दिवाळी म्हटलं की, मला आठवण होते नरसोबाच्या वाडीची.
नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे दत्तात्रय महाराजांचं एक जागृत असं देवस्थान कृष्णामाईच्या तिरावर वसलेलं आहे.
सांगली पासून २५ किमी अंतरावर असणारं हे गाव म्हणजे साक्षात दत्तभूमीच. ही भूमी श्री.दत्तमहाराजांचे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतींच्या १२ वर्षे वास्तव्याने पावन झालेली आहे.
आमच्या घरामधे श्री.दत्तमहाराजांची आराधना केली जात असल्यामुळे, आम्ही दिवाळी च्या आधी येणा-या गुरूव्दादशी ला नरसोबाच्या वाडी ला जायचो. तिथे ह्या काळात खूप मोठा उत्सव असतो.
पुण्याहुन सांगलीला जाणा-या बस मधे बसलं की शेवटचा स्टॉप म्हणजे नरसोबाची वाडी. रात्री अगदी उशीरा पोहोचल्यावर विनोद पुजारी म्हणून बाबांचे मित्र होते आम्ही त्यांच्याकडे उतरायचो. त्यांचं घर मस्त दुमजली होतं. राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था तेच बघायचे.
दिवाळी म्हणजे अगदी कडक थंडी, तरीपण आम्ही एकदा का होईना कृष्णामाईला पहाटे जाउन आंघोळ करायचो. त्यानंतर मंदिरातील काकड आरती व प्रात:कालपूजेला हजर व्हायचो.
तर, आत आल्यावर उजव्या बाजूला, नारायणस्वामींचं मंदीर आहे. त्यामागे, मोठी धर्मशाळा बांधलेली आहे.थोडंसं पुढे गेलं की, डाव्याबाजूला मुख्य मंदीर आहे जेथे औदुंबराच्या (झाडाच्या) सावलीमधे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाची वाडी सोडण्यापूर्वी ह्या जागी आपल्या मनोहारी पादुकांची स्थापना केली होती ज्याचा पुढे श्री.गुळवणी महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि सध्यस्थितीतील मंदीराची रचना झाली.
आता थोडी नजर वळवा, समोरच कृष्णामाईचं दुथडी भरून वाहणारं स्वच्छ, नितळ पाणी चकाकतांना दिसेल. असं म्हणतात की, पूर्वी पावसाळ्यामधे कृष्णामाईला इतका पूर यायचा की पाणी मंदिरातील पादुकांना स्पर्श करीत असे. पण, आजही कृष्णामाईच्या पात्राला पाणी अगदी काठोकाठ असतं. नदीकाठी बांधलेल्या सुंदर घाटामुळे मंदीर परिसराला एक उठाव आलेला आहे. असं हे प्रसन्न वातावरण असलेल्या मंदिराचं दर्शन घेउन आम्ही घराकडे परतायचो.
पुढे घराकडे जातांना, रस्त्यावर थोडंसं धुकं असायचं आणि सकाळच्या शुध्द हवेत धुपा-दिपाचे वास दरवळत असत आणि क्वचित कुठुन तरी गरमपाण्याच्या बंबाचा धुर दिसत असे. दुतर्फा असणा-या घरांची अंगणं सुध्दा सडा-संमार्जन करून सिध्द असत.सुवासिनी मंदिरामधे पुजायला जातांना दिसत. दिवाळी सुरू होण्यास अवकाश असून देखील अगदी मंगलमय वातावरण असायचं.
नरसोबाच्या वाडीला, मंदीरामधे सकाळी ९ ते १२ ह्या वेळेत मनोहारी पादुकांची पुजा करण्याची संधी भाविकांना मिळते.आम्हीदेखील एकादशीच्या दिवशी ही पुजा करीत असू. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान खिडक्या बसवलेल्या आहेत ज्यामधून पुजा करणा-या व्यक्तीला पादुकांची होणारी पुजा व्यवस्थित बघता येते. तसंच मुख्य व्दारातून इतर भाविकांना दर्शन घेता येते. ह्या तीर्थक्षेत्री असणारे ब्राम्हणवृंद आपल्याकडून यथासांग पुजा करवून घेतात. दुपारी १२ ते १ च्या सुमारास महापुजा, नैवेद्द व आरती होते.
