शुक्रवारी संध्याकाळी कामातून थोडं मोकळं झाल्यावर विचार आला, चला उद्या वीकएन्ड :) लकीली काहीच कामं नाहीत तेंव्हा नुसती झोप काढायची :)
शनिवारी अगदी उन्हं वर आल्यावर जाग आली, आळोखे-पिळोखे देत उठले..अगदी गोगलगायीच्या स्पीडने सगळं आवरलं, जेवण केलं आणि फक्त दोन तासाची वामकुक्षी घेतली..उठल्यावर विचार आला..अरेच्चा, आपली तर झोप पूर्ण झाली आता काय करावं बरं? वाटलं, चला जरा पाय मोकळे करून यावेत. मग अगदी भरभर आवरलं आणि जवळच्याच एका मॉलकडे मोर्चा वळवला.
मॉलमधे प्रवेश करताच गार-सुगंधित झुळकेनं माझं स्वागत केलं आणि मन अगदी प्रसन्न झालं :)
आता माझ्या आवडत्या कामाला मी सुरूवात केली.तसं तर आज विशेष काही घ्यायचं नव्हतं,फक्त विंडो शॉपिंग करायची होती पण तरीही काही आवडलच तर घ्यायला हरकत नाही असा विचार करत मी माझ्या आवडत्या दालनाकडे वळले. तिथे स्टँडवर वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, ब्रँडच्या बॅग्स, वॉलेट्स, क्लचेस ठेवलेले होते.एक-एक वस्तू न्याहाळत मी सगळं बघितलं पण विशेष काही आवडलं नाही तशी मी पुढे चप्पल-बुट सजवलेल्या भिंतीकडे सरकले. तिथे सुध्दा वेगगेगळ्या ब्रँडचे जोडे,सपाता,चपला ठेवलेल्या होत्या.बघत-बघत मी एका ठिकाणी थांबले.
मला ती चप्पल अगदी वेगळी वाटली बाकी सगळ्यांमधे म्हणून मी ती घालून बघितली तसा लगेच तिथे उभा असलेला मॉलचा एक माणुस,'मॅडम, मे आय हेल्प यू?' म्हणत पुढे आला.त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी ती चप्पलच न्याहाळत होते,माझ्या पायाच्या मापाची ती होती आणि खुपच आकर्षक होती,मला ती आवडली :D
मग मी त्या माणसाला त्या चपलेचा जोड आणायला सांगितला. ते देतांना त्याने जोडाचं कौतुक करायला सुरूवात केली,'मॅम,धिस ब्रँड इझ व्हेरी गुड अॅण्ड कम्फर्टेबल, इट्स लुकींग व्हेरी गुड ऑन यू,शल आय पॅक इट?'.मी पुन्हा दुर्ल़क्ष करत आधी ती चप्पल घालून तिथे ठेवलेल्या आरशात स्वतःचे पाय न्याहाळले,मग पुन्हा एकवार नुसतंच पायांकडे बघितलं खात्री करून घेतली की ती सुट होतेय का नाही, मग थोडं चालून बघितलं आणि झालं,(वेडया)मनाने शिक्कामोर्तब केलं की, ही चप्पल चांगली आहे चला घेउया.पण लगेच (शहाणं)मन पुढे आलं आणि त्याने विचारलं, आधी किंमत तर बघ. तशी मी किंमत बघितली तर xxx ओन्ली दिसलं.
वेडं मन - :-$
शहाणं मन - बापरे इतकी महाग? नाही, नाही. नाही घ्यायची, चला पुढे जाऊ.
वेडं मन - हे काय रे शहाण्या!!
शहाणं मन - चप्पल आहे ना सध्या वापरायला मग पुन्हा कशाला हवीये?
वेडं मन - एक मिनीट थांब..
