Friday, August 10, 2012

आधारवड

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी


श्री.गंगाधर गणपतराव देशमुख
उर्फ
बाबासाहेब देशमुख



 कोणी साह्य करो वा न करो, शिक्षण होय जे कर्म,
शिकलेच पाहिजे ते; श्रेयस्कर हाच आपणा धर्म.

शिकल्याशिवाय आपला विकास होणार नाही हे मर्म ७० वर्षांपूर्वी खेड्यामधे वाढलेल्या एका कोवळ्या वयातल्या पोराला कळालं अन त्याने स्वत:चं, स्वत:च्या कुटुंबाचं अन पुढे गावाचं कल्याण ह्याच शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणलं!

गोरा वर्ण,तरतरीत नाक,सहा फूट देहयष्टी,करारी नजर पण चेह-यावर शांत भाव हे वर्णन आहे माझे आजोबा श्री.गंगाधर उर्फ बाबासाहेब गणपतराव देशमुख यांचं. आयुष्यभर गांधी टोपी घालणारे एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामधे मोलाची कामगिरी बजावली.आमच्या कुटुंबाचा सगळ्यात ज्येष्ठ,सुज्ञ,प्रेमळ,कर्तव्यनिष्ठ असा हा आधारवड जुलै ३०,२०१२ रोजी आम्हांला पोरका करून गेला..

८४ वर्षांच्या आयुष्यामधे त्यांनी एक आज्ञाधारक मुलगा,समंजस नवरा,कर्तव्यनिष्ठ पिता,प्रेमळ आजोबा अशा घरामधल्या महत्त्वाच्या भूमिका निभावल्या त्याचबरोबर अनुशासन पाळणारा गावकुसाचा पोलिस-पाटील, डोळ्यात तेल घालून शेती बघणारा धनी अशा घराबाहेरच्या भूमिकाही अगदी चोख बजावल्या.  

त्यांचा जन्म २७ एप्रिल,१९२७ रोजी मु.पो.माहोरा, ता.मंठा, जिल्हा जालना येथे झाला.पण वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचं वडीलांचं छत्र हरवलं त्यामुळे सख्खी चार भावंडं,एक चुलत भाऊ अन आई इतक्या कुटुंबाचा भार त्यांच्या कोवळ्या खांद्यांवर येऊन पडला.खेळण्या-बागडण्याच्या वयात असतांना घरावर कोसळलेल्या ह्या संकटाला त्यांनी आईच्या मदतीने खंबीरपणे तोंड द्यायला सुरूवात केली.स्वतःच्या शिक्षणासोबतच त्यांनी शेतीची तसंच बाहेरची कामं हळुहळू शिकायला सुरूवात केली.

वयाच्या सोळाव्या वर्षी आजोबांचं लग्न झालं अन आमची आजी श्रीमती.रमाबाई गंगाधर देशमुख बनून कुटुंबात प्रवेशिती झाली.आजी अवघी चौदा वर्षांची होती पण त्याही वयात परिस्थितीची गांभिर्यता लक्षात घेऊन तिने आजोबांचा आधार व्हायचं ठरवलं अन घराची धुरा सांभाळायला सुरूवात केली.दोघांनी अगदी व्यवस्थित संसार केला.कधी मुबलक पैसा आहे म्हणून उधळ-माधळ केली नाही की कधी सगळं संपलं आता म्हणून दुस-याकडून मागून सण साजरा केला नाही.कायम अंथरूण बघून पाय पसरले अन अडीनडीच्या वेळेसाठी पैश्याची काटकसरीने योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठेवली.    

दादा(आजोबा) जसे स्वतःच्या शिक्षणाबाबत जागरूक होते तसेच त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाबाबतही आग्रही होते.प्रत्येकाने शिकून स्वतःच्या नशिबाला घडवायला हवं ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती म्हणूनच त्यांनी कितीही जरी अडचणी आल्या तरी कोणालाही शिक्षणापासून परावृत्त केलं नाही.त्यांनी भावांना-मुलांना तर शिकवलंच पण बहिणी आणि मुलींना सुद्धा शिक्षणामधे कुठे मागे राहू दिलं नाही.त्या काळातही आमच्या घरातल्या स्त्रीया कमीत कमी ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेल्या होत्या.शिक्षणाचा हा वसा पुढे त्यांच्या मुलांनी अन नातवांनी गिरवला अन घरातला प्रत्येक मुलगा-मुलगी,नात-नातू आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले अन फक्त भारतातच नाही तर दुबई,कॅनडा,लंडन,न्यूयॉर्क सारख्या देशांमधेसुद्धा चमकले.ह्या गोष्टींमुळे गावात अन आजूबाजूच्या परिसरात लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं अन तेही शिकण्यास प्रवृत्त झाले. 

