Monday, October 27, 2014

UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर

नुकतीच UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर ही योजना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.

ही योजना खासकरून तुमच्या-आमच्यासारख्या नोकरदारांसाठी आहे. ह्या योजनेमुळे आता आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त PF अकाउंट्स लक्षात ठेवायची गरज नाही.
एकदा का तुमचा UAN तयार झाला की भारतामधे असलेल्या कोणत्याही कंपनी मधे गेल्यावर तुम्ही फक्त हा क्रमांक सांगायचा म्हणजे लगेच PF चे पैसे ह्यामधे जमा होत राहतील.
आधी असलेल्या सर्व PF खात्यांचे विलीनीकरण तुम्ही ह्या खात्यामधे करू शकता, ह्याबाबत तुमच्या कंपनीतील संबंधित अधिका-याशी संपर्क साधावा.

तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

तुमच्या HR डिपार्टमेंटला ह्या क्रमांकाबाबतीत विचारणा करा.ज्या कंपनी मधे तुम्ही काम करत आहात त्या कंपनीला तुमच्यासाठी UAN तयार करून घ्यावा लागतो.

एकदा का हा क्रमांक तुम्हांला मिळाला की खाली दिलेल्या दुव्यावर जाऊन तुम्ही त्या क्रमांकाला अॅक्टीव्हेट करू शकता.

http://uanmembers.epfoservices.in/

पुढे "I Have Read and Understood the Instructions" ह्या सुचनेसोबत दिलेल्या खिडकीवर टिचकी मारा.
त्यानंतर येणा-या स्क्रीनवर खालील माहिती भरा.
UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर

मोबाईल क्रमांक

Enter Member ID details - हयामधे तुमचा जुना PF क्रमांक दिलेल्या रकान्यांच्या रचनेनुसार भरा.

तिथे तुम्हाला एक कोड लिहीलेला दिसेल तो त्याच ओळीत असलेल्या रकान्यामधे भरा
आणि Get Pin ह्या बटनावर टिचकी मारा.

दोन मिनीटामधे तुमच्या मोबाईलवर एक कोड येईल तो दिलेल्या रकान्यामधे भरा आणि I Agree ह्या सुचनेसोबत दिलेल्या खिडकीला टिचकी मारा.    
ह्यानंतर तुम्हाला तुमचा UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर अ‍ॅक्टीव्हेट झाल्याचा संदेश दिसेल.
आता तुम्ही UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर ह्या यूझर आयडी म्हणून वापरून व तुम्ही ठरविलेल्या संकेताक्षराचा उपयोग करून आत प्रवेश करू शकता.

UAN - यूनीव्हर्सल अकाउंट नंबर च्या साईटमधे तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध आहेत जसे की,

१)UAN card download

२)Member passbook download

३)Updation of KYC(Know Your Customer) information - ही माहिती तुमच्या कंपनीने भरून ठेवलेली असेल, तसे न-आढळल्यास संबंधित अधिका-याशी संपर्क साधावा.

४)Listing all his/her member id(s) to UAN

५)File and view transfer claim(s)

Monday, October 13, 2014

डॉ.प्रकाश बाबा आमटे - दी रियल हिरो



सर्वप्रथम दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद की त्यांनी डॉ.प्रकाश आमटे ह्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट बनविला.

हा खरं तर चित्रपट नाही तर डॉ.प्रकाश आमटे ह्यांच्या अविरत कार्याचा घेतलेला अगदी छोटासा आढावा आहे, पण हा आढावा सुध्दा तुमच्या-आमच्यासारख्या सुखवस्तू घरात राहणा-या सुशिक्षित लोकांना खूप काही सांगून जातो. आपल्या आयुष्यामधे येणा-या फुटकळ गोष्टींपुढे हार मानून हातावर हात ठेऊन बसण्याच्या वृत्तीला हसतो.

'प्रकाशवाटा' हे डॉ.प्रकाश आमटे लिखित पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हांला त्यातलेच संदर्भ ह्या सिनेमामधे बघायला मिळतील.पण जितकं कार्य डॉ.प्रकाश आमटे यांचं आहे त्यातला अगदी ठळक भाग ह्या सिनेमाच्या माध्यमातून आपल्यासमोर उलगडलेला आहे.

नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी ह्यांनी डॉ.प्रकाश आमटे व मंदाताई यांची भूमिका वठवलेली आहे.दोघेही दिग्गज कलाकार असल्यामुळे त्यांचा अभिनय वगैरे विषय इथे गौण आहेत.