असं म्हणून वेडं मन विचारमग्न झालं आणि लगेच मन:चक्षु समोरून एक चित्रफित सरकू लागली.ज्यामधे माझं कपाट समोर आलं आणि एक एक ड्रेस फिरू लागले,जवळपास प्रत्येक ड्रेसला मॅच होणारी अशी एक चप्पल होती माझ्याकडे पण, एक स्कर्ट येस्स..एकच असा स्कर्ट होता की ज्याला ती चप्पल सुट होत नव्हती.मग काय, वेडं मन पुढे सरसावलं आणि
वेडं मन - ए, त्या स्कर्ट साठी हवीये मला ही चप्पल.एकदम सुट होते त्याला :)
शहाणं मन - तो स्कर्ट ह्या चपलेच्या अर्ध्या किमतीचा सुध्दा नाहीये.आणि बाहेर रस्त्यावर अशीच चप्पल इथल्यापेक्षा १/४ किमतीत मिळेल! नाही, इतकी महाग चप्पल नकोच.चला जाऊ आपण..
वेडं मन - अरे पण, रस्त्यावरच्या सस्त्या मालाला काही क्वालीटी नसते.नेमकी वापरायला काढली आणि तुटली तर?
शहाणं मन - .....दुर्लक्ष
पहाता पहाता शहाणं मन आम्हांला दुसरीकडे घेऊन जाऊ लागलं आणि वेडं मन तरीही वळून-वळून बघतच राहिलं..
पुढे कपडयांच्या सेक्शनमधे तर वेडया मनाला अगदी चेव आला, जे टॉप छान दिसेल त्या प्रत्येकावर ती चप्पल कशी सुट होते हे तो अगदी हिरीरीने समजावून देउ लागला..असं करत करत सगळा मॉल बघून झाला, पाय अगदी थकुन गेले म्हणून मी खाण्याच्या ठिकाणी एका खुर्चीवर स्वत:ला झोकून दिलं,पाणी प्यायले आणि खुप उशीर झाला आहे हे बघुन लगेच घरी जायला निघाले..दाराकडे जातांना पुन्हा एकदा त्या चपलेने खुणावलं आणि त्या क्षणी मला ती चप्पल घेण्याचा मोह अनावर झाला आणि तिला घेऊनच मी बाहेर पडले :D
घरी आल्यावर लगेच त्या स्कर्ट आणि चपलेची जोडी खरंच जमतीये ना हे तपासून बघितलं,छान दिसत होतं सगळं, स्वतःशीच हसले आणि विचार आला, किती वाद घातला आपण तेंव्हा नाही घ्यायचं म्हणून पण, तो एकच मोहाचा क्षण घातकी ठरला आणि पैसे उधळले गेले..
खरं तर असे मोहाचे फक्त काही क्षणच दर महिन्यात येतात आणि कपडयांचं,चप्पल-बुटांचं,ज्वेलरीचं कदाचित कधी होम फर्निशिंग ने कपाट/घर भरायला भाग पाडतात. अशी काही खरेदी केली की आपण स्वतःला दहादा बजावतो की पुढच्या महिन्यात नो शॉपिंग अॅट ऑल!! पण, अचानक एका दिवशी हेच क्षण आडवे येतात आणि सणक आल्यासारखे आपण लिंकींग रोड, फॅशन स्ट्रीट नाहीतर हाँगकाँग लेन किंवा एफ.सी.रोडवर जाऊन धडकतो, मनसोक्त खरेदी करतो आणि घरी आल्यावर आईचे बोलणे झेलतो,'अगं, घरातली दोन कपाटं ओसंडून वाहतायेत तुझ्या कपडयांनी आणि आता आणखी शॉपिंग?? कुठे ठेवायचा हा पसारा??' पण ह्यावर आपलं नेहमीचं उत्तर,'आई, ही फॅशन आहे गं सध्या,मी लावते बरोबर कपाट' :-)
काहीही म्हणा हे मोहाचे क्षण वाईटच!!
पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की, हेच क्षण त्या वेळी अत्युच्च आनंद, प्रसन्नता आणि असं बरंच काही छान छान देऊन जातात :-) त्यामुळे वाईट जरी असले ना तरी हे मोहाचे क्षण निदान शॉपिंगबाबत तरी हवेहवेसे वाटतात :-)
या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
खूप छान.....!!!
ReplyDeleteधन्यवाद हर्षद :-)
ReplyDeleteलेख मस्त लिहिलाय
ReplyDeleteधन्यवाद अभिजित :-)
ReplyDelete