आजोबांचा स्वभाव शांत न संयमी होता.प्रतिकुल परिस्थिती जरी समोर आली तरी न-डगमगता त्यातून मार्ग काढून पुढे जाणं ह्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या ह्या स्वभावाला अन एकुणच मानसिक ताकदीला कुठेतरी देवावरचा गाढा विश्वास कारणीभूत असावा.त्यांचा प्रत्येक दिवस,अगदी शेवटच्या क्षणापर्यंतचा, देवाची पूजा-अर्चा केल्याशिवाय कधी सुरू झाला नाही.ते कायम देवाचं नामस्मरण करायचे फावल्या वेळात देवाची पुस्तकं वाचायचे.विविध धार्मिक स्थळांना भेटी द्यायचे,वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी केदारनाथाची यात्रा केली होती.त्यांना फिरायची खुप आवड होती, त्यांनी भारतभ्रमणासोबतच जगातील मोठमोठ्या देशांनाही भेटी दिल्या होत्या अगदी आत्ता गेल्या वर्षी ते दुबई मधल्या वर्ल्ड फेमस टॉवरला भेट देऊन आले होते. 
त्यांना ज्योतिषाशास्त्रातलं सुध्दा कळायचं.आम्हा सगळ्या नातवंडांचं प्रत्येक वर्षीचं भविष्य किंवा कधी कोणत्या कामासाठी चांगला काळ आहे किंवा कधी जर काही अडचणीचा काळ येणार असेल वगैरे हे सगळं ते सांगायचे.  

दादांना जरी ज्योतिषाशास्त्र कळत होतं,देवावर त्यांचा विश्वास होता तरी ते अंधश्रध्दाळू नव्हते,काळानुसार होणारे बदल ते सहजपणे स्विकारत अन स्वतःमधे बदल करवून घेत.अर्थात 'कालाये तस्मै नमः' हे त्यांचं जिवनसूत्रच होतं.घरातील सर्वात ज्येष्ठ न सदैव जागरूक असल्यामुळे त्यांनी काळानुरूप होणारे बदल सहजरित्या घरामधे सुध्दा मुरविले.

माहो-यासारख्या खेडेगावात राह्त असून सुध्दा पूर्वापार काळानुसार चालत आलेल्या स्पृश-अस्पृश भेदभाव अशा चालिरिती त्यांनी कधी मानल्या नाहीत न त्या पुसून टाकून गावकुसातल्या सर्व जाती-धर्मातील लोकांना घराचं दार सदैव उघडं केलं.

मला आठवतं,दादांच्या बोलण्यात कायम म्हणी,वाक्प्रचार गुंफलेले असायचे.कुठल्या प्रसंगाबद्दल जर ते बोलत असतील तर त्याला योग्य असणारी म्हण सांगूनच बोलायला सुरूवात व्हायची.आम्ही नातवंडं तर शाळेच्या आधीच आजोबांकडून अशा भरपूर म्हणी शिकलो होतो..त्यांच्या काही आवडत्या म्हणी अशा

अंथरूण पाहुन पाय पसरावे.

तंग खाना मगर मंग नही खाना (अडचण आहे म्हणून थोडी बचत करा पण लगेच दुस-यापुढे हात पसरू नका).

दूस-याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मूसळ दिसत नाही.

उचलली जीभ न लावली टाळूला.

एक नन्ना हजार में भारी (एक 'नाही' शब्द पुढच्या हजार गोष्टींना रोखू शकतो.)

खाऊन माजा पण टाकून माजू नका (हवं तर अन्न जास्त घेउन खा पण ताटातलं अन्न टाकून त्याचा अपमान करू नका).

ऐसी जगह पे बैठना कोई न बोले उठ,ऐसी बात करना कोई न बोले झूठ. 

आजोबांनी त्यांच्या आयुष्यात भारताच्या पारतंत्र्याचा लढा बघितलाच होता पण पुढे त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी कामही केलं.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगना आणि कर्नाटकाचा काही भाग निझामाच्या राजवटीखाली होता.त्याविरूध्द जी चळवळ सुरू झाली त्यामधे अनेकांनी विविध स्वरूपाचं कार्य केलं,ह्या सैनिकांमधे भूमिगत राहून कार्य करणा-यांची संख्यापण खूप होती त्यातलेच एक आमचे आजोबा होते.ह्या सैनिकांना अतिशय जोखमीची कामं अगदी गुप्तपणे करावी लागत ज्यामधे रात्रीतून घरामधे गुप्त मिटींग्स घेणे,इतर स्वातंत्र्यसैनिकांना अन्न-धान्य पुरवठा करणे,पत्रकं-निरोप एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवणे वगैरे.ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना,आहुत्यांना १९४८ मधे यश मिळालं अन निझामाची राजवट संपुष्टात आली.

