संध्याकाळी ऑफिस मधून निघाले आणि आईचा फोन आला,
आई : अगं, सगळं ठिक आहे ना तिथे?
मी : (गोंधळून) हो, ठिक तर दिसतय, पण झालं काय?
आई : अगं, आज एका माणसाने एका नेत्याच्या तोंडात मारली!! टिव्हीवर सारखं तेच दाखवत आहेत आणि काही भागामधे ह्या गोष्टीमुळे गोंधळ सुरू झाल्याचं पण बातम्यांमधे सांगत आहेत, म्हणून लगेच तुला फोन केला.
मी : (हसून) अगं आई, इथे तसं काही नाही झालं, काळजी करू नकोस, घरी गेल्यावर बोलू.
मी फोन ठेवला आणि आईने सांगितलेल्या प्रसंगाबद्दल विचार सुरू झाले. मी तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला आणि खरंच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटलं त्या शुरवीर सरदारजीचं ज्याने इतक्या ज्येष्ठ नेत्याच्या मुखात भडकावली. ह्या सगळ्या नेत्यांना इतकी ’Z' लेव्हल ची सिक्युरीटी असते आणि तरीही ह्या व्यक्तीने इतकं अवघड काम कसं पार पाडलं असेल बरं. असो. त्याने आज जे काम केलं त्यासाठी प्रत्येकाने (अर्थात त्या नेत्याच्या समर्थकांना सोडून) त्याचं तोंडभरून कौतुकच केलं आहे.
मला तसं तर त्या नेत्याच्या (कृष्ण)कृत्यांबद्दल जरा कमीच माहिती आहे पण, गेल्या कित्येक वर्षांमधे आपल्या देशास जे काही नेते मिळाले ते फक्त दामाजीपंतांची आराधना, उपासना, जोपासना करणारे मिळाले, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना एकच ध्यास लागतो आणि जळी, स्थळी, काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त पैसाच दिसतो मग सुरू होतात विविध मार्गाने आपल्या लक्षाला (life-time goal) मिळविण्याचे प्रयत्न. मग कोणी ’आदर्श’ घोटाळे करतं तर कोणी 2G स्कॅम आणि असेच फाईली भरभरून घोटाळे सुरूच आहेत.
९९% नेते असेच आहेत आजच्या भारताच्या नशिबात पण काही नेते अहं मी म्हणेन (मला कळायला लागल्यापासून) मी एकच असा माणूस बघितला जो राजकारणात असतांना देखील कधी कुठल्या प्रलोभनांना बळी न-पडता प्रामाणिकपणॆ दिलेली ५ बर्ष कारभार सांभाळून पुन्हा एकदा जन-सामान्यांमधे मिसळून गेला...मी बोलतीये डॉ.अब्दुल कलाम आझाद ह्यांच्याविषयी!
शाळेत असतांना मला ’अग्निपंख’ हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका प्रामाणिक, बुध्दिमान, आपल्या कामाशी आणि देशाशी इमान राखणा-या वैज्ञानिकाची ओळख झाली. त्यांचे आचार-विचार माझ्यासारख्याच अनेक मुला-मुलींसाठी,तरूणांसाठी प्रेरणादायी ठरले अजुनही ठरत आहेत.
जेंव्हा डॉ.कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले तेंव्हा सगळ्या देशाला अत्यानंद झाला होता. खरं तर, सामान्य माणसाला देशाचा राष्ट्रपती कोण आहे ह्या गोष्टीची ब-याचदा माहिती नसते वा ह्याच्याशी काही घेणं-देणं नसतं पण डॉ.कलाम हे व्यक्तिमत्त्व असं आहे की ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला ख-या अर्थाने आपल्या देशाचा प्रथम पुरूष अभिमानास्पद मिळाला होता.
(डॉ.कलाम ह्यांना राष्ट्रपती पद बहाल करण्यामागे ’राजकारण्यांचं’ काय कारस्थान होतं ते तर माहित नाही पण प्रत्येक भारतीयाला निदान ५ बर्षाकरिता हा दिलासा मिळाला की आता आपल्या देशाची धुरा एका बुध्दिमान माणसाच्या हातात आहे आणि नक्कीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे.)
मागे एकदा मला ’The Kalam Effect' हे पुस्तक वाचायला मिळालं. हे पुस्तक पी.एम.नायर ह्यांनी लिहीलेलं आहे. लेखक हे खरं तर राष्ट्रपती डॉ.कलाम ह्यांचे पर्सनल असिस्टंट होते आणि त्यांनी ह्या पुस्तकात राष्ट्रपतींची कारकिर्दच थोडक्यात मांडली आहे. देश चालविण्याचं शिवधनुष्य डॉ.कलामांनी कसं पेललं, येणा-या बिकट प्रसंगांना कस उत्तर दिलं अशा गंभीर प्रश्नांपासून ते येणा-या प्रत्येक पत्राला उत्तर देण्याच्या प्रयासापर्यंतचा प्रवास ह्या पुस्तकातून उलगडत जातो. पुस्तक वाचतांना आपण एका असामान्य व्यक्तीला खुप जवळून बघत असल्याची जाणिव होते.
आपल्या देशाच्या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत पण त्यातल्या कलमांमधे वेळोवेळी बदल करणं आवश्यक असतं ह्या गोष्टीची जाणीव डॉ.कलामांना होती आणि म्हणूनच त्यांनी स्वत: अभ्यास करून संसदेत अहवाल सादर करून काही कलमांमधे आवश्यक ते बदल करून घेतले.
एक ना अनेक अशा खुप गोष्टी ह्या पुस्तकातून आपल्याला कळतात. एखाद्या व्यक्तीचं राष्ट्रपती असतांना काय कर्तव्य आहे ह्याची सामान्य माणसाला उकल होते.
सामान्य माणसाच्या दुर्दैवाने आणि ’राजकारण्यांच्या’ कृपेने डॉ.कलाम ह्यांना फक्त पाचच वर्ष ह्या देशाचा राष्ट्रपती राहता आलं...पण ही व्यक्ती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमचं घर करून राहिली..
वाईट फक्त ह्याच गोष्टीचं वाटतं की, राजकारणी लोक पैशामागे इतके कसे आंधळे होतात आणि देश विकून बसतात.
Dr.Kalam's speech in the european union
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.