Thursday, July 24, 2014

व्हायरस

लहू एक तो रंग दो क्यूं है

केबीसी ने केलेली जाहिरात किती मोठा संदेश देऊन जाते.तुम्हांला ही जाहिरात बघितल्यावर आवडली तर तुम्ही लाईक करणार आणि शेयर करणार पण खरंच हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे का? काल दिल्लीमधे असलेल्या महाराष्ट्र सदनामधे घडलेल्या प्रकाराला लगेचच हिंदू-मुस्लिम जातीयवादाचं स्वरूप दिलं गेलं!

मरेपर्यंत जातच नाही ती 'जात' हे एकच सत्य आहे का? जात-पात, धर्म ह्या गोष्टी खरं तर खाजगी स्वरूपाच्या असायल्या हव्यात. फार तर घरातल्या देवघरापासून ते तुम्ही मानता त्या देवाच्या घरापर्यंत बास! त्यापुढे समाजामधे, कार्यालयांमधे, सरकारी कामकाजामधे कशाला हवी आहे तुम्हाला जात-पात??

निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक माणसाला बुध्दी,पंचेंद्रिय,शरीराची रचना हे सगळं सारखं दिलं आहे मग भेदभाव का करायचा आणि तोही एका तुच्छ गोष्टीला धरून?? स्पर्धाच करायची असेल तर बुध्दीच्या जोरावर करा ना प्रत्येक वेळेस जातीच्या आरक्षणाच्या आडून काय वार करायचे!!

नुकतंच महाराष्ट्रमधे नविन आरक्षण घोषित करण्यात आलं आहे आणि ते फक्त सरकारी खात्यामधे नकोय तर खाजगी क्षेत्रामधे सुध्दा लागू व्हावं असा आग्रह धरला जात आहे. काय बोलणार ह्या वृत्तीला, कधी मोठे होणार आहोत आपण?

आपल्या देश आज पोलिओमुक्त झाला आहे, येत्या काही काळामधे मेडिकल सायन्सच्या मदतीने आपण दुर्धर रोगांनासुध्दा असंच पळवून लावू पण 'जात' नावाचा हा व्हायरस कधी जाणार आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून?

Thursday, July 10, 2014

अज्ञानातलं सुख

 माणसाचा मेंदू किती विचित्र वागू शकतो कधीकधी ह्याचं खरंच मला आश्चर्य वाटतं!! नुकतंच मला कळालं की माझ्या राशीला पुढचे १३ महीने गुरूग्रह अनिष्ट आहे आणि ह्या काळामधे आर्थिक नुकसान,मानसिक स्वास्थ बिघडणं वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागेल.

 हे माहित झाल्यापासून माझ्या मेंदूला नविन चाळा लागला आहे. माझ्यासोबत घडणा-या प्रत्येक गोष्टीची कारणमिमांसा करण्याऐवजी माझा मेंदू बेधडकपणे एकच उत्तर देतो - 'गुरू अनिष्ट आहे ना म्हणूनच होत असणार हे सगळं'!!

 गर्रर्र!! मला तर वैताग आला आहे ह्या कारणाचा. खूप सुखी होते मी जोवर मला ही गोष्ट कळाली नव्हती. निदान समोर येणा-या प्रश्नासाठी नीट विचार करून काहीतरी मार्ग काढू शकत होते मी पण, ह्या 'गुरू'प्रकरणामुळे आता हात-पाय सुध्दा हलवत नाहीये :(

 खरं तर ना माझा 'भविष्य', राशीफल वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नाही! हातातल्या रेषांपेक्षा हाताने काम करण्यावर माझा जास्त विश्वास आहे आणि तोच माझा नेहमी प्रयत्न असतो. ह्यामुळेच की काय मी आजवर कधीही वर्तमानपत्रातलं म्हणा किंवा कोणत्याही मोठ्या ज्योतिष्याचं माझ्याबद्दलचं भविष्य वाचलेलं नाही. एवढं कशाला माझी रास कोणती आहे हेही मला दोन वर्षांपूर्वी कळालं!!

 भविष्य, ग्रहांची दशा, राहू-केतू यांचे दोष तर शनिची साडेसाती एक ना शंभर किती प्रकार आहेत हे सगळे माणसाला कोड्यात टाकणारे!! ह्यापेक्षा असं काही असतं हेच माहित नसेल तर माणूस स्वतःवर जास्त विसंबून नाही का राहणार?? स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी घ्यायला नाही का शिकणार?

 हं आता तुम्ही म्हणाल की, काही गोष्टी अचानक घडतात आपण त्यात प्रत्यक्ष सहभागी नसतांनाही मग तेंव्हा काय करायचं? अरे यार, आयुष्य हे अशा अचानक घडणा-या गोष्टींनी भरलेलं आहे तेंव्हा जर जगायचं असेल तर त्याला स्विकारावंच लागणार ना! हो पण तुम्हाला स्वतःला थोडं कणखर बनवावं लागेल काही अप्रिय निर्णय / घटना पचवायला आणि ते तितकसं अवघड नाही असं मला वाटतं.