पुढे आमचे दादा माहो-याचे पोलिस-पाटील म्हणून नेमले गेले.जवळपास वयाची ५० वर्षे त्यांनी ही भूमिका अगदी इमाने-इतबारे निभावली.गावामधे शांतता राखणे,भांडण-तंटा झाल्यास त्यात मध्यस्थी करून तो सोडविणे किंवा एखादं प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर तालुक्यातल्या पोलिस स्टेशनला कळविणे ह्या गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर होती. ह्याबाबतीत माझ्या आजीने एक प्रसंग असा सांगितला की, १९६९-७० साली जेंव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष लोटली होती पण तरीही खेडयांमधे लोक जात-पात अगदी काटेकोरपणे पाळत होते.त्यामुळे अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांना गावातल्या विहीरवर पाणी भरायची मुभा नव्हती, कोणीतरी त्या लोकांना रोज पाणी काढून देत असे.एकदा त्या लोकांनी ह्या पध्दतीविरूध्द चाल करून सरळ त्या विहीरीवर पाणी भरलं त्यामुळे गावातले बाकीचे लोक आजोबांकडे फिर्याद घेऊन आले.त्या अस्पृश्य लोकांनी विहीरीवर पाणी भरल्यामुळे त्यांना शिक्षा करावी अशी त्यांनी मागणी केली.यावर आजोबांनी फिर्याद करणा-या लोकांना कडक शब्दात ठणकावलं की, ती सुध्दा माणसंच आहेत अन कायद्यानुसार त्यांनाही समान हक्क आहे त्यामुळे ते आजपासून विहीरीवर पाणी भरू शकतील,ज्या कोणाला त्रास होत असेल त्याने स्वत:ची दूसरी व्यवस्था करून घ्यावी.अन तेंव्हापासून ती विहीर सर्वांसाठी खुली झाली.        

ह्या कामांबरोबरच आजोबांनी, गावक-यांच्या मदतीने माहो-यामधे विविध सुधारणा करविल्या,गावामधे प्राथमिक शाळा नव्हती त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणात अडसर येत होता,ह्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन शाळा उभारणीसाठी दिली तसंच शाळेमधे शिकविणा-या शिक्षकांची नेमणूक, मुलांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम ह्याकडेही बारकाईने लक्ष दिलं.दरवर्षी शाळेतून पहिल्या येणा-या मुला-मुलींना शिष्यवृत्तीही देऊ केली. 
माहोरा गांव खुप आतल्या भागात आहे तिथे पोहोचायला मुख्य रस्त्यापासून बरंच आत यावं लागतं.सगळीकडे जोडणारा रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामधे जाण्या-येण्याकरता खुप अडचणी येतात त्यासाठी दादांनी गावातर्फे आमदाराकडे अर्ज करून डांबरी पक्के रस्ते करवून घेतले.
तसंच गावाच्या मध्यवर्ती भागात एक १०० वर्ष जुनं विठ्ठल-रखुमाईचं मंदीर होतं,त्याची अतिशय पडझड झाली होती.त्या मंदीराचा स्वखर्चाने जिर्णोद्धार करविला अन पुन्हा एकदा गावक-यांसाठी प्रति-पंढरपूर उभं केलं अन गावामधे टाळ-मृदुंगाच्या नादात हरिनामाचा गजर सुरू झाला..

असे आमचे आजोबा जे संयमी होते, जे मिळतंय त्यात समाधान मानणारे होते.देवाने मला अजुन का नाही दिलं ह्या विचारापेक्षा प्रारब्धाने जे जे दिलं ते त्यांनी गोड मानून घेतलं. कधी कोणाशी भांडले नाही की कधी कोणाला वैरी ठरवून त्याच्याशी संबंध तोडले नाही.कधी जर कोणी त्यांच्याकडे काही मागितलं तर त्याला नाही न-म्हणता शक्य तितकी मदत केली.संसाराचा रहाटगाडगा हसतमुखाने,समाधानाने,इतक्या मोठ्या कुटुंबाला एकत्र ठेवत त्यांनी पार केला अन आज ते पुढच्या प्रवासाला निघून गेले..

अजुनही सकाळी ६ वाजता गजराच्याऐवजी त्यांच्या धीरगंभीर आवाजातील भूपाळ्यांचा आवाज कानी घूमतो..








या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



2 comments: