Thursday, May 24, 2012

रूटीन



आज ब-याच दिवसानंतर दवाखान्यात जायची वेळ आली..अंहं..विशेष काही नाही,नेहमीच्या चेक-अप साठी गेले होते. सकाळची वेळ होती त्यामुळे दवाखान्यात अगदी मोजकेच लोक दिसत होते.काही टेस्ट करायच्या म्हणून एका काउंटरकडे वळले. तिथे असणा-या माणसाला विचारलं,

मी: गुड मॉर्निंग, मला ही टेस्ट करायची आहे,काय करावं लागेल?

काऊंटरचा माणूस: ( अगदी रूक्षपणाने ) कार्ड आहे का?

मी: ( गोंधळून ) कुठलं कार्ड?

काऊंटरचा माणूस: ( वैतागून ) अहो, तुम्ही इथे याआधी कधी तपासणी केली आहे का? जर केली असेल तर एक कार्ड दिलेलं असेल त्याचा नंबर द्या!

मी: नाही, मी पहिल्यांदाच आलीये. तुम्ही नविन कार्ड बनवा आणि ह्या टेस्ट करायच्या आहेत त्याचे पैसे किती ते पण सांगा.

काऊंटरचा माणूस: हं, हे घ्या कार्ड अन तुमचे xxx पैसे होतात, सुटे पैसे सुध्दा द्या.

मी निमूटपणाने पैसे दिले आणि विचारलं की कुठे जावं लागेल, तर त्याने माझ्या प्रश्नाकडॆ दुर्लक्ष करत माझ्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे बघितलं.

मग मी रस्ता शोधत एका लॅबपाशी येऊन थांबले,आत बघितलं तर बाकावर काही माणसं बसली होती आणि एक सुंदर चेह-याच्या मॅडम लोकांची टेस्ट करत होत्या.मी पण आत जाऊन बाकावर बसले आणि बघत होते समोर काय सुरू आहे ते.

त्या मॅडम एका आजीबाईंची टेस्ट करत होत्या, त्या आजीनी विचारलं,’अहो मॅडम, मला ही टेस्ट कशाला करायला सांगितली आहे? मला काय झालंय?’ तसं त्या मॅडमने वैद्यकीय भाषेत काहितरी उत्तर दिलं.तिथे बसलेल्या कोणालाच ते समजलं नाही आणि त्या आजींच्या चेह-यावर काळजीची काजळी पसरली!

माझा नंबर आला तसं मी त्या मॅडमसमोरच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि गुड मॉर्निंग म्हणत माझा हात पुढे ठेवला. त्यांनी कम्प्युटरकडे बघत अतिशय रूक्ष आवाजात ’रिसीट’ म्हणून विचारलं.माझी टेस्ट झाली आणि निघतांना मी विचारलं की,रिपोर्ट कधी मिळणार तसं त्या मॅडमनी एक बोट वर करत भिंतीवर लावलेल्या एका पाटीकडे इशारा केला.त्यावरची सुचना वाचून मी बाहेर पडले.

ह्या दवाखान्यामधे सगळया प्रकारचे डॉक्टर्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत त्यामुळे पुढे मी डोळे तपासायचे म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले. आत गेल्यावर मी डॉक्टरला गुड मॉर्निंग म्हटलं आणि माझं कार्ड समोर केलं.तसं त्यांनी माझा नंबर लिहून घेतला आणि आपल्या असिसस्टंटला मशिन अ‍ॅडजस्ट करायला सांगितलं.माझी तपासणी करून झाल्यावर त्यांनी मला डोळ्याचे काही व्यायाम समजावून सांगितले आणि सुचना दिल्या अगदी रूक्ष आवाजात.
- कंम्प्युटर वर काम करतांना दर वीस मिनिटांनी, मोजून पाच मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यायचीच नाहीतर डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल!
- हिरव्या पालेभाज्या,गाजर ह्यांचा समावेश जेवणामधे करायचा नाहीतर डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल.
- रात्री किंवा कमी प्रकाशात कंम्प्युटर वर काम करायचं नाही, नाहीतर (मी मनात डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल).
- कधी जर डोळे खुपच कोरडे वाटले तर हा xxxx आय ड्रॉप वापरायचा.
सुचना देऊन झाल्यावर मी ’थॅंक्स’ म्हणत बाहेर पडले पण त्या डॉक्टरचं काही लक्ष नव्हतं.

पुढे मी दंतवैद्याकडे गेले तिथेसुध्दा डोळ्यांच्या डॉक्टरकडे आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती झाली.

दवाखान्यातुन बाहेर पडतांना मी विचार करत होते की, ह्या दवाखान्यामधे काय आज ’जागतिक शोककळा दिन’ वगैरे आहे की काय? सगळेजण इतके मख्ख चेह-याचे, उत्साह संपलेले का आहेत? अगदी सकाळ्च्या प्रहरी सुध्दा ह्या लोकांमधे काम करायचा उत्साह नाहीये तर संध्याकाळी ह्यांचं काय होत असेल?

तसं पाहिलं तर काऊंटरवर काम करणा-या माणसाला किंवा लॅबमधल्या त्या मॅडमला कदाचित त्यांची ही नोकरी नको असेल दुसरं काहितरी करायचं असेल पण अडचण म्ह्णून ते हे काम करत असतील त्यामुळे त्यांच्यामधे काम करण्याची तितकी इच्छा नसेलही पण ते डोळ्याचे किंवा दाताचे डॉक्टर्स? त्यांनी तर त्यांच्या आवडीने हे क्षेत्र निवडलं आहे ना मग त्यांना सुध्दा इतका कंटाळा यावा? त्यांनी जर असंच को-या चेह-याने सगळ्या रूग्णांना तपासलं तर ज्याला काहीही झालेलं नाहीये त्याला सुध्दा ’बहुतेक आपल्याला काहितरी भयंकर रोग झाला आहे’ असं वाटायला सुरूवात होइल!!

