Thursday, June 23, 2011

नट - कुसुमाग्रज

शेवटचं वाक्य झालं आणि टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला...नाटक आता संपलं...बाहेर प्रेक्षागृह रिकामं होत आहे...पण, नट अजून तिथेच उभा आहे...अतिशय रंगलेला आजचा प्रयोग नट त्याच्याच नजरेतून पुन्हा एकवार त्या रिकाम्या..नाही...थरारुन उठलेल्या प्रेक्षागृहासमोर उभा राहुन अनुभवत आहे....कुसुमाग्रजांची ’नट’ ही कविता...प्रत्येक कलाकाराची अदाकारी एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते...


नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.

मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्दांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.

Tuesday, June 7, 2011

उणीव


रविवारी दादरला ब्लॉगर्स मेळावा होता कांचन ताईने आयोजित केलेला, मी पहिल्यांदाच त्यात सहभागी होणार होते...तिथे गेले, कार्यक्रम अगदी छान, अनौपचारिक पध्दतीचा होता, १-२ आजोबा, २-४ काका भेटले.अगदी घरातलं एखादं कार्य आहे असच मला वाटत होतं, सरतेशेवटी महेंद्र काकांनी लकी ड्रा घोषित केला आणि त्यात चक्क माझं नाव आलं!?! मला तर एक क्षण कळालच नाही, तुम्हांला वाटेल काय वेडी मुलगी आहे इतकं काय गोंधळायचं, पण जेंव्हा अनपेक्षित पणे असा सुखद क्षण समोर येतो तेंव्हा मला असचं काहिसं होतं....त्यानंतर मी नामकाकांना भेटले, मला त्यांच्या ई-पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं होतं..काकांनी माझ्या ब्लॉग बद्दल चौकशी केली आणि अगदी दुस-याच दिवशी मी लिहीलेले जितके पण ब्लॉग्स होते त्यांबद्दल प्रतिक्रिया कळवली, मला खुप छान वाटलं पण नामकाका फक्त त्यावरच नाही थांबले तर त्यांनी माझा एक ब्लॉग एका ई-पुस्तकासाठी टाकायचं ठरवलं होतं आणि माझी परवानगी (खरं तर माझ्यासाठी पर्वणीच होती) मागितली होती, मी काय लगेच हो म्हणाले आणि अगदी अर्धा तासाच्या आत काकांनी मला एक मेल केलं ज्यात माझ्या ब्लॉग नंतर त्यांनी मंजिरीच्या कवितांबद्दल सांगितलं होतं....ते मेल वाचल्यावर मला तर काय करू नि काय नाही असं झालं....मी रविवारी ब्लॉगर्स मेळाव्याला गेले काय आणि आज माझा ब्लॉग ई-पुस्तकासोबत प्रसिद्ध होतो काय...अगदी स्वप्नागत वाटत होतं मला हे सगळं!!!

त्यानंतर मी अगदी भराभर माझ्या आई, बाबा, ताईला, मित्र-मैत्रिणींना ह्याबद्दल कळवलं...लगेच सगळ्यांचे अभिप्राय यायला सुरूवात झाली, कोणी मेलवरून सांगितलं तर कोणी फोन केले तर कोणी चॅट वरून पिंग केलं.....मी अगदी हवेत तरंगत होते काहि क्षण....पण नंतर अगदी जड जड वाटायला लागलं...लहानपणी शाळेत कोणत्याही स्पर्धेत बक्षिस मिळालं की घरी येउन आईला मिठी मारून सगळं सांगायची सवय होती मला ज्याची आज तिव्रतेने आठवण झाली आणि अगदी एकटं एकटं वाटायला लागलं...राहून राहून कोणितरी प्रत्यक्ष भेटून आपल्याशी बोलावं असं वाटायला लागलं......पण पर्याय नव्हता, मग स्वत:ला उठवलं आणि वपुंच्या पुस्तकांच्या कुशीत जाउन बसले!

काहिहि म्हणा..आज तंत्रज्ञान जरी कितीहि प्रगत असलं, आपण एकमेकांशी जगाच्या कोणत्याही कोप-यातून संपर्कात राहू शकत असलो तरीहि प्रत्यक्ष एकमेकांसोबत असण्याची उणीव हे विज्ञान अजून तरी भरून काढु शकत नाही....          


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Friday, June 3, 2011

कातरवेळ


ऑफिसमधे काम करत असतांना सहज नजर वर गेली आणि दिसलं की आकाशाच्या एका कोप-यात सूर्य, आपलं देखील अस्तित्व आहे असं काहितरी त्या काळ्या काळ्या मोठाल्या ढगांना सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रकार आहे बघावं म्हणून जागेवरून उठुन खिडकीपाशी गेले तर दिसलं की संपूर्ण आकाश काळ्या-निळ्या ढगांनी अगदी गच्च भरून आलंय आणि आता कधीहि पावसाला सुरूवात होईल....हे सगळं बघुन कुठेतरी मनात तुझा विचार चमकला आणि का काय माहित खुप हुरहूर वाटायला लागली....अगदी एकटं असल्याचा भास झाला...आजची संध्याकाळ खूप अवघड जाईल सरायला असं वाटायला लागलं...आणि अचानक एक विचार चमकला, ह्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे उमगलं, तू भेटू नाही शकत हे दिवसभर मनाला समजावून सांगितलं तरीहि त्याचं वाट बघणं आणि त्या वाट बघण्यात संध्याकाळचे चार तास चौपट झाल्यासारखं वाटणं ही सगळी प्रक्रिया काळिज चिरत जाते आणि आपल्याला ह्या धार-धार कात्रिला कुठेही थांबवता येत नाही!!! आह!!!

अजुन मी खिडकीपाशीच उभी होते...मधल्या वेळेत सूर्य कधी अस्ताला गेला आणि उरलं-सुरलं आकाशही त्या ढगांनी व्यापुन गेलं कळलंच नाही आणि बघता बघता पाउस सुरू पण झाला...पहिला पाउस!! एक मन अगदी लहान मुलाप्रमाणे उडया मारत होतं आणि दुसरं मन तुझ्या आठवणींनी अगदी काठोकाठ भरून आलं होतं....ह्या सगळ्या विचारांमधे मी कधी ऑफिसच्या बाहेर पडले ते माझा मलाचं कळालं नाही...मग पहिला थेंब, दुसरा, तिसरा आणि आणि सहस्त्र जलधारा...पहिल्या पावसात मी पुरती भिजले अगदी खोल खोल आतपर्यंत...जणू तुच मला सहस्त्र धारांनी कवेत घेतलस....  


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check