Saturday, May 22, 2010

’केस’ बचाव मोहीम!

अचानक एका रात्री माझ्या मैत्रिणीचा फोन आला, "अगं, खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे!" मला एक क्षण वाटलं, नाकासमोर सरळ चालणा-या या मुलीच्या आयुष्यात अशी कुठली समस्या निर्माण झाली असेल?? मग तिने घाब-या आवाजात सांगितलं, "माझे केस खुप गळत आहेत, काही तरी केलंच पाहिजे!!"

मग काय, माझ्या मैत्रिणीला मी मदत करायचं ठरवलं आणि सुरु झाली आमची ’केस’ बचाव मोहीम!

सगळ्यात पहिले आम्ही धाव घेतली माझ्या आईकडे, तिच्या लांबसडक केसांकडे बघुन माझ्या मैत्रिणीला जरा धीर आला.आईने तर आधी आमच्या पिढीला फ़ैलावरच घेतलं,"तुम्ही आज-कालच्या पोरी, केसांना तेल नको लावायला, आम्ही बघा; मग म्हणाली, रोज तेल लावावं आणि आठवडयाला एकदा शिककाइने केस धुवावेत मग कशाला होतोय केस गळण्य़ाचा त्रास!!" आम्हा दोघींना पण ते पटलं.

पण एकाच आठवडयात माझी मैत्रिण वैतागली, रोज सकाळी उठुन ऑफिस ला जाण्याच्या घाईत तेल लावणं एक तर अवघड त्यात शिककाइने धुतल्यावरही केसांचं तेल जात नाही मग त्यावर धुळ बसली की डोकं सगळं चिकट होतं!!

आता दुसरा पर्याय शोधणं आवश्यक होतं मग आम्ही आमच्या जिवश्च-कंठश्च मित्र-मैत्रीणीं पासुन ते ऑफिस मधे नुकतीच ओळख झालेल्या प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली. कोणी सांगितलं मी अमुक तेल आणि तमुक शैम्पू वापरते तो अगदी छान आहे, जरुर वापर; कोणी सांगितलं फक्त तेल + शैम्पू वापरुन चालणार नाही, कंडिशनर पण वापरलं पाहिजे. जे रुचलं ते माझी मैत्रिण वापरुन बघत होती मग पुन्हा काही दिवसांनी त्याचे दुष्परिणाम दिसले की पुढचा पर्याय आम्ही शोधत होतो. एकीने सांगितलं की माझी पार्लर वाली खुप छान हेड मसाज देते तुला नक्की फ़ायदा होइल! तिच्या कडे २-३ आठवडे जाउनही काही विषेश परिणाम दिसला नाही म्हणुन आम्ही पुन्हा शोधाशोध सुरु केली.

सल्ले तर आम्हाला एकदम सही मिळत होते - कोणी सांगितलं आर्युवेद ट्राय कर, कोणी सांगितलं ’हर्बल का नाही ट्राय करत? त्याचे काही दुष्परिणाम पण नाहीत!!’.कोणी म्हणे आठवडयातुन ३ वेळेस केस धुत जा तर कोणी म्हणे दररोज केस धुत जा पण हद्द तर तेंव्हा झाली जेंव्हा आम्हाला HAIR DYE वापरायलाचा सल्ला मिळाला!!

बरेच आठवडे प्रयोग केल्यावर माझी मैत्रिण अगदी कंटाळली आणि दुर्दैवाने तिच्या केसांनी देखील प्रतिसाद देणं बंद केलं!!ह्या सगळ्यामधे वेळ आणि पैसा तर खर्च झालाच पण मनस्ताप झाला तो वेगळाच.

एवढा सगळा खटाटोप करुनही माझ्या मैत्रिणिच्या केसांची अवस्था खालावतच गेली आणि अगदी मोजण्याइतपतच केस तिच्या डोक्यावर राहिले!!

पण या सगळ्यातुन एक धडा मात्र आम्ही शिकलो...ऎकावे जनाचे अन करावे मनाचे!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, May 11, 2010