ह्या चित्रपटाचं चित्रीकरण हेमलकसा ह्या डॉ.प्रकाश आमटे यांच्या कर्मस्थळीच झालेलं आहे.तसंच ह्यामधे जे काही प्राणी दाखविले आहेत तेदेखील त्यांच्या प्राणिसंग्रहातील आहेत.

चित्रपट बघतांना किंवा 'प्रकाशवाटा' हे पुस्तक वाचतांना आपल्याला जाणिव होते की डॉ.प्रकाश आमटे व मंदाताई यांची मानसिकता किती वेगळी आहे.हेमलकसा सारख्या जंगलामधे जाऊन अक्षरशः शून्यातून त्यांनी स्वतःसाठी नाही तर तिथल्या आदीवासींसाठी एक नविन जग उभं केलं.अगणित अडचणी आल्या पण धैर्याने, एकमेकांना धीर देत, सुरूवात केलेल्या कामावर आणि बाबा आमटेंना त्यांच्यावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते पुढे जात राहिले आणि अजूनही चालत आहेत.कोणत्याही देवापेक्षा श्रमावर त्यांची निष्ठा जास्त आहे आणि त्यामुळेच आज हेमलकसाचं रूपडं पालटलं आहे.

डॉ.प्रकाश आमटे यांच्या कार्याची दखल आजवर ब-याच देशांनी घेतली आहे तसंच भारतसरकारने देखील विविध सन्मान देऊन त्यांचा गौरव केलेला आहे.त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना आता खूप प्रसिध्दी मिळाली आहे पण तरीही, डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटूंबीय ह्या गोष्टीचा गर्व करत नाहीत. उलटपक्षी, अजूनही खूप काम बाकी आहे ही जाणिव ठेवून आपलं काम सातत्याने करत आहेत.

त्रिवार वंदन डॉ.प्रकाश आमटे आणि त्यांच्या कार्याला.

Thursday, October 9, 2014

२००

बँग-बँग चित्रपटाने पाचच दिवसात २०० कोटीची कमाई करत 'एलीट २०० करोर क्लब' मधे आपल्या चित्रपटाची नोंद केली असून आता त्याची घोडदौड किती कोटीपर्यंत जाते ते बघायचं आहे.

२००९ मधे प्रदर्शित झालेला '३ इडियट्स' हा चित्रपट ह्या क्लबचा आद्यजनक. ह्या चित्रपटापासूनच क्लबची सुरूवात झाली आणि त्यानंतर येणा-या प्रत्येक चित्रपटाने ह्या क्लबमधे स्थान मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ह्या क्लबमधे सलमान खानच्या ३ चित्रपटांनी नोंद करून आपला खुंटा अगदी बळकट केला आहे.त्याखालोखाल शाहरूख खान आणि आमीर खानचा नंबर लागतो.

नुसती मारधाड, झिरो फिगर असलेल्या नट्या, परदेशामधील नयनरम्य ठिकाणं, कर्णकर्कशमधुर संगीत, फोडनीला म्हणून थोडासा रोमान्स आणि मग जर लक्षात राहिलं तर, असलीच तर एखाद्या ओळीची 'कथा' असा सगळा बाज उभा केला की झालीच म्हणून ह्या क्लब मधे एंट्री!!

फक्त आणि फक्त पैसा कमावणे हा एकमेव हेतू आहे सध्याच्या बहुतांशी 'बॉलिवूड' चित्रपटांचा.

मुळात चित्रपटाला कथाच नसते त्यामुळे कलाकारांनी अभिनय करणे वगैरे तर दूरच्याच गोष्टी. बरं गाणी किंवा त्याचं संगीत तरी नवं-कोरं असावं तर तिथेही आपली निराशाच होते. हल्ली तर जुन्या गाण्यांना नविन संगीतामधे घोळवून आपल्यासमोर गाण्याचं जणू कॉकटेलच सादर केलं जातं. एक गाणं ओठांवर येतं न येतं की लगेचच दोन-तीन गाणी डोक्यात पिंगा घालू लागतात आणि काही दिवसातच मग त्यातलं कोणतंच गाणं ऐकावसंही वाटत नाही!

