शांता शेळके यांच्या पावसाआधीचा पाऊस ह्या ललित-लेख संग्रहातील एक लेख अतिशय आवडला, कुठेतरी रोज आपल्याला येणा-या अनुभवांचा आरसा वाटला म्ह्णून इथे नमुद करायची इच्छा झाली.
इतर कोणत्याही प्राण्याला न लाभलेली बोलण्याची शक्ती मनुष्यप्राण्याला लाभली आहे म्ह्णून तो स्वत:ला इतरांपेक्षा अधिक भाग्यवान समजतो.पण ही शक्ती किती अपुरी आहे, तिला किती मर्यादा आहेत याची जाणीव माणसाला या जगात पावलोपावली होत असतो.आपल्याल न कळणा-या भाषांची तर गोष्टच सोडून द्दा, पण एक भाषा बोलणारे लोक तरी त्या भाषेच्या द्वारा परस्परांचे मनोगत जाणून घेउ शकतात का? "I can't understand you." "I don't get you." ही इंग्रजी वाक्ये आपल्या दैनंदिन व्यवहारातही आपण अनेकदा वापरत असतो.याचा अर्थ काय? आपण अतिशय आतुरतेने, उत्साहाने दुस-याला काहीतरी सांगायला जावे आणि त्याने थंड निरुत्साहाने, उपेक्षावृत्तीने ते ऐकून घ्यावे, हे आयुष्यात कोणाच्या अनुभवाला येत नाही?
ख्रिस्ती धर्मपुस्तकात एक मजेदार कथा आहे.नोहा हा मानवजातीचा एक थोर पूर्वज.त्याच्या वंशजांमध्ये निम्रुद नावाचा एक राजा होऊन गेला.तो फार दुष्ट, हिंसक वृत्तीचा होता.म्ह्णून देवांना तो आवडत नसे.त्या काळी जगातली सारी माणसे एकच भाषा बोलत असत.निम्रुदाला या सा-या माणसांचे एक सलग राज्य स्थापून देवाहूनही वरचढ व्हायचे होते.म्ह्णून त्याने या माणसांना एक प्रचंड शहर बांधायला सांगितले आणि त्या शहरात एक अतिप्रचंड मनोरा उभा करायचा बेत केला.जेहोबा देवाला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला ही कल्पना मुळीच आवडली नाही.परंतु निम्रुद व त्याचे लोक यांनी देवाला आव्हान द्यायचे ठरवले.ते म्हणाले, "चला.आपण एक प्रचंड मनोरा उभा करू.इतका प्रचंड की तो आभाळाला भिडेल.आणि मग प्रत्यक्ष देवाचेही आमच्यापुढे काही चालायचे नाही!"
त्यावर जेहोबा देवाने काय केले माहीत आहे? त्याने एक युक्ती योजिली.मनोरा बांधणा-या सा-या लोकांची भाषा त्याने वेगवेगळी करुन टाकली.आता असे झाले की मनोरा बांधणा-या लोकांना एकमेकांची भाषाच मुळी समजेना.मग ते बांधकाम करणार कसे? मनोरा तर अर्धवटच राहिला. अन ज्या प्रचंड नगरीत हे बांधकाम चालले होते तिचे नाव पडले ’बाबेल’. ’बाबेल’ म्हणजे गोंधळ. ’बाबेल’ चेच पुढे ’बाबिलोन’ झाले.
तो बाबेलचा मनोरा तेव्हा अर्धवटच राहिला. पण आजही आपण बारकाईने विचार केला तर असे आढळून येते की सारे जग हाही बाबेलचा मनोराच आहे. इथे एकाचे बोलणे दुस-याला समजत नाही!!
No comments:
Post a Comment