्नसांचा वापर अगदी सढळ हाताने + आवडीनुसार तुम्ही करु शकता. आता सुकामेवा चा नंबर - चला आता प्रत्येकी एक मूठ काजू-बदाम-अक्रोड(हो अक्रोड अतिशय महत्वाचा घटक आहे) घ्या आणि त्याची जाडसर पूड करुन घ्या. आता तुम्ही म्हणाल, काप का नको? पूड का करायची? बीटरुट असल्यामुळे या पोष्टिक हलव्याचा रंग अगदी गडद लाल होतो त्यात मग बदाम-काजूचे काप फारच बेरंगी लाल दिसतात, कसं वाटेल मग ते खातांना 😒 आणि आक्रोड जरासे तुरट(मला तरी त्यांची चव तुरटच वाटते) लागतात त्यामुळे त्याचे नुसते तुकडे नकोच म्हणून सोप्पा उपाय आहे पूड 😁 हां झाली का पूड करुन,चला आता झाकण उघडून बघा बरं हलवा कितपत शिजला ते? हां दूध आता ब-यापैकी आटलं आहे, परत एकदा सगळं मिश्रण मिक्स करा आणि झाकण ठेवा. आता साखरेचा नंबर, तर या हलव्यामधे साखर अगदी कमीतकमी घालायची. म्हणजे बघा जर एक किलो गाजर+२५०ग्रॅ बीटरुट असेल तर २००ग्रॅ साखर पुरेशी आहे. कारण मुळात गाजर असतात गोड त्यात परत बीटरुट शिजलं की त्याचाही गोडवा उतरतो त्यामुळे अगदी कमी साखर जरी घातली तरी अतिशय स्वादिष्ट बनतो पौष्टिक हलवा 😊 खूप झाल्या गप्पा, झाकण उघडलं तर अहाहा वाफेवर स्वार होऊन हलव्याचा सुगंध 'मी तय्यार आहे' ची वर्दी देत आला 😊 तरी एकदा निरखून बघा दूध कुठे दिसत नाही नं भांड्यात? हां म्हणजे हलवा छानपैकी शिजला बरं 😊 त्यात आता साखर घाला आणि हलवून घ्या. पदार्थाच्या उष्णतेने साखर लगेच वितळायला लागेल. परत एकदा सगळं मिश्रण एकत्र करा आणि साखर विरघळून हलवा तयार होईतो जरा दम धरा 😜 १०मिनीटांमधे साखरपाक विरघळून हलव्याला चकाकी यायला लागेल. एकदा का सगळा पाक त्या मिश्रणात मिसळला की हलवा छान तयार होईल, भांड्यापासून थोडा वेगळा व्हायला सुरूवात होईल. आता तुमच्या आवडीनुसार अजून पाच मिनीटं त्या मिश्रणाला हलवून ड्राय करु शकता किंवा आत्ताच गॅस बंद केला तरी चालेल👍 १०मिनीटं मिश्रण निवलं की त्यात मगाशी केलेली ती काजू-बदाम-अक्रोडची जाडसर पूड घालून मिक्स करुन घ्या. आता एका वाटीमधे त्यातला दोन-तीन चमचे पौष्टिक हलवा घ्या त्यावर काजू-बदाम लावून जरा सजावट करा आणि देवाला चाखायला द्या🙏 त्यानंतर कुटुंबियांसाठी आणि स्वतःसाठी पौष्टिक हलव्याच्या वाट्या भरून घ्या आणि सुगंधी-चविष्ट-स्वादिष्ट अशा पौष्टिक हलव्याची लज्जत अनुभवा 😋👌👌👌 माझ्या घरी हिवाळ्यात पहिला हा पदार्थ बनतो, तुमच्याकडे काय बनवतात? #हिवाळास्पेशल #पौष्टिकहलवा #गावरानगाजरcravings #खाण्यासाठी_जन्म_आपुला
Subscribe to:
Posts (Atom)