सध्या तर एक नविन गायक-गीतकार-संगीतकार-डान्सर-डीजे असा सर्वगुणसंपन्न व्यक्ती प्रत्येक चित्रपटासाठी 'खास' गाणं बनवून देत आहे. त्याच्या प्रत्येक गाण्याचा हेतू एकच, तरूण पिढी झिंगली पाहिजे!! त्याच्या गाण्यामधे जे शब्द वापरलेले असतात ते सगळे तरूण पिढीच्याच शब्दकोशातले असतात.आधुनिक ढोल-ताश्यांचं जोरदार संगीत, उसासे-धापा टाकत म्हटलेलं गाणं आणि अंगविक्षेप करत नाचणारी मंडळी ही त्याच्या गाण्याची वैशिष्ठ्ये!!

काय म्हणावं ह्याला - नुसता सावळा नाही तर काळाकभिन्न गोंधळ!!

खरं तर ३ इडियट्स हा चित्रपट खूप वेगळ्या धाटणीचा होता.भलेही त्याची कथा कोणा लेखकाच्या कथेशी साधर्म्य असणारी होती पण, त्यातला मूळ आशय फारच वेगळा आणि मनाला अगदी भिडणारा, जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याला कुठे ना कुठे स्पर्श करणारा होता. त्यामधे सगळं काही होतं, मैत्री, कॉलेजच्या दिवसामधली मजा, शैक्षणिक पातळीवरची स्पर्धा, रोमँटीक गाणी आणि कानपिचक्या देणारे प्रसंग. एका हिंदी चित्रपटासाठी लागणारा सगळा माल-मसाला होता पण त्याला चव मात्र काहीतरी वेगळीच होती.कधीही तो चित्रपट बघितला तरी दोन घटका करमणूकीव्यतिरिक्त काहीतरी वेगळं त्यातून सापडत जातं.

जर अशाच चित्रपटांची यादी 'एलीट २००' मधे लागत गेली असती तर एक प्रेक्षक म्हणून आपल्याला खरंच खूप कसदार काहितरी बघायला मिळालं असतं पण...असो.

हल्ली तर असं झालं आहे ना की, दर शुक्रवारी ढिगानी हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात पण त्यातला कुठलाच असा आवर्जून बघावा असा नसतो. मधेच कधीतरी एखादा येतो म्हणा पण सरासरी बघता हेच वाटतं की, चित्रपटामधे काम करणारे कलाकार इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही कसे काय तयार होतात 'अशा' चित्रपटामधे काम करायला?! अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर,'हमशकल्स' किंवा बोल बच्चन किंवा ब्ल्यू वगैरे वगैरे..यादी बरीच मोठी आहे.

सुदैवाने मराठी चित्रपटसृष्टीला अशी काही बाधा झाली नाही.अर्थात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज' आणि 'लई भारी' चित्रपटांनी नाही म्हटलं तरी ब-यापैकी गल्ला जमविला.पण, ही लाट अधिक काळ मराठीमधे राहील असं वाटत नाही.

नशिबाने मराठी मधे आता प्रयोगशील दिग्दर्शकांचा एक नविन चमू आलेला आहे जो अधिकाअधिक वेगळ्या विषयांवरील चित्रपट काढून विविध देशांमधे होणा-या फिल्म फेस्टीव्हल्समधे वाहवा,शाबासकी मिळवत आहे.

सध्या तर असं चित्र दिसत आहे चित्रपट गृहांमधे की मराठीचे ४-५ सिनेमे चालू आहेत आणि सगळे निदान एकदा बघू शकतो असे आहेत हिंदीच्या मानाने :)

एक प्रेक्षक म्हणून फक्त इतकीच अपेक्षा आहे की,दोन घटका करमणूक म्हणून चित्रपट असायला हवा पण जर प्रत्येकजण फक्त मारधाड किंवा थोड्याफार फरकाने तेच तेच दाखवत असेल तर मग कशाला मी माझा वेळ आणि पैसा खर्च करू, त्यापेक्षा इंटरनेटवर पायरेटेड व्हर्जन बघितलेलं बरं, मनात येईल तेंव्हा बंद तरी करता येईल आणि पैसेही जास्त खर्च नाही होणार ;)

असो, आता बघायचं आहे की हिंदीमधे कोण असा माईकालाल आहे जो ३०० च्या घरात चित्रपटाची कमाई करू शकेल!!

Monday, October 6, 2014

चिखलफेक

विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आणि परत एकदा महाराष्ट्रामधे गोंधळ चालू झाला. ब-याच वर्षांपासून असणा-या पक्षांची युती मोडली आणि मित्रपक्ष एकमेकांसमोर शत्रूपक्ष म्हणून उभे राहिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी न-भूतो न-भविष्यती अशी पळवापळवी झाली आणि एकदाचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले.