आमचा कट्टा - OSM



हल्लीच्या काळात ’कॉलेज कट्टा’ हा शब्द काही नविन नाही. ह्या कटटयाने प्रत्येकाला आयुष्यात थोड्याफ़ार प्रमाणात कडू-गोड अनुभव दिलेले आहेत.अशाच कटटयाचा अनुभव घेण्याचं भाग्य मला ५ वर्ष लाभलं. हा कट्टा म्हणजे अगदीच आमच्या कॉलेजचा भाग नव्हता पण, आमच्या कॉलेजबाहेर असलेल्या एका दुकानाचा भाग होता Om Super Market...म्हणजेच OSM अर्थात आमचा कट्टा!!
कॉलेज सुरु झाल्यावर काही दिवसातच OSM ची ओळख झाली, परराज्यातुन, परदेशातुन आलेले आम्ही सगळे वर्गमित्र-मैत्रीणि (classmates) एकमेकांना OSM च्या क्रुपेने भेटलो. मग रोज कॉलेज सुटलं की, OSM ला सगळ्यांची हजेरी, मग कॉफ़ी आणि veg-puff सोबत सुरु व्हायची चर्चा. अगदी आज काय काय झालं कॉलेजमधे, रात्री जेवायला कुठे जायचं किंवा weekend ला भटकायला कुठे जायचं पासून ते freshers party कुठे द्यायची नविन आलेल्या मुलांना इथपर्यंत सगळ्या योजना इथेच आखल्या गेल्या. ब-याच जणांचे break-ups, patch-ups ह्या कटटयाच्या साक्षीने झाले.
कोणी नविन गाडी घेतली किंवा कोणाला एखाद्या स्पर्धेत बक्षिस मिळालं तरी OSM लाच सगळे भेटून ही बातमी एकमेकांना द्यायचो.
कधी रविवारी भटकायचा कंटाळा आला किंवा कॉलेजला चुकून सुट्टी असलीच तर ह्याच कटटयावर रोज शिकवल्या जाणा-या विषयाच्या चिरफाडी पासून ते देश-विदेशाच्या गहण प्रश्नांवर चर्चासत्र घडायचं.
काही वेळेस काही जणांना दिवाळी ला घरी जायला नाही मिळायचं मग दिवाळी, नविन वर्ष (new year) असे सण OSM वरच साजरे व्हायचे.होंळी तर अगदी सगळ्यांच्या hostel / PG वर खेळून झाली तरी OSM ला किमान अर्धा तास खेळल्या शिवाय कधी पूर्ण झालीच नाही.
कधी अभ्यासाचा कंटाळा आला की, किंवा रात्री जेवण झाल्यावर चक्कर मारायची म्हणून आमच्या सगळ्यांची पावलं आपोआप तिकडेच वळायची.कधी जर एखाद्याचा मूड खुपच off असेल तर त्याला जबरदस्तीने तिकडे नेलं जायचं म्हणजे त्याला डोंगराएवढं वाटणारं दु:ख उंदराएवढं होउन कधी पळून जायचं हे त्याला पण कळायचं नाही.
कॉलेजच्या विविध कार्यक्रमांची आखणी, कॉलेजला कोणत्या स्पर्धेत कोणी भाग घ्यायचा, क्रिकेट च्या सामन्यांसाठी कसं खेळायचं, कुठे जाऊन सराव करायचा ह्या आणि अशा अनेक गोष्टी आम्ही कट्टयावरच ठरवल्या.
OSM आणि कॉलेजच्या सान्निध्यात ५ वर्ष कशी सरली ते कळलच नाही, कॉलेजच्या शेवटच्या सत्रात एकेकाची नोकरी लागली त्याच्याही treats आधी OSM वर मिळाल्या आणि मग hotels मधे!!
हे सगळं वाचून कदाचित तुम्हाला वाटेल, मी आणि माझ्या मित्र-मैत्रीणिंनी फ़क्त उनाडक्याच केल्या या कट्ट्यावर पण नाही, आम्हा घरापासून दुर असणा-या एकटया पोरांना ह्या कट्ट्यामुळेच जिवा-भावाचे मित्र मिळाले, अभ्यासा सोबतच मन मोकळं करायची जागा मिळाली म्हणूनच कदाचित we all could give our best in exams as well as placement activity.
परीक्षा संपल्या तसं सगळेजण नोकरी / घर होती तिकडे निघून गेले..कॉलेज संपलं आणि कट्ट्याचा सहवासही...आता तर नोकरी मुळे एका शहरात असुन सुध्दा भेटणं अगदी अवघड होउन बसलयं, अशा वेळेस OSM ची खुप तीव्रतेने आठवण होते.नशिबाने कॉलेज मधे असणा-या विविध कार्यक्रमांमुळे, Alumni meet मुळे पुन्हा एकदा कट्ट्यावर भेटायचा योग येतो तेंव्हा पुन्हा १ कॉफ़ी आणि veg-puff सोबत ५ वर्षाच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला जातो.
OSM ने आम्हा सर्वांना आमच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचा काल बहाल केला आहे...
आता मात्र मी या सुखाला पारखी झालीये...आजही office मधून आल्यावर वाटतं काश....OSM यहां भी होता..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check