Saturday, May 22, 2010

’केस’ बचाव मोहीम!

अचानक एका रात्री माझ्या मैत्रिणीचा फोन आला, "अगं, खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे!" मला एक क्षण वाटलं, नाकासमोर सरळ चालणा-या या मुलीच्या आयुष्यात अशी कुठली समस्या निर्माण झाली असेल?? मग तिने घाब-या आवाजात सांगितलं, "माझे केस खुप गळत आहेत, काही तरी केलंच पाहिजे!!"

मग काय, माझ्या मैत्रिणीला मी मदत करायचं ठरवलं आणि सुरु झाली आमची ’केस’ बचाव मोहीम!

सगळ्यात पहिले आम्ही धाव घेतली माझ्या आईकडे, तिच्या लांबसडक केसांकडे बघुन माझ्या मैत्रिणीला जरा धीर आला.आईने तर आधी आमच्या पिढीला फ़ैलावरच घेतलं,"तुम्ही आज-कालच्या पोरी, केसांना तेल नको लावायला, आम्ही बघा; मग म्हणाली, रोज तेल लावावं आणि आठवडयाला एकदा शिककाइने केस धुवावेत मग कशाला होतोय केस गळण्य़ाचा त्रास!!" आम्हा दोघींना पण ते पटलं.

पण एकाच आठवडयात माझी मैत्रिण वैतागली, रोज सकाळी उठुन ऑफिस ला जाण्याच्या घाईत तेल लावणं एक तर अवघड त्यात शिककाइने धुतल्यावरही केसांचं तेल जात नाही मग त्यावर धुळ बसली की डोकं सगळं चिकट होतं!!

आता दुसरा पर्याय शोधणं आवश्यक होतं मग आम्ही आमच्या जिवश्च-कंठश्च मित्र-मैत्रीणीं पासुन ते ऑफिस मधे नुकतीच ओळख झालेल्या प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली. कोणी सांगितलं मी अमुक तेल आणि तमुक शैम्पू वापरते तो अगदी छान आहे, जरुर वापर; कोणी सांगितलं फक्त तेल + शैम्पू वापरुन चालणार नाही, कंडिशनर पण वापरलं पाहिजे. जे रुचलं ते माझी मैत्रिण वापरुन बघत होती मग पुन्हा काही दिवसांनी त्याचे दुष्परिणाम दिसले की पुढचा पर्याय आम्ही शोधत होतो. एकीने सांगितलं की माझी पार्लर वाली खुप छान हेड मसाज देते तुला नक्की फ़ायदा होइल! तिच्या कडे २-३ आठवडे जाउनही काही विषेश परिणाम दिसला नाही म्हणुन आम्ही पुन्हा शोधाशोध सुरु केली.

सल्ले तर आम्हाला एकदम सही मिळत होते - कोणी सांगितलं आर्युवेद ट्राय कर, कोणी सांगितलं ’हर्बल का नाही ट्राय करत? त्याचे काही दुष्परिणाम पण नाहीत!!’.कोणी म्हणे आठवडयातुन ३ वेळेस केस धुत जा तर कोणी म्हणे दररोज केस धुत जा पण हद्द तर तेंव्हा झाली जेंव्हा आम्हाला HAIR DYE वापरायलाचा सल्ला मिळाला!!

बरेच आठवडे प्रयोग केल्यावर माझी मैत्रिण अगदी कंटाळली आणि दुर्दैवाने तिच्या केसांनी देखील प्रतिसाद देणं बंद केलं!!ह्या सगळ्यामधे वेळ आणि पैसा तर खर्च झालाच पण मनस्ताप झाला तो वेगळाच.

एवढा सगळा खटाटोप करुनही माझ्या मैत्रिणिच्या केसांची अवस्था खालावतच गेली आणि अगदी मोजण्याइतपतच केस तिच्या डोक्यावर राहिले!!

पण या सगळ्यातुन एक धडा मात्र आम्ही शिकलो...ऎकावे जनाचे अन करावे मनाचे!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

3 comments:

  1. Hi,

    Nice post....
    btw, the Persis Khambatta or the Yul Bryner look aint that bad too.

    ReplyDelete
  2. very nice decision taken at the end
    good one

    ReplyDelete