त्यानंतर आम्ही परतायचो. दुपारी विश्रांती घेउन मग संध्याकाळी आम्ही कृष्णामाईच्या पैलतीरी वसलेल्या ’अमरेश्वर’ ह्या शंकराच्या मंदिराला भेट देत असू. हे मंदीर कृष्णामाईच्या काठावर वसलेलं असल्याने तुम्ही नावेतून जाउ शकता किंवा चालतही जाउ शकता.
संधीकालच्या प्रकाशात कृष्णामाईचं पात्र अधिकच सुंदर भासतं, त्या प्रवाहाकडे बघता बघता संध्याकाळच्या पुजेची वेळ कधी होते कळतच नाही.
सकाळी झालेल्या महापुजेपेक्षाही मला संध्याकाळी असणा-या पालखीचं खुप आकर्षण असायचं. नारायणस्वामींच्या मंदिरामधे पालखीची तयारी केली जाते. विशेष म्हणजे ही तयारी सर्व भक्तगणांना बघायला मिळते.सर्वप्रथम उत्सवमूर्तीला अभिषेक केला जातो.त्यानंतर चंदनगंध,कुकुम,काजळ आदिंनी मुखवटयाची सजावट केली जाते. त्यानंतर पुणेरी फेटा बांधला जातो. सरतेशेवटी ताज्या फूलांची आरास केली जाते. त्यानंतर आरती-वात,नैवेद्द होतो आणि "राजाssधिराज, महाराज" च्या गजरात मिरवणुकीची सुरूवात होते. पालखीसोबत चंद्र, सूर्य, चवरी (वारा घालण्याचा पंखा) घेउन तसंच भालदार, चोपदार औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करतात. भक्तांना देखील ह्या पालखीमधे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते. दत्तात्रय महाराजांची विविध स्तुतीपरपदं म्हणत म्हणत ही मिरवणूक साधारण तासभर चालते आणि दिवसाची सांगता होते.
...आज कित्येक वर्ष झाले आम्ही नरसिंहवाडीला गुरूव्दादशीच्या निमित्ताने जाउ शकलो नाही पण, दिवाळी म्हटलं की आम्हांला ह्या सगळ्या उत्सवाची आठवण होत नाही असं कदाचितच घडत असेल..
जसा हा उत्सव माझ्या लक्षात आहे तशीच नरसोबाच्या वाडीशी निगडीत एक आठवण खुप वेगळी आणि छान आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे किल्ला करायची पध्दत आहे. तिथे तर किल्ला बनविणे स्पर्धा घेतली जाते आणि ही स्पर्धा अशी तशी नाही तर अगदी अटीतटीची असते. फक्त २,४ विटा घेउन थोडी माती थापली की किल्ला तयार ही तिथे किल्ल्याची व्याख्या नाही. तर, तिथे लहान-मोठे सगळे मुलं व्यवस्थित आखणी करून, विचार करून शिवाजी महाराजांचा एखादा फेमस किल्ला निवडतात मग माती, विटा, चुना, विविध रंग ह्या सर्व साहित्यासह किल्ला बांधणीला सुरूवात करतात आणि साधारण २-४ दिवसात त्या फेमस किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती बनवतात. त्यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे तसंच किल्ल्याच्या आवारात छोटंसं तळं करून त्यात दिव्यावर चालणारी बोट अशा गोष्टी रचून सजावट करतात. आम्ही सर्वजण तर हे सगळं बघून अगदी हरखून जायचो आणि आपण पण असाच किल्ला करायचा घरी गेल्यावर हा विचार घेउन नरसोबाच्या वाडीचा निरोप घ्यायचो..
तर, कशी वाटली तुम्हांला ही आगळी-वेगळी सफर..जमलं तर तुम्ही पण एकदा जाउन याच, माझं तर ह्या दिवाळीचं प्लॅनिंग फिक्स झालेलं आहे.
वरील ब्लॉग जालरंग प्रकाशनाच्या दिपज्योती २०११ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.
http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
khupch chan priyanka..!!
ReplyDelete-Swati Patil
Thanks so much Swati :-)
ReplyDeleteMind blowing!!! u have control on language...how u can write such beautiful...composition...hands off 2 u...Darshan zale aaja..narsoba chaya wadi che...
ReplyDeleteKiran