का होत असेल बरं ह्या सगळ्यांचं असं? कदाचित त्यांना दिवसभरात इतक्या लोकांशी बोलावं लागतं,त्यांना तपासावं लागतं,किचकट रोगांचं निदान करावं लागतं त्यामुळे त्या पेशंटसोबत असतांना ते हसणं, नॉर्मल वागणं विसरतही असतील..शेवटी ते पण तर माणसंच आहेत ना..हे तर त्यांचं रोजचं रूटीनच...अरे हो...त्यांचं रूटीन असं आहे म्हणून ते असे वागत आहेत. आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की, दवाखान्यातल्या लोकांना जिवंत माणसांसोबत काम करावं लागतं तरीपण ’रूटीन’ मुळे त्यांच्या वागण्यातला जिवंतपणा हरवून जातो!

काही दिवसानंतर मला बॅंकेमधे काही कामानिमित्त जावं लागलं. तिथे मी ’इथे मदत मिळेल’ काऊंटवर चौकशी करून योग्य त्या माणसासमोर म्हणजे एका मॅडमसमोर जाऊन उभी राहिले.

मी: एक्सक्युज मी मॅडम..

त्या मॅडमनी कंम्प्युटरसमोरची नजर वळवून फक्त उजव्या भुवईनेच ’काय आहे’? असा प्रश्न केला..

मी: मला जरा ही कागदपत्रं तपासून घ्यायची आहेत, जरा बघता का?

मॅडम: हं, बघू. असं म्हणून त्यांनी कागद हातात घेतले. १० मिनीटानंतर मी हे कागद तपासेन तोपर्यंत थांबा.

मी ठिके म्हणून तिथेच असलेल्या बाकावर बसले आणि बॅंकेत काम करणा-या इतर कर्मचा-यांना बघायला सुरूवात केली.काही वयस्क,काही तरूण अशी बरीच मंडळी काम करत होती पण सगळ्यांचे चेहरे सारखे दिसत होते..अगदी स्त्री-पुरूष सगळ्यांचे.मी आश्चर्याने मगाशी बोललेल्या मॅडमकडे बघितलं तर त्यांचा चेहरापण सेम इतरांसारखा!! मग माझ्या लक्षात आलं, ह्या सगळ्यांच्या चेह-यावर ’रूटीन’ नामक मुखवटा चढलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा उत्साह,कामामधे जिवंतपणा वगैरे वगैरे...छ्या..विसरा.

१० मिनीटानंतर माझं काम त्या मॅडमनी करून दिलं अगदी त्याच निर्लेप आवाजात आणि मी बाहेर पडले. विचारचक्र पुन्हा एकदा रूटीन ह्याच शब्दाभोवती फिरत होतं..माझ्या असं लक्षात आलं की,आपलं तरी काय वेगळं असतं,रोज रोज ऑफिसमधे जाऊन तेच तेच बोअरींग काम करावं लागलं, काहिच नाविन्य नसलं की आपल्याही कुठे लक्षात येतं आपण आजुबाजूच्यांना गुड मॉर्निंग म्हटलंय की नाही ते! कुठल्याही गोष्ट रोज घडायला लागली की त्यातलं नाविन्य हे संपणारच ना, म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे अगदी तसंच...

पण, असं होणं बरोबर नाही ना, अशाने तर आपण माणूसपण हरवून बसू..यंत्र बनून जाऊ आपण...नो यार! रूटीन जर इतकं भयानक असेल तर काहितरी उपाय शोधलाच पाहिजे!

हे विचार सुरू असतांनाच मला कोणीतरी हाक मारली, वळून बघितलं तर आमचे फॅमिली डॉक्टर दिसले. ह्या अवलियाला मी, मला कळायला लागल्यापासुन बघत आली आहे.त्यांच्या कडे कधीही जा ते अगदी हसतमुखाने तुमचं स्वागत करणार.मी लहान म्हणून मला नेहमी एक चॉकलेट देणार आणि जर खुप लागलेलं असेल किंवा दुखत असेल तरी बोलण्यातुन अशी काही जादू करणार की तुमचं दुखणं अर्धअधिक तिथेच पळून गेलं पाहिजे!

बरं त्यांचं हे वागणं अगदी प्रत्येक पेशंटसोबत असायचं. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यत त्यांचा दवाखाना आणि नंतरचं हॉस्पिटल यामधे मी त्यांना कधीच कंटाळलेलं,चिडलेलं अगदी वैतागलेलं सुध्दा बघितलं नाही. इतक्या विविध लोकांना ते रोज तपासत असतात पण त्यांच्यामधला जिवंतपणा आज वयाच्या पन्नासाव्या वर्षीपण अगदी सळसळता आहे.

तर त्यांनी मला सुप्रभात विश केलं आणि म्हणाले की, उन्हाचं इकडे कुठे फिरतीये. आम्ही दोघे एका झाडाच्या सावलीत थांबलो आणि मी त्यांना माझ्या डोक्यातला रूटीननामक गोंधळ ऐकवला..त्यावर ते कधी नव्हे ते गंभीर होत म्हणाले.’जर तुम्हाला रोज तेच काम करावं लागणार आहे हे माहित आहे तर त्यात आनंद निर्माण करणं हेदेखील तुम्हांलाच करावं लागेल.आमच्यासारख्या दिवसातुन अनेक लोकांशी संबंध येणा-या माणसांना खरं तर जास्त विचार करावा लागत नाही.येणारा प्रत्येक पेशंट काहितरी नविन गोष्ट घेउन येतो.त्याला तपासायचं, रोगाचं निदान करायचं ह्या गोष्टीमधुन सारखे नवे विचार डोक्यात संचारत असतात.कधी कधी मेंदुला मुंग्या आणणा-या गोष्टीसुध्दा समोर येतात पण आपण कोणाला तरी मदत करतोय चांगलं जिवन जगायला हीच भावना त्या प्रसंगातुन मला पुढे जायचा मार्ग दाखवते.

तुमच्या हातात आहे तुमच्या दिवसाला एखाद्या पाणी साचलेल्या डबक्यासारखं करणं किंवा नदीसारखं प्रवाही ठेवणं.आजुबाजुला बघितलं की, खिडकीतुन दिसणारं झाड रोज वेगळंच भासतं, चिमण्या-कावळा हे पक्षी गातात पण रोज त्यांचं गाणं वेगळं असतं कारण रोजचा दिवस हा नवा असतो,काहितरी नविन तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो त्यामुळे त्या दिवसाला रूटीनच आहे म्हणून हिणवण्यापेक्षा त्या नविन दिवसामधे आपण नविन काय करणार आहोत ते शोधायचं ’ :-)

बस..ह्याउपर काहि करायची गरज नाही पडत. तुमच्या आय.टी. मधे ते वेगवेगळे शिबिरं घेतात ना हिच गोष्ट समजावण्यासाठी? पण मी बघ तुला विदाऊट ट्रेनिंग फुकट सल्ला देतोय ;) इतका जास्त विचार करायचो नसतो ग बाळे इतक्या लहान-सहान गोष्टींचा’. मी ज्या गोष्टीचा इतके दिवस विचार करत होते त्याला काका ’लहान-सहान’ म्हणाले? हीही..

खरंच अगदी दोन मिनिटात डॉक्टरकाकांनी माझ्या डोक्यातला रूटीननामक वळवळणारा किडा चिमटीत अलगद उचलून पार डोक्याबाहेर फेकुन दिला :-) ग्रेटच ...

आज मला कळालं त्यांच्या उत्साहाचं रहस्य, आता मी सुध्दा ते ट्राय करणार, व्हॉट अबाऊट यू??



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, May 16, 2012

मोहाचा एक क्षण



शुक्रवारी संध्याकाळी कामातून थोडं मोकळं झाल्यावर विचार आला, चला उद्या वीकएन्ड :) लकीली काहीच कामं नाहीत तेंव्हा नुसती झोप काढायची :)

शनिवारी अगदी उन्हं वर आल्यावर जाग आली, आळोखे-पिळोखे देत उठले..अगदी गोगलगायीच्या स्पीडने सगळं आवरलं, जेवण केलं आणि फक्त दोन तासाची वामकुक्षी घेतली..उठल्यावर विचार आला..अरेच्चा, आपली तर झोप पूर्ण झाली आता काय करावं बरं? वाटलं, चला जरा पाय मोकळे करून यावेत. मग अगदी भरभर आवरलं आणि जवळच्याच एका मॉलकडे मोर्चा वळवला.

मॉलमधे प्रवेश करताच गार-सुगंधित झुळकेनं माझं स्वागत केलं आणि मन अगदी प्रसन्न झालं :) 

आता माझ्या आवडत्या कामाला मी सुरूवात केली.तसं तर आज विशेष काही घ्यायचं नव्हतं,फक्त विंडो शॉपिंग करायची होती पण तरीही काही आवडलच तर घ्यायला हरकत नाही असा विचार करत मी माझ्या आवडत्या दालनाकडे वळले. तिथे स्टँडवर वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, ब्रँडच्या बॅग्स, वॉलेट्स, क्लचेस ठेवलेले होते.एक-एक वस्तू न्याहाळत मी सगळं बघितलं पण विशेष काही आवडलं नाही तशी मी पुढे चप्पल-बुट सजवलेल्या भिंतीकडे सरकले. तिथे सुध्दा वेगगेगळ्या ब्रँडचे जोडे,सपाता,चपला ठेवलेल्या होत्या.बघत-बघत मी एका ठिकाणी थांबले. 

मला ती चप्पल अगदी वेगळी वाटली बाकी सगळ्यांमधे म्हणून मी ती घालून बघितली तसा लगेच तिथे उभा असलेला मॉलचा एक माणुस,'मॅडम, मे आय हेल्प यू?' म्हणत पुढे आला.त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी ती चप्पलच न्याहाळत होते,माझ्या पायाच्या मापाची ती होती आणि खुपच आकर्षक होती,मला ती आवडली  :D 

मग मी त्या माणसाला त्या चपलेचा जोड आणायला सांगितला. ते देतांना त्याने जोडाचं कौतुक करायला सुरूवात केली,'मॅम,धिस ब्रँड इझ व्हेरी गुड अ‍ॅण्ड कम्फर्टेबल, इट्स लुकींग व्हेरी गुड ऑन यू,शल आय पॅक इट?'.मी पुन्हा दुर्ल़क्ष करत आधी ती चप्पल घालून तिथे ठेवलेल्या आरशात स्वतःचे पाय न्याहाळले,मग पुन्हा एकवार नुसतंच पायांकडे बघितलं खात्री करून घेतली की ती सुट होतेय का नाही, मग थोडं चालून बघितलं आणि झालं,(वेडया)मनाने शिक्कामोर्तब केलं की, ही चप्पल चांगली आहे चला घेउया.पण लगेच (शहाणं)मन पुढे आलं आणि त्याने विचारलं, आधी किंमत तर बघ. तशी मी किंमत बघितली तर xxx ओन्ली दिसलं.