 मी असे बरेच जण बघितले आहेत जे रोज सकाळी उठून एखादं वर्तमानपत्र फक्त 'भविष्य' वाचण्यासाठी विकत घेतात किंवा दिवाळी अंकांमधे पुढच्या पूर्ण वर्षाचं भविष्य येतं ते वाचण्यासाठी धडपडतात. आणि हल्ली तर सगळ्या टी.व्ही.चॅनेल्सवर सकाळी सकाळी एक पूर्ण कार्यक्रम असतो प्रत्येक राशीचं भविष्य सांगण्याचा. मला तर हे सगळं बघून हसूच येतं!

 असे वर्तमानपत्रातून आणि पुस्तकातून येणारे भविष्य खरंच कोणी जाणकार लिहीतो की अजून कोणी ते त्या गोष्टी छापणाराच जाणो. शांता शेळके यांनी एका पुस्तकामधे कुसुमाग्रजांबद्दलचा एक प्रसंग सांगितला आहे - 'कुसुमाग्रज प्रतिथयश साहित्यिक होण्यापूर्वी वर्तमानपत्रासाठी काम करायचे आणि तेंव्हा राशिभविष्यही लिहायचे',.ह्यावरून तुम्हांला समजल असेल मला नेमकं काय सांगायचं आहे ते.

 माझं असं स्पष्ट मत आहे की,जर स्वतःवर विश्वास नसेल तर अशा कुबड्यांची माणसाला गरज पडते. करत असलेलं काम जर मनासारखं झालं नाही तर अशावेळेस खापर फोडायला काहीतरी हवं म्हणून काही लोक हे भविष्य, नशिब वगैरे करत बसतात आणि स्वतःची कुठेतरी चूक झाली असू शकते हे तपासायचं साफ विसरून जातात.

 कधी कधी मला राशीचे खडे घालणा-या लोकांना विचारावसं वाटतं की, ह्या अशा अंगठ्या घालून खरंच तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटले काहो? तुम्हाला आता कशातच अडचण येत नाही का? सगळीकडे तुम्ही यशस्वीच होता का?
असं जर खरंच घडलं असतं ना तर मग प्रत्येक दुसरा माणूस हा टाटा-बिर्ला, अंबानी झाला असता आपल्या देशामधे!

 तुम्ही कधी विचार केला आहे की नाही माहित नाही पण, मला अजून एक प्रश्न नेहमी सतावतो. भारत देश जर सोडला तर अमेरिका, चीन, जपान, दुबई सारख्या देशांमधे जन्मलेले आणि भारतीय वंशाचे नसलेले लोक असे राहू-केतू, शनिची साडेसाती करत असतील का? का पृथ्वीपासून लाखो किमीवर असणा-या ग्रहांचा परिणाम फक्त आणि फक्त भारतवासियांवर होतो?? मजाच वाटते मला ह्या सगळ्याची.

 मी तर ब-याच वेळा हेही बघितलं आहे की वयाने, अनुभवाने मोठी माणसं सुध्दा मूहूर्त बघितल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. एखादं शुभकार्य करायचं आहे म्हणून घराबाहेर जाण्याचा मूहूर्त तुम्ही बघितला तरी एकवेळ चालेल. पण, ऑफिसमधे नविन प्रोजेक्ट चालू करण्यासाठी कोणी मूहूर्त बघू शकतं?? साधा सर्व्हर जो मानवनिर्मित आहे त्याचा आय.पी.अ‍ॅड्रेस सुध्दा संख्याशास्त्रानुसार ठरविला जातो?? कहर आहे हा कहर! ही अतिशयोक्ती नाही हं माझ्या ऑफिसमधे घडलेली घटना आहे!!

 मला माहित आहे की ज्योतिष, ग्रहांची दिशा ह्याचं एक शास्त्र आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालं आहे. पण, हल्ली ह्या शास्त्राचा योग्य ज्ञान देण्यापेक्षा व्यवसाय करण्यासाठी जास्त उपयोग केला जात आहे. आणि अशा व्यावसायिकतेमुळे लोकांमधे अंधश्रध्दाळूपणा वाढत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्यापेक्षा 'भविष्य/ राशीफल' मथळ्याखाली दिलेल्या शब्दांवर जास्त विश्वास बसायला लागला आहे लोकांचा. पण ह्यामुळे शेवटी काय होणार तर खरोखरच अपयश हाती येणार आणि परत नशिबाला, राशीतल्या ग्रहांना बोल लावला जाणार....

 त्यापेक्षा आपलं अज्ञानातलं सुखच बरं आहे जे समोर येईल ते स्वत:च्या बुध्दीच्या कुवतीनुसार सोडवायचं आणि समाधानी व्हायचं..कधी जर उत्तर सापडलं नाही तरी हार नाही मानायची आणि नविन मार्ग शोधून काढायचा!