प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आणि खरी चिखलफेक सुरू झाली. प्रत्येकाने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायला सुरूवात केली की, माझ्या पक्षाने कसं आजवर महाराष्ट्राचं भलं केलं आणि बाकी पक्षांनी कसं वाट्टोळं! लोकसभेच्या निवडणुकीमधे जे-जे मुद्दे मांडले होते त्याची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती घडू लागली. स्थानिक पातळीवरचे उमेदवार ज्यांना आजवर फक्त मोठ-मोठ्या बॅनर्सवर बघितलं होतं ते लोक घरोघर जाऊन प्रत्येकाच्या पाया पडू लागले. आम्ही ह्यावेळेस 'उमेदवार' आहोत हं, लक्षात असू देत,अशी आठवण करून देऊ लागले. गावोगावी जाऊन प्रचारसभा, रस्त्यावरून प्रचारकांनी काढलेल्या बाईक दिंड्या यांनी शहर गजबजून गेलंय आणि मतदान करण्यांसाठी थोडी करमणूक आणि बरीच डोकेदुखी सुरू झाली.

लोकसभेच्या निवडणुकीत एका पक्षाने टेक्नॉलॉजीचा उपयोग अगदी योग्य प्रकारे करून आपलं स्थान यंगस्टर्सच्या मनात पक्क केलं. ते पाहून ह्यावेळेस प्रत्येक पक्षाने आपापली जाहिरात करण्यासाठी सोशल नेटवर्कींग साईट्स ची मदत घेतली आहे. टीव्ही, रेडिओ आणि जमेल त्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याची अहमहिकाच चालू आहे.

पण इतका भडिमार करून खरंच मतदाता योग्य ते मत देऊ शकेल का?

दिल्लीमधे असणा-या सरकारच्या पक्षाला महाराष्ट्रामधे तसंच काम करता येण्यासाठी खरंच त्या ताकदीचा, ह्या मातीतले प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढणारा माणूस मिळाला आहे का?

ह्याआधी जो पक्ष ह्या राज्याची धुरा सांभाळत होता ते लोक त्यांनी केलेल्या(?)कामाचा डंका वाजवतात पण खरी परिस्थिती काय आहे हे इथल्या जनतेला माहित आहे, तरीही त्यांना, आपण निवडून येणारच हा विश्वास कसा काय वाटू शकतो?

उमेदवार किती शिकलेला आहे, त्याला आपल्या न्यायव्यवस्थेची काही जाण आहे की नाही ह्या आपल्याच संविधानामधे सांगितलेल्या नियमांना बगल देऊन त्याची संपत्ती किती आणि त्याच्याकडे किती सोनं वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देऊन उमेदवार ठरवला जातो???

असंही चित्र आहे की, काही पक्ष फक्त निवडणूक होईतो वेगळे झाल्यासारखं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात मतमोजणी नंतर सरकार स्थापन करायची वेळ आली की ते परत एकत्र येतील आणि पहिले पाढे पंच्चावन!

एक पक्ष असाही आहे की जो स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून 'मराठी अस्मिता - मराठी माणूस - मराठी माणसांचं राज्य' इतकेच शब्द बोलत आला आहे. टोलधाडी आणि मतांची फोड करण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम त्यांना करता नाही आलं तरीही, त्यांना हा विश्वास आहे की, जर महाराष्ट्रातून परप्रांतीय पूर्णपणे हाकलले गेले तर तो पक्ष महाराष्ट्राला परत एकदा सोन्याचे दिवस दाखवेल! खरं तर त्या पक्षाला चांगलं माहित आहे की त्यांच्यामधे हे राज्य चालविण्याची धमक नाही ना त्यांना इतका पाठिंबा मिळू शकतो पण, फक्त तोंडाची वाफ दवडली म्हणजे राज्यातल्या जनतेची मत मिळतील हा त्यांचा भ्रम काही अजून दूर होत नाही.

आज मी, एक मतदार म्हणून सध्या पूर्णपणे संभ्रमित आहे! आताच्या घडीला कोणत्याच पक्षाचा उमेदवार असा दिसत नाही की जो खरंच माझ्या भागातल्या, माझ्या शहरातल्या, माझ्या राज्यातल्या समस्यांवर निदान विचार करून पुढे काय करता येईल ह्या दिशेने पाऊल टाकू शकेल.

पण एक मात्र आहे, मतदान तर करायला जायचंच भलेही 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय का निवडावा लागू नये!!!