वेडं मन -  :-$ 
शहाणं मन - बापरे इतकी महाग? नाही, नाही. नाही घ्यायची, चला पुढे जाऊ.
वेडं मन - हे काय रे शहाण्या!! 
शहाणं मन - चप्पल आहे ना सध्या वापरायला मग पुन्हा कशाला हवीये?
वेडं मन - एक मिनीट थांब..
असं म्हणून वेडं मन विचारमग्न झालं आणि लगेच मन:चक्षु समोरून एक चित्रफित सरकू लागली.ज्यामधे माझं कपाट समोर आलं आणि एक एक ड्रेस फिरू लागले,जवळपास प्रत्येक ड्रेसला मॅच होणारी अशी एक चप्पल होती माझ्याकडे पण, एक स्कर्ट येस्स..एकच असा स्कर्ट होता की ज्याला ती चप्पल सुट होत नव्हती.मग काय, वेडं मन पुढे सरसावलं आणि 
वेडं मन - ए, त्या स्कर्ट साठी हवीये मला ही चप्पल.एकदम सुट होते त्याला :)
शहाणं मन - तो स्कर्ट ह्या चपलेच्या अर्ध्या किमतीचा सुध्दा नाहीये.आणि बाहेर रस्त्यावर अशीच चप्पल इथल्यापेक्षा १/४ किमतीत मिळेल! नाही, इतकी महाग चप्पल नकोच.चला जाऊ आपण..
वेडं मन - अरे पण, रस्त्यावरच्या सस्त्या मालाला काही क्वालीटी नसते.नेमकी वापरायला काढली आणि तुटली तर?
शहाणं मन - .....दुर्लक्ष

पहाता पहाता शहाणं मन आम्हांला दुसरीकडे घेऊन जाऊ लागलं आणि वेडं मन तरीही वळून-वळून बघतच राहिलं..
पुढे कपडयांच्या सेक्शनमधे तर वेडया मनाला अगदी चेव आला, जे टॉप छान दिसेल त्या प्रत्येकावर ती चप्पल कशी सुट होते हे तो अगदी हिरीरीने समजावून देउ लागला..असं करत करत सगळा मॉल बघून झाला, पाय अगदी थकुन गेले म्हणून मी खाण्याच्या ठिकाणी एका खुर्चीवर स्वत:ला झोकून दिलं,पाणी प्यायले आणि खुप उशीर झाला आहे हे बघुन लगेच घरी जायला निघाले..दाराकडे जातांना पुन्हा एकदा त्या चपलेने खुणावलं आणि त्या क्षणी मला ती चप्पल घेण्याचा मोह अनावर झाला आणि तिला घेऊनच मी बाहेर पडले  :D 

घरी आल्यावर लगेच त्या स्कर्ट आणि चपलेची जोडी खरंच जमतीये ना हे तपासून बघितलं,छान दिसत होतं सगळं, स्वतःशीच हसले आणि विचार आला, किती वाद घातला आपण तेंव्हा नाही घ्यायचं म्हणून पण, तो एकच मोहाचा क्षण घातकी ठरला आणि पैसे उधळले गेले..

खरं तर असे मोहाचे फक्त काही क्षणच दर महिन्यात येतात आणि कपडयांचं,चप्पल-बुटांचं,ज्वेलरीचं कदाचित कधी होम फर्निशिंग ने कपाट/घर भरायला भाग पाडतात. अशी काही खरेदी केली की आपण स्वतःला दहादा बजावतो की पुढच्या महिन्यात नो शॉपिंग अ‍ॅट ऑल!! पण, अचानक एका दिवशी हेच क्षण आडवे येतात आणि सणक आल्यासारखे आपण लिंकींग रोड, फॅशन स्ट्रीट नाहीतर हाँगकाँग लेन किंवा एफ.सी.रोडवर जाऊन धडकतो, मनसोक्त खरेदी करतो आणि घरी आल्यावर आईचे बोलणे झेलतो,'अगं, घरातली दोन कपाटं ओसंडून वाहतायेत तुझ्या कपडयांनी आणि आता आणखी शॉपिंग?? कुठे ठेवायचा हा पसारा??' पण ह्यावर आपलं नेहमीचं उत्तर,'आई, ही फॅशन आहे गं सध्या,मी लावते बरोबर कपाट' :-)

काहीही म्हणा हे मोहाचे क्षण वाईटच!! 

पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की, हेच क्षण त्या वेळी अत्युच्च आनंद, प्रसन्नता आणि असं बरंच काही छान छान देऊन जातात  :-)  त्यामुळे वाईट जरी असले ना तरी हे मोहाचे क्षण निदान शॉपिंगबाबत तरी हवेहवेसे वाटतात  :-)



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check




Tuesday, May 15, 2012

मदत



सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असणा-या ’सत्यमेव जयते’ ह्या कार्यक्रमामधे शेवटच्या टप्प्यात आमीर खान आपल्याला म्हणजे सगळ्या देशाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर आपण एस.एम.एस. व्दारे देऊ शकतो ज्याला फक्त एक रूपया लागतो आणि त्याव्दारे जितके पैसे जमा होतील त्यातून टॅक्स कापून जे पैसे उरतील ते आणि त्याच रकमेइतकी रक्कम रिलायन्स कंपनी त्यात जमा करून एका ठरावीक सेवाभावी संस्थेला देणार असं सांगण्यात येतं, त्या संस्थेचं नावदेखील तिथे दिलेलं असतं...

हल्ली ब-याच मोठमोठया कंपन्यांमधे काही सेवाभावी संस्था मदतीसाठी जातात, तिथे मग सगळ्या कर्मचा-यांना दरमहा काही ठरावीक रक्कम ह्या संस्थेला देण्याची तरतूद आपल्या पगारातून करता येते.

वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांमधे एकच मुद्दा स्पष्ट होतो की, आपण हल्ली कोणत्याही सेवाभावी संस्थेला अगदी सहजपणे हव्या त्या रकमेची मदत करू शकतो आणि काहीही कष्ट न-घेता, घरबसल्या ’पुण्य’ कमावू शकतो

पण, यात एक शंका अशी निर्माण होते की, कितपत शाश्वती आहे की ते पैसे खरंच गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतात..टी.व्ही.वरील अनेक कार्यक्रमांमधून ह्याही आधी अशा सेवाभावी संस्थांना देणग्या देऊ असं ऐकलं, पाहिलं होतं पण ह्या गोष्टीची शहानिशा कशी करायाची की खरोखर, मुळात त्या सेवाभावी संस्थेला ही मदत मिळाली आणि पुढे त्या संस्थेत काम करणा-या कर्मचा-यांच्या तावडीतून सुटुन ती रक्कम गरजू लोकांसाठी उपयोगात आणली गेली..

मला आठवतं मी शाळेत असतांना लातूर गावात खुप भयानक स्वरूपाचा भूकंप झाला होता आणि त्यासाठी मदत करा म्हणून सगळीकडे आवाहन केलं होतं, लोकांनी भरभरून मदत केलीसुध्दा पण नंतर वर्तमानपत्रात ’गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नाही’ ह्या स्वरूपाच्या बातम्या वाचाव्या लागल्या..

माझी एक मैत्रीण मुंबईला राहायला आली, तिला पावसाळ्यामधे एका गरजू कुटुंबाला छत्री द्यायची इच्छा होती, बाहेर जातांना ती नेहमी दोन छ्त्र्या बाळगायची.मी तिला एकदा, एका सिग्नलला आमची रिक्षा उभी असतांना, रस्त्याच्या कडेला असणा-या एका बाईकडे इशारा करत म्ह्टलं की तू तिला मदत करू शकतेस, तिलापण वाटलं म्हणून ती जाणार तितक्यात त्या बाईजवळ ४-५ मुलं आणि एक पुरूष येऊन बसलेले आम्हांला दिसले, तशी मैत्रीण परत फिरली आणि म्हणाली, ’नको, ते लोक छत्री न-वापरताच विकून पैसे मिळवतील’!

’ट्रफिक सिग्नल’ ह्या सिनेमामधे सुध्दा हा मुद्दा मांडलेला आहे की, लोक गरजू असण्याचा अभिनय किती हुबेहुब करून आपल्याकडनं मदत मिळवतात..

माझी आई नेहमी म्हणते की,’सत्पात्री दान द्यावं’ म्हणजे खरंच जो गरजू मनुष्य असतो त्याला मदत करावी..पण आपण हे ठरवणार कसं की कोणती व्यक्ती गरजू आहे आणि कोणती व्यक्ती फक्त पैसे मिळविण्यासाठी तसं असण्याचं ढोंग करत आहे..सिग्नल वर भिक मागणारे, अधू-पंगू असण्याचा अभिनय करणारे किती आणि खरे गरजू तसे लोक किती ह्यामधे फरक करणं अवघड जातं.

पण मग अशा लोकांना मदत करायची कशी? कदाचित एक करता येईल की, पैशापेक्षा वस्तूंच्या स्वरूपात आपण ही मदत सेवाभावी संस्था किंवा समाजकार्य करणा-या लोकांना करू शकतो.एखाद्या वीकएन्डला संस्थेला जाऊन भेट देउ शकतो पण, अशा स्वरूपाची मदत त्यांना पुरेशी नाही असंही मला वाटतं.म्हणजे, संस्थेच्या विस्तारासाठी,विकासासाठी त्यांना काही वस्तू खरेदी करणं आवश्यक असतं, मग अशावेळेस पैशाचीच मदत लागते पण, पैसा म्हटलं की पुन्हा 'भ्रष्टाचार' बोकाळण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

आता कोणी म्हणेल की, हल्ली तुम्ही संस्थांना भेटी देउन तिथे चालणा-या कामकाजाबद्दल सगळी माहिती घेऊ शकता पण, तुमच्या-आमच्या पैकी किती लोक, पगारातून दरमहा जाणा-या १०० रूपयांकरता, अशी माहिती घेण्याची तसदी घेता?

खुप गोंधळ झाला आहे माझ्या डोक्यात, गरजू लोकांना मदत करायची इच्छा तर आहे पण कोणत्याही संस्थेतर्फे जाण्याला मन धजावत नाही, अशा वेळेस काय करायचं?



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Tuesday, May 8, 2012

काकस्पर्श




महेश मांजरेकर निर्मित 'काकस्पर्श' हा चित्रपट सिनेसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे.

त्या चित्रपटाच्या पोस्टरवर एकुणच ब्राम्हण कुटुंब दाखवलेलं आहे त्यामुळे मला सुरूवातीला थोडी धाकधूक होती की पुन्हा एकदा कोणीतरी जातीयवाद घेउन उगाच चित्रपट काढला आहे की काय पण माझी ही भिती खोटी ठरली. हा चित्रपट एका खुप वेगळ्या विषयाचा आहे. आधीच्या काळी ज्या स्त्रीया लहान/तरूण वयात विधवा होत त्यांना सहन करावं लागणारं दु:ख, मानसिक आणि शारीरीक त्रास ह्यावर भाष्य करणारी अतिशय संवेदनशील कथा ह्या चित्रपटाचा गाभा आहे.

