Tuesday, March 8, 2011

वटसावित्री

आज महिला दिनाचं औचित्य साधुन वपुं च्या ’माझं माझ्यापाशी’ ह्या पुस्तकातला एक उतारा इथे नमूद करावासा वाटला

माझं माझ्यापाशी - व.पु.काळे

यमधर्माशी वादविवाद करून नव-याचा प्राण सावित्रीनं वाचवला, ह्यातच सत्यवानही तेवढ्या योग्यतेचा होता, हे सिध्द होतं.
प्रपंच आणि नोकरी, दोन्ही पातळ्यांवर झगडा देणारी प्रत्येक ’स्त्री’ सावित्रीच आहे. ती वर्षभर वटसावित्रीचीच भूमिका बजावत आहे. सत्यवान बारमधे जातोय, घरी पार्ट्या झोडतोय, बायकोवर डाफरतोय, तयार चहाच्या कपाची वाट पाहतोय आणि आपल्यापेक्षा जास्त कौतुक, प्रसिध्दी, गुणवत्ता, कर्तृत्व बायकोजवळ असेल, तर नवरेपणाचा हक्क अबाधित ठेवून, पत्नीच्या प्रगतीच्या आड येतोय.
संसारासाठी अर्थार्जन करणा-या सावित्रीची पूजा आणि व्रत बारमास चालू आहे. धावती गाडी पकडण्यासाठी तिला शारीरिक बळ हवंय, तिनं उपास का करावा? मंगळागौरीची जागरणं का करावीत?
पुराणे संकेत आता झुगारून दिले पाह्यजेत. ह्याचा अर्थ ’श्रध्देला’ तिलांजली दिली, असा होत नाही. बुध्दी आणि शास्त्र इकडं ती श्रध्दा वळली पाह्यजे. किमान, आपण अमुक एक व्रत का करीत आहोत? ह्याचं समर्पक समर्थन बाईजवळ हवं. नव-याचं आयुष्य वटसावित्रीच्या व्रतानं वाढतं, हा संकेतच तपासायला हवा. ते अशक्य आहे, मग स्वत:ची भूमिका स्पष्ट हवी, त्यासाठी स्वत:चा स्वत:वर गाढा विश्वास हवा. तो आत्मविश्वास, आत्मविकास वाढवणा-या गोष्टी जर सायन्सजवळ असतील, तर ’सायन्स म्ह्णजे अध्यात्म’ आणि एक जिताजागता जीव, आयुष्य यशस्वी करण्यासाठी, जागरूकतेने कार्यरत असेल, तर तेच व्रत, ह्या भूमिकेपाशी थांबणं हीच प्रगती.
उरलेल्या सगळ्या रूढी, आज फेकून द्दायला हव्यात.

No comments:

Post a Comment