आला पुन्हा हा सोमवार!! वीकेण्ड कित्ती पटकन संपला यारर..काश..वीकेण्ड अजुन एखादा दिवस असता तर काय बिघडलं असतं का? हे आणि असेच विचार येतात माझ्या मनात अगदी प्रत्येक सोमवारी सकाळचा गजर बंद करताना!! तरीही ह्या विचारांना पांघरूणासोबत बाजूला सारून शेवटी मी उठते...कशी बशी तयार होते अन बस-स्टॉपवर पोहोचते..सोमवार आणि त्यातून ९ ची वेळ म्हणजे कोणत्याही बसस्टॉपला किती गर्दी असते हे वेगळं सांगायची गरजच नाही, मग आलेल्या बसमधे अगदी धक्काबुक्की करून मी प्रवेश मिळवते आणि निदान आठवडयाच्या पहिल्या दिवशी तरी ’लेट मार्क’ लागणार नाही ह्या विचाराने गर्दी कापत पुढे सरकते!!
ऑफिसमधे पोहोचल्यावर कॉफीच्या घोटासोबत रटाळ ’सोमवार’ ला सुरूवात करते. नेहमीच्याच कामांवर एकवार हात फिरवून आज काही वेगळं करायला मिळेल का ह्या विचांरात दिवस अर्धा संपतो...हुश्श!! मग थोडा हुरूप येतो की चला आता उरलेल्या दिवसात काय आहे ह्या विचांरात जेवण संपवून परत येते..आणि इतका वेळ महतप्रयासाने दाबून ठेवलेली झोप पुन्हा डोळ्यांवर चढायला लागते!! झालं!! आता कशी घालवणार ही झोप!! मग एक, दोन कधी कधी तर तीन कप कॉफी प्यायल्यावर निद्रादेवी प्रस्थान करतात!!
ह्या सगळ्या खटपटीमधे थोडा वेळ गेल्यावर अचानक लक्षात येतं की आज एका महत्वाच्या विषयावर गुगल करायचं राहिलं, मग काय, डोकं एकदम १०० च्या स्पीडने पळायला लागतं...अगदी कसून काम केल्यावर पोटात कावळे ओरडायला लागल्यावरच लक्ष जातं घडयाळाकाडे अन लक्षात येतं की अरे ’सोमवार’ संपला पण!! मग झालेल्या कामाकडे एकदा नजर टाकून स्व:तवर खुश होउन मी ऑफिसबाहेर पडते!!
अशात-हेने कंटाळवाणी सकाळ आणलेल्या ’सोमवार’ चा शेवट मात्र चांगला होतो!!