Thursday, July 24, 2014

व्हायरस

लहू एक तो रंग दो क्यूं है

केबीसी ने केलेली जाहिरात किती मोठा संदेश देऊन जाते.तुम्हांला ही जाहिरात बघितल्यावर आवडली तर तुम्ही लाईक करणार आणि शेयर करणार पण खरंच हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे का? काल दिल्लीमधे असलेल्या महाराष्ट्र सदनामधे घडलेल्या प्रकाराला लगेचच हिंदू-मुस्लिम जातीयवादाचं स्वरूप दिलं गेलं!

मरेपर्यंत जातच नाही ती 'जात' हे एकच सत्य आहे का? जात-पात, धर्म ह्या गोष्टी खरं तर खाजगी स्वरूपाच्या असायल्या हव्यात. फार तर घरातल्या देवघरापासून ते तुम्ही मानता त्या देवाच्या घरापर्यंत बास! त्यापुढे समाजामधे, कार्यालयांमधे, सरकारी कामकाजामधे कशाला हवी आहे तुम्हाला जात-पात??

निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक माणसाला बुध्दी,पंचेंद्रिय,शरीराची रचना हे सगळं सारखं दिलं आहे मग भेदभाव का करायचा आणि तोही एका तुच्छ गोष्टीला धरून?? स्पर्धाच करायची असेल तर बुध्दीच्या जोरावर करा ना प्रत्येक वेळेस जातीच्या आरक्षणाच्या आडून काय वार करायचे!!

नुकतंच महाराष्ट्रमधे नविन आरक्षण घोषित करण्यात आलं आहे आणि ते फक्त सरकारी खात्यामधे नकोय तर खाजगी क्षेत्रामधे सुध्दा लागू व्हावं असा आग्रह धरला जात आहे. काय बोलणार ह्या वृत्तीला, कधी मोठे होणार आहोत आपण?

आपल्या देश आज पोलिओमुक्त झाला आहे, येत्या काही काळामधे मेडिकल सायन्सच्या मदतीने आपण दुर्धर रोगांनासुध्दा असंच पळवून लावू पण 'जात' नावाचा हा व्हायरस कधी जाणार आपल्या सगळ्यांच्या डोक्यातून?

No comments:

Post a Comment