पार्वती नावाची १३-१४ वर्षांची कोवळी पोर लग्न होऊन सासरी येते, तिचा नवरा महादेव मुंबईला शिकत असतो तिथे त्याला एक कसलासा आजार होतो आणि ते दोघे भेटण्याच्या क्षणीच त्याचा मृत्यु होतो. पार्वतीचं लग्नानंतर नाव बदलून उमा केलेलं असतं, ती इतकी लहान असते की, नवरा काय असतो त्याचा मृत्यु झाल्यामुळे तिने काय गमावलं आहे हे तिला कळत पण नाही.
तिचा मोठा दीर हरी, हा घरातला कर्ता पुरूष असल्यामुळे महादेवच्या मृत्युनंतरचे सगळे विधी पार पाडणे ही त्याची जबाबदारी असते.सगळे विधी झाल्यावर कावळ्याला पिंड ठेवलं जातं, बराच वेळ कोणताच कावळा शिवत नाही त्यामुळे हा मोठा दीर महादेवच्या आत्म्याला काहीतरी वचन देतो आणि मग लगेच कावळा शिवतो.
पुढे त्या काळातल्या रूढींनुसार उमाचे केशवपन करायची वेळ येते तेंव्हा हरी पुढे होऊन कडवा विरोध दर्शवतो ह्या कृत्यामुळे तो बाकी सगळ्या समाजाचा रोष ओढवून घेतो आणि उमाच्या केसालासुध्दा धक्का लागून देत नाही.कित्येक प्रसंग असे येतात जिथे समाज घरामधे ठेवलेल्या विधवा स्त्रीबद्दल नाही नाही ते बोलतो, घरातली मोठी आत्या सुध्दा तिचा द्वेष करते पण हरी अगदी खंबीरपणे तिचं रक्षण करतो, पण हे सगळं हरी का करतो...?

चित्रपटाची कथा अत्यंत चांगली आहे, त्या काळातलं ब्राम्हण समाजाचं चित्र खुप व्यवस्थित उभं केलं आहे. सचिन खेडेकर, प्रिया बापट आणि शाळा चित्रपटाची शिरोडकर ह्यांचा अभिनय अप्रतिम आहे.विषय जरी जड असला तरी मांडणी व्यवस्थित केल्यामुळे कुठेही बोअर होत नाही उलट एका क्षणी प्रिया बापटची अवस्था बघून सुन्न व्हायला होतं..

एक चांगला मराठी चित्रपट बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या चित्रपटाची निवड तुम्ही नक्कीच करू शकता..अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे महेश मांजरेकरच्या प्रोडक्शन हाऊसमधून काहीही मारधाड नसलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी खरंच एक छान गिफ्ट आहे.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Sunday, May 6, 2012

कंटाळा आला आहे मला ह्या +ve अ‍ॅटिटयूडचा



सारखं सारखं किती आशावादी राहायचं माणसाने. प्रत्येक गोष्टीमधून काहितरी कोरून-काटून चांगलं शोधून काढायचं. म्हणजे साधं सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी काढायला जा तर लाईट जातात आणि गॅसवर पाणी तापवून घेण्याइतपत वेळ नसतो मग ’निदान पाणी तर मिळालं ना’ ह्या विचारासोबत समाधानाचा साबण लावून आंघोळ उरकायची!

ऑफीस मधे एखाद्या नविन प्रोजेक्टला रूजू झाल्यावर तुम्हांला एक कम्प्युटर दिला जातो ज्यामधे स्पीड नावाची गोष्टच नसते म्हणून तुम्ही मॅनेजरकडे ’रॅम’ वाढवून देण्याची विनंती करता जी हमखास ’प्रोजेक्ट कॉस्ट’ ह्या नावाखाली रद्द केली जाते, तेंव्हा तुम्ही पुन्हा एकदा स्वत:ला समजावता, ’निदान काम करायला काहीतरी दिलंय ना’.

एखादी गोष्ट तुम्हांला हवी असेल त्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न सुध्दा करत आहात पण ती गोष्ट तुम्हांला सारखी हुलकावण्या देत असेल तरी तुम्हांला स्वत:ला सांगावं लागतं,’अजुन वेळ आली नाही त्या गोष्टीची, होईल बरोबर वेळेत!’ अरे पण अशी कधी येणार ती वेळ, १ दिवसात, ६ महीन्यात, १ वर्षानंतर की कदाचित कधीच नाही??

कंटाळा आलाय मला ह्या आशावादी विचारांचा, सारखा स्वत:च्या मनाला समजावण्याचा, जर मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर अजीर्ण होतात हे गोड-गोड आशावादी विचार. वाटतं ह्या निराशावादी विचारांसोबत निदान मनासारखे दोन अश्रूतरी ढाळता येतात उगाच आनंदी असण्याचा मुखवटा घालून स्वत:चीच फसवणूक करायची गरज नाही पडत. नको वाटतात कोणाचेही ’बी पॉझिटीव्ह’ म्हणणारे पाठीवरचे हात..राहावसं वाटतं ह्या अंधारात निदान थोडावेळ तरी, मनाला आलेली मरगळ बरी वाटते, कुठलंच काम करायची इच्छा नको वाटते उलट विचारचं नको वाटतात कारण कुठेतरी पुन्हा एकदा ती पॉझिटीव्ह एनर्जी आत शिरते त्या विचारांसोबत आणि सगळा आळस झटकायला लावते.

जर कोणी देव, नियती, निसर्ग ज्याने कोणी ही सृष्टी बनवलीये तो असेल तर त्याच्यासमोर नाराजी व्यक्त करायला फार मदत होते ह्या निराशेची, आपण लहानपणी रूसून बसतो ना जर आईने आपलं काही ऐकलं नाही तर, तसं रूसून बसावसं वाटतं जेंव्हा ही आपल्यातली आणि आपल्या आजुबाजूची पॉझिटीव्ह एनर्जी काही मदत करत नाही..

त्रास ह्या गोष्टीचा होतो की कुठुन कळतंच नाही आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते बरोबर दिशेतले आहेत की नाही, पुन्हा जितक्या प्रमाणात आपण प्रयत्न करतोय जर ते कमी पडत आहेत तर अजुन काय करायला हवं, कुठनंच उत्तर मिळत नाही मग कंटाळा येतो, जाऊ देत नकोच ती गोष्ट मला, हा विचार जोर धरायला लागतो.

जवळपास असणा-या प्रत्येकाला ती गोष्ट मिळाली आहे आणि आपण प्रयन्त करूनही जर ते आपल्या बाबतीत अजुन घडतच नाहीये तर मग दाद मागायची कोणाकडॆ? ह्या जगातली पॉझिटीव्ह एनर्जीतर अशावेळी मूग गिळून बसलेली असते! थकवा येतो बुध्दीला विचार करून करून पण उत्तर सापडतच नाही. आतल्या आत घुसमट होते, काय करावं ते कळत नाही, ऊर फुटेस्तोवर रडावंस वाटतं पण ते करूनही उत्तर सापडणार नसतंच..मग अशावेळी करणार तरी काय? श्याsss जाऊ देत आता डोक्यातल्या ह्या शब्दांचासुद्धा कंटाळा आलाय..............


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Thursday, May 3, 2012

अमेरिका - अनिल अवचट



पुस्तक हातात घेतल्यावर पहिलं वाक्य दिसलं ते म्हणजे, ’नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणा-या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना..काळजीपूर्वक.

एक क्षण विचार आला हे पुस्तक नेमकं कशाबद्दल सांगणारं आहे? अमेरिकेचं प्रवासवर्णन की वर दिलेल्या वाक्याप्रमाणे तिथे जायची इच्छा असणा-यांसाठी मार्गदर्शक पुस्तिका?? कळेलच म्हणून पुढे वाचायला सुरूवात केली आणि ’सुरूवात’ ह्या प्रस्तावनेत लेखकाने स्पष्ट केलं हे पुस्तक काय आहे आणि पुढे काय-काय वाचायला मिळणार आहे...हे ना प्रवासवर्णन आहे ना मार्गदर्शकपुस्तिका....हे आहे लेखकाने अमेरिकेत बघितलेल्या,अनुभवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचं चिंतन.

लेखकाला ’आयोवा इंटरनॅशनल रायटर्स प्रोग्रॅम’ अंतर्गत साडेतीन महिन्यांकरता अमेरिकेत जायची संधी मिळाली त्यादरम्यान आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्ती ह्या सगळ्यांचं वर्णन वीस प्रकरणांमधे मांडलेलं आहे..अर्थात हा आकडा मोठा वाटत असला तरी एकदा पुस्तक हातात घेतल्यावर ते वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववत नाही, ह्याचं एकच कारण म्हणजे अनिल अवचट यांची लेखन शैली. त्यांचं निरीक्षण जबरदस्त आहे हे वाचायला लागल्यावर लक्षात येतंच पण, आपल्यापैकी ब-याच जणांना माहित असलेल्या ’अमेरिके’बद्दल च्या गोष्टी देखील त्यांच्या शब्दांतून वाचतांना अजिबात रटाळ वाटत नाहीत. आपल्या घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती अशी फिरून आल्यावर आपल्याशी गप्पा मारतांना जसे एक-एक प्रसंग सांगेल अगदी त्या पध्दतीने अवचट ह्यांनी आपल्यासमोर त्यांचं हे अनुभवाचं बाड उघडलं आहे.

सुरूवातीला त्यांच्यावर दडपण आलं होतं कारण राहणीमान साधं, इंग्रजीचा थोडा प्रॉब्लेम ह्यामुळे अमेरिकेसारख्या ठिकाणी सुरूवातीचे काही दिवस त्यांना जरा बुजल्यासारखं झालं पण जसजशी इतर कवी-लेखकांशी ओळख होत गेली, वातावरणाशी जुळवून घेता आलं तसे ते बिनधास्त झाले.

भारतातून गेल्यावर प्रत्येकाला तिथले रस्ते, स्वच्छता, हिरवीगार झाडं ह्या गोष्टी अगदी वेगळ्या विश्वात नेउन ठेवतात त्याप्रमाणे लेखकाचेही डोळे सुरूवातीला दिपून गेले होते. मोठे रस्ते, सगळीकडे भरधाव वेगाने जाणा-या गाडया, मोठमोठे मॉल्स, विविध वंशाची दिसणारी यंत्रवत माणसं ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे की आपणच लेखकासोबत सगळीकडॆ फिरतोय असं वाटायला लागतं.

पुस्तकात सुरूवातीला, ज्या गोष्टी अगदी साध्या पण, अमेरिकन्सच्या लाईफमधे अविभाज्य घटक बनलेल्या आहेत अशांचं विश्लेषण केलेले आहे जसं शॉपिंग, टी.व्ही., व्यसनं आणि कौटुंबिक प्रश्न. तसंच, भटकंतीप्रिय अमेरिकन्सचं आणि ह्या वेडाचा फायदा घेउन जिथे शक्य असेल तिथे टूरिस्ट स्पॉट बनवलेल्या विविध स्थळांचं अगदी हुबेहुब वर्णन केलेलं आहे.

पुढे, अमेरिकेसारख्या संपन्न देशात रोज तयार होणा-या शेकडो टन कच-याबद्दल आणि सुंदरता, स्वच्छता राखण्याच्या अट्टहासामुळे जवळपासच्या छोटया देशांची जी निसर्गहानी केली जाते ह्याबद्दलचं रहस्य उलगडलं आहे, वाचून मन अगदी खिन्न होतं आणि फक्त वरतून सुंदर दिसणा-या अमेरिकेचा एक वेगळाच चेहरा आपल्यासमोर उघडा पडतो.

यानंतर लेखकाने आयोवा कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विविध उपक्रमांबद्दल तसेच जगभरातल्या कवी-लेखकांबद्दल झालेल्या ओळखीतल्या गमती-जमती, किस्से सांगितले आहेत. त्यांच्या ग्रुपमधे आफ्रिकन, मंगोलियन, युरोपियन्स, पाकिस्तानी यांसारखे ब-याच देशातुन आलेले कवी-लेखक होते. त्यांसोबत असतांना लेखकाच्या असं लक्षात आलं की, भारत सोडला तर इतर देशांमधे पुस्तक काय साधा लेख प्रसिध्द करणं किती अवघड आहे. खुद्द अमेरिमधे तर लोक आपलं एखादं पुस्तक प्रसिध्द करण्याकरता वर्षानुवर्षे कशी वाट बघतात तसंच जर एखाद्याचं प्रसिध्द झालं तर तो स्वत:च्या जन्माचं सार्थक झालं असं समजतो, काय ना मोठया देशातलं सगळंच विचित्र!!

ह्या सगळ्या गोष्टी वाचतांनाच लेखकाने, त्यांना अमेरिकेत भेटलेल्या विविध मराठी कुटुंबाबद्दल तसंच झालेल्या नवनविन ओळखीवजा नात्यांबद्दल सांगितलं आहे, कोणी अमेरिकेत कायमचे स्थायिक झालेले तर कोणी फक्त शिक्षणासाठी काही वर्षांकरता तिथे स्थिरावलेले. प्रत्येकाच्या मनामधे भारतातून कोणीतरी आलंय हे बघून निर्माण होणारी एकच भावना, माझ्या देशातलं, मातीतलं आणि भाषेचं असणारं माणूस आज भेटलं. पण ह्याबरोबरच मराठी कुटुंबांमधे निर्माण झालेल्या न्यू-जनरेशन प्रॉब्लेम्सबद्दल पण सांगितलं आहे. जन्म इथला पण तिकडे स्थलांतरीत झालेल्या लोकांना भारताचा ओढा आणि त्यांच्या मुलांना मात्र भारताचा तिटकारा ह्या तिढ्यात वावरणारी मंडळी बघून लेखकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि रागही आला पण, कुठेतरी आपणही असेच वागलो ह्या जाणिवेने त्यांना ओशाळल्यासारखं झालं आहे.

अमेरिकेचं बोलावणं आलं तेंव्हा लेखकाने काही गोष्टी तिकडे गेल्यावर करायच्या ठरवल्या होत्या जसं की, ड्रग डिअॅकडिक्शन सेंटर्सला भेट देउन तिथे असणा-या गोष्टींचा इथे भारतातल्या त्यांच्या मुक्तांगण संस्थेसाठी काही उपयोग करता आला तर तसंच स्थलांतरित मेक्सिकन मजुरांची माहिती घ्यायची.सुरूवातीच्या काही दिवसात तिथलं सगळं समजल्यावर त्यांनी ह्या गोष्टींबद्दल शक्य तितकी माहिती गोळा करायला सुरूवात केली.त्यांच्या ग्रुपला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मदत करायला एक-एक माणूस नेमलेला असायचा जो त्या-त्या कवी-लेखकाची व्यवस्थित माहिती करून त्यांना हव्या असलेल्या विषयाबद्दल सर्व प्रकारे मदत करू शकणारा किंवा त्यात काम केलेला असायचा.त्यामुळे ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळवायला लेखकाला अतिशय सोपं गेलं.मेक्सिकन शेतमजुरांच्या तसंच सर्व प्रकारच्या स्थलांतरित कामगारांचे प्रश्न अमेरिकेसमोर धिटपणाने उभे करणा-या सीझर शॅवेझ ह्या गांधीवादी आचार-विचार अमलात आणणा-या नेत्याला भेटायची त्यांची इच्छा मात्र काही कारणास्तव पूर्ण होऊ शकली नाही.ह्या कामगारांविषयी माहिती घेतांना लेखक मेक्सिकोला भेट द्यायला मुद्दाम गेले पण तिथे सर्व प्रकारे अतिशय दयनीय अवस्था आहे.नुसतं वाचलं किंवा ऐकलं तरी कोणाला खरं वाटणार नाही की अमेरिकेसारख्या संपन्न देशाच्या एका सीमेवर असाही एखादा प्रदेश असू शकतो जिथे स्वच्छता तर खूप दूरची गोष्ट आहे पण साधं पिण्यालायक पाणी मिळणं पण अवघड आहे.खरं तर ह्या लोकांवर ही वेळ अमेरिकेमुळेच आली आहे हे वाचल्यावर आपल्याला धक्का बसल्याशिवाय राह्त नाही.जीवनासाठी आवश्यक गोष्टीसुध्दा उपलब्ध नसल्याने तिथले लोक अमेरिकेकडॆ काहितरी काम मिळेल ह्या आशेने धाव घेतात पण, अशा असहाय लोकांना सिमेवर ठग कसे लुटतात आणि माणसांची तस्करी कशी चालते हे वाचल्यावर अंगावर काटा उभा राहतो...

असा हा, अमेरिकेत आल्यावर कुतूहलातून सुरू झालेला प्रवास तिथली सामाजिक वेगवेगळी वैशिष्टयं दाखवत शेवटी एक भयाण सत्य सांगून संपतो.